नवी दिल्ली, ३१ मार्च : महाराष्ट्राला लोककलेचा समृध्द वारसा लाभला आहे. राज्याच्या विविध भागात रूजलेल्या लोककलांनी अन्यायाविरूध्द बंड उभारण्यासाठी व समाजाला शिक्षीत करण्यासाठी प्रबोधनाची परंपरा समर्थपणे चालविली आहे, असे मत प्रसिध्द लोककलावंत तथा मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभाग प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांनी आज मांडले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव
व्याख्यानमालेचे तेरावे पुष्प गुंफताना ‘महाराष्ट्रातील लोककला
आणि प्रबोधन’ या विषयावर डॉ. चंदनशिवे बोलत होते.
लोककलेची पाळमूळ महाराष्ट्राच्या
मातीत खोलवर रूजली आहेत. लोककला या भक्ती प्रधान, रंजनप्रधान आणि विधी प्रधान या
त्रिसुत्रांवर आधारीत असून मौखिक पध्दतीने एका पिढीकडून दुसरीकडे संक्रमीत होत
गेली. लोककला या धार्मिकतेशी जोडलेल्या असल्यातरी त्यांनी प्रबोधनाचे महत्वपूर्ण
कार्य केल्याचे सांगून डॉ. चंदनशिवे यांनी भारुड, गोंधळ,आंबेडकरी जलशातील कवण, लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे यांच्या कवणांचे सांगितिक
सादरीकरण केले.
गोंधळ,जागरण,भारूड,पोवाडा,दशावतार,खडीगंमत,जाकडी,किर्तन,लळीत,नमन,खेडे
अशी प्रांतपरत्वे अनेक विधी नाटय, ग्रामविधीचे कला प्रकार महाराष्ट्राच्या भूमित
पहायला मिळतात. या प्रत्येक कला प्रकाराचे आपापले
स्वतंत्र अस्तित्व असल्याचे डॉ. चंदनशिवे म्हणाले.
भक्ती-रंजन-विधी
या त्रिसुत्रीवर लोककलेचा डोलारा
लोकरंजन
व प्रबोधन कार्य करणा-या लोककला या धार्मिकतेशी जोडलेल्या असून भक्ती प्रधान,
रंजनप्रधान आणि विधी प्रधान या त्रिसुत्रांवर आधारीत आहेत. या कार्यात महाराष्ट्रातील संतांनीही मोठे योगदान दिले. १२
व्या शतकात चक्रधर स्वामींनी लिळाचरित्र ग्रंथाच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन
केले. यानंतर आलेल्या वारकरी संप्रदायामध्ये
संत ज्ञानेश्वरांपासून सावता, सेना,
तुकाराम, एकनाथ, नामदेव, जनाबाई, बहिणाबाई या
संतांनी मराठीची समृध्द परंपरा आपल्या अभंग, भारुड,
विरहिणी,गौळणीतून मांडल्याचे डॉ. चंदनशिवे
म्हणाले.
संत एकनाथांचे भारुड
संत एकनाथांनी ‘भारूड’
लिहीली. त्यांनी बहुजनांच्या मनावर गारुड केलं
ते बहुजनांच्या मनावर आरुढ झाल म्हणून ते बहुजनांमध्ये बहुरुढ झाले त्यामुळेच या
रुपकाला ‘भारुड’
म्हणण्याची परंपरा आहे. संत एकनाथांनी
आपल्या भारुडात बुरगुंडा, एडका,
कंजारीन, वडारीन, वैदीन असे वेगवेगळे रूपक मांडले.
अशिक्षीत समाजाला कर्मकांडातून बाहेर काढण्यासाठी एकनाथांनी लिहीलेल्या ‘भूत जबर मोठं ग बाई.....’ या
भारुडाचे सांगितिक सादरीकरून डॉ. चंदनशिवे यांनी या भारुडातील संदेशही यावेळी
उलगडून दाखवला.
गोंधळ,
जागरणाची परंपरा
विधी नाटक,
भक्ती नाटकातून कुळाचार करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. कुळधर्म
कुळाचारानुसार इष्टदेवतेला आळवणी करण्यासाठी गोंधळ,जागरण करण्यात येतो. आई
अंबाबाईच्या साडेतीन शक्तीपीठाचा श्गोंधळ घातला
जातो तसा खंडोबाला पुजण्यासाठी ‘वाघ्या मुरळी’चे
जागरण घालण्याचीही परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले.
‘...मोरेश्वर गणपती गोंधळा ये, तुळजापूर भवानी गोंधळा ये, कोल्हापूर अंबाबाई गोंधळा ये ....’ या
गोंधळाचे सांगितिक सादरीकरण केले.
गोंधळ या विधीनाटयात स्पुट पदे,
निरुपण यातून देविचा महिमा गाण्याची परंपरा आहे. गोंधळाच्या पूर्व रंगात गण,आवाहन,
स्पुटपदे तर उत्तररंगात देविचे आख्यान सांगण्याची परंपरा असल्याचे सांगून त्यांनी ‘देवीचे
आवाहन’ व ‘जोगाव्या’चे
सादरीकरणही केले.
अन्याया
विरुध्द तमाशाने आवाज केला बुलंद
महाराष्ट्रात झालेल्या
स्थित्यंतरात लोककलांनी महत्वाची भूमिका पार पाडली. यात संत, लोककलावंत, शाहीर आणि महापुरुषांनी
पुढाकार घेतला. परकियांची आक्रमणे व शत्रुंच्या अन्यायाविरूध्द स्थानिकांनी पुकारलेल्या बंडातून तमाशा,भारूड
या लोककलांचा जन्म झाल्याचे त्यांनी सांगितले .
१७ व्या शतकाच्या उत्तरार्धात
व १८ व्या शतकाच्या पूवार्धात पेशवाईत ‘तमाशा’ जन्माला
आला. ‘तमाशा’ ही
लोककला जागविण्यात शाहिरांचे मोठे योगदान
आहे. यात शाहीर सर्वश्री राम जोशी, प्रभाकर,अनंत फंदी, होणाजी,बाळा, परसराम,
सातुहिरूकौलापूरकर, भाऊ भक्कड आदिंनी आपल्या कवन व रचनांच्या माध्यमातून लोकांचे
निखळ मनोरंजनच केले नाही तर लोकांचे प्रबोधनही केले.
भारतीय स्वातंत्र लढा, संयुक्त महाराष्ट्राची
चळवळ,मराठवाडा मुक्तीसंग्राम आदींमध्ये तमाशा कलावंताचे मोलाचे योगदान राहिले आहे.
महात्मा फुलेंच्या विचारावर आधारीत ‘सत्यशोधकी
जलसा’ उभा राहिला. त्यानंतर महाराष्ट्रात
सुरु झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनाच्या चळवळीतही लोककलावंत आणि शाहिरांनी
मोलाचे योगदान दिल्याचे दिसते.
भाऊ मालोजी भंडारे ऊर्फ भाऊ
फक्कड या प्रतिभावंत कलावंताने आपला तमाशा बंद करून बाबासाहेबांचा ‘आंबेडकरी जलसा’ स्थापला.
शाहीर केरूबा खेकडे, हरीहररराव सोनुले,पतीतपावन दास, केरुबा गायकवाड, भिमराव
कर्डक,वामनदादा कर्डक, दत्ता शिंदे, प्रल्हाद शिंदे , विठ्ठल उमप ही सर्व मंडळी
आंबेडकरी जलशात उभी राहिली. जलशामध्ये ‘मावशी’ हे
पात्र सुत्रधाराच्या भूमिकेत येते व कर्मकांडावर जातीयतेवर प्रहार करते असे डॉ.
चंदनशिवे म्हणाले.
त्यांनी यावेळी जलशातील ‘सोन्याच पानदान हळदी कुंकवान घासीन, माझ्या भिमाचा
प्रसाद उभ्या गल्लीन वाटीन …’ हे कवण सादर केले.
मुंबईसह
एकभाषिक महाराष्ट्र राज्य स्थापन होण्यासाठी उभारलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत
कॉम्रेड डांगे,बापट,आचार्य
अत्रे,जंगम स्वामी यांच्या खांदयाला खांदा लावून शाहीर अमर शेख,गवाणकर,आत्माराम
पाटील,चंदु भरडकर, कृष्णकांत जाधव, लिलाधर हेगडे आदिंनी आपल्या तडफदार शाहिरीतून
जनजागृती करत मोलाचे योगदान दिले असे सांगून डॉ. चंदनशिवे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ
साठे यांच्या ‘माझी मैना
गावावर रायली ,माझ्या जिवाची होतीया कायली….’ संगीत
कवनाने व्याख्यानाचा समारोप केला.
आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा : https://twitter.com/MahaGovtMic
००००
िरितेश भुयार /वृत्त वि. क्र.७३ /दिनांक ३१.०३.२०२१
No comments:
Post a Comment