Friday, 22 December 2023

महाराष्ट्राचे चिराग शेटटी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार



राष्ट्रपतींच्या हस्ते नऊ जानेवारी 2024 रोजी पुरस्काराचे वितरण

 

नवी दिल्ली , 22 : वर्ष 2023 साठीचे  राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार बुधवारी रात्री जाहीर झाले असून यात महाराष्ट्र राज्यातून चिराग शेटटी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नऊ जानेवारी 2024 रोजी एका विशेष कार्यक्रमात करण्यात येईल.

 

दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा कल्याण आणि  क्रीडा  मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात येतात.  यावर्षी दोन खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार तर 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. यासह  एकूण नऊ खेळाडूंना आणि क्रीडा प्रशिक्षकांनाद्रोणाचार्य श्रेणीतील जीवनगौरव पुरस्कार’, ‘नियमित द्रोणाचार्य पुरस्कारव ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. यासोबतच ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार देशातील तीन  खेळाडूंना जाहीर झालेले आहेत. मौलाना अबुल कलाम आझाद चषक गुरू नानक विद्यापीठ, अमृतसर, लवली प्रोफेशनल विद्यापीठ, पंजाब आणि कुरूक्षेत्र विद्यापीठ, कुरूक्षेत्र या तीन संस्थांना घोषित करण्यात आला आहे.

मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार 2023 महाराष्ट्रचे बॅडमिंटन पट्टू चिराग चंद्रशेखर शेट्टी यांना प्रदान करण्यात येणार आहे. उत्कृष्ट प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार 2023 मध्ये महाराष्ट्राचे मलखांब प्रशिक्षक गणेश देवरूखकर यांचा समावेश आहे. तर, तिरंदाजी या क्रीडा प्रकारासाठी ओस देवतळे आणि आदिती स्वामी यांना आतापर्यंच्या चमकदार कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे, तर अर्जुन पुरस्कार हा दुसरा सर्वोच्च सन्मान आहे. अर्जुन पुरस्कार विजेत्यांना 15 लाख रुपयांच्या रोख पारितोषिकासह प्रमाणपत्र देखील दिले जाते.

ऑगस्ट 2023 मध्ये जर्मनीतील बर्लिन चॅम्पियनशिपच्या कंपाउंड तिरंदाज स्पर्धेत 21 वर्षीय ओजसने सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय बनून इतिहास रचला आणि संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. ओजसने चीनमधील हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकून आणखी एक विक्रम केला. नागपूरचा गोल्डन बॉय तिरंदाज ओजस देवतळे याच्या तिरंदाजीतील असामान्य कामगिरीबद्दल प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी त्याचे नाव जाही झाले आहे.

सातारा तालुक्यातील शेरेवाडी येथील आदिती गोपीचंद स्वामी ही क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘अर्जुन पुरस्कार’ मिळविणारी जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली आहे. आदिती ही कमी वयात जागतिक पातळीवर सर्वोच्च कामगिरी करणारी खेळाडू आहे. 2023 मध्ये जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कम्पाऊंड तिरंदाजीमध्ये तिने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. आदितीने भारताला 14 वर्षांनंतर वर्ल्ड कपमध्ये 720  पैकी 711 गुण मिळवून वर्ल्ड रेकॉर्ड करून भारताचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे. भारताला एशियन गेम्स, एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप अशा अनेक स्पर्धांमधून तिने सुवर्णपदके मिळवून दिली आहेत.

सलग चारवर्ष कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येते.  खेळात तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट प्रदर्शनासाठी अर्जुन पुरस्कार दिला जातो.  खेळाडूंच्या मागील चार वर्षांतील उत्तम प्रदर्शन, नेतृत्व, खेळ आणि त्यातील शिस्तीसाठी या पुरस्काराची शिफारस केली जाते.

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळातील प्रशिक्षण देण्यासाठी आणि खेळाडुंकडून स्पर्धांसांठी उत्कृष्ट कार्य करून घेणा-या क्रीडा प्रशिक्षकांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस केली जाते.

खेळ आणि स्पर्धेमधील आजीवन कामगिरीसाठी ध्यानचंद पुरस्कार दिला जातो. यामध्ये खेळाडूंच्या चांगले प्रदर्शन आणि सेवानिवृत्तीनंतरही संबंधित क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देत राहण्यासाठी या पुरस्काराची शिफारस केली जाते.खाजगी अथवा सार्वजनिक क्षेत्रातील कॉरपोरेट संस्था ज्या खेळाडू आणि खेळांना प्रोत्साहन देतात अशा संस्थांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्काराने गौरिवण्यात येते.  आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शनासाठी विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आजाद ट्रॉफी दिली जाते.

 

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांची यादी

मेजर ध्यानचंद खेलरत्न : चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी (बॅडमिंटन) अर्जुन पुरस्कार:ओजस देवताळे, आदिती स्वामी (दोघे तिरंदाजी), मुरली श्रीशंकर, पारुल चौधरी (दोघे अ‍ॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर. वैशाली (बुद्धिबळ), मोहम्मद शमी (क्रिकेट), अनुष अग्रवाल, दिव्यक्रिती सिंग (घोडेस्वारी), दिक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक, सुशीला चानू (दोघे हॉकी), पवन कुमार, रितू नेगी (दोघे कबड्डी), नसरीन (खो-खो), पिंकी (लॉन बोल्स), ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, ईशा सिंह (दोघे नेमबाजी), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार, अंतिम (दोघे कुस्ती), नौरेम रोशिबिना देवी (वुशू), शीतल देवी (पॅरा-तिरंदाजी), इलुरी रेड्डी (अंध क्रिकेट), प्राची यादव (पॅरा-कॅनोइंग). ’

 

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी) : ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ), महावीर प्रसाद सैनी (पॅरा-अ‍ॅथलेटिक्स), शिवेंद्र सिंह (हॉकी), गणेश देवरुखकर (मल्लखांब). ’ 

 

द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव): जसकीरत सिंग ग्रेवाल (गोल्फ), भास्करन ई (कबड्डी), जयंता कुमार पुशीलाल (टेबल टेनिस). ’ 

 

ध्यानचंद जीवनगौरव: मंजुषा कन्वर (बॅडमिंटन), विनीत कुमार शर्मा (हॉकी), कविता सेल्वराज (कबड्डी)

 

 

********************

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा

  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     

अमरज्योत कौर अरोरा/ वि.वृ.क्र. 221 /दि. 22. 12. 2023

Tuesday, 19 December 2023

‘दिवाळी अंक’ महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक पंरपरेचे प्रतिक निवासी आयुक्त, रूपिंदर सिंग

नवी दिल्ली, 19: ‘दिवाळी अंक’ महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक पंरपरेचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी आज केले. महाराष्ट्रात दिवाळी अंकांची दीर्घ परंपरा आहे. विविध विषयांना वाहिलेल्या आकर्षक दिवाळी अंकांचे महाराष्ट्र परिचय केंद्रातील प्रदर्शन म्हणजे दिल्लीतील मराठी माणसांसाठी साहित्यिक मेजवानी असल्याचे मत श्री सिंग यांनी येथे मांडले. महाराष्ट्र परिचय केंद्रात, दिवाळी विशेषांक प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त तसेच प्रधान सचिव श्री रुपिंदर सिंग यांच्या हस्ते आज करण्यात आले. याप्रसंगी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन श्री सिंग यांचे स्वागत केले. यावेळी कार्यालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते. दिवाळी हा सर्वसामान्य भारतीयांचा प्रमुख सण म्हणून देशभर साजरा केला जातो. महाराष्ट्रात दिवाळी निमित्त निघणा-या दिवाळी विशेषाकांच्या पंरपरेमुळे आता या सणाला बौध्द्कितेची जोड म्हणजे दिवाळी अंक. महाराष्ट्रात आणि देशभर जिथे मराठी लोक राहतात तिथूनही विशेषांक प्रकाशित केले जातात. महाराष्ट्रात 1909 पासून सुरू झालेल्या दिवाळी विशेषकांची पंरपरा आज 115 वर्षापर्यंत पोहोचली. दिवाळी विशेषांक हा अक्षर सोहळा म्हणून आता दरवर्षी साजरा होत आहे. वाचकांच्या अभिरूचींना जपत आज जवळपास सर्वच विषयांवर दिवाळी अंक बाजारात उपलब्ध आहेत. दिवाळी अंकांमुळे नवोदित लेखकांपासून तर प्रतिष्ठित लेखकांपर्यंतचे विविध विषयांवरील लेखन यामध्ये कथा, कविता, तसेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवरील लेख एकाच अंकात वाचण्याची पर्वणी यानिमित्ताने मिळत असल्याचेही निवासी आयुक्त श्री सिंग यावेळी म्हणाले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने विशेषांक प्रदर्शन ही येथील वाचकांसाठी वाचन महोत्सव असून दिल्ली परिसरातील वाचकांनी याचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री सिंग यांनी यावेळी केले. प्रदर्शनात 120 दिवाळी अंकांची मेजवानी या प्रदर्शनात गृह लक्ष्मी, आवाज, मिळून सा-याजनी, चार चौघी, श्री व सौ, अंतर्नाद, जत्रा, किशोर, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत-दिपोत्सव, साप्ताहिक सकाळ, झी मराठी आदि 130 दिवाळी अंक मांडण्यात आले आहेत. हे प्रदर्शन आज पासून सुरू झाले असून, शुक्रवारी 22 डिसेंबर 2023 पर्यंत चालणार व सकाळी 10 वाजता पासून ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. यावर्षीच्या दिवाळी विशेषांकामध्ये ‘धनंजय, जत्रा, साधना, सामना, आवाज, अक्षरधारा, किशोर, प्रपंच, छावा, मैत्र, निनाद, हंस, ऋतुरंग, स्वरप्रतिभा, अंतर्नाद‍’ असे एकापेक्षा एक सरस अंक आहेत. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत ग्रंथालयातील वाचक सदस्यांसाठी दिवाळी अंक उपलब्ध राहतील. 00000000000000 आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic अमरज्योत कौर अरोरा/ वि.वृ.क्र. 219 /दि. 19. 12. 2023

Monday, 18 December 2023

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये नऊ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी केली जाणार

नवी दिल्ली, 18: महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ईएसआयसी रुग्णालयांची कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत उभारणी केली जाणार असल्याची माहिती, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिली आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री, भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ईएसआयसीच्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील बिबवेवाडी (पुणे) येथे ईएसआयसी रुग्णालयातल्या खाटा शंभरवरून एकशे वीसवर नेण्याच्या प्रस्तावालाही मंजूरी देण्यात आल्याचे मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात उल्लेख आहे. तसेच, अंधेरीमध्ये पाचशे खाटांच्या बहुशाखीय रुग्णालयाला मंजूरी देण्यात आली आहे. त्यात सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली मिळण्यास मदत होणार आहे. कायमचे अपंगत्व आल्यास मिळणारे लाभ, तसेच कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्यांना मिळणारे लाभ वाढविण्याविषयीही बैठकीत मंजूरी देण्यात आली. महाराष्ट्र राज्यासोबतच, गुजरातमध्ये सतरा ठिकाणी नवीन दवाखान्यांची उभारणीही केली जाणार आहे, तर, ओडिशातील राऊरकेलामधल्या रुग्णालयात खाटांची संख्या 75 वरून दीडशेवर नेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नाफेड आणि एनसीसीएफ महाराष्ट्रकडून दोन लाख मेट्रिकटन कांदा खरेदी करणार

नवी दिल्ली,18: महाराष्ट्रातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय, एनसीसीएफ (NCCF) आणि नाफेडच्या (NAFED) माध्यमातून केंद्र सरकारने घेतला असल्याची माहिती, एनसीसीएफच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिस जोसेफ चंद्रा यांनी नाशिकमध्ये आज दिली. देशातील ६५ ते ७० टक्के कांदा नाशिक जिल्ह्यातून खरेदी करणार असल्याचे श्रीमती चंद्रा यांनी सांगितले. नाशिकसह अहमदनगर, धुळे, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत एनसीसीएफ आणि नाफेडमार्फत अंदाजे पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे. एनसीसीएफने दोन लाख ८९ हजार ८४८ मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये नाफेड आणि एनसीसीएफकडून कांदा खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवणार असल्याचेही श्रीमती चंद्रा यांनी सांगितले. एनसीसीएफच्या वतीने ग्राहकांच्या हितासाठी दिल्ली, कोलकाता, पाटणा, बंगळुरू, मुंबई आणि नाशिक अशा ११४ शहरांमध्ये १ हजार १५५ मोबाइल व्हॅनद्वारे २५ रुपये प्रति किलोने कांदा विक्री सुरू केली आहे. कांदा, गव्हाचे पीठ, डाळींपाठोपाठ एनसीसीएफतर्फे मूगडाळ आणि तांदूळदेखील अत्यल्प दरात विक्री करणार असल्याची ही माहिती श्रीमती चंद्रा यांनी यावेळी दिली. 00000000000000 आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic अमरज्योत कौर अरोरा/ वि.वृ.क्र. 218 /दि. 18. 12. 2023

Tuesday, 12 December 2023

अहमदनगर जिल्ह्यातील काद्यांला रास्त भाव मिळणार नगर येथे लाल कांदा खरेदी केंद्र लवकरच सुरु होणार – केंद्रीय कृषी सचिव यांचे आश्वासन खासदार सदाशिवराव लोखंडे यांची माहिती

नवी दिल्ली 12 : नाशिक , संभाजी नगर आणि पुणे येथे कांदा उत्पादनाला मिळत असलेला बाजार भाव, अहमदनगर जिल्ह्यालाही मिळावा, तसेच अहमदनगर (शिर्डी) येथे लाल कांदा खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्याचे आदेश केद्रीय कृषी सचिव रोहित कुमार सिंग यांनी संबंधीतांना दिल्याची माहिती शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव‍राव लोखंडे यांनी आज दिली. श्री. लोखंडे यांनी याबाबत केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री पियुष गोयल यांची लोकसभा परिसरातील त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी केंद्रीय कृषी विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग उपस्थित होते. श्री. लोखडे यांनी श्री. गोयल यांच्याकडे कांदा खरेदी भावाच्या संदर्भात तीन महत्वाचे मुद्दे मांडले व याबाबत सविस्तर चर्चा केली. नाशिक, संभाजीनगर व पुणे जिल्ह्यात सध्या 24.03 रुपये प्रतिकिलो कांद्याचा खरेदी भाव आहे. मात्र अहमदनगर (शिर्डी) येथे याच काद्याचे 20.75 प्रैसे प्रतिकिलो आहे, ही तीन रुपयांची नुकसान भरुन काढण्याकरीता केंद्र शासनाने केंद्रीय कृषी सचिवांमार्फत संबंधीतांना तसे आदेश द्यावेत व अहमदनगर जिल्ह्यातही रु. 24.03 प्रति किलो प्रमाणे शासनाने कांदा खरेदी करण्याबाबतची विनंती केली. दुसरी महत्वाची मागणी अहमदनगर येथे लाल कांदा खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्याची मागणी व केद्र शासनाकडून कांदा निर्यात बंदी हटवून त्याची निर्यात लवकर सुरु करावी ही मागणी केली. सोबतच तातडीने केंद्र शासनाकडून नाफेड आणि एनसीसीएफ कडून कांदा खरेदी करुन चांगला भाव देण्यात यावा अशीही मागणी यावेळी केली. 000000000000000 आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic अमरज्योत कौर अरोरा/ वि.वृ.क्र. 214 /दि. 12. 12. 2023

Thursday, 7 December 2023

शिर्डी लोकसभा मतदार संघासह नाशिक, मराठवाड्याला घाटमाथ्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची पंतप्रधानांकडे मागणी --- खासदार सदाशिवराव लोखंडे



 

नवी दिल्ली07: शिर्डी लोकसभा मतदार संघातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी घाटमाथ्याचे पाणी शेतक-यांना उपलब्ध व्हावेतसेच अहमदनगर (शिर्डी)नाशिकमराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना 115 टीएमसी पाणी उपलब्ध होण्याची मागणी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी लोकसभेच्या शीतकालीन सत्राच्या शुन्यप्रहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आज केली.

 सह्याद्री पर्वतरांगातून समुद्राकडे वाहून जाणारे घाटमाथ्यातील पाणी अडवल्यास 115 टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते. यापैकी 15 टीएमसी पाणी मुळागोदावरी व प्रवरा नद्यांवर कोल्हापुरी टाइप बंधारे बांधून या पाण्याचा उपयोग शेतक-यांसाठी कायमस्वरूपी केला जाऊ शक्तो. तसेच उर्वरित 5 टीएमसी पाणी  अकोले-संगमनेर-कोपरगाव-श्रीरामपूर या चार तालुक्यातील वंचित शेतक-यांना उपलब्ध होईल. असे एकूण 20 टीएमसी पाणी शिर्डी मतदार संघात उपलब्ध होऊ शकेल व त्‍यांच्या समस्या सुटण्यास मदत होईल. यासोबतच नाशिकसाठी 10 टीएमसी व उर्वरित ठी 85 टीएमसी पाणीसाठा मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसा उपलब्ध होण्याबाबतची मागणी त्यांनी  लोकसभा अध्यक्षांमार्फत पंतप्रधान यांच्याकडे केली. तसेच यासाठी पंतप्रधानांनी राज्य शासनाकडून याबाबत सविस्तर प्रस्ताव मागवून व त्यास केंद्रसरकारने मंजूरी देण्याबाबतची यावेळी विनंती केली.

00000000000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.21 / दिनांक 07.12.2023

 

Monday, 4 December 2023

राष्ट्रीय सर्वोत्तम पर्यटन ग्राम आणि ग्रामीण घरगुती निवाससुविधा स्पर्धा 2024 साठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावे



दिल्ली, 4 : देशात ग्रामीण पर्यटनाला देण्यात येणारे प्रोत्साहन आणि विकासाला अधिक चालना देण्यासाठी राष्ट्रीय सर्वोत्तम पर्यटन ग्राम आणि राष्ट्रीय सर्वोत्तम ग्रामीण घरगुती निवाससुविधा स्पर्धा 2024 केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सुरू केल्या आहेत. यापूर्वीच्या राष्ट्रीय सर्वोत्तम पर्यटन ग्राम स्पर्धा 2023 मध्ये भारतामधील 35 गावांची सुवर्ण, रौप्य आणि कांस्य श्रेणीत निवड करण्यात आली होती.

देशात ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने पर्यटकांसाठी ग्रामीण घरगुती निवाससुविधांची लोकप्रियता वाढवण्यासाठी राष्ट्रीय नीतिसह ग्रामीण घरगुती निवाससुविधाविषयक सर्वसमावेशक राष्ट्रीय धोरण आणि आराखडा तयार केला होता. ग्रामीण पर्यटन आणि ग्रामीण घरगुती निवाससुविधांना लोकप्रिय करण्यासाठी राष्ट्रीय सर्वोत्तम पर्यटन ग्राम आणि राष्ट्रीय सर्वोत्तम ग्रामीण घरगुती निवाससुविधा स्पर्धांचे आयोजन करणे हा भारतीय पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन संस्थेच्या सहकार्याने मंत्रालयाचा धोरणात्मक उपक्रमांपैकी एक उपक्रम आहे.   

ग्रामीण पर्यटनवाढीसाठी सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आणि पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी पर्यटन मंत्रालयांने राज्य सरकारे, उद्योगातील हितधारक, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक समुदायांना या स्पर्धांच्या माध्यमातून सक्रीय केले आहे.

            या स्पर्धेमुळे परिचित नसलेले भाग पर्यटकांसाठी अधिक खुले होतील, ज्यामुळे समुदायांच्या सहभागात वाढ होईल, सांस्कृतिक वारशाचे जतन होईल आणि शाश्वत पर्यटनाला चालना मिळू शकेल.

पर्यटन मंत्रालयाने ग्रामीण पर्यटनासाठी या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने केंद्रीय ग्रामीण पर्यटन आणि ग्रामीण घरगुती निवाससुविधा नोडल संस्था(CNA RT & RH) स्थापन केली आहे. ग्रामीण स्तरावर या स्पर्धांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी मास्टर ट्रेनर्स तयार करण्यासाठी ही संस्था क्षमता उभारणी सत्रांचे आयोजन करत आहे.

            ही स्पर्धा जागतिक पर्यटन दिनी म्हणजे 27 सप्टेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आली होती आणि त्यासाठी 15 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज पाठवता येणार आहेत. www.rural.tourism.gov.in या लिंकच्या माध्यमातून अर्ज करण्याच्या पोर्टलचा वापर करता येईल.

000000000000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.211  / दिनांक 01.12.2023

 


 

Saturday, 2 December 2023

पंतप्रधान चार डिसेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर: सिंधुदुर्गातील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधान करणार अनावरण : नौदल दिन 2023 कार्यक्रमाला राहणार उपस्थित




नवी दिल्ली, २: पंतप्रधान नरेंद्र मोदी चार डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. संध्याकाळी 4.15 वाजता महाराष्ट्रातील सिंधुदूर्गला पोहोचतील आणि राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर सिंधुदूर्ग येथे 'नौदल दिन 2023' कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहतील. पंतप्रधान भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या,विमाने आणि विशेष दलांची प्रात्यक्षिके  सिंधुदुर्गातील तारकर्ली किनाऱ्यावरून पाहतील.

 दरवर्षी चार डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. सिंधुदूर्ग येथील 'नौदल दिन 2023' सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध सागरी वारशाला आदरांजली अर्पण करत आहे. पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे पंतप्रधानांनी जलावतरण केले तेव्हा शिवरायांच्या राजमुद्रेपासून  प्रेरणा घेत साकारण्यात  आलेल्या नौदलाच्या नव्या ध्वजाचा भारतीय नौदलाने स्वीकार केला आहे. 

दरवर्षी, नौदल दिनानिमित्त,भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांद्वारे 'कार्यान्वयन प्रात्यक्षिके' आयोजित करण्याची परंपरा आहे. ही 'कार्यान्वयन प्रात्यक्षिके' लोकांना भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या बहु-क्षेत्रीय मोहिमांचे विविध पैलू पाहण्याची संधी देतात. हे राष्ट्रीय सुरक्षेप्रती नौदलाच्या योगदानावर प्रकाश टाकते, तसेच नागरिकांमध्ये सागरी जनजागृतीचा प्रसारही करते.

0 0 0 0 0

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.211 दिनांक 02.12.2023

 

 

Friday, 1 December 2023

एअर मार्शल मकरंद रानडे निरीक्षण आणि सुरक्षा विभागाचे नवे महासंचालक



एअर मार्शल मकरंद रानडे निरीक्षण आणि सुरक्षा विभागाचे नवे महासंचालक

 

नवी दिल्ली, 01: भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल मकरंद रानडे यांनी 01 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथील हवाई दल मुख्यालयात निरीक्षण आणि सुरक्षा विभागाचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला.

एअर मार्शल रानडे यांनी 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय हवाई दलात लढाऊ विभागातून शासकीय सेवेला सुरुवात केली. त्यांनी  36 वर्षांहून अधिक कालावधीच्या कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या पदांवर यशस्वीरित्या काम केले आहे. लढाऊ विमानांच्या तुकडीचे आणि दोन हवाई स्थानकांचे कमांड म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. रणनीती आणि हवाई लढा प्रशिक्षण विकास संस्था आणि संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय या संस्थांमध्ये संचालक म्हणून त्यांची कारकिर्द राहिली आहे. काबुल आणि अफगाणिस्तानच्या भारतीय दूतावासांमध्ये त्यांनी एअर अट्टॅचे म्हणून कर्तव्य निभावले आहे.

हवाई दलाच्या मुख्यालयात त्यांनी संचालक, कार्मिक अधिकारी, हवाई दल कर्मचारी निरीक्षण संचालनालयाचे मुख्य संचालक आणि हवाई दल कार्यकारी (अवकाश) विभागाचे सहाय्यक प्रमुख या पदांवर कार्यरत राहिले आहे. या नियुक्तीपूर्वी ते नवी दिल्ली येथील पश्चिम एअर कमांडच्या मुख्यालयात वरिष्ठ कर्मचारी अधिकारीपदावर कार्यरत होते.

एअर मार्शल रानडे यांना वर्ष 2006 मध्ये वायु सेना (शौर्य) पदक आणि वर्ष 2020 मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आले होते.

एअर मार्शल संजीव कपूर यांचा हवाई दल सेवाकार्याचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर 2023 रोजी पूर्ण झाल्यानंतर एअर मार्शल रानडे यांनी त्यांच्याकडून महासंचालकपदाचा पदभार स्वीकारला आहे.