Monday, 12 April 2021

महाराष्ट्राला लाभल्या समृध्‍द व वैविद्यपूर्ण रानवाटा : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली

  

नवी दिल्ली, १२ : महाराष्ट्राच्या जंगलातील हिरवाई, पक्षी, प्राणी यांचा वैविद्यपूर्ण अधिवास आणि या जंगलातील अनाकलनीय व चमत्कृतिक घटनांचा अनुभव मला घेता आला. येथील रानवाटा समृध्द असल्याची, माहिती अरण्यऋषी, पक्षीतज्ज्ञ, वृक्ष अभ्यासक व साहित्यिक मारूती चितमपल्ली यांनी आज दिली.  

             महाराष्ट्राच्या रानवाटा या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे रौप्य पुष्प (25 वे) गुंफताना श्री. चितमपल्ली  बोलत होते.

        वनाधिकारी पदवी शिक्षण पूर्ण करून वनअभ्यासक हुड यांच्या प्रेरणेतून निष्ठेने सुरु झालेला वन विभागातील प्रवास व या सेवेमध्ये महाराष्ट्रातील चमत्कृतिक रानवाटांतून सापडलेले ज्ञानभांडार असा पटच मारुती  चितमपल्ली यांनी  उलगडला.

            १९५८-६० मध्ये तामीळनाडूतील कोईंबतुर शहरात वनाधिकारी पदवी शिक्षण घेताना, महाविद्यालयाच्या प्रथेनुसार अनाईमलाई पर्वतावर स्थित वनअभ्यासक हुड यांच्या समाधीचे दर्शन व त्याचा किस्सा श्री चितमपल्ली यांनी सांगितला. हुड यांनी अनाईमलाई पर्वतावरील हजारो एकरावर फुलवलेली हिरवाई व त्यांची वनांप्रती असलेली निष्ठा बघून थक्क झालो.  येथून वनांचा विकास आणि तेथील प्राण्यांचे संवर्धन त्यांचा वैविद्यपूर्ण अभ्यास हे जीवन ध्येय ठरल्याचे श्री चितमपल्ली यांनी सांगितले. 

             महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथील जबाबदारी पार पाडताना वन्यजीवन व्यवस्थापन, वने, वन्यप्राणी आणि पक्षी जगताविषयी केलेल्या संशोधन कार्यातील निरीक्षणांवर त्यांनी ओघवता प्रकाश टाकला. या सर्व परिपकातून राज्याच्या जंगलातील वैविद्यपूर्ण व चमत्कृतिक वैशिष्टये विविध पुस्तकांच्या रुपात मांडता आली येथील वनांतील  पक्षी निरीक्षणाचा अनुभवही समृध्द करणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

  

                                                  रानकुत्र्यांना अभय

       महाराष्ट्रातील रानवाटांचा अभ्यास करताना व प्रत्यक्ष कार्य करताना ठसठसीत आठवाव्या अशा अनुभवांमध्ये रानकुत्र्यांचे प्राण वाचविण्याचा अनुभव श्रेष्ठ असल्याचे सांगून श्री चितमपल्ली यांनी स्वानुभव कथन केला. पूर्व विदर्भातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान आणि नागझिरा अभयारण्यात कार्यरत असताना रानकुत्र्यांबाबत सटीक अभ्यास करून शासनास सादर केलेल्या अहवालामुळे येथील रानकुत्र्यांचे प्राण वाचले. या भागात वाघाची संख्या कमी होण्यास रानकुत्रेच जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढून रानकुत्र्यांना माराण्याचे फर्मान देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पक्षितज्ज्ञ सलीम अली यांच्यासोबत झालेल्या भेटीत त्यांनी रानकुत्र्यांचा साक्षेपी अभ्यास करून शासनाचा फर्मान थांबवा अशा सूचना दिल्याचा संदर्भही श्री चितमपल्ली यांनी यावेळी दिला. यासाठी २४ तास रानात पहारा देवून रानकुत्र्यांच्या खानपध्दतीचा अभ्यास केला निरीक्षण नोंदवली यासंदर्भात शासनास सविस्तर अहवाल सादर केला. अखेर वाघांची संख्या कमी होण्यास रानकुत्रे जबाबदार नसल्याचे मान्य झाले व त्यांचे प्राण वाचले हा आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण ठरल्याचे त्यांनी सांगितले.    

            संस्कृत साहित्यात वन्यप्राण्यांची मोठी माहिती उपलब्ध असल्याने वयाच्या ४०व्या वर्षी संस्कृत भाषा शिकण्याचा व विद्यापीठात दुसरा क्रमांक पटकाविण्याचा अनुभवही श्री चितमपल्ली यांनी सांगितला. ‘पालकाप्यमहा पाल ऋषीने लिहीलेल्या संस्कृत ग्रंथाचा अभ्यास व पुढे प्रत्यक्ष देशाच्या दक्षीण भागातील जंगलामध्ये जावून हत्ती या महाकाय प्राण्याच्या वैशिष्टयपूर्ण क्रियाकलापाबाबतच्या अनुभवांवरही श्री चितमपल्ली यांनी यावेळी प्रकाश टाकला.


No comments:

Post a Comment