Saturday, 27 February 2021

राजधानीत संत रविदास महाराज आणि कव‍िश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती साजरी



नवी दिल्ली दि. 27 :  संत रविदास महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राजशिष्टाचार आणि गुंतवणुक आयुक्त निधी पांडे  यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

परिचय केंद्रात संत रविदास आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती साजरी

महाराष्ट्र परिचय केंद्रात आज संत रविदास आणि वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी परिचय केंद्राचे उपंसचालक दयानंद कांबळे,  दै. सकाळ नवी दिल्लीच्या वृत्त विभागाचे  प्रमुख अनंत बागाईतकर, प्रतिनिधी मंगेश वैंशपायन यांनी संत रविदास आणि कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्प अपर्ण अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी  अंजु निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार, ग्रंथपाल रामेश्वर बर्डे तसेच उपस्थित कर्मचा-यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Friday, 26 February 2021

कथ्थक नृत्याविष्कारातून कुसुमाग्रजांना अभिवादन

 




नवी दिल्ली,दि.26 : कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितांचा अर्थ उलगडणारा पदन्यास आणि प्रभावी रूपबंधाने नटलेला नृत्याविष्कार सादर करीत पुण्यातील नृत्यांगना नेहा मुथियान यांनी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या अहि-नकुल आणि आगगाडी व जमीन या कविता  नृत्यभाषेतून सादर करून अभिवादन केले आहे.   

 

                महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने 'मराठी भाषा गौरव दिना'चे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितावाचन उपक्रमांतर्गत कथ्थक नृत्यांगना नेहा मुथियान आणि त्यांच्या शिष्यांनी   कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारीत कथ्थक नृत्याविष्कार सादर केला. महाराष्ट्रासह देश- विदेशातील मराठी साहित्य रसिकांसाठी मराठी भाषा गौरव दिना निमित्त ही अनोखी भेटही ठरली आहे.


नेहा मुथियान यांचे कथ्थक नृत्य खालील लिंकवर

https://twitter.com/MahaGovtMic/status/1365299282765520898?s=19

https://twitter.com/micnewdelhi/status/1365288965771681794?s=19

https://twitter.com/MahaMicHindi/status/1365304293457231873?s=19

https://youtu.be/6HlTzWfsaz0

 

                      वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांनीमराठी साहित्यात दिलेल्या भरीव योगदानाचा कृतज्ञभाव व्यक्त करण्यासाठीमराठी भाषा गौरव दिनाचेऔचित्य साधत परिचय केंद्रानेत्यांच्याकविता वाचन उपक्रमाचे आयोजन केले. १३ फेब्रुवारी २०२१ पासून सुरु झालेल्या या उपक्रमांतर्गतमलेशिया,ऑस्ट्रेलिया या देशांसह कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, तेलंगणा, दिल्ली या राज्यांतून आणि महाराष्ट्रातून गडचिरोली ते सिंधुदुर्ग अशा विविध भागांतून सहभागी ५० साहित्य रसिकांनीकविता वाचन केले. कार्यालयाच्या ट्विटर, फेसबुक, युटयूब, इंस्टाग्राम आदीं समाज माध्यमांद्वारे यास  प्रसिध्दी देण्यात आली. गडचिरो जिल्हयातील कुरखेडा येथील साडेतीन वर्षांची विनंती झाडे हिच्यासह लहान मुलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. कला, साहित्य, नाटय,शिक्षण आदी क्षेत्रातील ८५ वर्षांच्या साहित्य रसिक या उपक्रमात सहभागी झाले. या उपक्रमांतर्गत कुसुमाग्रजांच्या जयंती दिनाच्या पूर्व संध्येला कथ्थक नृत्यांगना नेहा मुथियान आणि त्यांच्या शिष्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारीतअप्रतिम नृत्याविष्कार सादर केला आहे.

              नृत्यांगना नेहा मुथियान आणि त्यांच्या शिष्यांनी कुसुमाग्रजांच्या बहुप्रसिध्द विशाखा काव्य संग्रहातील अहि-नकुल आणि आगगाडी व जमीनया कवितांवर आधारीतकथ्थकनृत्याविष्कार  सादर केला. कधी नागाने घातलेला विळखा तर कधी नकुलाने अर्थात मुंगुसाने त्याच्यावर केलेला प्रहार आणि आगगाडीच्या गर्वाला अचानक मातीने दाखविलेले सामर्थ्य या दृष्यातून जन्मलेली नृत्यभाषा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या सोशल मिडीयावर अवतरली आहे.

                                             कथ्थकच्या माध्यमातून रंगला संग्राम

                    कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी अहि नकुल या कवितेतून ब्रिटिश राजसत्ता आणि भारतीय जनता असा संघर्ष नाग आणि मुंगुसाचे प्रतिक वापरून मांडले आहे. कुसुमाग्रजांच्या भारदस्त शब्दांनी मनामनांमध्येनिर्माण केलेल्या या संग्रामाचे चित्र या कलाकारांनी नृत्याविष्काराच्या माध्यमातून दृष्यस्वरूपात समर्थपणे मांडले आहे. अन्यायाची सीमा गाठली जाते तेव्हा हतबलताही बलवान ठरते आणि मदांध सत्तेविरूध्द विद्रोह करते हा भाव कलाकारांनी उत्तम पदन्यासातून दर्शविला आहे.

       ओतीव विखारी वातावरणी आग!

        हा वळसे घालीत आला मंथर नाग.... या ओळींतून प्रतीत होणारी नागाची प्रक्षोभकवृत्ती नृत्याविष्कारातून उत्तमरित्या मांडली आहे. कुसुमाग्रजांनी या कवितेत वज्र, गर्भरेशमी पोत, मादक वस्त्र, अग्नीचा ओघळ, कनकाची कटयार, मल्हारतान अशा एकापेक्षा एक सकस कल्पना योजल्या आहेत व कथ्थक नृत्याच्या माध्यमातून कलाकारांनी या कल्पना हुबेहूब साकारल्या आहेत.

                  आगगाडी व जमीनच्या माध्यमातून अन्यायाविरुध्दचे बंड

जीवन लहरी छंदात बांधलेल्याआगगाडी व जमीन या कवितेतून कुसुमाग्रजांच्या विशिष्ट शैलीचा प्रत्यय येतो आणि याच शब्दछटा नृत्याविष्कारात प्रतिबिंबीत झाल्या आहेत.ही कविता रूपकात्मक आहे. समाजात उच्चवर्गाकडून होणारे शोषण आणि या शोषणाविरूध्द निम्नवर्गीयांनी उभारलेले बंड ही या कवितेतील मध्यवर्ती कल्पना पदन्यास व रूपबंधातून नृत्याविष्कारात अवतरली आहे. या दोन्ही नृत्याची मूळ संरचना नेहा मुथियान यांच्या गुरु शांभवी दांडेकर यांची आहे.


महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटरहॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi

Wednesday, 24 February 2021

महाराष्ट्राला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे तीन पुरस्कार प्रदान






   
          

नवी दिल्ली,दि.24 :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत भौतिक तपासणी आणि तक्रार निवारणाच्या उल्लेखनीय कार्यासाठी केंद्रीय कृषी व कृषी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते आज महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुणे आणि अहमदनगर जिल्हयांनाही प्रथम क्रमाकांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीयोजनेच्या द्विवर्षपूर्ती निमित्ताने केंद्रीय कृषी व कृषी कल्याण मंत्रालयाच्यावतीने येथील पुसा कॉम्प्लेक्स परिसरातील ए.पी.शिंदे सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या योजने अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे राज्य व निवडक जिल्ह्यांना केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते यावेळी पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्राला एकूण तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले.

केंद्रीय कृषी व कृषी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी , केंद्रीय कृषी सचिव संजय अग्रवाल, महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्यासह उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश , अरूणाचल प्रदेश या राज्यांचे कृषी मंत्री यावेळी उपस्थित होते.

 

                    राज्याच्या कृषी विभागाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत भौतिक तपासणी आणि तक्रार निवारणाच्या उल्लेखनीय कार्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आणि कृषी आयुक्त धिरज कुमार  यावेळी उपस्थित होते.

 

यायोजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी ५ टक्के लाभार्थींची  तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाकडून महाराष्ट्र राज्यात ४,६८,७४७ शेतकऱ्यांची जिल्हा, तालुका व गाव निहाय यादी प्राप्त झाली होती. त्यातील  ९९.५४ टक्के लाभार्थ्यांची भौतिक तपासणी पूर्ण करून राज्याने देशात उत्कृष्ट कार्य केले.तसेच राज्यात या योजनेसंदर्भातजवळपास ३८९९१ तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. त्यापैकी २३६३२ तक्रारींचानिपटारा करण्यात आला. या दोन्ही उल्लेखनीय कार्याची पावती म्हणून महाराष्ट्राला या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

                          पुणे आणि अहमदनगर जिल्हयांचाही सन्मान

या योजनेंतर्गत तक्रार निवारणात उत्कृष्ट कार्य करत देशातील उत्कृष्ट जिल्हा ठरलेल्या पुणे  जिल्हयाला यावेळी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख  आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे  यांनी पुरस्कार स्वीकारला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीयोजनेंतर्गत पुणे जिल्ह्याने प्राप्त २२७८  तक्रारींपैकी २०६२  तक्रारींचा निपटारा करून देशात प्रथम क्रमांक पटकाविला .

या योजनेंतर्गत लाभार्थी भौतिक तपासणीच्या कामात देशात सर्वोत्कृष्ट जिल्हयाचा मान पटकाविणा-या अहमदनगरजिल्हयाला यावेळी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अहमदनगर जिल्ह्याने लाभार्थी भौतिक तपासणी अंतर्गत २८८०२ लाभार्थी पैकी सर्वच अर्थात १०० टक्के तपासणी पूर्ण करून देशात उल्लेखनीय कार्य केले आहे.

 

महाराष्ट्रात आतापर्यंत १.१४ कोटी शेतकऱ्यांनीप्रधानमंत्री किसान सन्मान निधीयोजनेत नोंदणी केली असून आतापर्यंत साधारण १.०५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ११६३३ कोटी रुपये जमा झाले आहेत.

 

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटरहॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi

                                                              000000 


 

Tuesday, 23 February 2021

यंदाच्या खरीप हंगामासाठी महाराष्ट्राला मागणीप्रमाणे खत पुरवठा करावा



 

 कृषीमंत्री दादाजी भुसे यांची केंद्रीय खते व रसायने मंत्र्यांकडे मागणी

 

नवी दिल्‌ली,  दि. 23 : महाराष्ट्रासाठी या वर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यक असणारा खत पुरवठा वेळेवर आणि मागणीप्रमाणे करावा, अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे आज केली.

 

            कृषीमंत्री श्री.भुसे आज नवी दिल्ली येथील दौऱ्यावर गेले असून त्यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांबाबत त्यांनी चर्चा केली. राज्याचे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यावेळी उपस्थित होते.

 

            राज्याला खरीप हंगामासाठी सुमारे 44.50 लाख मेट्रीक टन खताची आवश्यकता असून त्याचा पुरवठा केंद्राकडून केला जातो. खरीप हंगामासाठी जून आणि जुलै महिन्यात खताला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये जून ते ऑगस्ट या कालावधीत खत पुरवठा विस्कळीत झाला होता. यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्य शासन 2 लाख मेट्रीक टन युरियाचा अतिरिक्त साठा करणार असून विविध खतांची सुमारे 44.50 लाख मेट्रीक टन खत पुरवठ्याची मागणी केंद्र शासनाकडे आज झालेल्या भेटीत करण्यात आली आहे. खतांचा पुरवठा वेळेत व्हावा अशी विनंती श्री.भुसे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे  केली. ज्या महिन्यामध्ये पिकाच्या गरजेप्रमाणे खताची मागणी आहे त्याप्रमाणे वेळेवर आणि पुरेसा खत पुरवठा व्हावा, असेही श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.

पालघर राष्ट्रीय महामार्गाची पुनर्रचना व्हावी : कृषी मंत्री दादाजी भुसे

 













नवी दिल्ली, : राज्याचे कृषी मंत्री आणि पालघरचे पालक मंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय भुपृष्ठ आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन पालघर राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक 160 ची नियमानुसार पुनर्रचना व्हावी, अशी मागणी केली. 

 श्री भुसे यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय वाणीज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, केंद्रीय वस्त्रोउद्योग मंत्री स्मृती इरानी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

 

            श्री भुसे यांनी केंद्रीय मंत्री श्री गडकरी यांच्या निवासीस्थानी त्यांची भेट मंगळवारी सांयकाळी घेतली. यावेळी पालघर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 च्या पुनर्रचना व्हावी असा प्रस्ताव सादर केला. मुंबई-नाशिक आणि मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्वाचा हा राष्ट्रीय महामार्ग 217 किलो मिटरचा आहे.या महामार्गावर जड वाहानांचे  सतत वहन होत असल्यामुळे या मार्गाची पुनर्रचना होणे गरजेच आहे. यासोबतच या महामार्गाचे त्र्यंबकेश्वर, जव्हार, नाशिक असे थोडे रूंदीकरण व्हावे अशीही श्री भुसे यांनी बैठकीत मागणी केली.   यामुळे या परिसरात  असणा-या तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाला हा महामार्ग पुरक ठरेल.

            यासह कोथरेडीगज-सतना-मालेगाव-चाळीसगाव हा राज्य महामार्ग क्रमांक 19 हा दुपरी रस्ता चौपदरी करावा अशी मागणी केली. राज्य महामार्ग 19 मालेगाव ग्रामीणला जोडून असल्यामुळे  गुजरात, राजस्थान आणि दक्ष‍िणेकडे तमिळनाडू आणि कर्नाटकाला जातो. या महामर्गावर जड वाहनांची गर्दी होत असल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो. त्यामुळे या दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण हे सीआरएफ  निधीतून करावे अशी मागणी श्री भुसेंची बैठकीत केली.

 

केंद्रीय संरक्षण विभागातर्फे नाशिकमध्ये सुसज्ज रूग्णालय द्यावे

              भारतीय संरक्षण दळातील  विविध लष्करी तुकड्यांमध्ये सैनिक म्हणून नाशिक जिल्ह्यातील  लोकांचा मोठया प्रमाणात समावेश आहे. याठिकाणी निवृत्त सैनिक, सैनिकांची कुटुंबे आहेत. त्याच्यासाठी अद्यावत असे रूग्णालय नाशिक जिल्ह्यात असावे, अशी मागणी  केंद्रीय संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंग यांच्याशी झालेल्या बैठकीत श्री भुसे यांनी केली.            

 

केंद्रीय वाणीज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून द्राक्ष्यांवरील अनुदानाचे पुर्नविलोकन व्हावे

 

केंद्रीय वाणीज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून  द्राक्ष्यांवरील अनुदानाचे पुर्नविलोकन व्हावे, अशी मागणी श्री भुसे यांनी केंद्रीय वाणीज्य आणि उद्योग  मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन केली. 2018-19 आणि 2019-20 मध्ये 7 टक्के आणि 5 टक्के असे अनुदान दिले होते. परंतु 31 डिसेंबर 2020 पासून अनुदान मिळणे बंद झाले आहे. याचा विपरीत परिणाम द्राक्ष शेतीवर  होत आहे. त्यामुळे शेतक-यांचे नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेता यावर्षी अनुदान पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी मागणी श्री भुसे यांनी यावेळी केली. त्यांनी या संदर्भात निवेदनही दिले.

 

नाशिकमध्ये टेक्सटाईल पार्कची मागणी

नाशिक जिल्ह्यात मोठया प्रमाणात हातमागाचे काम होत असून याठीकाणी टेक्सटाईल पार्क उभारण्यात यावा, अशी मागणी श्री भुसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांना निवेदन देऊन केली.

राजधानीत संत गाडगे महाराज जयंती साजरी







नवी दिल्ली ,दि. 23 : क्रातिकारी संत थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली.

 कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 महाराष्ट्र परिचय केंद्रात संत गाडगे महाराजांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहीली. यावेळी माजी सहसचिव चंद्रकांत जाधव आणि विधीमंडळाचे माजी जनसंपर्क अधिकारी विठ्ठल जाधव यांच्यासह उपस्थित कार्यालयातील अधिकारी-कर्मचा-यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.  

  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi

                                                              000000

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.33/  दिनांक  23.02.2021

 

 

 

 

Thursday, 18 February 2021

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने शिवजयंतीनिमित्त ‘शिवरायांचे संघटन कौशल्य’ विषयावर ऑनलाईन व्याख्यान




                

नवी दिल्ली, 18 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391 व्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने शिवाजी महाराजांचे चरित्र अभ्यासक तथा वक्ते गणेश आष्टेकर यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन सर्वांना करण्यात येतआहे.

            जनतेचा राजा , स्वराज्य निर्माता तथा महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रासह देश-विदेशात मोठया उत्साहात साजरी करण्यात येते. शिवरायांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या वेगवेगळया पैलुंची माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने परिचय केंद्राने शिवरायांचे संघटन कौशल्य विषयावर डोंबीवली (ठाणे) येथील शिवाजी महाराजांचे चरित्र अभ्यासक तथा वक्ते गणेश आष्टेकर यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे.  

 

                               सकाळी 9 वाजता समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण होणार

        शुक्रवार 19 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 9 वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल व फेसबुकहून व्याख्यान थेट प्रसारीत होईल. अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत  आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे  ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share  वरून पाहता येणार आहे. 

   

                     आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     

                                                                        00000

रितेश भुयार  /वृत्त वि. क्र. 29  /  दिनांक  18.02.2021