Tuesday 25 February 2020

‘कदाचित अजूनही’ काव्य संग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान




नवी दिल्ली, 25 : 'कदाचित अजूनही' या मराठी काव्य संग्रहासाठी प्रसिध्द कवयित्री अनुराधा पाटील यांना आज साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.
येथील कमानी सभागृहात साहित्य अकादमीच्यावतीने  साहित्य अकादमी पुरस्काराचा दिमाखदार सोहळयाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रम सोहळयाचे प्रमुख पाहुणे म्हणुन ज्येष्ठ कवी, लेखक, ‍दिग्दर्शक गुलज़ार उपस्थित होते. यावेळी श्रीमती पाटील यांना  साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार आणि उपाध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते मराठी भाषेतील उत्कृष्ट लेखनासाठी साहित्य अकादमी  वर्ष 2019 च्या पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले. यावेळी अकादमीचे  सचिव डॉ. के. श्रीनिवास राव उपस्थित होते.
'कदाचित अजूनही' या काव्यसंग्रहाविषयी
अनुराधा पाटील यांचा 'कदाचित अजूनही' हा पाचवा काव्यसंग्रह आहे. कदाचित अजूनहीमध्ये आशय विषयाचे वैविध्य ठळक जाणवते. पर्यावरण, माध्यमे, हिंसा, जगण्यात आलेली आक्रमकता आणि अतीवेग यावर कवितांतून त्यांनी भाष्य केलेले आहे. यातील हरेक क्षण अदृश्य सोबत करणाऱ्या मृत्यूबाबत....  . आतल्या काळोखात पाकळी पाकळीनं उमलत गेलेला मृत्यू..’, ‘हजारो पाकळ्यांचं काळं कमळ..या कविता आत्मविश्लेषण करायला लावतात. थकल्या भागल्या संध्याकाळी चारदोन कष्टकरी बायांनी ओवरीवर बसत एकमेकींना चार सुखदु:खाचे बोल सांगावेत, तशी त्यांची कविता आहे. ती खुपणारे आचपेच गडदपणे मांडते; पण किंचितही आवाजी, आक्रस्ताळी होत नाही. तरी वाटय़ाला आलेल्याचा निमूट स्वीकार न करता बदलाचे दानही ती भवतालाकडे मागते अन् म्हणते, ‘बाळाची टाळू भरणारा मायाळू हात त्यांच्याही माथ्यावर असो.. अशा मार्मिक आशयाच्या यामधील कविता आहेत.
            या काव्य संग्रहातील कवितांच्या माध्यमातून संयत विवेकशीलपणे श्रीमती पाटील चांगुलपणाला आवाहन करतात. या संग्रहातील कविता स्त्री दु:खाची दुखरी नस नेमकी पकडून संवादी होतात. या काव्यसंग्रहात राने-वने, झाडे-झुडपे, नद्या-समुद्र-वारे, चंद्र-सूर्य असा निसर्गाचा उल्लेख आहे. या सर्व कविता ग्रामीण, शेती संस्कृती आणि एतद्देशीय पंरपरेशी घट्ट नाते सांगणा-या आहेत. बदलत्या ग्रामीण जीवनाचे चित्रण या काव्य संग्रहात दिसून येते. गावाकडील जीवनाच्या नव्या दु:खी कंगो-यांचे तटस्थ दर्शन कवितेतून घडते. मुंबई येथील शब्द प्रकाशनने 2005 'कदाचित अजूनही' हा 128 पृष्ठांचा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.
अनुराधा पाटील गेल्या 40 वर्षांपासून सातत्याने कविता लिहत आल्या असून दिगंत’, ‘दिवसेंदिवस’, ‘तरीही’, ‘वाळूच्या पत्रात मांडलेला खेळहे त्यांचे प्रसिध्द काव्य संग्रह आहेत.
त्यांना अनेक सन्मानाने सन्मानित करण्यात आलेले आहेत.
संस्कृत भाषेसाठी पेन्ना मधुसूदन यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान
प्रज्ञाचाक्षुषम् या संस्कृत साहित्यातील महाकाव्यासाठी  पेन्ना मधुसूदन यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री मधुसूदन हे कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक नागपूर येथे  संस्कृत भाषेचे प्राध्यापक आहेत. यासह ते भारतीय दर्शन,धर्म आणि संस्कृति या विभागाचे विभाग प्रमुख म्हणुनही कार्यरत आहेत.
प्रज्ञाचाक्षुषम् हे एक महाकाव्य असून ते अव्दितीय विव्दान संत- गुलाबराव महाराज (1881-1995) या जीवन आणि अध्यात्मिक दर्शनवर आधारित आहे. संत नेत्रहीन असूनही त्यांच्या छोटया जीवन काळात त्यांनी मोठे लिखाण केलेले होते. हे महाकाव्य 850 छंदामध्ये आहे.
दोन्ही साहित्यिकांना पुरस्कार स्वरूप 1 लाख रूपये, ताम्रपत्र आणि शालने देऊन गौरविण्यात आले.

No comments:

Post a Comment