Friday, 20 March 2020

नरडवे सिंचन प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी





                       8 हजार हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली 
नवी दिल्ली, 20 : सिंधुदुर्ग जिल्हयातील नरडवे मध्यम सिंचन प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आज पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे प्रकल्पाच्या कामाला गती येणार असून परिसरातील 53 गावांतील  8 हजार 84 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

               सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली तालुक्यात नरडवे गावात ‘नरडवे मध्यम सिंचन प्रकल्प’ असून केंद्राकडे राज्य शासनाने या प्रकल्पाच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. या मंजुरीमुळे परिसरातील  53 गावातील शेतक-यांना फायदा होणार असून 8 हजार 84  हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
           
              नरडवे मध्यम सिंचन प्रकल्पांतर्गत गड नदीवर 123.74 दशलक्ष घन मिटर क्षमतेचे धरण बांधण्यात येत आहे. कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणा-या या प्रकल्पाचा समावेश ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत’ करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे कणकवली तालुक्यातील 40 गाव, कुडाळ तालुक्यातील  5 आणि मालवण तालुक्यातील 8 अशा एकूण 53 गावांतील 8 हजार 84 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.
            या प्रकल्पास आज मिळालेल्या पर्यावरणीय मंजुरीमुळे प्रकल्पाच्या कामास गती येणार असून त्याचा फायदा स्थानिक शेतक-यांना होणार आहे.
                         
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                              http://twitter.com/micnewdelhi                        
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.58/दिनांक २०.०३.२०२०

Tuesday, 17 March 2020

नागपूर एम्स मध्ये बाहयरूग्ण सेवेस सुरुवात













                    
नवी दिल्ली, 17 : नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायंसेस (एम्स)मध्ये बाहय रुग्ण सेवेस सुरुवात झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात दिली .

            केंद्र शासनाने 7 टप्प्यांमध्ये देशभरात एकूण 22 एम्स संस्था उभारण्याचा निर्णय घेतला. यापैकी देशभरात आतापर्यंत भोपाळ (मध्यप्रदेश), भूबनेश्वर (ओडिशा),जोधपूर (राजस्थान), पटना (बिहार), रायपूर (छत्तीसगड) आणि ऋषिकेश (उत्तराखंड) ही 6 एम्स कार्यरत  झाली आहेत.

             देशात महाराष्ट्रातील नागपूर येथील एम्ससह उत्तर प्रदेशात रायबरेली आणि गोरखपूर,आंध्रप्रदेशातील  मंगलागिरी आणि पंजाबमधील भटिंडा एम्स येथील बाहयरूग्ण सेवेस सुरुवात झाली आहे.
                         
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                              http://twitter.com/micnewdelhi                        
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.57/दिनांक १७.०३.२०२०



Friday, 13 March 2020

महाराष्ट्रात गेल्या चार वर्षात 27 हजार नेत्रदान















                       

नवी दिल्ली, 13 : राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीबाधितता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यात गेल्या चार वर्षात 27 हजार 889 नेत्रदान झाले असून आतापर्यंत 74 नेत्रदान केंद्र स्थापित झाले आहेत.

            केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने राज्य शासनांच्या समन्वयातून देशभर ‘राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीबाधितता नियंत्रण कार्यक्रम’ राबविण्यात येतो. वर्ष 2016-2017 ते 2019-20 आर्थिकवर्षानुसार देशातील 36 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये आतापर्यंत 2 लाख 64 हजार 695 नेत्रदान झाले आहेत.
राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीबाधितता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात गेल्या चार वर्षात 27 हजार 889 नेत्रदान झाले आहे. राज्यात वर्ष 2016-17 मध्ये निर्धारीत 7 हजार नेत्रदानाच्या तुलनेत जास्त म्हणजे 7 हजार 514 जणांनी नेत्रदान केले. वर्ष 2017-18 मध्ये निर्धारीत 7 हजार नेत्रदानाच्या तुलनेत 7 हजार 560 तर वर्ष 2018-19 मध्ये  निर्धारीत 7 हजार नेत्रदानाच्या तुलनेत 7 हजार 323 दात्यांनी नेत्रदान केले. वर्ष 2019-20 या चालू आर्थिक वर्षात निर्धारीत 7 हजार 500 च्या तुलनेत आतापर्यंत 5 हजार 492 नेत्रदान झाले आहे. तसेच, गेल्या चार वर्षात देशात एकूण 380 नेत्रदान केंद्र उभारण्यात आले असून महाराष्ट्रात 74 नेत्रदान केंद्र उभारण्यात आले आहेत.

                        केंद्रीय आरोग्य  आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.                      
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                              http://twitter.com/micnewdelhi                        
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.56/दिनांक १३.०३.२०२०



Thursday, 12 March 2020

राजधानीत यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

















                   
         महाराष्ट्र परिचय केंद्रात यशवंतराव चव्हाणांच्या जीवनावरील माहितीपटाचे प्रदर्शन

नवी दिल्ली, 12 : महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली.जयंतीच्या औचित्याने महाराष्ट्र परिचय केंद्रात यशवंतराव चव्हाणांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा माहितीपट दाखविण्यात आला. 
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय  यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त शामलाल गोयल, सहायक निवासी आयुक्त अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
  महाराष्ट्र परिचय केंद्रात यशवंतराव चव्हाणांच्या जीवनावर माहितीपट

महाराष्ट्र परिचय केंद्रात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. यशवंतराव चव्हानांच्या वैविद्यपूर्ण व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकणारा माहितीपट यावेळी दाखविण्यात आला. श्री. चव्हाण यांच्याच दूरदृष्टीतून दिल्लीत महाराष्ट्र परिचय केंद्राची १९६१ मध्ये स्थापना झाली. श्री. चव्हाण यांनी कार्यालय व येथील ग्रंथालयाला दिलेली भेट, परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमातील श्री. चव्हाण यांची उपस्थिती आदी प्रसंगांची दुर्मीळ छायाचित्रेही यावेळी प्रदर्शीत करण्यात आली .

तत्पूर्वी, परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थित अधिकारी- कर्मचारी, पत्रकार, अभ्यागत यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.                           
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                              http://twitter.com/micnewdelhi                        
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.55/दिनांक १२.०३.२०२०


Wednesday, 11 March 2020

लोणावळातील ‘कैवल्यधाम’ केंद्राला आयुष मंत्रालयाचा पुरस्कार



नवी दिल्ली, 11 :  पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील कैवल्यधाम एसएडीटी गुप्ता योगीक रूग्णालय व आरोग्य सेवा केंद्राला आयुष मंत्रालयाचा माहिती तंत्रज्ञानाचा पुरस्कार आज जाहिर झाला आहे.
            येथील आयुष भवनमध्ये केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  विविध श्रेणीमध्ये एकुण पाच व्यक्ती तसेच संस्थांना पुरस्कार जाहिर झाला आहे.  यात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागासाठी  पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील कैवल्यधाम या केंद्राचा समावेश आहे.
आयुष मंत्रालयातंर्गत आर्येुवेद, योगा, नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध्‍ा आणि होमीयोपॅथी या आरोग्य उपचार पद्धतींचा समावेश होतो. यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून समस्यांचे निराकरण करून जोखीम कमी करून योग्य नियोजन  करणा-या संस्थांना पुरस्कार जाहिर झाले असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले.
सोबतच छाननी समितीच्या पुढे झालेल्या सादरीकरणानंतरच पुरस्कारांसाठी नामंकन देण्यात आल्याची माहितीही श्री नाईक यांनी दिली. यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा नावीन्यपूर्ण वापर करून उत्पादनांची तसेच प्रकल्पांची  गुणवत्ता, कार्यक्षमता, प्रक्रिया, प्रभावीता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या संस्थाना तसेच व्यक्तींना हा पुरस्कार जाहिर झाला.
कैवल्यधाम हे केंद्र पुणे जिल्हयातील लोणावळा येथे असून 170 एकरमध्ये  हे केंद्र पसरलेले आहे. या केंद्राची स्थापना  1924 मध्ये स्वामी कैवल्यानंद यांनी केली. येथे आठव्या शतकातील पंतजली अष्टांग योग चे प्रशिक्षण दिले जाते. यासह येथे आर्येुवेद, नॅचरोपॅथी उपचार पद्धती आहेत.

तीन वर्षात महाराष्ट्रातील 11 हजार तरूण भारतीय सेनेत दाखल






नवी दिल्ली, 11 :   गेल्या तीन वर्षात देशभरातील 1 लाख 54 हजार 902 तरूण भारतीय सैन्यात दाखल झाले आहेत, महाराष्ट्रातील 11 हजार 866 तरुणांचा यात समावेश आहे.

             देशातील तरूण मोठया प्रमाणात भारतीय सेनेत दाखल झाल्याचे चित्र आहे. भारतीय सेनेत गेल्या तीन वर्षात झालेल्या विविध रिक्त पदांच्या सैन्य भरतीमध्ये 30 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांतील तसेच नेपाळमधील  सरासरी 95 टक्के  तरूण दाखल झाले आहेत. यात एकटया महाराष्ट्रातील 11 हजार 866 तरुणांचा समावेश आहे.

            वर्ष 2016-17 मध्ये महाराष्ट्रातील 3 हजार 980 तरूण , वर्ष 2017-18 मध्ये  3 हजार 836 आणि वर्ष 2018-19 मध्ये 4 हजार 50 तरुण भारतीय सैन्यात दाखल झाले आहेत.

भारतीय सैन्यात वर्ष 2016-17 मध्ये 52 हजार 86 तरूण दाखल झाले, वर्ष 2017-18 मध्ये 49 हजार 438 तर वर्ष 2018-19 मध्ये 53 हजार 378 दाखल झाले आहेत. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज लोकसभेमध्ये लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. 
                       
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                              http://twitter.com/micnewdelhi                        
 000000  
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.53/दिनांक ११.०३.२०२०

Friday, 6 March 2020

महाराष्ट्रातील दिव्यांग उद्योजकांना राजधानीत उत्तम प्रतिसाद






               
नवी दिल्ली, 6 :  केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्यावतीने राजधानीत आयोजित दिव्यांग उद्योजकांच्या ‘एकम फेस्ट’ प्रदर्शनीत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील उद्योजकांना दिल्लीकर तसेच देश-विदेशातील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.  

            मुंबईच्या चारुशिला जैन-मुरकर, अहमदनगरचे गणेश हनवते आणि दिनकर गरुडे या दिव्यांग उद्योजकांनी कलाकुसरीच्या वस्तू या प्रदर्शनीत मांडल्या आहेत व त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

            केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या राष्ट्रीय अपंग आर्थिक व विकास महामंडळाने(एनएचएफडीसी) येथील बाबाखडक सिंह मार्गवर स्थित ‘स्टेट एम्पोरिया काँप्लेक्स’ भागात ‘एकम फेस्ट’ चे आयोजन केले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गहलोत, सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी आणि महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते  2 मार्च 2020 ला या प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. देशभरातील 17 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांतील 44 पुरूष व 38 महिला  अशा एकूण 82 दिव्यांग उद्योजकांनी यात सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रातून एक महिला व दोन पुरुष दिव्यांग उद्योजक यात सहभागी झाले आहेत.

             या प्रर्शनीत 57 क्रमांकाचा स्टॉल आहे  मुंबईच्या वरळी भागातील चारुशिला जैन-मुरकर यांचा. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांना अस्थिव्यंगत्व आले. या प्रदर्शनीत त्यांचा आर्टीफिशीयल ज्वेलरीचा स्टॉल आहे. येथे रास्त दरात व उत्तम कलाकुसरीच्या वस्तू महिला ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. या स्टॉलवर दिल्लीकरांसह परदेशी महिलांनीही खरेदीसाठी एकच गर्दी केलेली दिसते. एनएचएफडीसीकडून त्यांनी  एकदा 3 लाखांचे व नंतर 5 लाखांचे कर्ज घेतले व वेळेत त्याची परतफेडही केली. यातूनच त्यांनी लंडनमधून 2004 ला हेअर ड्रेसर, ब्युटीशीयन अर्थात बॅपटेकचा डिप्लोमा केला. प्रशिक्षण घेवून आल्यानंतर त्यांनी आतापर्यंत 20 हजारांहून अधिक दिव्यांग महिलांना प्रशिक्षीत केले आहे. दिल्लीत आयोजित होणा-या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा, दिल्ली हाट आणि फरिदाबाद येथील सुरजकुंड शिल्प मेळयातही गेल्या 20 वर्षांपासून पासून त्यांनी सतत सहभाग घेतला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या हल्ली प्रदर्शनीत कमी सहभागी होतात. 2017 मध्ये इंदोर येथील प्रदर्शनानंतर थेट यावर्षी दिल्लीतील प्रदर्शनात त्या सहभागी झाल्या असून ग्राहकांच्या प्रतिसादामुळे त्या समाधानी आहेत.

               ‘एकम फेस्ट’ मध्ये 58 क्रमांकाच्या स्टॉलवर अहमदनगर जिल्हयातील शेवगाव येथील गणेश हनवते यांनी तयार केलेल्या लेदरच्या वस्तूंवर ग्राहकांची गर्दी बघायला मिळते. कॅल्शीयमच्या अभावाने 2003 मध्ये श्री. हनवते यांना अस्थिव्यंगत्व आले, त्यांच्या दोन्ही पायात रॉड टाकण्यात आले आहेत. दिव्यंगत्वावर मात करून त्यांनी पंरपरागत चर्मकार व्यवसाय निवडला. एनएचएफडीसीकडून त्यांनी 1 लाखांचे कर्ज घेतले व त्यातून यंत्र सामुग्री व कच्चा माल खरेदी केला. 2006 ते 2016 पर्यंत सलगपणे श्री. हनवते यांनी   आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा, दिल्ली हाट आणि सुरजकुंड शिल्प मेळयात सहभाग घेतला आहे. त्यांच्या स्टॉलवर उत्तम गुणवत्तेचे व वैविद्यपूर्ण कलाकुसर असलेले चामडयाचे कमर पट्टे (वेस्ट बेल्ट) आणि चामडयापासून निर्मित वस्तू आहेत. आपल्या खास संवाद शैलीतून ते ग्राहकांना स्टॉलवरील माल विकत आहेत व रास्त दरात उत्तम वस्तू मिळत असल्याने ग्राहकांनीही या स्टॉलवर एकचगर्दी केल्याचे चित्र आहे.   

            या प्रदर्शनीत 33 क्रमांकाच्या  स्टॉल वर अहमदनगर जिल्हयाच्या कोपरगाव तालुक्यातील कोल्पेवाडीचे दिनकर गरूडे यांचा मसाले, लोणचे व बिस्कीटांचा स्टॉल आहे. श्री. गरुडे  वयाच्या 8 व्या वर्षी पोलिओग्रस्त झाले. त्यांनी परिस्थिचा नेटाने सामना केला व आज एक उद्योजक म्हणून ते प्रसिध्दीस आले. एनएचएफडीसीकडून त्यांनी 5 लाखांचे कर्ज घेतले. यातूनच त्यांनी व्यवसाय थाटला व त्यासाठी आवश्यक साधन सुविधा उभारल्या. आजुबाजुच्या परिसरात ते आपला माल पोचवतात त्यासाठी चार चाकी गाडयाही त्यांनी विकत घेतल्या आहेत. राज्यात आयोजित विविध प्रदर्शनातही ते सहभाग घेतात  2014 पासून त्यांनी   आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा, दिल्ली हाट आणि सुरजकुंड शिल्प मेळयात सहभाग घेतला आहे.  त्यांच्या स्टॉल वर आंबा व हिरव्या मिरचीचे लोणचे, कांदा-लसून मसाला, मालवणी व गोडा मसाला, तसेच काजू, जिरा, स्टार, क्रिम ,नाचणी अशी वैविद्यपूर्ण बिस्कीटेही आहेत. या स्टॉलवरील मसाल्यांसह बिस्कीट व लोणच्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिासाद  मिळत आहे.    
             9 मार्च 2020 पर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 वाजे  दरम्यान  हे  प्रदर्शन सर्वांसाठी  खुले आहे.

                            महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                                                        000000 

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.51/ दिनांक 6.03.2020 



Thursday, 5 March 2020

‘डेक्कन क्विन’ला जर्मन तंत्रज्ञानाची जोड












                     

  
नवी दिल्ली, 5 : भारतीय रेल्वेच्या वारसा यादीत अग्रणी असणा-या 90 वर्ष जुन्या पुणे-मुंबई शहरांदरम्यान धावणा-या प्रसिध्द ‘डेक्कन क्विन’ रेल्वेगाडीचे रूप आता बदलणार आहे. या गाडीला जर्मनतंत्रज्ञानाधारीत डबे आणि विशेष सुरक्षा व्यवस्था तर राष्ट्रीय प्रारूप संस्थेच्या माध्यमातून (एनआयडी)आकर्षक बाहयरूप, विशेष लोगो अशा सुधारणा करण्यात येणार आहेत.

             ‘डेक्कन क्विन’ या रेल्वे गाडीची सेवा अधिक प्रवासी स्नेही करण्याच्या दृष्टीने मध्यरेल्वेने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार रेल्वेगाडीच्या रुपासह, सुरक्षेवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

                                               ‘डेक्कन क्विन’ मध्ये असे होणार बदल   

       या रेल्वे गाडीच्या ताफ्यात आता जर्मन डिझाईनचे लिंक हॉफमन बुश (एल.एच.बी.) हे विशेष डबे येणार आहेत. हे डबे सुरक्षेच्या आणि आरामदायी प्रवासाच्यादृष्टीने महत्वाचे आहेत. यासोबतच एल.एच.बी डब्यांचे बाहयरूपही आकर्षक बनविण्यात येणार आहे. त्यामुळे सद्याच्या निळया- पांढ-या व लाल रंगातील ही रेल्वे गाडी अधिक आकर्षक रूपात प्रवाशांच्या दिमतीस येणार आहे. प्रवशांना या रेल्वेगाडी विषयी असणारा जिव्हाळा लक्षात घेता बाहयरूपाचे प्रारूप तयार करताना विविध माध्यमांतून प्रवशांची मतं व सूचना घेण्यात आल्या आहेत. यासर्वांच्या आधारे आणि प्रवाशांच्या पसंतीक्रमाधारे मध्यरेल्वेने तयार केलेल्या एकूण प्रारूपापैकी योग्य त्या प्रारूपाची निवड करण्यात येईल.   

            वेगळी ओळख सांगणा-या डेक्कन क्विनसाठी विशेष लोगोही तयार करण्यात येणार आहे. जागतिक वारसा लाभलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या धर्तीवर हा लोगो तयार करण्यात येत असून मध्यरेल्वेने तयार केलेल्या 8 वेग-वेगळया रेल्वे डब्यांच्या बाहयस्वरूपाचे प्रारूप आणि लोगो रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार अहमदाबाद येथील राष्ट्रीय प्रारूप (डिझाइन) संस्थेकडे पाठविण्यात  आले आहेत. या संस्थेच्या पथकाने डेक्क्न क्विनला भेट दिली व प्रवाशांच्या भावनाही जाणून घेतल्या. एनआयडीचे हे पथक या महिन्यातच आपला अहवाल सोपवणार आहे.

            वर्ष 1930 पासून प्रवशांच्या सेवेत रूजू झालेल्या डेक्कन क्विनच्या नावे महत्वपूर्ण विक्रम आहेत. यात देशातील पहिली सुपर फास्ट ट्रेन होण्याचा बहुमान, पहिली लांब पल्ल्याची इलेक्ट्रीक ट्रेन, महिलासांठी स्वतंत्र डबा असणारी देशातील पहिली ट्रेन आणि डायनींग कार प्रमाणे आसनव्यवस्था असणारी देशातील पहिली ट्रेन होण्याचा बहुमानही या रेल्वे गाडीने मिळविला आहे.

                            महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                                                        000000 

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.50/ दिनांक 5.03.2020 



Wednesday, 4 March 2020

महाराष्ट्रातील चार कलाकारांना ‘राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार’







                     राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान    
           
नवी दिल्ली, 4 : ललित कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी महाराष्ट्रातील चार कलाकारांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.

            सोलापूर येथील तेजस्विनी सोनवणे आणि मुंबई येथील सागर कांबळे, रतनकृष्ण साहा, दिनेश पांडया यांना यावेळी राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

            केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात आज 61 व्या राष्ट्रीय ललितकला अकादमी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल, मंत्रालयाचे सचिव योगेंद्र त्रिपाठी  आणि  ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ. उत्तम पाचारणे यावेळी उपस्थित होते.

            61 व्या राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कारासाठी  देशभरातून 5 हजार कलाकारांचे अर्ज  प्राप्त झाले होते, यातील 15 सर्वोत्कृष्ट कलाकारांची निवड करून त्यांना आजच्या समारंभात सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चार कलाकारांना यावेळी गौरविण्यात आले. 2 लाख रूपये, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

            तेजस्विनी सोनवणे यांना प्रिंट मेकींग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. तेजस्विनी सोनवणे यांनी पुण्यातील भारती विद्यापीठाच्या फाईन आर्ट महाविद्यालयातून बॅचलर ऑफ फाईन आर्टचे तर मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथून मास्टर ऑफ फाईन आर्टचे शिक्षण पूर्ण केले. मुंबई, दिल्ली,पटना,कोलकत्ता,भुवनेश्वर,खजुराहो येथील चित्रपद्रर्शनात त्यांनी सहभाग घेतला. 2017 मध्ये दक्षिण कोरियातील बुसान शहरात आयोजित आंतरराष्ट्रीय आर्ट फेअरमध्येही त्यांनी सहभाग घेतला आहे.

            मुंबईतील डोंबिवली(पूर्व)येथील सागर कांबळे यांना पेंटींगश्रेणी मध्ये उत्कृष्ट कार्यासाठी गौरविण्यात आले. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून क्रिएटीव्ह पेंटींगचे शिक्षण पूर्ण करून सागर कांबळे यांनी कलाक्षेत्रातील प्रवास सुरू केला. देशभरात आयोजित क्रिएटीव्ह पेंटींगच्या कार्यशाळांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. देश-विदेशातील महत्वाच्या संस्थांच्यावतीने आयोजित प्रदर्शनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. कलाक्षेत्रातील योगदानासाठी त्यांना 24 हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

            मुंबईच्या सायन येथील  रतनकृष्ण साहा यांना मुर्तीकलेतील उत्कृष्ट योगदानासाठी गौरविण्यात आले. श्री. साहा यांनी बडोदा येथील एम.एस.विद्यापीठातून मूर्तीकलेचे शिक्षण पूर्ण केले. मुंबई, दिल्ली, कोलकत्ता या शहरांमध्ये त्यांनी मुर्तीकला प्रदर्शनी लावली. ब्रिटेन आणि अमेरिकेतील मुर्तीकलेच्या समुह प्रदर्शनातही त्यांनी सहभाग घेतला. मुर्ती कलेतील योगदानासाठी त्यांना विविध राज्यांचे पुरस्कार व शिष्यवृत्या मिळाल्या आहेत.

            मुंबईतील घाटकोपर(पश्चिम) येथील दिनेश पांडया यांना आर्ट फोटोग्राफीतील उत्कृष्ट योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मधून त्यांनी  शिक्षण पूर्ण केले. मुंबई, बेंग्लुरु आणि चेन्नई आणि लंडनमध्ये त्यांनी चित्रप्रदर्शन लावले. त्यांनी देश-विदेशातील 15 समुह चित्रप्रदर्शनात सहभाग घेतला. 1989 मध्ये त्यांना ब्रिटीश कॉन्सीलची फेलोशिफ मिळाली आहे.  

            राष्ट्रीय ललित कला अकादमीच्यावतीने दिल्लीतील मुख्यालयात 4 ते 22 मार्च 2020 दरम्यान आयोजित 61 व्या राष्ट्रीय ललित कला अकादमी प्रदर्शनीत पुरस्कार प्राप्त 15 कलाकारांसह एकूण 284 कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शती करण्यात येणार आहेत.    
                             महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.49/  दिनांक 4.03.2020