नवी दिल्ली ,५ : उत्खननातील
पुराव्यांनुसार पशुपालक हे महाराष्ट्राचे आद्य वसाहतकार असल्याचे सिध्द झाले असून सातवाहन
राजवटीने महाराष्ट्राची पायाभरणी करून राज्याला वैभव मिळवून दिले, अशी माहिती
प्रसिध्द विचारवंत व कादंबरीकार संजय सोनवणी
यांनी दिली.
महाराष्ट्र
परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे १८वे
पुष्प गुंफताना “महाराष्ट्राच्या
जडणघडणीचा इतिहास” या विषयावर श्री. सोनवणी बोलत
होते.
महाराष्ट्राच्या
पुरातन
इतिहासाच्या ज्ञात साधनांतून महाराष्ट्रात परर्जन्यमान चांगला असल्याने पशुपालन हा
येथील मुख्य व्यवसाय होता व धनगर,गवळी आदी पशुपालकांचे येथे वास्तव्य असल्याचे
दिसते. म्हणूनच पशुपालक हे महाराष्ट्राचे आद्य वसाहताकर ठरतात. या मातीत महत्वाचे
मानवी वंश राहायला आले, त्यांनी वसाहती केल्या याच वसाहतींनी निर्माण केलेल्या विरोबा, विठोबा, ज्योतिबा, जगदंबा, तुळजाभवानी,
काळुबाई आदी देवी-देवता पुढे महाराष्ट्राच्या लोकदेवता झाल्या. या लोकदेवतांनी
महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जोपासला, असे श्री सोनवणी यांनी सांगितले.
सातवाहनांनी केली महाराष्ट्राची
पायाभरणी
सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात
घराणे होय. सिमुख सातवाहनाने इसपूर्व २२०
मध्ये जुन्नर येथे सत्ता स्थापन केली. या राजवंशाने ४५० वर्षे राज्य करून गुजरात,
कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश पर्यंत राज्य विस्तार केला. प्राकृत मराठी
भाषेला हाल सातवाहन राजाने साहित्यिक भाषा
बनवले. ‘गाथा सप्तशती’ या ग्रंथात
हाल सातवाहनाने ७०० ग्रंथांचे संकलन केले. गौतमीपूत्र सातकर्णी ने मराठी माणसांचा
पहिला स्वातंत्र्य लढा उभारला. सातवाहन काळात रायगड, राजगड, राजमाची
आदी किल्ले बांधले गेले. नाशिक येथील पांडवलेणी, कार्ले
भाजे लेण्याही याच काळात बांधल्या गेल्या. बंदरे उभारली. सातवहानांच्या काळात
महाराष्ट्रातील कला साधने, शेती
उत्पादनांचा व्यापार रोम मध्ये होत असे.
सातवाहन काळात महाराष्ट्राला मोठे वैभव प्राप्त झाले होते, असे त्यांनी
सांगितले.
सातवाहनानंतर
खान्देशात स्थिर झालेल्या ‘अहिर वंशा’ने
सव्वाशे वर्ष राज्य केले. ६ व्या ते ८ व्या शतकात महाराष्ट्रात ‘चालुक्यांची राजवट’ आली.
८ व्या ते १० व्या शतकात ‘राष्ट्रकुट
राजवट’ आली त्यांनी जैन धर्माला राजाश्रय दिला
त्यामुळे महाराष्ट्रात अहिंसा,मानवता आदी मुल्यांची
पायाभरणी झाली.कोकणातील ‘शिलाहार
राजवंशा’ची राजवट, त्यांचा प्रभाव व त्यांनी कोकणास
मिळवून दिलेले वैभव यावर श्री सोनवणी यांनी प्रकाश टाकला.
राजा भिल्लम याने १२ व्या शतकात
यादवांची सत्ता स्थापन केली. अडिचशे वर्ष राज्य करणा-या यादव काळात यादव घराणे
म्हणजे महाराष्ट्र अशी ओळख निर्माण झाली. यादव घराण्याने आजच्या महाराष्ट्राच्या
जडणघडणीवर अनेक प्रकारे प्रभाव टाकला. यादवकाळात ‘रुख्मीनी
स्वयंवर’, ‘ज्ञानेश्वरी’ या साहित्य रचना जन्माला आल्या. संतांची
मांदीयाडी निर्माण होण्यासाठी यादवकाळात मनोभूमिका तयार झाल्याचे त्यांनी
सांगितले.
सातवाहनांनी मराठी भाषेचा, साहित्य
संस्कृतीचा,किल्ले़, शेती,व्यापाराचा पाया घातला. पुढच्या राजवटींनी तो वाढवत नेत
यादवकाळात तो शिखरावर पोहचला आणि आजचा महाराष्ट्र तयार व्हायला सुरुवात झाली. पुढे
छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय होईपर्यंत महाराष्ट्र दास्यात राहिला. तरिही येथील
जनतेची मानसिक जडणघडण बदललेली नव्हती. राजकीय दास्य असले तरी सामाजिक दास्य
लोकांनी स्वीकारलेले दिसत नाही.
महाराष्ट्राची संत परंपरा, वैचारिक
परंपरा, राजकीय परंपरा हे राज्याचे व्यापक चित्र दर्शविते. विदर्भ, पवनी, चंद्रपूर,
मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या विशाल भूप्रदेशावर राज्य करणा-या
राजवटींनी एका वैशिष्टयपूर्ण संस्कृतीची निर्मिती केली. हा आपला समृध्द वारसा
सर्वांनी समजून घेतला पाहिजे व तो जपला पाहिजे असा आशावाद श्री सोनवणी यांनी
व्यक्त केला.
महाराष्ट्र
परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
०००००
रितेशभुयार /वृत्त.वि. क्र.८६/ दिनांक ५.०४.२०२१
No comments:
Post a Comment