नवी दिल्ली,३० : देशाची
राजधानी असलेली दिल्ली हा पत्रकारिता क्षेत्रासाठी समुद्र आहे. यात मराठी
पत्रकारितेला अनन्यसाधारण महत्व असून मराठी पत्रकारांनी उत्तम कार्यातून दिल्लीत आपली
वेगळी ओळख निर्माण केली आहे,असे मत ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक सकाळ नवी दिल्लीच्या
वृत्त विभागाचे प्रमुख अनंत बागाईतकर यांनी आज व्यक्त केले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने
आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे बारावे पुष्प गुंफताना ‘दिल्लीतील
मराठी पत्रकारिता’ या विषयावर श्री बागाईतकर बोलत होते.
दिल्लीतील मराठी पत्रकारिता, तिचे
स्वरूप व या पत्रकारितेचा होत गेलेला विकास हा पट श्री बागाईतकर यांनी विविध घटनांचा
उल्लेख करत व दाखले देत उलगडला. दिल्लीतील
महाराष्ट्र परिचय केंद्राची येथील मराठी पत्रकारितेच्या विकासातील महत्वाच्या
भूमिकेवरही त्यांनी प्रकाश टाकला.
सुरुवातीच्या काळात मराठी वृत्तपत्रांची
दिल्लीत प्रतिनिधी नेमण्याबाबत असलेली उदासिनता आणि याचकाळात लेखक तथा पत्रकार
जयंतराव टिळक यांनी दैनिक केसरीचे विशेष प्रतिनिधी म्हणून चमकदार कार्य करून मराठी
वृत्तपत्रांची दूर केलेली उदासिनता यावर श्री बागाईतकर यांनी भाष्य केले. जयंतराव
टिळकांनी मराठी वाचकांना दिल्लीतील
घडामोडी पुरविल्या. त्यांच्या ‘अशी ही दिल्ली’ या साप्ताहिक सदरातून मराठी वाचकांना नियमीत माहिती
मिळत असे .पुढे या सदारावर पुस्तक स्वरूपात दोन खंड प्रकाशित झाले ते वाचनीय आहेत, असे
श्री. बागाईतकर म्हणाले. त्यानंतर दैनिक केसरीचे प्रतिनिधी म्हणून राजाभाऊ
कुलकर्णी आले त्यांचीही वार्तापत्र खूप गाजली.
बापुसाहेब लेले ; मराठी
पत्रकारांसाठी आधारवड
महाराष्ट्रातून दिल्ली या परमुलुखात आल्यावर येथील भाषा,
संस्कृती, वातावरण या विपरीत परिस्थितीत काम करताना सुरुवातीला पत्रकारांना अडचणी
येतात. मात्र, ज्येष्ठ पत्रकार बापुसाहेब लेले हे दिल्लीत येणा-या मराठी
पत्रकारांसाठी आधारवडच होते. दिल्लीतील पत्रकारितेत आपली वेगळी छाप सोडणारे श्री.
लेले यांचा उत्साह विलक्षण दांडगा होता तसेच ते मृदू स्वभावाचे
होते.महाराष्ट्रातून दिल्लीत आलेल्या नवीन पत्रकारांना त्यांचा आधार वाटत असे. ते
या पत्रकारांची आस्थेने चौकशी करत व त्यांना आवश्यक मदत करीत. मो .ग. तपस्वी हे
मराठी पत्रकार मात्र, शिस्तीचे भोक्ते होते. दिल्लीत आलेल्या नवीन मराठी
पत्रकारांच्या लिखाणातील त्रृटी दाखवून ते आस्थेने समजावून सांगत व मार्गदर्शन करत. हा काळ संपल्यानंतर वि.ना.देवधर
हे महाराष्ट्र टाईम्सचे प्रतिनिधी म्हणून
दिल्लीत आले त्यांच्याकात दिल्लीत महत्वाच्या घडामोडी घडल्या.
गंगाधर इंदूरकर यांनी दिल्लीत हिंदी
वृत्तपत्रामध्ये आपली वगेळी ओळख निर्माण केली होती. यानंतर ब-याच मराठी पत्रकारांनी दिल्लीतील अमराठी माध्यमांमध्ये उत्तम कार्य
केल्याचे सांगून सुभाष किरपेकर, मधु साठे, सुनिल गाताळे ,व्यंकटेश केसरी यांच्या कार्याचा उल्लेख श्री बागाईतकर यांनी
यावेळी केला.
मराठी वृत्तपत्रांना पटले दिल्लीचे महत्व
पत्रकाराच्या अंगभूत वैशिष्टयांसह
त्यांच्याकडून मराठीतून विश्लेषण, भाष्य हे वाचकांपर्यंत पोहचावे यासाठी महाराष्ट्रातील
वृत्तपत्रांना आपला दिल्लीत प्रतिनिधी असावा अशी निकड वाटू लागली. मराठी लेखणीतून
दिल्लीतील घडामोडी येणे गरजेचे वाटू लागले व पुढे आघाडीच्या वृत्तपत्रांनी दिल्लीत
आपले प्रतिनिधी पाठवायला सुरुवात केली. गोविंदराव तळवलकर महाराष्ट्र टाईम्सचे
संपादक असताना त्यांनी अशोक जैन यांना महाराष्ट्र टाईम्सचे प्रतिनिधी म्हणून
पाठविले तर माधवराव गडकरी दैनिक सकाळच्या मुंबई आवृत्तीचे संपादक असताना त्यांनी
विजय नाईक यांना दिल्लीत पाठविले. लोकसत्ताने श्री पेंडसे यांना प्रतिनिधी म्हणून
नियुक्त केले असा संदर्भही श्री बागाईतकर यांनी
दिला.
दिल्लीतील आर्थिक, राजकीय, सामाजिक
आदी घडमोडींमध्ये महाराष्ट्राचे स्थान राष्ट्रीय वृत्तपत्रातून आवश्यक तेवढे
प्रदर्शित होत नाही. हे स्थान विस्ताराने व तपशीलाने व ठळकपणे देण्याचे काम मराठी
पत्रकारांनी केले. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या मागे असलेले दिल्लीतील
धागे-दोरे तसेच आतली माहिती देण्याचे काम या पत्रकारांनी केल्याचे त्यांनी
सांगितले.
पत्रकारितेचा विकास व विस्तार होत
गेला त्यानुसार मराठीतील अग्रगण्य वृत्तपत्रांनी दिल्लीत प्रतिनिधींची संख्या वाढवली.
आधी वृत्तपत्रीय पत्रकारितेचा काळ होता आता इलेक्ट्रॉनीक माध्यमांचे युग आले आहे,
आता त्यांनीही आपले प्रतिनिधी नेमले आहे. दिल्लीत वृत्तपत्र व वृत्त वाहिन्यांचे ब्युरो कार्यालय स्थापन
झाले व त्यात प्रतिनिधींची संख्याही वाढली. आणि हळू हळू दिल्लीतील मराठी
पत्रकारिता बहरत गेली ही स्वागतार्ह बाब असल्याचे मत श्री बागाईतकर यांनी मांडले.
प्रेस क्लब ऑफ इंडियांच्या स्थापनेत मराठी पत्रकाराचे योगदान
प्रेस क्लब ऑफ इंडिया या पत्रकारितेतील
महत्वाच्या संस्थेच्या स्थापनेतही मराठी पत्रकाराचे योगदान असल्याचे त्यांनी
सांगितले. टाईम्स ऑफ इंडियामध्ये कार्यरत दि.रा.मकनेकर हे प्रेसक्लबचे संस्थापक
सरचिटणीस हाते. पुढे या संस्थेत दिल्लीतील मराठी पत्रकारांनी विविध भूमिका सक्षमपणे
वठविल्या. दिल्लीतील मराठी पत्रकारितेला
अनन्यसाधारण महत्व आहे. हा वारसा यापुढे आणखी विकसीत होण्यासाठी प्रयत्न व्हावेत,असे
आवाहन श्री बागाईतक यांनी केले .
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर
हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
०००००
रितेश भुयार /वृत्त.वि. क्र.७१ /दिनांक ३०.०३.२०२१
No comments:
Post a Comment