Monday, 29 November 2021

महाराष्ट्राने दिलेल्या संस्कारातून देश सेवा करू ; सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचा ध्यास












          पुढचे पाऊलच्यावतीने उमेदवारांचा सत्कार व परिक्षार्थींना मार्गदर्शन

 

नवी दिल्ली, 29 :  महाराष्ट्राच्या मातीच्या संस्काररूपी  शिदोरीतून देशसेवा करू, असा विश्वास सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवरांनी  आज येथे व्यक्त केला.

 

            पुढचे पाऊल  संस्थेच्यावतीने आयोजित सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांच्या सत्कार समारंभात प्रातिनिधीक विचार मांडतांना मृणाली जोशी आणि आदित्य जीवने या उमेदवारांनी या भावना व्यक्‍त केल्या. कवी श्रेष्ठ गोविंदाग्रजांनी वर्णिलेल्या मंगल देशा ,पवित्र देशा महाराष्ट्र देशा .... राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा,कोमल देशा फुलांच्याही देशा.... या ओळी उदधृत केल्या. हवे तेवढे मृदू राहू पण प्रसंगी राकट व कणखर बाणा जपत उचित निर्णयासाठी आम्ही सदैव तत्पर राहून महाराष्ट्राची पताका सनदी सेवेत डौलाने मिरवू असा मनोदय या उभय उमेदवरांनी त्यांच्या प्रातिनिधीक भाषणांतून बोलून दाखवला.

             दिल्ली स्थित मराठी अधिका-यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या ‘पुढचे पाऊल’ संस्थेच्यावतीने आज येथील डॉ आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचा सत्कार व मार्गदर्शन समारंभाचे आयोजन करण्यात आले. एकूण तीन सत्रात झालेल्या या कार्यक्रमाच्या  शेवटच्या  सत्रात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते व केंद्रीय कार्मीक विभागाचे माजी सचिव दीपक खांडेकर, व्हाइस ॲडमिरल सतीश घोरमाडे आणि पुढचे पाऊलचे संस्थापक तथा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ ज्ञानेश्वर मुळे यांच्या उपस्थितीत सनदी सेवा उर्त्तीण उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.   

                       मृणाली जोशी,आदित्य जिवने, विनायक महामुनी, शुभम स्वामी, नितीन पुके, निलेश गायकवाड, अंशुमन यादव, गौरव साळुंखे, श्रीकांत विसपुते, श्रीकांत मोडक, सुहास गाडे, प्रणव ठाकरे, विनायक नरवडेसुरज गुंजाळ, विकास पालवे, प्रतीक जुईकर, बंकेश पवार, संकेत वाघे, अजय डोके, अजिंक्य विद्यागार , सुमितकुमार धोत्रे आणि अभिषेक दुधाळ या सनदी सेवा उत्तीर्ण उमेदवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

            तत्पूर्वी, कार्यक्रमाच्या दुसऱ्या  सत्रात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव संतोष वैद्य, विमानतळ सुरक्षा विभागाचे अतिरिक्त महासंचालक प्रमोद फळणीकर, संरक्षण मंत्रालयात कार्यकारी संचालक सुशील गायकवाड, तामीळनाडू तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आनंद पाटील  आणि डॉ ज्ञानेश्वर मुळे यांनी  सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवार आणि लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

               कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात उर्त्तीण उमेदवरांनी  परीक्षार्थींना स्पर्धा परीक्षेची व अभ्यासाची तयारी या विषयी अनुभव कथन केले.  दिल्लीच्या विविध भागात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा तयारी करणारे महाराष्ट्रातील विद्यार्थी मोठया संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. पुढचे पाऊल संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचा सत्कार व मार्गदर्शन समारंभाचे हे तिसरे वर्ष होते.

 

                                                        00000  

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     

रितेश भुयार/वि.वृ.क्र. २४८ /दि. २९.११.२०२१

 


 

दिवाळी अंक प्रदर्शन दिल्लीकर वाचकांसाठी पर्वणी : उपविभागीय जिल्हाधिकारी डॉ. पियुष रोहणकर

 




 


नवी दिल्ली, 29 : दिवाळी अंक प्रदर्शन दिल्लीकर वाचकांसाठी पर्वणी असल्याचे गौरव उदगार उपविभागीय जिल्हाअध‍िकारी डॉ. पियुष रोहणकर यांनी आज येथे काढले.

 महाराष्ट्र परिचय केंद्रातील ग्रंथालयात आज दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन नवी दिल्ली जिल्ह्याच्या छावणी उप विभागीय जिल्ह्याधिकारी डॉ. पियुष रोहणकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री रोहणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर, उपसंपादक रीतेश भुयार, ग्रंथपाल रामेश्वर बरडे तसेच परिचय केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, आजचा काळ हा सामाजिक माध्यमांचा असूनही वाचन संस्कृतीला वाढविण्याचे काम दिवाळी अंकानिमित्त होत आहे हे प्रशंसन‍ियच आहे. परिचय केंद्राच्यावतीने दिवाळी अंक प्रदर्शन मांडणे हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पंरपरेला साजेसा उपक्रम असल्याचेही डॉ. रोहणकर यावेळी म्हणाले.

डॉ. पियुष रोहणकर हे वर्ष 2014 च्या भारतीय प्रशासक‍िय सेवा (दानिक्स) कॅडरचे अधिकारी आहेत. यासोबत ते लेखक ही आहेत त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणा-यांवर आधारीत  ए प्लेसेंट इस्केप  ही इंग्रजीत कांदबरी लिहीली आहे. यासह ते कवीता करतात.  आजच्या कार्यक्रमात त्यांनी  शेरही म्हणुन दाखविला.

 

आजपासून दिवाळी अंक प्रदर्शन वाचकांसाठी खुले

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या दिवाळी अंक प्रदर्शनात विविध विषयांवरील नामांकीत प्रकाशकांसह नवोदित प्रकाशकांचीही  60 च्या वर दिवाळी अंक मांडण्यात आलेले आहेत. यामध्ये चांगुलपणाची चळवळ, महाराष्ट्राची जत्रा, किशोर, कालनिर्णय, दिवाळी आवाज, मिळून सा-याजणी, तारांगण, माहेर, मार्मिक, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सामना, लोकप्रभा, मिडिया वॉच, लोकमत दिपोत्सव असे एकापेक्षा एक सरस वाचनीय दिवाळी अंक परिचय केंद्रात वाचकांसाठी उपलब्ध आहेत.   हे प्रदर्शन आजपासून ग्रंथालय सदस्यांसाठी खुले आहे.  हे प्रदर्शन पुढील पाच दिवस शुक्रवारपर्यंत राहील.

ज्येष्ठ पत्रकार व आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ जयपाल पाटील यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट







नवी दिल्ली, 29 :   ज्येष्ठ पत्रकार व आपत्ती  व्यवस्थापन तज्ज्ञ  जयपाल पाटील यांनी   आज महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली.                    

                परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी  तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा  यांनी  श्री. पाटील यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. माहिती अधिकारी अंजु निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार, आ‍काशवाणी दिल्लीच्या क्रीडा विभागाचे प्रोग्राम एक्जीक्युटीव्ह नितीश अरोडा यावेळी उपस्थित होते.

            दिल्ली आयआयटी  परिसरात  24 ते 27 नोव्हेंबर 2021 दरम्यान आयोजित 5व्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेत श्री. पाटील सहभागी झाले होते .चार दिवस चाललेल्या या परिषदेत श्री. पाटील यांनी  होफफुल टुमारो या विषयावर शोध निबंध सादर केला. या परिषदेत सादर केलेल्या शोध निबंधाविषयी  त्यांनी यावेळी माहिती  दिली  व अनुभव कथन केले.

             श्री. पाटील यांनी यावेळी कोविडोत्तर  जीवनशैली विषयावर कार्यालयात उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. आहार-विहार, व्यायाम आदिंचा अवलंब करण्यासोबतच टेरेस गार्डन फुलविण्याचा तसेच पाणी  बचतीचा  मंत्रही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

     ‍ि                                              00000  

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     

वि.वृ.क्र. २४६ /दि. २९.११.२०२१

 

             

 

 

Friday, 26 November 2021

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा










नवी दिल्ली, 26 : राजधानीत सुरु असलेल्या भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात आज आयोजित महाराष्ट्र दिन कार्यक्रमात भुपाळी, जात्यावरील ओवी, भारूड, गौळण, लावणी, कोळीनृत्य आदि महाराष्ट्राच्या समृध्द लोककलांचे दमदार सादरीकरण झाले. राज्याच्या वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिकंली.

येथील प्रगती मैदानावर 40 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात आज अपर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त शामलाल गोयल यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र दिन’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र, महाराष्ट्र सदनाच्या गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त डॉ.निधी पांडे, अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे, सहायक निवासी आयुक्त डॉ राजेश अडपावार आणि महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक संध्या पवार, महाव्यवस्थापक विजय कपाटे उपस्थित होते.

भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळव्यात दररोज सायंकाळी ‘ खुल्या सभागृहात’ व्यापार मेळाव्यात सहभागी देश व राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होते. या उपक्रमांतर्गत व्यापार मेळाव्याच्या १२ व्या दिवशी आज ‘महाराष्ट्र दिन’ कार्यक्रम साजरा करण्यात आला.

महाराष्ट्राच्या लोककलांचे दमदार सादरीकरण

नाशिक येथील पिनॅक इव्हेंट्स ॲड मॅनेजमेंट प्रस्तुत सप्तसुर संगीत अकॅडमीच्या कलाकारांनी ‘महाराष्ट्र लोक कला दर्शन’ कार्यक्रमाचे सादरीकरण केले. भुपाळीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहाटेचे दर्शन घडविणारे वासुदेव नृत्य तसेच पहाटे घरा-घरांमध्ये जात्यांवर दळण दळतांना गायिल्या जाणाऱ्या ओवींचे सादरीकरण झाले. मंगळागौर सणाची झलकच यावेळी रंगमंचावर बघायला मिळाली. यावेळी मंगळागौरीचे विविध गाणे गात त्यावर कलाकारांनी ठेका धरला. नारळी पोर्णिमेचा सण व कोळी बांधवांचा उत्साह दर्शविणारे कोळीगितांचे सादरीकरणही झाले. ‘मला दादला नको ग बाई …’ हे संत एकनाथांचे प्रसिध्द भारूडही यावेळी सादर झाले. लावणी ,गौळण, शेतकरी नृत्य, खानदेशी नृत्य, धनगर नृत्य, जोगवा या लोककलांच्या सादरीकरणाने येथे उपस्थित देश-विदेशातील रसिक प्रेक्षकांची दाद मिळविली.

राज्यातील आदिवासी जमातीचे दर्शन घडाविणारे नृत्य, वाघ्या-मुरळी आदींनी रसिकांच्या टाळया मिळविल्या. विविध लोककला व लोकनृत्यांच्या आविष्काराने सजलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समृध्द लोक संस्कृतीचे प्रति‍बिंबच उभे राहिले आणि यास उपस्थितांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला.
‍ 00000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार / वि.वृ.क्र. 245 /दि. 26 .11.2021


 

राजधानीत ‘संविधान दिन’ साजरा










महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांहून ‘महापुरुष : डॉ आंबेडकर’ लघुपटाचे थेट प्रसारण

नवी दिल्ली, 26 : महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र येथे आज ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाजमाध्यमांहून ‘महापुरुष : डॉ आंबेडकर’ या लघुपटाचे थेट प्रसारणही करण्यात आले.

कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळया समोर आयोजित कार्यक्रमात ‘राज्य घटनेच्या उद्देशिकेचे’ सामूहिकपणे वाचन करण्यात आले. यावेळी निवासी आयुक्त शामलाल गोयल, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त डॉ.निधी पांडे,अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे, सहायक निवासी आयुक्त डॉ राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘संविधान दिन’ साजरा

महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचा-यांनी ‘राज्य घटनेच्या उद्देशिकेचे’ सामूहिकपणे वाचन केले. यावेळी जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
‘महापुरुष : डॉ आंबेडकर’ लघुपटाचे थेट प्रसारण

संविधानातून न्याय, स्वातंत्र्य ,समता व बंधुता यांची शाश्वती देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या ‘महापुरुष : डॉ आंबेडकर’ या लघुपटाचे आज सकाळी 11.00 वाजता महाराष्ट्र परिचय केंद्राच्या तिन्ही भाषेतील अधिकृत ‘ट्विटरहँडल’,‘फेसबुक’, ‘युटयूब चॅनेल’ आणि ‘कू’ या समाज माध्यमांहून थेट प्रसारण करण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने १९६८ मध्ये ‘महापुरुष : डॉ आंबेडकर’ या लघुपटाची निर्मिती केली असून श्री. नामदेव व्हटकर यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे तर ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीत दिले आहे.
‍ि 00000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार / वि.वृ.क्र. २४४ /दि. २६.११.२०२१



 

Thursday, 25 November 2021

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात आज “महाराष्ट्र दिन”

 


आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात आज महाराष्ट्र दिन

नवी दिल्ली, 25 : महाराष्ट्राची लोककला ही समृध्द अशी आहे. शुक्रवारी भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात महाराष्ट्र दिन साजरा केला जाणार आहे.

येथील प्रगती मैदानावर 40 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उद्या शुक्रवारी दिनांक 26 नोव्हेंबरला   महाराष्ट्र दिनाचे उदघाटन अपर मुख्य सचिव तथा निवासी आयुक्त (महाराष्ट्र सदन) शामलाल गोयल यांच्याहस्ते होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय  माहिती प्रसारण विभागाचे सचिव अपुर्व चंद्र हे असणार आहेत.

            प‍िनॅक इव्हेंट्स ऍण्ड मॅनेजमेंट या संस्थेच्यावतीने  महाराष्ट्राची लोककलाहा सांस्कृतिक कार्यक्रम मेळाव्यातील  एम्फी  थ‍िऐटर (हॉल क्रमांक 2 ते 5 जवळ)  येथे सांयकाळी 5:30 वाजता  होणार आहे.

भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात सहभागी देश व राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होते. या अंतर्गत व्यापार मेळाव्याच्या बाराव्या  दिवशी शुक्रवारी  महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमात गणेश वंदना, भुपाळी, ओवी, भारूड, गोंधळ,  गण, गवळण, पोवाळा, शाह‍िरी, लावणी,  कोळी गीत, जागरण, जोगवा असे लोककलेचे विविध प्रकार  सादर केले जाणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात गायक स्वत: गायन करतील आणि त्यावर कलाकार त्यांची-त्यांची कला सादर करतील.

या सांस्कृतिक कार्यक्रमास येथील दिल्लीकरांनी अधिकाधिक  प्रतिसाद  दयावा, असे आवाहन महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण दराडे यांनी केले आहे.


महाराष्ट्रातील लघु उद्योजकांच्या उत्पादनाला आयआयटीएफमध्ये ग्राहकांची खास पसंती








महाराष्ट्र दालनाला ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
नवी दिल्ली , २५ : हळद, बेदाना, मसाले, चामडयाची उत्पादने, बाबुंफर्निचर, पैठणीसाडया, कोल्हापुरी चप्पल आदि महाराष्ट्रातील लघु उद्योजकांच्या उत्पादनांना राजधानीत सुरु असलेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (आयआयटीएफ) देश-विदेशातील ग्राहकांची खास पसंती मिळत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने प्रगतीमैदान येथील हॉल क्र. २ मध्ये राज्याचे विद्युत वाहन धोरण, राज्यातील महत्वाचे प्रकल्प, स्टार्टअपची विविध उत्पादने व हस्तकला उत्पादनांनी सज्ज व सुबक असे महाराष्ट्र दालन साकारण्यात आले आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या भारत व्यापार प्रोत्साहन संस्थेच्यावतीने (इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशन)४०व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन केले असून येथे भेट देणाऱ्या देश-विदेशातील ग्राहकांना महाराष्ट्र दालन आकर्षित करीत आहे.

राज्यशासनाच्या पुढाकारातून देश-विदेशात सांगलीची उत्पादने

महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) सांगली जिल्हयातील कडेगाव तालुक्याच्या वांगी येथील लालासो भोसले यांचा हळदी ,बेदाना आणि मिरचीपूड ही उत्पादने असलेल्या स्टॉलवर ग्राहकांची एकच गर्दी दिसते. रास्त दरात गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळत असल्याचा आनंद या स्टॉलहून उत्पादने खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी बोलून दाखवला. या स्टॉलचे प्रमुख लालासो भोसले गेल्या चार वर्षांपासून या मेळाव्यात येताहेत व राज्यशासनाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीमुळे देश-विदेशातील ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने पोहचत असल्याचे समाधान त्यांनी बोलून दाखविले.


कोल्हापुरी, शाहू व कुरुंगवाळी चप्पलांचा बोलबाला

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व उमेदच्या बचतगटांच्या स्टॉलवर कोल्हापुरी चप्पलांसह विक्रीसाठी असलेली वैशिष्टयपूर्ण पादत्राणे, वारलीपेंटींग ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. कोल्हापूर येथील सिध्दाई महिला बचतगटाच्या ‘आम्ही कोल्हापुरी चप्पल’ या स्टॉलवर टिपिकल कोल्हापुरी चप्पलांसह कापसी ,कुरुंगवाळी, मोजेसेफ, शाहू चप्पल, पेपर कापसी ही पादत्राणेही ग्राहक मोठया उत्साहाने खरेदी करीत आहेत. ‘सिध्दाई महिला बचतगटा’च्या प्रमुख सीमा कांबळे यांनी सांगितले, २०१६ पासूनच त्या राज्य शासनाच्या ‘उमेद’ अभियानासोबत जुडल्या असून भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात त्या प्रथमच सहभागी झाल्या. जागतिक दर्जाच्या या मेळाव्यात सहभागी झाल्याने एक चांगला अनुभव गाठिसी येत असल्याचा व चोखंदळ ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने पोहचत असल्याचा आनंदही त्यांनी बोलून दाखवला.

माविमच्या ‘क्रांतीज्योती वारली पेंटींग युनिट’चा वारलीबॅग व गारमेंटच्या स्टॉलवरील आकर्षक उत्पादनेही ग्राहकांच्या पसंतीस पडत आहेत. वारली पेंटींग युनीटच्या रीना जाधव आणि शमसुन्नीसा इकबाल खुटे यांच्या चेहऱ्यावरील आनंदही बोलका आहे. माविमचाच ‘चांदा ते बांदा’ योजनेंतर्गत असलेला चंद्रपूर येथील कारपेट क्लस्टरचा स्टॉल व येथील कारपेट वॉल फ्रेमिंग, बांबुकव्हर डायरीही ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेंतर्गत येथे गडचिरोली जिल्हयातील मोशीखांब येथील प्रतिक्षा हॅण्डीक्रॉफ्टचा स्टॉल आहे, या स्टॉलच्या प्रमुख प्रतिक्षा शिडाम यांनी कुशन कव्हर,लाईट लँप, मॅक्रम, वारली पेंटींग जाकेट आदि उत्पादने विक्रीसाठी ठेवली आहेत. खादी ग्रामोद्योग महामंडळांशी संलग्न औरंगाबाद येथील शुभम लेदर अँड लेदर फोम इंडस्ट्रीनेही चामडयाची आकर्षक उत्पादने विक्रीस ठेवली आहेत. या स्टॉलचे प्रमुख गजानन पुरुषोत्तम हे २००८ पासून खादी ग्रामोद्योग महामंडळासोबत जुडले असून प्रथमच या व्यापार मेळाव्यात सहभागी झाले आहेत . सिंधुदुर्ग जिल्हयातील कुडाळ येथील ‘वुडीग्रास’ हा बांबुफर्निचरचा स्टॉलही महाराष्ट्र दालनास भेट देणाऱ्या ग्राहक व व्यापाऱ्यांचे लक्षवेधून घेत आहे. वुडीग्रास हा उपक्रम सुरु होवून केवळ एक महिना झाला असून अल्पावधीतच त्यास या आंतरराष्ट्रीय मेळाव्यात आपले उत्पादन प्रदर्शीत व विक्री करण्याची संधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे.

राज्यातील आठ उद्योग समूहांची (क्लस्टर) उत्पादने येथील स्टॉलवर प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत व या सर्व स्टॉल्सला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र दालनात राज्यशासनाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या विद्युत वाहन धोरण, विविध स्टार्टअप, औरंगाबाद औद्योगिक शहर, कोस्टल रोड प्रकल्पाची माहिती देणारे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. दालनात प्रवेश करताच आत्मनिर्भरतेचा संदेश देणारी भली मोठी वज्रमूठ आणि त्याभोवती फिरणा-या खास सायकली, ड्रोन आणि वॉशरुम ओडर फ्री इंस्ट्रुमेंट हे दालनाला भेट देणा-या ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे.

बृह्नमुंबई महानगर पालिका ,औरंगाबाद औद्योगिक शहराविषयी माहिती देणारा आकर्षक स्टॉल, महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य केंद्रही (मैत्री) या दालनास भेट देणा-या व्यापार व उद्योग क्षेत्रातील मंडळींना आकर्षित करीत आहेत.
‍ 00000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार / वि.वृ.क्र. २४२ /दि. २५.११.२०२१