Monday, 2 December 2019

सिंधुदुर्ग जिल्हयातील ‘भोगवे’ समुद्र किना-याला मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’











नवी दिल्ली, 2 : भोगवे समुद्र किना-याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’ दिले आहे. यामुळे  महाराष्ट्र शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून घोषीत केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. 

            केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाने ‘पर्यावरण अभ्यास संस्था, डेन्मार्क’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेकडून विविध मानकांच्या आधारे भारतातील समुद्र किना-यांचा अभ्यास केला. एकूण 4 उत्कृष्ट मानकांच्या 33  घटकांआधारे ब्लु फ्लॅग प्रमाणपत्रासाठी देशातील सर्वोत्कृष्ट 13 समुद्र किना-यांची निवड करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हयातील भोगवे समुद्र किना-याचा समावेश आहे.

            सिंधुदुर्ग जिल्हयाच्या वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे गावाला कर्ली नदी व समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो. लांबच्या लांब पसरलेली पांढ-या शुभ्र व स्वच्छ वाळूची चौपाटी आणि किना-यावरील माड पोफळीच्या बागा यामुळे समुद्र किना-यावरील  निसर्ग सौंदर्य अधिक देखणे दिसते.याच समुद्र किना-याची ‘पर्यावरण अभ्यास संस्था, डेन्मार्क’ ने एकूण 4 उत्कृष्ट मानकांच्या  33  घटकांआधारे ब्लु फ्लॅग प्रमाणपत्रासाठी निवड केली.

            पर्यावरण शिक्षण आणि माहिती, आंघोळीच्या पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण व्यवस्थापन आणि संवर्धन तसेच सुरक्षा व समुद्र किना-यावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा या प्रमुख चार निकषांवर भोगवे समुद्र किनारा उत्कृष्ट ठरला आहे.
                         केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल राज्य मंत्री बाबुल सुप्रियो यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात  ही  माहिती दिली.
    महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. २६० /  दिनांक 2/12/2019     



No comments:

Post a Comment