Monday 7 December 2020

दिवाळी अंकांमुळे ‘दिवाळी’ बौध्दिक सण : जीवन तळेगावकर

 











नवी दिल्ली, 7 : दिवाळी अंकांमुळे दिवाळी हा बौध्दिक सण असल्याचे मनोगत जीवन तळेगावकर यांनी दिवाळी विशेषांक प्रदर्शनीच्या उद्घाटन कार्यक्रमात व्यक्त केले.

    महाराष्ट्र परिचय केंद्रात आज दिवाळी विशेषांक प्रदर्शनाचे उद्घाटन लेखक व कवी  जीवन तळेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री तळेगावकर यांचे स्वागत केले. यासह त्यांना दिवाळी विशेषांकाचा एक संचही भेट स्वरूपात देण्यात आला. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर, कमलेश पाटील,  ग्रंथपाल रामेश्वर बरडे तसेच कार्यालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

            दिवाळी हा सर्वसामान्य भारतीयांचा प्रमुख सण म्हणुन देशभर साजरा केला जातो.   महाराष्ट्रात दिवाळी निमित्त निघणा-या  दिवाळी विशेषाकांच्या पंरपरेमुळे आता या सणाला बौध्द्कितेची जोड लाभली आहे. महाराष्ट्रात आणि देशभर जिथे मराठी लोक राहतात तिथुनही विशेषांक प्रकाशित केले जातात. असे जवळपास 1500 विशेषांक दरवर्षी प्रकाशित होत असल्याचे श्री तळेगावकर म्हणाले. यंदा कोरोणा मुळे काही विशेषांक प्रकाशित झालेत तर काहींनी आपली कुस बदलून डिजीटल स्वरूपात प्रकाशन केले. डिजीटल स्वरूपातीलही दिवाळी अंकाना मागणी असल्याचे श्री तळेगावकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रात 1909 पासून सुरू झालेल्या दिवाळी विशेषाकांची पंरपरा आज 111 वर्षापर्यंत पोहोचली.  दिवाळी विशेषांक हा अक्षर सोहळा म्हणुन आता दरवर्षी साजरा होत आहे. वाचकांच्या अभिरूचींना जपत आज जवळपास सर्वच  विषयांवर दिवाळी अंक बाजारात  उपलब्ध आहेत. दिवाळी अंकांमुळे नवोदित लेखकांपासून तर प्रतिष्ठित लेखकांपर्यंतचे विविध विषयांवरील लेखन यामध्ये कथा, कविता, तसेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवरील लेख  एकाच अंकात वाचण्याची पर्वणी यानिमित्ताने मिळत असल्याचेही श्री तळेगावकर यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने विशेषांक प्रदर्शन ही येथील वाचकांसाठी वाचन महोत्सव असून दिल्ली परिसरातील वाचकांनी याचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री तळेगावकर यांनी यावेळी केले.

            श्री जीवन प्रकाश तळेगावकर मुळचे नांदेडचे आहेत. तांत्रिक क्षेत्रात काम करीत असूनही विविध विषयांवर ते लिहीत असतात.  कामानिमित्त होणा-या परदेशी दौ-यावर आधारित प्रवासवर्णन दै. उदयाचा मराठवाडा प्रकाशित करीत आहेत. यासह अक्षरनामा या समाजमाध्यमामध्ये विविध विषयांवर ते लिहीत असतात.

अंडर द शॅडो ऑफ विसडम ट्री हे पुस्तक आणि जागतिकीकरणाच्या प्रतीक्षेत मराठी हा कविता संग्रह आहे. या कविता संग्रहातील   साहित्य विषयावरील  माय तत्त्वापासून दूर नेणारं माया तत्त्व अध‍िक दूर......उमेद भरणारं  ! या कवितेचे वाचन त्यांनी यावेळी केले.  श्री तळेगावकर यांनी लिहीलेल्या पुस्तकांच्या प्रती  महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट स्वरूपात दिल्या.

वाचकांसाठी दिवाळी विशेषांकाचे दालन खुले

महाराष्ट्र परिचय केंद्रातील ग्रंथालयात दिवाळी विशेषांकाचे दालन आजपासून सर्व वाचकांसाठी खुले आहे. यावर्षीच्या  दिवाळी विशेषांकामध्ये धनंजय, जत्रा, साधना, सामना, आवाज, अक्षरधारा, किशोर, प्रपंच, छावा, मैत्र, निनाद, हंस, ऋतुरंग, स्वरप्रतिभा, अंतर्नाद‍ असे एकापेक्षा एक सरस अंक आहेत. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत ग्रंथालयातील वाचक सदस्यांसाठी दिवाळी अंक उपलब्ध राहतील.

 

No comments:

Post a Comment