Wednesday, 31 August 2022

महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना





 


राजधानी दिल्लीतील विविध मराठी गणेश मंडळांतही गणरायांचे उत्साहात आगमन

नवी दिल्ली, 31 : ढोल ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषाने आज कोपर्निकस मार्ग व येथील महाराष्ट्र सदन निनादले .लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेश भक्तांनी एकच गर्दी जमली. गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तीमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात दिसून आले.

महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच दिल्लीच्या वेगवेगळया भागातील विविध गणेश मंडळातही उत्साहाच्या वातावरणात आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. महाराष्ट्राच्या कानाकोप-यात आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे.
महाराष्ट्र सदनात सार्वजनिक उत्सव समितिच्यावतीने आयोजित गणेशोत्सवात महाराष्ट्र सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी सपत्नीक गणरायाची पूजा केली. महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, गणेश भक्त यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी, आज सकाळी येथील कोपर्निकस मार्गावर जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” हे जयघोष आणि ढोल ताशांच्या गजरामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले. मिरवणुकीनंतर पूजा, मंत्रोच्चार व श्रींची आरती होवून गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील जवळपास ३० मराठी गणेशोत्सव मंडळातही आज गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष सर्वत्र साजरा करण्यात आला.
गणेशोत्सव काळात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिल्ली व परिसरात गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल आहे. विविध गणेश मंडळांच्यावतीने या काळात महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठमोळया लावणीसह विविध लोकनृत्य, नाटक, सांगितीक कार्यक्रम, झांज पथकांचे सादरीकरण, कीर्तन, भजन संध्या आदी कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन येथील गणेशमंडळांनी यावर्षी केले आहे. विविध क्षेत्रात कार्यरत मराठींसह अमराठी गणेशभक्तही दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील गणेशोत्सवात मोठया प्रमाणात सहभागी होतात.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :http://twitter.com/micnewdelhi
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 142 / दिनांक 31.08.2022

Monday, 29 August 2022

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार


 

राष्ट्रपतींच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, 29 : महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२२ चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या दामुनाईकतांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि याच जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ बाळके यांना तसेच, मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कुलच्या मुख्याध्यापक कविता संघवी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतेच वर्ष २०२२ च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली आहे. देशातील एकूण ४६ शिक्षकांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असून महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा यात समावेश आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या औचित्याने येथील विज्ञान भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
000000
रितेश भुयार / वृत्त वि. क्र. १४१ / दिनांक २९.०८.2022

Saturday, 27 August 2022

महाराष्ट्राचे सुपुत्र न्या.उदय लळीत यांनी 49वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली




 


नवी दिल्ली, 27 : महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी आज भारताचे 49वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.

राष्ट्रपती भवनाच्या दरबारहॉल मध्ये आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी न्या.लळीत यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. या शपथग्रहण समारंभास उपराष्ट्रपती जगदीप धनकड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती एम.व्यंकैया नायडू ,माजी सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा, केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेण रिजेजू यांच्यासह केंद्रीय मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांचा कार्यकाळ शुक्रवारी (26 ऑगस्ट 2022) संपला. न्या. लळीत आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळतील व 8 नोव्हेंबर 2022 रोजी ते सेवानिवृत्त होतील. सिंधुदुर्ग जिल्हयातील देवगड तालुक्यातील गिर्ये-कोठारवाडी हे न्या. लळीत यांचे मूळ गाव. त्यांचे आजोबा सोलापूरला वकिली करण्याच्या निमित्ताने स्थायिक झाले. त्यांचे वडील न्या.उमेश लळीत हे मुंबई उच्च न्यायालयात न्यायामूर्ती होते. न्या. उदय लळीत यांनी मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. न्या.लळीत हे 2014 पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :http://twitter.com/micnewdelhi
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 139 / दिनांक 27.08.2022   

Wednesday, 24 August 2022

साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा संगीता बर्वे यांना ‘पियूची वही’ कादंबरीसाठी पुरस्कार



 

नवी दिल्ली, 24  : प्रसिध्द लेखिका संगीता बर्वे  यांना ‘पियूची  वही’ या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा ‘साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार’ आज जाहीर झाला आहे.

            देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नाव लौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने आज वर्ष 202च्या बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील २२ प्रादेशिक भाषांसाठी  साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारांची  निवड व घोषणा करण्यात आली.

                                संगीता बर्वे यांच्या लेखनकार्याविषयी

             व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉ. संगीता बर्वे या उत्तम कवयित्री आणि बाललेखिका आहेत. ‘मृगतृष्णा आणि  दिवसाच्या वाटेवरूनहे त्यांचे कवितासंग्रह प्रसिध्द आहेत. श्रीमती बर्वे यांची बाल लेखिका म्हणूनही  वेगळी ओळख आहे. गंमत झाली भारी, झाडआजोबा, खारुताई आणि सावली, उजेडाचा गाव हे त्यांचे मुलांसाठीचे कवितासंग्रह असून पियूची वही ही कांदबरी विशेष प्रसिध्द आहे. याच कादंबरीवर आधारित संगीत पियूची वही हे बाल नाटयही त्यांनी लिहीले आहे. अदितीची साहसी सफर या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला आहे. यासोबतच, त्यांनी विविध विषयांवर ललित लेखनही केले आहे.  

         श्रीमती बर्वे यांच्या कवितासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचा कविवर्य भा.रा.तांबे पुरस्कार, इंदिरा संत  योजनेंतर्गत उत्कृष्ट वाचन निर्मिती पुरस्कार, विशाखा पुरस्कार, कामगार साहित्य परिषदेचा ग.दि.माडगूळकर पुरस्कार ,अनन्वय पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.   

                                     पियूची वही’ विषयी

            रोजनिशी  लिहीण्यासाठी  रोज काहीतरी  लिहिण्यासारखे केले पाहिजे या प्रेरणेतून पीयू नावाच्या मुलीला निसर्गातील वेगवेगळया गोष्टींची होणारी ओळख हे पियूची वही या कादंबरीचा विषय आहे. पीयू नावाची एक छोटी मुलगी  रोजनिशी लिहिण्यासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून सुटीच्या दिवशी खिडकी रंगवायला घेते. त्यातून तिला तिचे जग आणि निसर्ग सापडतो. निसर्ग आणि निसर्गातील विविध घटकांच्या ओढीने पीयू आपले अनुभव लिहू लागली.

                               परिक्षक मंडळ व पारितोषिकाविषयी

                भारत सासणे, प्रवीण बानदेकर आणि प्रेमानंद गजवी  या साहित्यिकांचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार निवडीच्या परिक्षक मंडळात समावेश होता. 50 हजार रुपये आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून यावर्षी १४ नोव्हेंबर २०२२ या बालदिनी साहित्य अकादमीच्या विशेष कार्यक्रमात या पुस्काराचे वितरण करण्यात येईल.

          या पुरस्कारांमध्ये कोकणी  भाषेसाठी लेखिका ज्योती कुंकळकर यांच्या मयुरी या कादंबरीस बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

     http://twitter.com/micnewdelhi     

 000000 

रितेश भुयार / वृत्त वि. क्र. १३9  / दिनांक  4.०८.2022                                           

 

 

 

Tuesday, 23 August 2022

महाराष्ट्राची राष्ट्रीयत्वाची परंपरा पुढे नेत भारतदेश समजून घ्या ;राज्यपाल आर.एन.रवी







‘पुढचे पाऊल’च्यावतीने उत्तीर्ण उमेदवारांचा सत्कार व परिक्षार्थींना मार्गदर्शन

नवी दिल्ली, 23 : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व स्वातंत्र्यचळवळीतील महाराष्ट्राचे योगदान अनन्य साधारण असून महाराष्ट्राची ही गौरवशाली परंपरा पुढे नेत भारतदेश समजून घ्या’, असे आवाहन तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी यांनी आज येथे केले.
‘पुढचे पाऊल’संस्थेच्यावतीने आयोजित सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांच्या सत्कार समारंभात विचार मांडतांना आर.एन.रवी यांनी या भावना व्यक्‍त केल्या. श्री. रवी म्हणाले, भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा देशभर विशेष सन्मान केला जातो. मुळात महाराष्ट्राला थोरपुरुष, समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक आदिंची गौरवशाली परंपरा आहे त्यामुळे राज्याच्या मातीतून भारतीय प्रशासकीय सेवेत येणारे हे अधिकारी आपल्या कार्याचा ठसा उमटवितात. याचा देशाला आभिमान असल्याचेही श्री रवी म्हणाले. राज्याची हीच परंपरा पुढे घेवून जातांना प्रशासन व जनता यामध्ये उत्तम सेतू बनून कार्य करा व त्यासाठी भारतदेश समजून घ्या असेही त्यांनी सांगितले.

श्री. रवी यांनी यावेळी उपस्थितांना आरोग्याची काळजी, वाचन व अभ्यासवृत्ती वृद्धिंगत करणे, आर्थिक स्वावलंबन तसेच आध्यात्मिकशक्ती यांचा उचित समतोल राखण्याविषयीही मार्गदर्शन केले.
दिल्ली स्थित मराठी अधिका-यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या ‘पुढचे पाऊल’ संस्थेच्यावतीने आज येथील डॉ आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचा सत्कार व मार्गदर्शन समारंभाचे आयोजन करण्यात आले. एकूण तीन सत्रात झालेल्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात राज्यपाल आर.एन.रवी यांच्या हस्ते व लोकपाल सदस्य तथा महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव डी.के. जैन,पुढचे पाऊलचे संस्थापक तथा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ ज्ञानेश्वर मुळे , परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव विश्वास संपकाळ आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या भारतीय भूमी पत्तन प्राधिकरणाच्या सदस्य (वित्त) रेखा रायकर यांच्या उपस्थितीत सनदी सेवा उर्त्तीण उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
गुणवंतांचा गौरव

या कार्यक्रमात संदीप शिंदे, प्रशांत बाविस्कर,रणजित यादव,ओंकार शिंदे,अक्षय प्रकाशकर,पवन खाडे, निरंजन सुर्वे, शंतनू मलानी, यश काळे, अर्जित महाजन,विशाल खत्री,रोहन कदम,नितीश डोमळे, स्वप्नील सिसले, अजिंक्य माने, अभिजित पाटील, देवराज पाटील, शुभम भोसले, पद्मभूषण राजगुरू, गिरीष पालवे या सनदी सेवा उत्तीर्ण उमेदवरांचा सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी, कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात उत्तीर्ण उमेदवारांनी स्पर्धा परीक्षेची व अभ्यासाची तयारी या विषयी अनुभव कथन केले. तसेच, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व आणि मुख्य परिक्षेविषयी उपस्थित तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. दुसऱ्या सत्रात उत्तीर्ण उमेदवरांनी परीक्षार्थींना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीविषयी मार्गदर्शन केले. दिल्लीच्या विविध भागात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करणारे महाराष्ट्रातील विद्यार्थी मोठया संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.
पुढचे पाऊल संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचा सत्कार व मार्गदर्शन समारंभाचे हे चौथे वर्ष आहे.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
000000
रितेश भुयार / वृत्त वि. क्र. 138 / दिनांक 23.08.2022


 

Monday, 22 August 2022

‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला सुरुवात









नवी दिल्ली२२ : महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्लीस्थित ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमूर्ती  प्रदर्शन व विक्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. प्रदर्शन व विक्री  ३१ ऑगस्ट २०२२  पर्यंत सुरु राहणार आहे.

        महाराष्ट्रातील मूर्तीकारांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या मूर्तींना  बाजारपेठ  उपलब्ध व्हावी तसेचदिल्लीतील मराठी व अमराठी गणेशभक्तांना गणेशमूर्ती उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने दिल्लीस्थित महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने गेल्या ३० वर्षांपासून गणेशमूर्ती व पुजेच्या साहित्याची विक्री व प्रदर्शन भरवण्यात येत आहे. दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात 3 गणेश मंडळांमध्ये गणेशोत्सव साजरा होतो. अमराठी  भक्तांचाही  गणेशोत्सवात मोठया प्रमाणात सहभाग असतो.

 

        महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमूर्ती व पुजेचे साहित्य खरेदीसाठी पहिल्याच दिवशी  लोकांची वर्दळ सुरु झाली असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सद्या कोविड-१९ महामारीचा जोर कमी असला तरी ग्राहकांची गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. मास्कसॅनिटायजरचा वापर आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन करून गणेशमूर्ती व पूजेच्या साहित्याची खरेदी होत आहे. येथे प्रदर्शन व विक्रीकरिता असलेल्या गणेशमुर्तींची कमाल उंची  फुट आहे. येथील नंदा एस्कोर्टस, त्रिभोवनदास झवेरी, उद्योजक, विविध क्षेत्रांतील मान्यवर यांच्यासह गणेश मंडळांनी गणरायाच्या मोठया मूर्ती राखीव करून ठेवल्या आहेत.

 

         ठाणे येथील मंदार सुर्यकांत शिंदे हे मागील २४ वर्षांपासून ‘मऱ्‍हाटी’ एम्पोरियममध्ये गणेशमूर्ती विक्री व प्रदर्शनासाठी ठेवतात. एम्पोरियमच्या दालनात यंदा लहान मोठया आकाराच्या एकूण 1000 गणेशमूर्ती आहेत. यासर्वच मूर्ती शाडूच्या मातीपासून तयार करण्यात आलेल्या अर्थात पर्यावरणपूरक आहेत.6 इंच ते 3 फुटापर्यंतच्या गणरायाच्या मूर्ती येथे उपलब्ध असून 500 रूपयांपासून ते 30 हजार रूपयांपर्यंत या मूर्त्यांची  किंमत आहे. 

           महामंडळाच्या बाबा खडकसिंह मार्गवरिल ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियम या दालनात गणेशचतुर्थी अर्थात ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी  वाजेपर्यंत हे प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे. अधिक माहिती करिता महामंडळाच्या 011-23363366 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.

 

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

     http://twitter.com/micnewdelhi     

 000000 

रितेश भुयार / वृत्त विक्र. १३७  /  दिनांक   २२.०८.2022                                           

 

 


 

Thursday, 18 August 2022

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांना आदरांजली महाराष्ट्र सदनात सद्भावना दिनाचे आयोजन






 

नवी दिल्ली दि. 18 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना त्यांच्या जन्मदिनी आदरांजली वाहिली व उपस्थितांना सद्भावना दिनाची शपथही दिली.
येथील कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित राहून राज्यपालांनी स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थित सचिव तथा महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे, अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना राज्यपालांनी सद्भावना दिनाची शपथ दिली.
महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन साजरा
महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन साजरा करण्यात आला. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी यावेळी स्व. राजीव गांधी यांना अभिवादन केले. उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद्भावना दिनाची शपथ दिली. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनीही स्व. राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
000000
वृत्त वि. क्र. १३५ / दिनांक १८.०८.2022

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शहीद जवानांना श्रध्दांजली राष्ट्रीय युध्द स्मारकाला दिली भेट





 नवी दिल्ली दि. 18 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राष्ट्रीय युध्द स्मारकाला भेट देत देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना श्रध्दांजली वाहिली.

येथील इंडिया गेट परिसरात स्थित ‘राष्ट्रीय युध्द स्मारका’स राज्यपालांनी भेट दिली. एअर कोमोडोर सुनिल तोमर यांनी राज्यपालांचे स्वागत केले. यावेळी सचिव तथा महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे आणि भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यपांलानी राष्ट्रीय युध्द स्मारकाच्या केंद्रस्थानी स्थित ‘अमर जवान ज्योतीला’ पुष्पचक्र अर्पण करून भारत देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले की, १९६२ च्या भारत-चीन युध्दात शहीद झालेल्या आपल्या बहिणीच्या पतिची (भाऊजी) प्रकर्षाने आठवण झाली. शहिदांच्या कुटुंबियांच्या दु:खाप्रती सद्भाव व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबाविषयी गर्व वाटतो, असे राज्यपालांनी म्हटले आहे. देशासाठी युध्द भूमीवर शहीद झालेल्या वीर जवानांवर देशाला गर्व असून ‘राष्ट्रीय युध्द स्मारक’ हे पाचवे धाम म्हणून देशाच्या तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल, असेही राज्यपालांनी संदेशात म्हटले आहे.
दरम्यान, राज्यपालांनी बुधवारी (दि.१७ ऑगस्ट) नवनियुक्त उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची उपराष्ट्रपती निवास येथे सदिच्छा भेट घेतली. तसेच,माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची १२,जनपथ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
000000
रितेश भुयार / वृत्त वि. क्र. १३६ / दिनांक १८.०८.2022