Thursday 19 September 2019

सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र चौथ्या स्थानावर












नवी दिल्ली, 19 : सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र देशात चौथ्या स्थानावर असून  राज्याच्या मत्स्य उत्पादनात वाढ झाल्याचे चित्र आहे, वर्ष २०११-१२ च्या तुलनेत वर्ष २०१७-१८ मध्ये ही वाढ २७ हजार टन आहे.
            केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री गिरीराज सिंह यांनी आज येथील मिडीया सेंटर मध्ये देशातील मत्स्य क्षेत्राची इतंभुत माहिती असणा-या सांख्यिकी  पुस्तिका -२०१८’ चे  प्रकाशन केले.या पुस्तिकेत वर्ष २०११-१२ ते २०१७-१८ पर्यंतची देशातील मस्त्य क्षेत्राशी निगडीत विविध बाबींची माहिती देण्यात आली आहे.
                                          
                                       सागरी मत्स्य उत्पादनात राज्य चौथ्या स्थानावर
            देशात ८ हजार ११८ कि.मी. चा समुद्र किनारा असून महाराष्ट्राला ७२० कि.मी. चा समुद्र किनारा लाभला आहे. समुद्राच्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राने पहिल्या पाच राज्यांमध्ये स्थान मिळवले आहे. वर्ष २०१७-१८ मध्ये राज्यात समुद्राच्या पाण्यातील मत्स्य उत्पादन ४ लाख ७५ हजार टन असून महाराष्ट्र देशात चौथ्या स्थानावर आहे. ७ लाख १ हजार टन उत्पादनासह गुजरात पहिल्या, ६ लाख ५ हजार टन उत्पादनासह आंध्रप्रदेश दुस-या तर ४ लाख ९७ हजार टन उत्पादनासह तामिळनाडू तिस-या स्थानावर आहे. वर्ष २०१७-१८ मध्ये देशातील १३ राज्य-केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण ३६ लाख ८८ हजार टन सागरी मत्स्य उत्पादन झाले आहे. 

                        मत्स्य उत्पादनात २७ हजार टनांची वाढ
        राज्यात गोडया आणि समुद्राच्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात  वाढ झाल्याचे चित्र आहे. वर्ष २०११-१२ मध्ये राज्यात गोडया आणि समुद्राच्या पाण्यातील मत्स्य उत्पादन ५ लाख ७९ हजार टन होते तर वर्ष २०१७-१८ मध्ये मत्स्य उत्पादनात २७ हजार टनांची  वाढ होवून एकूण उत्पादन ६ लाख ६ हजार टन एवढे झाले आहे. वर्ष २०११-१२ पासून प्रत्येक वर्षी राज्याच्या मत्स्य उत्पादनात वाढ झाली आहे.

                               गेल्या आठ वर्षात राज्याला १२८ कोटी वितरीत
        वर्ष २०१०-११ ते २०१७ -१८ अशा एकूण आठ वर्षात महाराष्ट्राला मत्स्य क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून एकूण १२८ कोटी ८६ लाख ८१ हजारांचा निधी वितरीत करण्यात आला. वर्ष २०१०-११ मध्ये राज्याला ७ कोटी १७ लाख ६३ हजारांचा निधी वितरीत करण्यात आला होता. यात वाढ होवून  राज्याला वर्ष २०१७ -१८ मध्ये  २२ कोटी ५६ लाख ८१ हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

                                         राज्यात ५ बंदरांच्या विकासासाठी निधी मंजूर     



            वर्ष २०१७ -१८ मध्ये राज्यातील ५  बंदरांच्या विकासासाठी केंद्राने निधी मंजूर केला आहे. यात अर्नाळा बंदरास ६१ कोटी ५६ लाख, मिरकरवाडा बंदरास ७१ कोटी ८० लाख ८८ हजार, ससुन डॉक बंदराच्या आधुनिकीकरणासाठी ५२ कोटी १७ लाख , कारंजा बंदाराच्या सुधारीत विकास आरखडाच्या अमंलबजावणीसाठी १४९ कोटी ८० लाख तर आनंदवाडी बंदरास ८८ कोटी ४४ लाख रूपये मंजूर झाले आहेत.
                                       
 आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                              
                                                          ०००००
 रितेश भुयार /वृत्त वि. क्र.218/ दिनांक 19.09.2019 
                                             


No comments:

Post a Comment