Thursday, 16 September 2021

महाराष्ट्रातील दोन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार

 

       

 





 

नवी दिल्ली 16 ;   आरोग्य क्षेत्राचा कणा असणा-या परिचारिकांना बुधवारी सांयकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील दोन परिचारिकांचा समावेश आहे.

        12 मे रोजीफ्लॅोरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिन हा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. कोरोना महामारीची साथ मागील वर्षापासून सुरू असल्यामुळे यावर्षी 12 मे रोजी हा कार्यक्रम होऊ शकला नाही.  बुधवारी दुरस्थ प्रणालीच्या माध्यमातून वर्ष 2020 चे राष्ट्रीय फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य तथा कुंटुब कल्याण मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय राज्य आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री डॉ. भारती पवार या उपस्थित होत्या.

        जळगाव जिल्ह्यातील खुर्द येथील उपकेंद्रातील प्रेमलता संजय पाटील या ऑग्जिलिएरी नर्स मिडवाइव् (एएनएम) आहेत. मागील 14 वर्षांपासून त्या आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. श्रीमती पाटील महिलांना समुपदेशन करण्याचे काम उत्तम प्रकारे पार पाडतात. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातंर्गत असणारी कामे त्यांनी चोख पार पाडली आहेत, त्यांच्या या कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

        जिल्हा सामान्य रूग्णालय, गडचिरोली येथील आंतर रूग्ण विभागाच्या परिचारिका शालिनी नाजुकराव कुमरे  यांनाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा परिचारिका क्षेत्रातील 35  वर्षाचा अनुभव आहे. श्रीमती कुमरे आपले काम पूर्ण क्षमतेने पार पाडतात. आपत्कालिन जीवन रक्षात्मक प्रणाली (Emergency life saving machine ) त्या सक्षमपणे सांभाळतात. यासह त्या नक्षलग्रस्त भागात चांगली कामगिरी बजावत आहेत. आरोग्य क्षेत्रातील अत‍िशय महत्वाचा भाग असणा-या  अवयव दान क्षेत्रातही त्या काम करतात.

प्रदान करण्यात आलेले पुरस्कार  वर्ष 2020 असून  एकूण 51 परिचारिकांना राष्ट्रीय  फ्लॅोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  पुरस्कार स्वरूपात पदक, प्रशस्तीपत्र आणि 50 हजार रूपये रोख प्रदान करण्यात आले आहे. हा पुरस्कार 1973 पासून देण्यात येत आहे.

       

Wednesday, 15 September 2021

कोरोना विरुध्द महाराष्ट्राचा भक्कम लढा ; लसीकरणातही देशात अग्रेसर

     

           विविध क्षेत्रात देशात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र राज्याने कोविड१९ या वैश्विक संसर्गाला धैर्याने तोंड देत या संकटकाळात आरोग्य यंत्रणा बळकट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रराज्य या संकटाचा निकराने सामना करीत आहे. कोविड१९ विरूध्दच्या लढाईत वेळोवेळी जनतेसोबत थेट संवाद साधत मुख्यमंत्री  राज्यातील जनतेच्या पालकत्वाची भूमिका वठवत असून त्यांना आधार देत आले आहेत. राज्याने आरोग्य यंत्रणा बळकट करून हा लढा अधिक भक्कम केला परिणामी रुग्ण संख्येत घट झाली व रुग्ण बरे होण्याची संख्याही वाढली आहे. लसीकरणातही राज्याने देशात आघाडी घेतली असून तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स नेमून कोरानाची संभाव्य तिसरी लाट परतवून लावण्याची तयारी केली आहे. राज्याने कोविड१९ च्या व्यवस्थापनासाठी केलेल्या यशस्वी कार्यवाहीवर प्रकाश टाकणारा हा लेख.

                 गेल्यावर्षी कोरोना संसर्ग सुरु झाला तेव्हा राज्याच्या हातात योग्यती  साधने नव्हती, सोयी नव्हत्या, उपकरणे नव्हती. मात्र, सव्वावर्षांत बऱ्याच साधनसामग्रीची उपलब्धता करण्यात आली. कोविड केअर सेंटर्स ,बेड्स,आयसीयू सुविधा,व्हेंटिलेटर्स,औषधी,मास्क,ऑक्सिजन उपकरणे अशा अनेक बाबी राज्याने उभारल्या. या सुविधा वाढविताना टाळेबंदीसह काही निर्बंधही लावले, याचाच सुपरिणाम म्हणून रुग्ण संख्या आटोक्यात येवू लागली आहे. यावर्षी मार्च महिन्यात राज्यात आलेल्या कोरानाच्या दुसऱ्या लाटेने आव्हान वाढवले. विशेषत: ऑक्सिजन मिळविण्यासाठी धडपड झाली. मात्र, राज्याने तातडीने मिशन ऑक्सिजन सुरु करून दररोज १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीसह ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचे लक्ष ठेवले. लसीकरणामध्ये महाराष्ट्राने दोन्ही डोस देण्यात देशात पहिले तर एकूण डोस देण्यात दुसरे स्थान मिळवून ६ कोटी ४० लाख लस मात्रांचा टप्पा ओलांडला आहे.

            राज्यात यावर्षी कोराना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीला दिवसाकाठी ६० हजार रुग्ण संख्या झाली. याचा सामना करण्याकरिता उपचाराच्या सुविधा,ऑक्सिजनची उपलब्धता,संसंर्ग टाळण्यासाठी कठोर निर्बंध लावण्यात आले  परिणामी  जून  महिन्यापासून राज्यातील कोरानाच्या दैनंदिन रुग्ण संख्येत घट होवू लागली व आज हा आकडा ३ ते ४ हजारांच्या घरात आला आहे. राज्य शासनाने पहिली लाट थोपवताना उभारलेल्या सुविधांच्या जोडीला यावेळी  उपचाराच्या नव्याने सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

                                              राज्यात उपलब्ध सुविधांवर एक नजर

          राज्यात ६०९ चाचणी प्रयोग शाळा आणि ५ हजारांहून अधिक कोविड केअर सेंटर्स आहेत. आजपर्यंत कोराना उपचाराच्या ६ हजार ९५९ सुविधा असून यात ४ लाख ९७ हजार ९७ आयसोलेशन खाटांचा (आयसीयू खाटा वगळून) समावेश आहे. त्यामध्ये १ लाख २१ हजार ऑक्सिजन खाटा आहेत. राज्यात ३६ हजार ७०२ आसीयू खाटा असून १४ हजार २४५ व्हेंटिलेटर्स आहेत. कोविड रुग्णांसाठी ३ लाख ५१ हजार ३३० खाटा उपलब्ध आहेत. कोविड संशयित रुग्णांसाठी १ लाख २७ हजार ७२१ आयसोलेशन  खाटा, १५ लाख ८६ हजार ९६ पीपीई कीट आणि २६ लाख १८ हजार ८६० एन९५ मास्क उपलब्ध आहेत.

                                                  

 

                                 मिशन ऑक्सिजनची घौडदौड

         कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेता राज्यात मिशन ऑक्सिजन राबविण्यात येत आहे. दररोज १३०० मेट्रीक टन ऑक्सिजन उत्पादित होत असून ही  क्षमता ३ हजार मेट्रीक टन नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आवश्यक ऑक्सिजनची  निर्मिती करण्यासाठी राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (पीएसए) बसवण्यात येत आहे. जून अखेर पर्यंत सुमारे ३८ पीएसए प्लान्ट कार्यान्वित झाले असून त्याद्वारे दिवसाला सुमारे ५३ मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती झाली. राज्यातील साखर कारखाने, पेपर, पोलाद, पेट्रोलियम, फर्टिलायझर, रिफायनरी उद्योगांच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती वाढविण्यात येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची  वाढती मागणी पाहता राज्याने अन्य राज्यांमधून ३५० मेट्रीक टन ऑक्सिजन घेतला.

                                                               आर्थिक पाठबळ

          कोरोना संसर्गाच्या संकटांचा निकराने सामना करण्याकरिता राज्यशासनाने आर्थिक पाठबळ दिले. कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांसाठी जिल्हा नियोजन समित्यांच्या माध्यमातून ३ हजार ३०० कोटी रूपये उपलब्ध करून दिले. राज्यातील ३५० आमदारांना त्यांच्या स्थानिक विकास निधीतून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी प्रत्येक १ कोटी प्रमाणे ३५० कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी ८ हजार ९५५ कोटी २९ लाखांची तर वैद्यकीय शिक्षण विभागासाठी १ हजार ९४१ कोटी ६४ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे .                                        

                                          रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के

                   सप्टेंबर महिन्यांच्या पहिल्या आठवडयापर्यंत राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के झाले आहे, देशाचा हा दर ९७.४८ टक्के तर जगाचा ८९.४८ टक्के आहे.  राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ६० लाख ८८ हजार ११४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ६१७  नमुने पॉझिटीव्ह आले आहेत . तुलनेने  ६३ लाख ९ हजार २१  रुग्ण या आजारातून बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्यू दर २.१२ एवढा आहे व आतापर्यंत १ लाख ३७ हजार ८९७ लोकांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.                       

                                                      लसीकरणात अव्वल

        राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला वेग आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयापर्यंत राज्यातील १ कोटी ७६ लाख ४५ हजार ८५५ नागरिकांना दोन्ही डोस देत, देशात अव्वल ठरले आहे. केंद्र शासनाकडून लसी उपलब्ध होताच एका दिवसात ११ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचा विक्रमही  राज्याच्या नावावर नोंदला गेला आहे. पहिला व दुसरा डोस मिळून राज्यातील ६ कोटी ४० लाख ७८ हजार ९१९  जनतेला  लस मात्रा देत महाराष्ट्र देशात दुस-या क्रमांकावर आहे.                                              

             केंद्र शासनाकडून प्राप्त लसीनुसार राज्यात दररोज सुमारे ३ ते ४ लाख नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.राज्यातील १८ पेक्षा अधिक वयाच्या लोकसंख्येपैकी ४८.६४ टक्के नागरिकांना एक डोस दिला गेला आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकसंख्येपैकी ३७.८८ टक्के नागरिकांना पहिला लसीचा डोस देण्यात आला आहे तर ४५ पेक्षा अधिक वयाच्या कमीत कमी एक डोस दिला गेलेल्या नागरिकांचे प्रमाण ५५.२४  टक्के एवढे आहे. आरोग्य कर्मचारी,  फ्रंटलाईन कर्मचारी, ४५  पेक्षा जास्त वयोगटातील आणि १८ ते ४४ वयोगटातील नागरिक अशा एकूण ६ कोटी ४० लाख ७८ हजार ९१९  जनतेला आतापर्यंत  लस मात्रा देण्यात आल्या आहेत.

            कोविड कृतीदलाची स्थापना ; ‘माझा डॉक्टर वैद्यकीय परिषदेचे आयोजन

              महाराष्ट्रात  कोराना संसंर्गाची लाट आली  तसे या संकटाचा सामना करण्याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली  राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब‍ कल्याण मंत्री राजेश टापे यांच्यासह संबंधित विभागांनी कंबर कसून कामाला सुरुवात केली. कोरोना संसर्गाची लाट थोपवून धरण्यासाठी व परतवून लावण्याकरिता मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संकल्पनेतून तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असणाऱ्या राज्य कोविड कृतीदलाची स्थापना करण्यात आली. या कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक असून सदस्य सर्वश्री डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई आदींचा यात समावेश आहे. कोरानाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला आहे. या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांचे कृती दल तयार केले  असून या १४ सदस्यीय  कृती दलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभु आहेत. मुख्यमंत्री महोदय कायम या कृतीदलांच्या संपर्कात असून त्यांनी या कृतीदलांच्यावतीने वेळोवेळी आयोजित परिषदांमध्ये सहभाग घेवून मार्गदर्शन केले आहे.

                                                 संभाव्य तिस-या लाटेची तयारी

                कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने नुकतेच ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला संबोधन करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोना संसर्गाविरूध्दच्या युध्दात डॉक्टर, नर्सेस, पोलीस, अग्निशमनदल कर्मचारी  आदी कोरोना योद्धे हे शस्त्र असल्याचे सांगितले. राज्यातील रुग्णालय व्यवस्था, यंत्रसामग्री,औषध उपलब्धतेबाबतही लक्ष देण्यात येणार असल्याचे अधोरेखित केले. राज्यात दुसरी लाट कायम आहे आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा बंदोबस्त करण्यासाठी  जनतेसह सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.

                                           मुख्यमंत्र्यांची पालकत्वाची भूमिका

           राज्यात सुरु झालेल्या कोरोना संसर्गापासूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकत्वाच्या भूमिकेतून वेळोवेळी जनतेशी संवाद साधत आहेत व त्यांना धीर देत आहेत. त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कोरोनाकाळात वेळोवेळी जनतेशी संवाद साधला. राज्यातील वृत्त वाहिन्यांद्वारेही घराघरात पोहचलेल्या या संवादातून त्यांनी राज्यशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. प्रसंगी राज्यातील जनतेने कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी दै‍नंदिन जीवनात स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्यासह नियम पाळण्याविषयीही ते मार्गदर्शन करीत आहेत.

              जनतेसोबतच्या संवादातच माझे कुटुंब माझी जबाबदारी आणि मी जबाबदार या महत्वाच्या घोषणा देत मुख्यमंत्र्यांनी राज्यात कोरोनाविरुध्दच्या लढाईसाठी हे दोन उपक्रम सुरु केले. कोरोनास्थितीत डळमळीत झालेली  स्थिती सावरून राज्याला पुन्हा उभेकरण्यासाठी त्यांनी याच मंचावून मिशन बिगिन अगेन आणि ब्रेक दि चेन या कार्यक्रमांची घोषणा केली. ब्रेक दि चेन निर्बंधकाळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ५ हजार ४७६ कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले. राज्यात या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबाजवणी सुरु आहे.  

             इतिहासकाळापासून विविध संकटांवर समर्थपणे मात करणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या थोर पंरपरेला साजेशे कार्य करत राज्यशासन कोरोना संसर्गाचा नेटाने मुकाबला करत या संकटावर मात करण्याच्या दिशेने समर्थपणे मार्गक्रमण करीत आहे. राज्यात मोठया प्रमाणात उभारण्यात येत असलेल्या सुविधा व गतीमान पध्दतीने सुरु असलेले लसीकरण तसेच कोरोना प्रतिबंधात्मक अन्य महत्चाच्या उपाययोजना व कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून महाराष्ट्र हे संभाव्य तिसऱ्या लाटेलाही परतवून लावण्यासाठी सज्ज होत आहे.                                        

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

                                                            00000

रितेश मोतीरामजी भुयार,

उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.

 

Thursday, 9 September 2021

महाराष्ट्रातून राज्यसभेवरील रिक्त एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला निवडणूक





नवी दिल्ली , ९ : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त असलेल्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबर २०२१ रोजी निवडणूक होणार असून २२ सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम तारिख आहे.  

                     भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह, पश्चिम बंगाल,आसाम, मध्यप्रदेश आणि तामीळनाडूमधून राज्यसभेवर रिक्त झालेल्या एकूण सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला .

                  खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे १६ मे २०२१ पासून महाराष्ट्रातून राज्यसभेची  जागा रिक्त  झाली आहे. या जागेसह राज्यसभेच्या एकूण सहा जागांसाठी ४ ऑक्टोबर २०२१ ला निवडणूक घेण्यात येणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

                                असा आहे निवडणूक कार्यक्रम                                                   

            या निवडणुकांसाठी १५ सप्टेंबर रोजी  निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. २२ सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम तारिख असून २३ सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी होणार. २७ सप्टेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मदतदान होणार असून  सायंकाळी ५ वाजता मतमोजणी  होवून निकाल जाहीर होणार आहे. ६ ऑक्टोबर २०२१ रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.        

                                       

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

                                                            00000

रितेश भुयार /वि.वृ.क्र.१९७ /दि. .०९.२०२१  

 



 

Wednesday, 8 September 2021

शेक्सपियर प्रमाणे उच्च दर्जाचे लेखन करण्याचे ध्येय – साहित्यिक लक्ष्मणराव शिरभाते




 

नवी दिल्ली , ८ : हिंदी भाषेतील श्रेष्ठ साहित्यिक गुल्‍शन नंदा यांच्या साहित्याने प्रेरित होवून ३५ पुस्तकांचे लेखक म्हणून लौकिक मिळाला. हा प्रवास थांबला नसून जगप्रसिध्द लेखक शेक्सपियर प्रमाणे उच्च दर्जाचे लेखन करण्याचा मानस महाराष्ट्राचे सुपुत्र व वरिष्ठ हिंदी साहि‍त्यिक लक्ष्मणराव शिरभाते यांनी आज व्यक्त केला.  

          दिल्लीतील आयटीओ परिसरातील विष्णू दिगंबर मार्गवर चहाची टपरी चालवत लेखन-प्रकाशन व्यवसाय सांभाळणाऱ्या श्री.लक्ष्मणराव यांच्या कार्याची दखल घेवून येथील एका प्रसिध्द पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांना चहाचे काउंटर आणि लेखन स्टॉल उपलब्ध करून दिला आहे. या उपलब्धीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने लक्ष्मणराव यांचा सत्कार व अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री. लक्ष्मणराव यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार  केला. माहिती अधिकारी अंजू निमसरकर , उपसंपादक रितेश भुयार, सामाजिक कार्यकर्त्या कविता नारायणन यावेळी उपस्थित होत्या.  

              यावेळी श्री लक्ष्मणराव यांच्यासोबत कार्यालयातील अधिकारी–कर्मचारी यांनी औनपचारिक वार्तालाप झाला. हिंदी भाषेतील लेखक बनण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या श्री लक्ष्मणराव यांचा अमरावती जिल्हयातील तळेगाव (दशासर) या त्यांच्या मूळ गावाहून दिल्लीतील प्रवेश आणि उदरनिर्वाह व ध्येय प्राप्तीचा पटच श्री लक्ष्मणराव यांनी यावेळी उलगडला. त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी रामदास ही हिंदी कांदबरी लिहिली  व ती प्रकाशित करायची म्हणून १९७५ मध्ये थेट दिल्लीत आले. याच शहरात राहून हिंदी लिखाण करण्याचा चंग बांधून त्यांनी मोठया प्रमाणात वाचन केले, दिल्ली विद्यापीठातून पदवी व इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त  विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. लेखन कार्यही सुरुच होते पण, कोणी प्रकाशक त्यांचे पुस्तक प्रकाशित करत नव्हते. अशात त्यांनी उदरनिर्वाह व परिवाराचा चरितार्थ चालविण्यासाठी आयटीओ परिसरातील विष्णू दिगंबर मार्गवर चहाची टपरी सुरु केली  व स्वत:च पुस्तक प्रकाशित करून येथेच ते पुस्तक विक्रीही करू लागले.  

          आजवर त्यांनी  कादंबरी, कथा, वैचारिक या साहित्य प्रकारात ३५ पुस्तके लिहिली असून त्यातील २२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. रामदास, नर्मदा, रेणु आदी त्यांच्या कादंबऱ्या तर  ‘अहंकार’, दृष्टिकोण’, अभिव्यक्ति आदी त्यांचे कथासंग्रह प्रसिध्द आहेत. द बॅरिस्टर  हे महात्मा गांधीजींवरील व प्रधानमंत्री हे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरील पुस्तकांसह त्यांचे वैचारीक पुस्तके प्रकाशित आहेत.

                  ‍िश्री लक्ष्मणराव यांच्या कार्याची दखल  द न्यूयॉर्क टाईम्स, द गार्डियन सारख्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांनी घेतली आहे. त्यांच्या कार्याची महती ऐकूण येथील अशोक रोडवर स्थित ला शंग्रीला या पंचतारांकित हॉटेल व्यवस्थापनाने श्री लक्ष्मणराव यांना सन्मानाने आमंत्रित करून त्यांचा चहाचा काउंटर उघडला आहे. त्यांची पुस्तकेही या काउंटरवर ‍विक्रीसाठी उपलब्ध असून येथे येणारे पाहुणे श्री लक्ष्मणराव यांच्यासोबत गप्पा मारत चहाचा आनंद घेतात. या हॉटेलकडून चांगला पगारही मिळतो वेगवेगळया क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत आपले लेखन पोहचते याचा आनंद  असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. आर्थिक लाभ मिळविणे लेखकाचे ध्येय नसावे तसेच प्रतिद्वंद आणि प्रतिस्पर्धेपासून लेखकांनी लांब रहावे तसेच सर्वप्रकारचे वाचन करावे असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

                  भविष्यात जागतिक किर्तीचे लेखक शेक्सपीयर प्रमाणे लेखन करण्याचा तसेच आपल्या लिखित  साहित्याचा मराठी, पंजांबी आणि  उर्दु भाषेत अनुवाद होवून जास्तीत-जास्त वाचकांपर्यंत हे साहित्य पोहचावे असा मानसही श्री लक्ष्मणराव यांनी बोलून दाखवला.                                           

                 अमरज्योत कौर अरोरा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर अंजू निमसरकर यांनी आभार प्रदर्शन केले आणि रितेश भुयार यांनी सूत्रसंचालन केले.             

                              परिचय केंद्राच्या ग्रंथालयास पुस्तके भेट

           श्री लक्ष्मणराव यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राच्या ग्रंथालयास त्यांची सर्व प्रकाशित पुस्तके भेट स्वरुपात दिली.                              

                                       

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

                                                            00000

वि.वृ.क्र.१९६ /दि. .०९.२०२१  

 




 

Tuesday, 7 September 2021

राजधानीत आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी





 


नवी दिल्ली, 7 : आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात  साजरी करण्यात आली.

 कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्यसचिव श्यामलाल गोयल यांनी  राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.  

    महाराष्ट्र परिचय केंद्रात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

 महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा  उपसंचालक (अ.का.)  अमरज्योत कौर अरोरा यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर,उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह उपस्थित कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

 आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

                                                            00000

वि.वृ.क्र.195 /दि. 7.09.2021

 


Monday, 6 September 2021

महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्त पदी डॉ. निरूपमा डांगे रूजु


नवी दिल्ली, 6  : महाराष्ट्र सदनात अपर निवासी आयुक्त पदावर डॉ. निरूपमा डांगे या आज सोमवारी रूजु  झाल्या आहेत.

भारतीय प्रशासकीय सेवेतील 2007 च्या तुकडीच्या  डॉ. निरूपमा डांगे या आहेत. 2018 मध्ये त्या बुलढाणा जिल्ह्यांच्या जिल्हाधीकारी पदावर कार्यरत होत्या. त्यांनतर त्या परदेशात अभ्यासासाठी गेल्या होत्या.

त्यापूर्वी विदर्भ विकास बोर्डच्या तसेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, नागपूर  येथील आयुक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार त्यांनी साभांळला आहे. यासह महाराष्ट्र राज्य खनीकर्म महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणुनही जबाबदारी सांभाळली आहे.


Wednesday, 1 September 2021

‘म-हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला सुरुवात







  

नवी दिल्ली, 1 : महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्लीस्थित म-हाटी महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमूर्ती आणि पुजेच्या साहित्याचे प्रदर्शन व विक्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. प्रदर्शन व विक्री  १० सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार आहे.

             महाराष्ट्रातील मूर्तीकारांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या मुर्त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच, दिल्लीतील मराठी व अमराठी गणेशभक्तांना गणेशमूर्ती उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने दिल्लीस्थित महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने गेल्या २९ वर्षांपासून गणेशमूर्ती व पुजेच्या साहित्याची विक्री व प्रदर्शन भरवण्यात येत आहे. दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात ४० गणेश मंडळांमध्ये गणेशोत्सव साजरा होतो.अमराठी भक्तांचाही गणेशोत्सवात मोठया प्रमाणात सहभाग असतो.

         महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमूर्ती व पूजेचे साहित्य खरेदीसाठी लोकांची वर्दळ सुरु झाली आहे. कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. मास्क, सॅनिटायजरचा अनिवार्य  वापर आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन करून गणेशमूर्ती व पूजेच्या साहित्याची खरेदी होत आहे. गणेशमुर्तींच्या उंचीलाही मर्यादा असून येथे प्रदर्शन व विक्रीकरिता असलेल्या मूर्तीची कमाल उंची फुट आहे. दिल्लीस्थित नंदा एस्कोर्टसह अन्य गणेश मंडळांनी  गणरायाच्या मोठया मुर्त्या राखीव करून ठेवल्या आहेत.

          ठाणे येथील मंदार सुर्यकांत शिंदे हे मागील २३ वर्षांपासून गणेशमूर्ती विक्रीकरिता दिल्लीतील म-हाटीएम्पोरियमध्ये येतात. एम्पोरियमच्या दालनात यंदा लहान मोठया आकाराच्या एकूण 00 गणेशमूर्ती आहेत. यासर्वच मुर्त्या इकोफ्रेंडली आहेत. 6 इंच ते फुटापर्यंतच्या गणरायाच्या मूर्ती येथे उपलब्ध असून 00 रूपयांपासून ते 6 हजार रूपयांपर्यंत त्यांची  किंमत आहे.  

महामंडळाच्या बाबा खडकसिंह मार्गवरिल म-हाटी महाराष्ट्र एम्पोरियम या दालनात गणेशचतुर्थी अर्थात १०   सप्टेंबर २०२१ पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी वाजेपर्यंत हे प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे. अधिक माहिती करिता महामंडळाच्या 011-23363366 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.

 महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

http://twitter.com/micnewdelhi 

                                                                 00000000

रितेश भुयार/वि.वृ.क्र १९२ / दि. ०१.०९.२०२१