Monday 1 May 2023

महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण सांस्कृतिक कला सादरीकरणाने ‘महाराष्ट्र दिन’ राजधानीत साजरा









नवी दिल्ली, 1:  महाराष्ट्र राज्याच्या 63 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित  सांस्कृतिक कार्यक्रमात वासुदेव नृत्य, जात्यावरील ओवी, गोंधळ, धनगर नृत्य, भारूड, पोवाडा, अभंग गायनासह ‘महाराष्ट्र गीत’ आदि समृध्द लोककलांच्या दमदार सादरीकरणाने राज्याच्या वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन महाराष्ट्र सदनात घडले.

      कस्तुरबागांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या बँक्वेटहॉल मध्ये आज सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन यांच्या  हस्ते  दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी राजस्थान सदनाचे निवासी आयुक्त धीरज श्रीवास्तव, महाराष्ट्र सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ राजेश अडपावार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित  होते.

     महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने आज राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनानेही यानिमित्त राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक, ऐतिहासिक वारश्याचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. राज्य  शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पदमावती कला संस्कार संस्थेच्या  कलाकारांनी यावेळी सादरीकरण केले.

 

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक वारश्याचे दर्शन

 

श्री गणेशाच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होऊन महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहाटेचे दर्शन घडविणारे वासुदेव नृत्य तसेच घरा-घरांमध्ये जात्यांवर दळण दळतांना गायिल्या जाणाऱ्या ओवीचे सादरीकरण झाले. रांगड्या आवाजात डफाच्या तालावर शिवाजी महाराजांच्या पोवाडयाने मनाचा ठेका धरला.  अंबेच्या जागरण, गोंधळ सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भारावले. गाण्यातून रामाचा वनवास आणि स्त्री शक्तीचा जागर घडविला.  प्रेक्षकांची नावे सांकेतिक भाषेतून मंचावरून सांगण्यात आली. या हातवारे करून गुप्त भाषेतील कलेला उपस्थित रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांनी भरभरून दाद दिली.  या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समृध्द लोक संस्कृतीचे  प्रति‍बिंब उभे केले आणि यास उपस्थितांचा उत्सफूर्त  प्रतिसाद लाभला.

आज सकाळी उभय महाराष्ट्र सदनात प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले.      

00000
 

No comments:

Post a Comment