नवी दिल्ली, 11: महाराष्ट्रातील
वैभववाडी-कोल्हापूर या 3411.17 कोटी रुपये
खर्चाच्या पीएम गतीशक्ती अंतर्गत प्रस्तावित रेल्वे मार्गाची शिफारस, 53 व्या राष्ट्रीय
नियोजन गटाच्या (एनपीजी) बैठकीत करण्यात आली.
उद्योग आणि व्यापार प्रोत्साहन विभागाच्या अंतर्गत (DPIIT) लॉजिस्टिक्स सचिव
सुमिता दावरा यांच्या अध्यक्षतेखाली गूरूवारी झालेल्या बैठकीत, ह्या रेल्वे
मार्गाबाबत शिफारस करण्यात आली. या बैठकीत तीन रेल्वे प्रकल्प आणि तीन रस्ते
प्रकल्प अशा एकूण 28,875.16 कोटी रुपयांच्या सहा प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यात आले. हे प्रकल्प सामाजिक व आर्थिक विकासाकरता मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी पुरवतील
आणि सध्या अस्तित्वात असलेल्या शहरी आणि रेल्वे पायाभूत सुविधांवरील ताणही कमी
करतील असे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (DPIIT) लॉजिस्टिक्स
सचिवांनी बैठकीत माहिती दिली. हे प्रकल्प भविष्यकालीन क्षमतावृद्धीसाठी अतिशय
महत्त्वाचे असून प्रकल्पक्षेत्राच्या लॉजिस्टिक्स क्षमतेमध्ये वाढ करतील.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला फायदा
यावेळी या गटाने महाराष्ट्रातील
वैभववाडी-कोल्हापूर या 3411.17 कोटी रुपये
खर्चाच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाची देखील शिफारस केली. या
रेल्वेमार्गामुळे इतर उद्योगांव्यतिरिक्त या भागातील विशेषतः महाराष्ट्र आणि
कर्नाटकमधील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसाठी औष्णिक कोळशाच्या वाहतुकीला मदत मिळणार
असून या भागातील पर्यटन आकर्षणाव्यतिरिक्त उद्योगांचे नव्या पायाभूत सुविधांच्या
कनेक्टिव्हिटी संदर्भात मूल्यमापन करण्यात आले. या रेल्वे
मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादित शेतीमाल बंदरापर्यंत पोहचण्यास तर
कोकणातील खनिजासह अन्य मालाची पश्चिम महाराष्ट्रात वाहतूक करणे सुलभ आणि किफायतशीर
होऊन कोकण व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल.
सद्या पश्चिम
महाराष्ट्रातील शेती उत्पादित मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक केली जाते. तर
कोकणातील खनिजांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे
मार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमालाची बंदरापर्यंत वाहतूक कमी
खर्चिक आणि सुलभ होणार आहे.तर कोकणातील मालही मालवाहतूक करणे सोयीस्कर ठरणार आहे.
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा : http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त क्र.148 / 11.08.2023
No comments:
Post a Comment