Saturday 21 September 2019

विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर : राज्यात 21 आक्टोंबरला मतदान

                                                       









नवी दिल्ली, 21 :  महाराष्ट्रासाठी  विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. राज्यात 21 ऑक्टोबर 2019  रोजी मतदान पार पडणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी  होणार आहे. 

             येथील ‘निर्वाचन सदन’ या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात आज पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्र आणि हरियाणा  राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच देशातील विधानसभा पोटनिवडणुकीचा  कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त सुशिल चंद्रा आणि अशोक लवासा यावेळी उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रमांच्या या घोषणेने राज्यात आजपासून आदर्श आचार संहिता लागू  झाली आहे.   

     असा आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम

            महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 21 ऑक्टोबर 2019 ला मतदान घेण्यात येणार आहे. 27 सप्टेंबरला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे.  उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर असून 5 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छानणी होणार आहे. 7 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. 21 ऑक्टोबर ला मतदान तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. 27 ऑक्टोबरला  राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबरला संपत आहे. 

                                                 राज्यात 8 कोटी 95 लाख मतदार
        केंद्रीय  निवडणूक आयोगाच्यातवीने  जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार 31 ऑगस्ट 2019 पर्यंत राज्यात मतदारांची  एकूण संख्या  8 कोटी 95 लाख 62 हजार 706 एवढी आहे. 2014 च्या तुलनेत  राज्यातील  मतदान केंद्रांमध्ये 5.61 टक्यांनी वाढ झाली असून यावर्षीच्या विधानसभेसाठी  एकूण 95 हजार 473 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा 28 लाख रूपये ठेवण्यात आली आहे.                                     
                              मतदार व उमेदवारांसाठी ‘हेल्पलाइन’ व ‘ॲप’ची सुविधा

मतदारांच्या मदतीसाठी आयोगाने ‘व्होटर हेल्पलाईन-1950’ सुरु केली आहे. 1950 या क्रमांकावर एसएमएस करून मतदारांना माहिती मिळवता येणार आहे. मतदारांसाठी ‘व्होटर हेल्पलाईन ॲप’ ही सुरु करण्यात आले आहे. उमेदवारांना आपल्या उमेदवारी अर्जाची स्थिती व प्रचार विषयक परवानगीसह अन्य महत्वाची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी ‘सुविधा ॲप’ सुरु करण्यात आले आहे. उमेदवार, राजकीय पक्ष किंवा उमेदवाराच्या वतीने प्रतिनीधी  थेट  https://suvidha.eci.gov.in या संकेत स्थळावर अर्ज करू शकतो व  उमेदवारांना ॲपवर परवानगीबाबतची स्थिती कळू शकणार आहे.   

   आचार संहिता काळात असे असणार नियम

निवडणूक काळात आचार संहितेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश असून उल्लंघन करणा-यांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले आहे. निवडणूक प्रचार काळात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत प्रचारासाठी ध्वनीक्षेपकावर बंदी घालण्यात आली आहे. तर पर्यावरण पुरक प्रचार साहित्य व माध्यमांचा उपयोग करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
संवेदनशील मतदानकेंद्रांवर व्हिडीओग्राफी,सीसी टीव्ही आणि वेबकास्टींग करण्यात येणार आहे.   प्रसार माध्यमांमधून आचार संहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणपत्र नियंत्रण केंद्र  उभारण्यात येणार आहे.
सोशल मिडीयाद्वारे प्रचारासाठी प्रमाणपत्राची आवश्यकता

निवडणूक काळात प्रसारमाध्यमांवरून चुकीची माहिती प्रसारित होऊ नये व अफवांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने महत्वाचे पाऊल उचलेले आहे. त्यानुसार राजकीय पक्षांना फेसबुक, ट्वीटर, युटयूब, व्हाट्सअप आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रचार साहित्य प्रसारित करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून गठीत करण्यात आलेल्या ‘सोशल मिडीया प्रमाणपत्र नियंत्रण केंद्रा’चे प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. असे प्रमाणपत्र नसल्यास सोशल मिडीयावरून प्रचारास बंदी असून, नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.  
                                                               *****
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic

रितेश भुयार /वृत विशेष क्र.219 / दि.21.09.2019



No comments:

Post a Comment