नवी दिल्ली, 07 : “भारतीय राजकारणातील विद्वान, सुशील सुसंस्कृत व्यक्तिमत्व हरपले आहे,” अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी परराष्ट्र मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त करतांना प्रतिक्रिया दिली.
माजी परराष्ट्र मंत्री तसेच जेष्ठ संसदपटू श्रीमती सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने अकास्मिक निधन झाले. आज बुधवारी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोधी रोड येथील स्मशानभूमीत त्यांचे पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली.
श्रीमती सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘श्रीमती स्वराज कुशल प्रशासक तसेच त्या खंभीर व्यक्ति होत्या. गेल्या पन्नास वर्षाच्या राजकीय वाटचालीत त्यांनी संसदीय राजकारणात स्वत:ची वैशिष्ठपूर्ण ओळख निर्माण केली. केंद्रीय मंत्रीमंडाळातील विविध विभागांचा कार्यभार त्यांनी जबाबदारीने सांभाळला होता. विशेषत: त्यांनी गेली पाच वर्ष परराष्ट्र मंत्रालयाची महत्वाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली होती’.‘देशभरात त्यांची प्रतीमा स्वच्छ होती आणि, मध्यमवर्गीय व गरीबांना आपला वाटावा असा त्यांचा चेहरा होता तसेच त्यांचा चाहतावर्ग ही खुप मोठा होता. त्यांच्या निधनाने आपण ज्येष्ठ नेत्या व मार्गदर्शक गमावल्या आहेत तसेच माझीही वैयक्तिक हानी झाली आहे. श्रीमती सुषमा स्वराज यांचे आपल्यामधून असे अचानक निघून जाणे सर्वांसाठी खूप धक्कादायक व दु:ख दायक आहे’ .
बुधवारी सकाळी त्यांचे पार्थिव जनपथ येथील त्यांच्या निवासस्थानी तसेच दुपारी दीन दयाळ उपाध्याय मार्ग येथील भाजप पक्षाच्या मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती श्री.एम.वेंकैया नायडू, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यासह वरिष्ठ मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी अंतिम दर्शन घेऊन श्रध्दाजंली वाहिली.
000000000000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा
No comments:
Post a Comment