Friday, 14 April 2023

राजधानीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

 






सदनातील कार्यक्रमात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांची उपस्थिती

 

नवी दिल्ली, दि. 14 : महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब भीमराव रामजी  आंबेडकर यांची 132 वी जयंती आज  महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रात उत्साहात साजरी करण्यात आली.

 

कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या पुर्णाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी पुतळ्याला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार  यांच्यासह  महाराष्ट्र  सदनाच्या  अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही डॉ.  बाबासाहेब आंबेडकर  यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी महाराष्ट्र सदनातील अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

महाराष्ट्र परिचय केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 

            महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपव्यवस्थापकीय संचालक श्री विजय कपाटे  यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यांच्यासह  परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजु निमसरकर, अधीक्षक रघुनाथ सोनवणे, किशोर वानखेडे, प्रशांत शिवरामे या कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

            सकाळी संसद भवन परीसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या समवेत   उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय सामजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. विरेंद्र कुमार, यांच्यासह केंद्रीय मंत्री,  खासदार सर्वश्री, सोन‍ीया गांधी,  मल्लिकार्जून खरगे यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचे अुनयायी मोठया संख्येने उपस्थित होते.  

0000

 

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अंजु निमसरकर वि.वृ.क्र.67/दि.14.04.2023

Tuesday, 11 April 2023

राजधानीत महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी






 

नवी दिल्ली, दि. 11 : थोर समाज सुधारक व क्रांतिकारक विचारवंत महात्मा जोतीबा फुले यांची जयंती उभय महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

 

कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात राज्यपाल श्री.रमेश बैस यांनी पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष श्री. हंसराज अहीर, प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार  यांच्यासह  महाराष्ट्र  सदनाच्या  अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही  महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

 

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

महाराष्ट्र परिचय केंद्रात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

 

            महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक माहिती अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

 


 

Monday, 10 April 2023

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सद‍िच्छा भेट

 




नवी दिल्ली , 10 : महाराष्ट्राचे  राज्यपाल रमेश बैस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांची त्यांच्या लोकजन कल्याण मार्ग स्थित शासकीय निवासस्थानी  सदिच्छा भेट घेतली.

                                                 

श्री. बैस यांनी पंतप्रधान श्री. मोदी  यांना  पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली.  यावेळी श्री. मोदी यांनी  श्री. बैस यांच्या सोबत महाराष्ट्रासंबंधी चर्चा केली.

Sunday, 9 April 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट





 





नवी दिल्ली,9: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज लखनऊ येथे त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

मुख्यमंत्री श्री शिंदे दोन दिवसीय उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून आज रात्री त्यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री श्री शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांना शाल, पुष्पगुच्छ तसेच 'श्री गणेशाची' प्रतिमा भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दोन दिवसीय दौऱ्याचे अनुभव सांगितले. तसेच, अयोध्येत होत असलेल्या विकासकामांचे कौतुक केले.

यावेळी योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या सन्मानार्थ रात्री भोजन आयोजित केले. याप्रसंगी राज्याचे मंत्री तसेच आमदार, खासदार उपस्थित होते.

00000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic 
 अंजुनिमसरकर/वि.वृ.क्र.64 /दि. 09.04.2023

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे अतुट नाते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे



शरयू नदीच्या तिरी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महाआरती

 

नवी दिल्ली, 9 :   महाराष्ट्राचे देशातील अन्य राज्यांसोबत नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले आहे, त्यातही महाराष्ट्र  आणि उत्तर प्रदेशचे नाते अतुट असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत शरयु नदीच्या तिरी केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत शरयु नदीवरील विशेष महाआरती सायंकाळी करण्यात आली.

मुख्यमंत्री श्री शिंदे हे दोन दिवसीय उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून आज अयोध्या येथे शरयू नदीच्या किनारी झालेल्या  महाआरतीत ते सहभागी झालेत. यावेळी श्री शिंदे बोलत होते.

ते पुढे म्हणाले,  महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश राज्याचे नाते खूप जुने आणि अतुट असे आहे. उत्तर प्रदेशकडे संपूर्ण देश हा आस्थेने आणि श्रध्देने पाहत असल्याचे ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातून आलेल्या हजारो भाविकांचे खुल्या मनाने उत्तर प्रदेश वासीयांनी उत्साहात स्वागत केल्याच्या भावना त्यांनी यावेळी बोलुन दाखविल्या. मुख्यमंत्री होण्यापूर्वी अनेक वेळा या परीसरात नियोजना निमित्ताने आल्याच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. मुख्यमंत्री झाल्यावर  प्रथमच अयोध्या नगरीत आल्यावर इथल्या जनतेने आपलेसे केले असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी त्यांनी शासन व प्रशासनातील सर्व वरिष्ठांचे आभार मानले.

मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी  शरयू नदीची पूजा केली. त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आणि हजारो भाविकांच्या साक्षीने विशेष महाआरती  झाली. शरयु नदीचा संपूर्ण परिसरात रोषणाई करण्यात आली .  संपूर्ण  वातावरण भक्तीमय  होते. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतच्यावेळी आतषबाजी करण्यात आली. राज्यातून खास गोंधळी लोककलेचे पथक शरयू नदीवर उपस्थित होते. महाआरतीच्या वेळी या पथकानेही आपल्या कलेचे प्रदर्शन केले .

याप्रसंगी लक्ष्मण किल्लाचे मैथलीशरण महाराज, शशीकांत महाराज, उत्तप्रदेशचे जलसंपदा मंत्री स्वतंत्र देवसिंह, राज्याचे  ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे , अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड,  कामगार मंत्री सुरेश खाडे, राज्यातील आमदार यासोबत खासदार सर्वश्री राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, कृपाल तुमाणे, सदाशिव लोखंडे, श्रीरंग बारणे, हेमंत गोडसे, संत, महंत  आदी मोठया संख्येने उपस्थित होते.

00000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                               अंजुनिमसरकर/वि.वृ.क्र.63 /दि. 09.04.2023

 

अयोध्येत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती




 

नवी दिल्ली, 9 : प्रभु श्री रामचंद्राच्या जन्मस्थळी अयोध्या येथे हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणीची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अयोध्येत आयोजित पत्रकार परिषदेत केली.

मुख्यमंत्री श्री शिंदे दोन दिवसीय उत्तर प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी अयोध्येत प्रभु श्री रामच्रंद्राच्या जन्मस्थळी दर्शन घेतले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची माहिती दिली. यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचेही श्री शिंदे यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्री योगी यांना निवेदन दिले असल्याची माहितीही श्री शिंदे यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे घेतलेल्या निणर्यांची माहिती येथील माध्यमांना दिली. राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई मिळावी, यासाठी स्वत: पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले.

अयोध्येतील वातावरण भारावलेले असून राम मंदिराच्या गर्भ गृहातील वातावरण दिव्य ऊर्जेची अनुभूती देणारे आहे. जानेवारी 2024 मध्ये मंदिरांचे बांधकाम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुर्ण होईल, असे ते म्हणाले.

तत्पुर्वी मुख्यमंत्री श्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभु श्री रामचंद्रच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले. हनुमान गढी येथे जाऊन भगवान मारुतीचे दर्शन घेतले. त्यानंतर जैन मंदिरात जाऊन भगवान महावीरांचे दर्शन घेऊन इतर ज्येष्ठ संत महंतांची भेट घेतली. त्यांनी  मंदीर बांधकामाची पाहणी केली. याप्रसंगी राज्याचे मंत्री, खासदार, आमदार आणि भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

 

 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतले ‘प्रभु श्री रामचंद्राचे दर्शन’




 

नवी दिल्ली, 9 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अयोध्या येथे  ‘प्रभु श्री रामचंद्रा’च्या जन्मस्थळी दर्शन घेतले.

 

मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आज अयोध्येत आगमन झाले असून यावेळी उभयतांचे  शहरात मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मंत्री, महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार यासह स्थानिक भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  अयोध्येतील मंदीरात  ‘प्रभु श्री रामचंद्रांचे’ दर्शन घेतले तसेच यावेळी झालेल्या महाआरतीत सहभागी झाले. यानंतर अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या  राम मंदिर परिसराला मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी करून मंदीराच्या बांधकामाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील , ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे , अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, राज्य उत्पादन शुल्क मंत्री  शंभूराजे देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, कामगार मंत्री सुरेश खाडे, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत यासोबत खासदार सर्वश्री राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, कृपाल तुमाणे, सदाशिव लोखंडे, श्रीरंग बारणे  आदी उपस्थित होते.


 

Saturday, 8 April 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्तर प्रदेशात जल्लोषात स्वागत







नवी दिल्ली, 8 :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील विमानतळावर आगमन झाले. 

 

मुख्यमंत्री श्री शिंदे आज पासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून आज सायंकाळी त्यांचे लखनऊ येथील विमानतळावर आगमन झाले. यावेळी उत्तर प्रदेशचे जलसंपदा मंत्री स्वतंत्र देवसिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री शिंदे यांचे स्वागत केले. तसेच, उत्तर प्रदेश वासियांनी श्री शिंदे यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी येथील जनतेचे धन्यवाद मानले.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन, दादाजी भुसे, संदिपान भुमरे, गुलाबराव पाटील आणि अन्य मंत्री  तसेच आमदार या दौऱ्यामध्ये सहभागी आहेत.

 

मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असणारे मंत्री तसेच आमदार  आज लखनऊ येथे थांबणार असून उद्या अयोध्या  येथे 'प्रभू श्री रामचंद्र' यांचे दर्शन घेतील.

    

 

00000

 

Thursday, 6 April 2023

इंदू मिल स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाच्या प्रतिकृतीबद्दल समाधान सामाजिक न्याय विभागातर्फे लोकप्रतिनिधींचा दिल्ली दौरा






नवी दिल्ली, 06 : मुंबई येथील इंदू मिल याठीकाणी उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळयाच्या प्रतिकृतीबद्दल लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी समाधान व्यक्त केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे या पुतळयाच्या प्रतिकृतीचा पाहणी  दौरा आज आयोजित करण्यात आला.

           मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री  यांच्या सुचनेनुसार आज समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटूंबातील सदस्य, महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, माजी मंत्री, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी यांचा  गाझियाबाद(उत्तर प्रदेश) येथील राम सुतार आर्ट कंपनी  येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या पुतळयाच्या प्रतिकृतीचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला.

यावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाच्या प्रतिकृतीची पाहणी करून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. तसेच, काही किरकोळ बदल सुचविले. इंदू मिल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे, असा राज्य शासनाचा मानस आहे.   इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे  भव्य स्मारक उभारण्यास राज्यशासन कटीबध्द असून बाबासाहेबांचा पुतळा या स्मारकाचे खास वैशिष्ट आहे.

          भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांचा पुतळा  उभारण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार हा पुतळा उभारणार असून गाझियाबाद येथे या पुतळ्याची २५ फुटाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या प्रतिकृतीच्या आधारावरच मूळ पुतळा उभारण्यात येणार आहे. यावेळी श्री सुतार यांनी उभारण्यात येणाऱ्या पुतळयाबद्दलचे  सादरीकरण केले.

         सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आयोजित दौऱ्यामध्ये भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, विधानसभा सदस्य संजय बनसोडे, यामिनी जाधव, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, डॉ. राजेंद्र गवई, जयदिप कवाडे, भदंत राहूल बोधी यासह सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे सदस्य, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे, सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टचे अधिष्ठाता प्रा.विश्वनाथ साबळे, आदि उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी येथे आयोजित बैठकीतील चर्चेत सहभागी होऊन डॉ. बाबासाहेब स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळयाच्या प्रतिकृतीविषयी समाधान व्यक्त केले.

देश- विदेशातील बाबासाहेबांचे अनुयायी या स्मारकाला भेट देवून त्यांच्या भव्य पुतळयापासून प्रेरणा घेतील, अशा भावना सर्वांनी यावेळी व्यक्त केल्या.  


 

Wednesday, 5 April 2023

महाराष्ट्रातील 5 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान









प्रा. दिपक धर यांना ‘पद्म भूषण’ तर अन्य चौघे ‘पद्म श्री’ ने सन्मानित

नवी दिल्ली, 5 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज  सर्वोच्च नागरी ‘पद्म पुरस्कारा’ने  55 मान्यवरांना  सन्मानित केले. यामध्ये महाराष्ट्राच्या 5 मान्यवरांचा समावेश आहे. प्रा. दिपक धर यांना ‘पद्म भूषण’ पुरस्काराने  तर अन्य चार मान्यवरांना ‘पद्म श्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

            राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये पद्म पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला.  राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास  उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम ब‍िरला, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्रीगण  कार्यक्रमास उपस्थित होते.

आज पार पडलेल्या पद्म पुरस्कार  वितरण सोहळयात एकूण 55 मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून यामध्ये राज्यातील  5 मान्यवरांचा समावेश आहे. प्रा. दिपक धर यांना ‘पद्म भूषण’ तर गजानन माने, परशुराम खुणे,  रवीना टंडन आणि  कुमी वाडिया यांना ‘पद्म श्री’ पुरस्काराने सन्मान‍ित करण्यात आले.

विज्ञान आणि अभियांत्रिकी  क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी प्रा.दिपक धर यांना आज पद्म भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रा. धर सांख्यिकीय भौतिकशास्त्रावरील संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले प्रख्यात सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आहेत. प्रा. धर यांना विज्ञानातील अत्यंत प्रतिष्ठेचा जागतिक स्तरावरील बोल्ट्झमन पुरस्कार (Boltzmann Medal) सांख्यिकीय घोषित झाला आहे.

राज्यातील 4 मान्यवरांना  ‘पद्म श्री’ पुरस्कार प्रदान

गजानन माने यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्राच्या कार्यासाठी आज ‘पद्म श्री’ पुरस्काराने  गौरविण्यात आले. श्री माने यांनी कुष्ट रोग्यांसाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या याच कार्याचा आज सन्मान झाला.

परशुराम खुणे यांना लोककला क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय  कार्यासाठी आज पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री खुणे यांनी नक्क्षल प्रभाव‍ित भागात लोककलेच्या माध्यमातून पुर्नवास आणि सामजिक  कुप्रथांवर बोट ठेवून लोक जागृती केली. त्यांच्या या कार्याची दखल घेत आज त्यांना पद्म श्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

कला क्षेत्रातील योगदानासाठी सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री  रवीना टंडन यांना आज पद्म श्री पुरस्काराने गौरिवण्यात आले. श्रीमती टंडन या 25 वर्षांपासून चित्रपट सृष्टीत काम करीत असून अनेक स‍िनेमामंधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

कला क्षेत्रातील योगदानासाठी कुमी वाडीया यांना आज पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरल संगीत ‘कंडक्ट’( संचलन) करणाऱ्या त्या प्रथम भारतीय महिला आहेत. त्यांनी आजवर देश विदेशात अनेक कार्यक्रम सादर केलेले आहेत. त्यांच्या याच कामगिरी साठी आज त्यांचा सन्मान झाला आहे.

 एकूण 55 पद्म पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले. 3 मान्यवरांचा पद्म विभूषण, 5 मान्यवरांचा पद्म भूषण आणि 47 मान्यवरांचा पद्म श्री पुरस्काराने गौरव झाला.