Monday, 12 August 2019

ओंकार नवलिहाळकर आणि विनीत मालपुरे यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान









चंद्रपूर येथील इको-प्रो बहुऊद्देशीय संस्थेचाही सन्मान

नवी दिल्ली, 12 :  कोल्हापूर येथील ओंकार नवलिहाळकर आणि नाशिक जिल्हयातील विनित मालपुरे या तरुणांना आज केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्काराने  सन्मानीत करण्यात आले. चंद्रपूर येथील इको-प्रो बहुऊद्देशीय संस्थेचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय युव दिनानिमित्त येथील अशोक हॉटेल मध्ये आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात येणा-या राष्ट्रीय युवा पुरस्कार 2016-17 चे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या सचिव उपमा चौधरी, सह सचिव असित सिंह उपस्थित होते. देशभरातील 20 तरूण आणि 3  संस्थाना आज हे पुरस्कार वितरीत करण्यात आले असून  कोल्हापूर येथील ओंकार नवलिहाळकर, नाशिक जिल्हयातील कळवण येथील विनीत मालपुरे आणि चंद्रपूर येथील इको-प्रो बहुऊद्देशीय संस्थेलाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. 50 हजार रूपये रोख, पदक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

ओंकार नवलिहाळकर हे कोल्हापुरातील आपत्कालीन सेवा संस्थांच्या माध्यमातून समाजसेवी उपक्रमांमध्ये  ब-याच वर्षांपासून कार्यरत आहेत. जीवन ज्योत आपत्कालीन सेवा संस्था, जीवन मुक्ती आपत्कालीन सेवा संस्थांसोबत कार्य करत त्यांनी अनेक लोकांचे प्राण वाचवले आहे. सलाम मुंबई फाऊंडेशन च्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर मधील शाळा तंबाखूमुक्त करण्यामध्ये ओंकार यांनी महत्त्वाचे योगदान दिले. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याकडून तंबाखू मुक्ती ची शपथ घेतली. ओंकार एका डोळ्याने दिव्यांग असून देखील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या झालेल्या प्रशिक्षणात संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचा प्रथम क्रमांक आला आहे. संसदवारी उपक्रमांतर्गत ओंकार याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

विनित मालपुरे यांनी केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या माध्यमातून  युवा विकासाचे उल्लेखनीय कार्य केले असून त्यांनी हे कार्य ग्रामीण भागापर्यत  पोहचविले आहे. युवा विकास कार्याच्या माध्यमातून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रकुल युवा परिषदेत सहभाग घेत भारताचे प्रतिनिधीत्व  केले आहे. मालपुरे यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना  ‘राज्य युवा  पुरस्काराने’ सन्मानित केले आहे. सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी विनीत यांचा ‘राष्ट्रीय गौरव सन्मान 2018’ ने गौरव करण्यात आला आहे. राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र, क्रीडा व युवा संचालनालय पुणे यांच्या माध्यमातून विनित यांनी सामाजिक क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली. संगणक अभियांत्रीकीत पदव्युत्तर शिक्षण झालेल्या विनित यांनी जय योगेश्वर बहुऊद्देशीय संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.

चंद्रपूर येथील इको-प्रो बहुऊद्देशीय संस्थेने विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत या संस्थेला “राष्ट्रीय युवा पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष बाळू धोत्रे यांनी हा पुरस्कार स्विकारला. चंद्रपूर किल्ल्याची स्वच्छता करून संस्थेने उल्लेखनीय कार्य केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या “ब्लड ऑन कॉल” योजनेची प्रभावी अंमलबजावणी या संस्थेने केली आहे. पर्यावरण, वन्य-जीव संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता, जलसंधारण आदी कार्य या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. सामाजिक जाणीवेतून दिलेल्या उत्तम सेवेची दखल राष्ट्रीय पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.   


महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा . http://twitter.com/MahaGovtMic                                         

000000

रितेश भुयार  /वृत्त वि. क्र.186/  दिनांक  12.08.2019










Friday, 9 August 2019

महाराष्ट्रातील 8 स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान





















नवी दिल्ली, 9 :  ‘भारत छोडोआंदोलन’, ‘गोवा मुक्ती संग्राम’ आणि ‘हैद्राबाद मुक्तीसंग्रामात’ मोलाचे योगदान देणा-या महाराष्ट्रातील 8 स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज  सन्मान करण्यात आला.
         9, ऑगस्ट  या क्रांतिदिनाचे औचित्य साधून ‘भारत छोडो’ आंदोलन, ‘गोवा मुक्ती संग्राम’, ‘हैद्राबाद मुक्तीसंग्राम’ यासोबतच देशभरात ब्रिटींशांना पिटाळून लावण्यासाठी  झालेल्या विविध आंदोलनात सहभागी स्वातंत्र्य सैनिकांचा आज राष्ट्रपती भवनात सन्मान  करण्यात आला.  या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 8 स्वातंत्र्य सैनिकांना गौरविण्यात आले. उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

     या कार्यक्रमात सन्मानीत करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिकांमध्ये भंडारा जिल्हयातील भिवाजी अंबुले, नागपूर जिल्हयातील रतनचंद जैन, परभणी जिल्हयातील माधवराव कुलकर्णी, औरंगाबाद जिल्हयातील लक्ष्मण उखडे,  बुलडाणा जिल्हयातील नारायण खेडकर, लातूर जिल्हातील शिवलींगप्पा इराप्पा उर्फ विरभद्रप्पा सिद्रामप्पा मंडगे, वर्धा जिल्हयातील गणेश बाजपेयी आणि बीड जिल्हयातील बन्सी जाधव यांचा समावेश आहे.

 परभणी येथील माधवराव कुलकर्णी (91 वर्ष) यांनी  ‘छोडो भारत’ आणि ‘हैद्राबाद मुक्ती संग्रामात’ सक्रीय सहभाग घेतला. भूमीगत राहून निजाम सैन्या विरोधात त्यांनी व्यॉड शिबीरातील  सैनिकांना मदत करून हैद्राबाद आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. मंठा पोलीस स्थानकावर 6 जानेवारी 1948 ला करण्यात आलेल्या हल्ल्यात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला.  
बुलडाणा येथील नारायण खेडकर (91 वर्षे)  यांनी गोवामुक्ती संग्रामात सहभाग घेतला. यवतमाळ येथे होमोयोपॅथीचे पदवी शिक्षण घेत असताना ते गोवा विमोचन समितीमध्ये सहभागी झाले व या समितीचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. बुलडाणा जिल्हयातून त्यांनी गोवा मुक्तीसंग्रामासाठी लोकांना एकत्रित केले.  स्वातंत्र्य सैनिकांना घेवून बेळगाव मार्गे गोव्यात प्रवेश करताना त्यांना अटक झाली. श्री खेडकर यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही सहभाग घेतला.
  औरंगाबाद येथील लक्ष्मण उघडे (90 वर्षे) यांनी हैद्राबाद मुक्ती संग्रामात सक्रीय सहभाग घेतला. मुळचे औरंगाबाद जिल्हयातील वैजापूर तालुक्यातील डागपिंपळगाव येथील श्री. उघडे यांनी भूमीगत राहून  हैद्राबाद मुक्ती  संग्रामात सहभाग घेतला. निजामांचे वर्चस्व असलेल्या या भागातील 8 ते 10 खेडयांमध्ये श्री. उघडे यांनी  तिरंगे झेंडे फडकवून निषेद दर्शविला. 
 लातूर जिल्हातील शिवलींगप्पा इराप्पा उर्फ विरभद्रप्पा सिद्रामप्पा मंडगे(88 वर्षे)  यांनी वयाच्या 17 व्या वर्षी हैद्राबाद मुक्ती संग्रामात उडी घेतली. भूमीगत राहून त्यांनी दारुगोळा पुरवठा केला. त्यांना गुलबर्गा येथे अटक झाली यावेळी त्यांनी 2 महिने तुरुंगवास भोगला. 
वर्धा  येथील गणेश बाजपेयी (87 वर्षे ) यांनी गोवा मुक्ती संग्रामात सक्रीय सहभाग घेतला.  वर्धा येथील जे.एस. वाणीज्य महाविद्यालयात पदवी शिक्षण घेत असताना ते गोवा विमोचन समितीत  सहभागी झाले. पुणे-बेळगाव बांधा मार्गे ते सहकारी स्वातंत्र्य सैनिकांसोबत गोव्यात शिरले. यावेळी पोर्तुगीज सैन्यानी अटक करून त्यांना मारहान केली.  त्यांना 2 महिन्याचा कारावास झ्राला.
 बीड  येथील बन्सी जाधव (86 वर्षे) यांनी  1947 सालच्या छोडो भारत आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला.  या काळात  त्यांच्यावर लाठी हल्ला  झाला व त्यांनी  तुरुंगवासही भोगला.
भंडारा येथील भिवाजी अंबुले(94वर्षे), तुमसर येथील लोकमान्य टिळक विद्यालयात शिक्षण घेत असताना  ‘छोडो भारत आंदोलनात’ सहभाग घेतला. याकाळात त्यांनी  10 महिने तुरुंगवास भोगला.
 नागपूर येथील रतनचंद जैन (93 वर्षे) यांनी 1942 च्या भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी त्यांना 6 महिन्यांचा तुरुंगवास  झाला.  
            निवासी आयुक्तांनी केला स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा सत्कार
        दरम्यान, महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय यांनी  आज भारत छोडोआंदोलन’, ‘गोवा मुक्ती संग्राम’ आणि ‘हैद्राबाद मुक्तीसंग्रामात’ मोलाचे योगदान देणा-या महाराष्ट्रातील 8 स्वातंत्र्य सैनिकांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic 
                                                     00000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.185 /  दिनांक  9.08.2019 









‘भोंगा’ सर्वोत्तम मराठी चित्रपट















 मराठी चित्रपटाला विविध श्रेणीत 9 पुरस्कार
66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा
नवी दिल्ली, 9 :  66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा झाली. सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा मान ‘भोंगा’ या चित्रपटाला मिळाला आहे. याशिवाय ‘पाणी’, ‘नाळ’, ‘चुंबक’, ‘तेंडल्या’, ‘खरवस’ आणि ‘आई शप्पथ’ हे मराठी चित्रपट विविध श्रेणींमध्ये सर्वोत्तम ठरले असून मराठी चित्रपटाला 9 पुरस्कार मिळाले आहेत. 'नाळ’ चित्रपटातील उत्तम अभिनयाकरिता श्रीनिवास पोकळे यास सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला तर स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्तम सहकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला .       
                                                 
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्रसिध्द दिग्दर्शक राहुल रवैल आणि सदस्यांनी आज शास्त्रीभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत वर्ष 2018 च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली. ‘अंधाधून’ चित्रपटासाठी अभिनेता अन्शुमन खुराणा आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपटासाठी  विकी कौशल यांना विभागून उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 'महानती' या तेलगू चित्रपटातील भूमिकेसाठी किर्थी सुरेश या अभिनेत्रीला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी अभिनेते स्वानंद किरकिरे यांना 'चुंबक' चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्तम सहकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला.                                
                              ‘भोंगा’ : सर्वोत्तम मराठी  चित्रपट
          प्रादेशिक भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचीही घोषणा यावेळी करण्यात आली. मराठी भाषेसाठी  ‘भोंगा’ या चित्रपटाची  सर्वोत्तम चित्रपट म्हणून निवड करण्यात आली. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील यांनी केले असून मंदार नलिनी प्रोडक्शनची  निर्मिती आहे. दिग्दर्शक व निर्मात्यास रजत कमळ आणि 1 लाख रूपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. आदिनाथ कोठारे दिग्दर्शित आणि पर्पपल पेबल पिक्चर निर्मित ‘पाणी’ हा मराठी चित्रपट पर्यावरणावरील सर्वोत्तम चित्रपट ठरला आहे. दिग्दर्शक व निर्मात्यास प्रत्येकी रजत कमळ आणि 1 लाख 50 हजार रूपये  पुरस्कार स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे.

                                             ‘नाळ’ : दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्तम चित्रपट
सुधाकर रेड्डी येंकटी दिग्दर्शित आणि मृदगंध फिल्म्स निर्मित ‘नाळ’ देशातील दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्तम चित्रपट ठरला आहे. स्वर्ण कमळ आणि 1 लाख 25 हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

                 श्रीनिवास पोकळे आणि स्वानंद किरकिरे यांच्या अभिनयाचा सन्मान
'नाळ’ चित्रपटातील उत्तम अभिनयाकरिता श्रीनिवास पोकळे यास  सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला आहे.  सर्वोत्तम बालकलाकारासाठी यावर्षी चार बालकलाकारांची निवड झाली आहे. रजत कमळ आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यासोबतच प्रसिध्द अभिनेते स्वानंद किरकिरे यांना ‘चुंबक’ चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्तम सहकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रजत कमळ आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.                                  
                             ‘तेंडल्या’ : सर्वोत्तम ऑडिओग्राफीचा मानकरी
‘तेंडल्या’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम ओडिओग्राफीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटात ध्वनीच्या माध्यमातून छोटया शहराच्या वैविद्यपूर्ण रंगछटा दर्शविण्यात आल्या आहेत. लोकेशन साऊंड रेकॉर्डिस्ट गौरव वर्मा यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून रजत कमळ आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
                                              नॉनफिचर मध्येही मराठीचा दबदबा                                
                   नॉनफिचर चित्रपटांमध्येही मराठी मोहर बघायला मिळाली  गौतम वझे दिग्दर्शित 'आई शप्पथ' या चित्रपटाला सर्वोत्तम दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वर्णकमळ आणि 1 लाख 50 हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘खरवस’ हा सर्वोत्तम लघु काल्पनिक चित्रपट ठरला आहे. आदित्य जांभळे यांनी चित्रपटाचे   दिग्दर्शन केले असून श्री महळसा प्रोडक्शन पोंडाची निर्मिती आहे.  प्रत्येकी रजत कमळ आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे  स्वरूप आहे. केदार दिवेकर यांच्या संगीत दिग्दर्शनातील 'ज्योती'  चित्रपटाला सर्वोत्तम संगित दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रजत कमळ आणि 50 हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.                                 
                                  ‘हेल्लारो’ सर्वोत्कृष्ट चित्रपट
‘हेल्लारो' हा गुजराती भाषेतील चित्रपट देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. 'बधाई हो' हा हिंदी चित्रपट सर्वोत्तम मनोरंजक चित्रपट ठरला तर 'पद्मन' हा हिंदी चित्रपट सामाजिक विषयावरील सर्वोत्तम चित्रपट ठरला आहे. ‘ओंडाल्ला येराडाल्ला’ या कन्नड भाषेतील चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मतेसाठी दिला जाणारा नर्गिस दत्त पुरस्कार जाहीर झाला आहे.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic 
                                                     00000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.184 /  दिनांक  8.08.2019 








Thursday, 8 August 2019

ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांना (मरणोत्तर) भारतरत्न प्रदान





नवी दिल्ली,दि.8 : महाराष्ट्राचे सुपूत्र ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांना (मरणोत्तर) आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. नानाजी देशमुख यांचे निकटचे नातेवाईक विरेंद्रजीत सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

            राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात आज देशातील सर्वोच्च नागरीसन्मान भारतरत्न पुरस्काराचे राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावर्षी भारतरत्न पुरस्कार घोषित झालेल्या माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी ,नानाजी देशमुख(मरणोत्तर), प्रख्यात गायक भुपेन हजारीका(मरणोत्तर) यांना  सन्मानित करण्यात आले.

नानाजी देशमुख यांचे निकटचे नातेवाईक विरेंद्रजीत सिंह यांनी तर भूपेन हजारीका यांचे पूत्र तेज हजारीका यांनी  पुरस्कार स्वीकारला. उपराष्ट्रपती एम. व्यकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती यावेळी उपस्थित होत्या.
नानाजी देशमुख प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते होते. समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले.  हिंगोली जिल्हयातील कडोळी या गावी 11 ऑक्टोबर 1916  मध्ये  नानाजी देशमुख यांचा जन्म झाला. नानाजी यांनी भारतीय संस्कृतीच्या आधारावर मनुष्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो या विचाला मध्यवर्ती ठेवून देशभर रचनात्मक व शाश्वत विकास साधणारे समाजकार्य केले.  पांचजन्य , राष्ट्रधर्म आणि स्वदेश या नितकालिकांचे  जबाबदारी त्यांनी सांभाळली. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही नानाजी देशमुख सहभागी झाले. देशातील शेतक-यांना सिंचनाच्याबाबतीत स्वयंपूर्ण करण्यात त्याचे मोलाचे योगदान राहीले आहे. गोवंशसंवर्धन, पारंपरिक कृषी पध्दतीचा विकास व प्रसार, गुरुकुल पध्दतीने शालेय शिक्षण, उद्योजकता विद्यापीठाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराला प्राधान्य,आरोग्यधाम योजनेंतर्गत आयुर्वेदिक वनौषधींविषयी संशोधन आदी महत्वपूर्ण कार्य नानाजींनी केले.

                               माजी राष्ट्रपती  प्रणव मुखर्जी यांचा सर्वोच्च नागरी सन्मान
            प्रसिध्द अर्थतज्ज्ञ व ज्येष्ठ राजकारणी म्हणून  प्रणव मुखर्जी ओळखले जातात. ते भारत देशाचे 13 वे राष्ट्रपती  ठरले. 11 डिसेंबर 1935  मध्ये जन्मलेले प्रणव मुखर्जी हे 6 दशकांच्या सक्रीय राजकारणात   लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य राहिले. केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री, परराष्ट्रव्यवहार मंत्री, संरक्षणमंत्री, वाणिज्य व उद्योग मंत्री आदी पद त्यांनी भुषविली आहेत.  भारतदेशाचे प्रथम नागरीक अर्थात राष्ट्रपती  म्हणून त्यांनी यशस्वीपणे पाच वर्ष कार्य केले.                            
                       भूपेन हजारिकांच्या अविट व अमिट सुरांचा सर्वोच्च सन्मान
        प्रसिध्द गायक व संगितकार भूपेन हजारिका यांच्या अविट व अमिट सुरांची दखल घेवून त्यांना मरणोत्तर देशातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. आसाममध्ये 8 डिसेंबर  1926 जन्मलेले हजारिका यांनी वयाच्या 10 व्या वर्षापासून आसमी भाषेत गायनास सुरुवात केली. कलकत्त्यात वयाच्या दहाव्यावर्षीच त्यांचे पहिले गाणे रेकॉर्ड झाले होते. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी पहिले गाणे लिहीले. बंगाली गीतांना हिंदीत अनुवादीत करून स्वर देत असत. रूदाली, मिलगयी मंजील मुझे, साज, दरमिया, गजगामिनी, दमन आणि क्यों या सुपरहीट चित्रपटांचे गीत लिहीले. हजारिका यांनी एकूण 1 हजार गीत रचणा केल्या व एकूण 15 पुस्तके लिहीली.                         

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi       
 000000   
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.१८३ /  दिनांक  ८.०८.२०१९