Thursday, 12 May 2022

महाराष्ट्रातून राज्यसभेवरील सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक


 

नवी दिल्ली , १२ : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी १० जून २०२२ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख ३१ मे आहे.

भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह १५ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण ५७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला .

महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार सर्वश्री पियुष गोयल, पी.चिदंबरम, प्रफुल्ल पटेल,डॉ. विकास महात्मे, संजय राऊत आणि डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांचा कार्यकाळ ४ जुलै २०२२ रोजी संपत असल्याने राज्यातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण ५७ जागांसाठी १० जून २०२२ ला निवडणूक घेण्यात येणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
या निवडणुकांसाठी २४ मे रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. ३१ मे ही अर्ज करण्याची अंतिम तारिख असून १ जून रोजी अर्जांची छाननी होणार. ३ जून पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. १० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मदतदान होणार असून सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. १३ जून २०२२ रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.
0000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार/ वि.वृ.क्र. 75/दि.12.05.2022

Friday, 6 May 2022

महाराष्ट्रात बंदरे विकासाची प्रचंड क्षमता ; केंद्र शासनाच्या सहकार्याची आवश्यकता : बंदरे विकास मंत्री अस्लम शेख

 


नवी दिल्ली, 6 : महाराष्ट्रात बंदरे विकासाची प्रचंड क्षमता असून यासाठी केंद्र शासनाचे  सहकार्याची आवश्यकता असल्याची भुमिका राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री  अस्लम शेख यांनी आज येथे मांडली.

 

येथील विज्ञान भवनात  राष्ट्रीय सागरमालाची ३ री शिखर बैठक  पार पडली. यावेळी श्री शेख बोलत होते. याबैठकीची अध्यक्षता केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केली. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.  वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय शिक्षण मंत्री कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी, नौवहन  आणि जलमार्ग राज्यमंत्री शांतनू ठाकूर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विविध राज्यांचे बंदर विकास मंत्री उपस्थित होते. राज्याचे बंदरे विकास मंत्री अस्लम शेख, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी राज्याच्यावतीने उपस्थित होते.

राज्याला  720  किलो मीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. मुंबई उपनगर आणि मुंबई जिल्ह्यात अंदाजे 114  कि.मी., ठाणे व पालघर जिल्हा मिळून 127 कि.मी., रायगड जिल्ह्याला 122 कि.मी., रत्नागिरी जिल्ह्याला 237  कि.मी., तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला 120 कि.मी. ची किनारपट्टी आहे. या किनारपट्टीवर  जवाहरलाल नेहरू बंदर विश्वस्त ही 2 बंदरे केंद्र शासनाच्या अंतर्गत  व इतर 48 बंदरे राज्याच्या किनारपट्टीवर आहेत. या 48 बंदरांवर राज्य शासनाकडून विविध विकासकामे महाराष्ट्र सागरी मंडळाकडून केली जात असल्याची माहिती श्री शेख यांनी बैठकीत दिली. 52 दशलक्ष टनापेक्षा अधिक मालवाहक कामे केली असल्याची माहिती श्री शेख यांनी यावेळी दिली. राज्यातील रो-रो (रोल टू रोल) सेवेबद्दल राज्यातील प्रवाशांनकडून मिळत असलेला प्रतिसाद बघता राज्यात रेडीयो क्लब, मुरूड-जंजीरा, एलीफंटा, पद्मदूर्ग, सुवर्णदूर्ग या 5 ठिकाणी प्रवासी तसेच पर्यटन जेट्टी उभारण्याची मंजुरी राज्याला प्रदान करण्यात यावी, अशी मागणी बैठकीत श्री शेख यांनी केली. यामुळे याठीकाणी रो-रो सेवा सुरू करता येईल, असेही श्री शेख यांनी सांगितले.

बंदरे औद्योगिक क्षेत्र (पोर्ट इंडस्ट्रीयल झोन) काळाची गरज

बंदरे औद्योगिक क्षेत्र आता काळाची गरज आहे. बंदरे औद्योगिक क्षेत्रामुळे बंदरे क्षेत्राशी निगडीत आधुनिक सोयीसुविधा किना-यालगतच उपलब्ध करता येतील, असे सांगुन यासाठी जमीनीची गरज आहे.  जमीन अधिग्रहण हा विषय केंद्र शासनाच्या अख्यारीत आहे. बंदर औद्योगिक  क्षेत्रासाठी राज्य शासनाला जमीन उपलब्ध व्हावी, अशी मागणी करीत श्री शेख यांनी राज्य शासन यासाठी 50 % टक्के चा वाटा उचलण्याची ग्वाही  दिली.   

समुद्रातील साचलेल्या गाळामुळे मच्छीमारांना आणि रो-रो सेवेवर त्याचा दूष्‍परिणाम होत आहे. ही बाब केवळ राज्याची नसून ज्या राज्यात समुद्र किनारे आहेत त्यांनाही समुद्री गाळाची समस्या भेडसावत असल्याचे सांगत, केंद्र शासनाने याकडे लक्ष देऊन राज्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणी श्री शेख यांनी बैठकीत केली.   

समुद्री किना-याला लागून महामार्ग आणि रेल्वे सेवा कशा करता येतील यावरही केंद्र शासनाने लक्ष देण्याची गरज अधोर‍ेखित करत,  वाहतुक संपर्क साधने समुद्री किना-यालगत असल्यास  त्याचा अधिक लाभ होऊ शकेल, असे सांगुन यामध्ये राज्यशासनही आपली भागीदारीता देईल, यावरही श्री शेख यांनी दुजोरा दिला.

यावेळी बैठकीत  बंदराच्या अन्य विषयासंदर्भातही आढावा घेण्यात आला.

 

Tuesday, 3 May 2022

राजधानीत महात्मा बसवेश्वर जयंती साजरी



 


नवी दिल्ली, दि. 3 :आद्य समाजसुधारक व संत, महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्गस्थितमहाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
0000
आम्हाला ट्विटर वर फॉलो कराhttp://twitter.com/MahaGovtMic
वि.वृ.क्र.74/दि.03.05.2022

Saturday, 30 April 2022

5 हजाराच्या खाली प्रलंबित केसेस आणण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न : संसदीय कार्यमंत्री अनिल परब

 


                                            



नवी दिल्ली दि. 30 : प्रलंबित न्यायालयीन केसेसच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकषांची पुर्तता करून प्रलंबित केसेस कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून ठोस पाऊले उचलली जात असून येत्या काळात 5 हजाराच्या खाली केसेस आणण्याचे लक्ष्य राज्य शासन लवकरात लवकर पुर्ण करणार असल्याची, माहिती राज्याचे संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी आज येथे दिली.

 

विज्ञान भवनात राज्यांचे मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांच्या 11 व्या संयुक्त परिषदेचे आयोजन केंद्रीय विधी मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, सर्वोच्च न्यायालयाचे  सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा, न्यायमूर्ती यु. यु. ललित, विधीमंत्री किरेन रिजिजू आणि विधी राज्य मंत्री एस. पी. सिंग बघेल, मंचावर उपस्थित होते.  

सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीश, राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशातील नायब राज्यपाल या परिषदेला उपस्थित होते. बॉम्बे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिपाकंर दत्ता,  बॉम्बे उच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश,   राज्याचे संसदीय कार्यमंत्री अनिल परब, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव निरज धोटे या परिषदेस उपस्थित होते.

 न्यायपालिकेला सशक्त करण्यासाठी पुरक व्यवस्था देण्याचे काम राज्यशासनाकडून केले जात आहे. यासह न्यायपालीकेकडून पायाभुत सुविधा अथवा अन्य कामांसाठी निधीची मागणी केली जाते, त्याप्रमाणे राज्यशासन न्यायपालिकेला निधी उपलब्ध करून देत असतो.   वर्ष 2016 मध्ये झालेल्या परिषदेत घेण्यात आलेल्या निर्णयांची अमंलबजावणी राज्य शासनाकडून केली गेली असल्याची माहिती श्री परब यांनी यावेळी दिली.

वर्ष 22-23 च्या अर्थसंकल्पात न्यायालयीन

पायाभूत सुविधेसाठी 495 कोटींची तरतूद

न्यायालयीन व्यवस्था मजबूत करण्यासाठी पायाभूत सुविधा पुर‍विणे  महत्वाचे असून यासाठी वर्ष 2022-23 च्या अर्थसंकल्पात  राज्यशासनाने 495 कोटींची तरतूद केली असल्याचे श्री परब यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय प्रायोजित योजनेतून 60 टक्के निधी आणि राज्यशासनाकडून 40 टक्के निधी देण्याचे निश्चित आहे. त्याप्रमाणे राज्यशासनाने तरतूद केलेली आहे.  यातंर्गत  नवीन न्यायालय इमारत, आणि निवासी घरे बांधण्यात येईल, अशी माहिती श्री परब यांनी यावेळी दिली.

यासह 1 एप्रिल ला राज्यशासनातर्फे काढण्यात आलेल्या निर्णयानुसार  राज्यात 14 कौटूंब‍िक न्यायालय नियमीत केली गेली आहेत, असेही श्री परब यांनी सांगितले.   

महाराष्ट्रातील न्यायीक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी एकूण 2357 न्याय‍ीक अधिका-यांची पदे मंजुर करण्यात आलेली आहेत.  प्रलंबित न्यायालीयन केसेसचा निपटारा करण्यासाठी राज्यात 23 ग्राम न्यायालय कार्यरत आहेत.  राज्यात एकूण 138 फास्ट ट्रॅक न्यायालयांना मान्यता दिलेली आहे. यापैकी 38 न्यायालय पोस्कोसाठी वापरली जातील. राज्यात 16 व्यावसायिक न्यायालयांना मान्यता आहे. त्यापैकी 6 न्यायालये मुंबई शहरात सुरू आहेत  अशी माहिती श्री परब यांनी याप्रसंगी दिली.  .

45 कंत्राटकी न्यायालयीन व्यवस्थापक पदे मंजुर केलेली असून सध्या ही पदे कार्यरत आहे.   राज्यशासनाने वर्ष 2021-2022 मध्ये 32 कोटी 92 लाख 97,000 हजार रूपयांचा निधी कायदेशीर मदतीसाठी राखीव ठेवला होता, त्यापैकी 28 कोटी 61 लाख 84,000 हजार रूपयांचा निधी खर्च झालेला आहे. यावर्षी 2022-2023 मध्ये 35 कोटी 68 लाख 99,000 हजार रूपयांचा निधी कायदेशीर मदतीसाठी अर्थसंकल्पात मंजुर करण्यात आलेला असल्याची माहिती श्री परब यांनी दिली.

आतापर्यंत राज्यातील अकोला, गडचिरोली, जळगाव, रायगड, वाशीम, अहमदनगर, औरंगाबाद, औरंगाबाद उच्च न्यायालय, नंदूरबार, सिंधुदुर्ग या   10 ठीकाणी पर्यायी विवाद निराकरण केंद्र उभारण्यात आलेले आहे. यासाठी 14 कोटी 57 लाख 22 हजार 081 रूपयांचा निधी खर्च करण्यात आलेला असल्याचे श्री परब यांनी यावेळी सांगितले.

0000

राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी






            नवी दिल्ली दि. 30 : राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र सदन साजरी करण्यात आली.

        कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार यांनी राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करूनअभिवादन केले.

            यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

**********

आम्हाला ट्विटर वर फॉलो कराhttp://twitter.com/MahaGovtMic

Wednesday, 27 April 2022

इंडो-पॅसिफिक भूभागातील शाश्वत विकासासाठी एकत्रित काम करणे काळाची गरज : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

 


नवी दिल्ली, 27 एप्रिल : इंडो-पॅसिफिक भूभागातील राष्ट्रांसमोरील समस्या सारख्या असून त्यासाठी एकत्रित येऊन काम करणे काळाची गरज असल्याचे मत, राज्याचे पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे मांडले.

ऑबर्जवर रिसर्च फॉऊंडेशन आणि केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने आयोजित  रायसीना डायलॉग 2022 च्या परिचर्चा कार्यक्रमात   इंडो-पॅसिफिक श्रेत्रातील मानवी विकास पुनर्स्थापित करणे या विषयावर विचार मांडताना राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री बोलत होते. या परिसंवादात  एफडी, फ्रांसचे आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्स कार्यकारी संचालक फिलीपे ऑरलीयांग, स्पेन च्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे महासंचालक जेवीयर सॅलीडो ऑरटीज. युनायटेड किंगडमच्या  कॉमन वेल्थ डेव्लपमेंट कार्यालयाचे संचालक मेलींडा बोहोन्नोन,  केनियातील युराय्या ट्रस्टचे कार्यकारी संचालक ऊडूअक अमिमो हे उपस्थित होते.  या परिसवांदाचे समन्वयन ऑस्ट्रेलिया आणि न्युजींलँडच्या  संचार व्यवस्थापक  रायली बॅजर्नी यांनी केले.

श्री ठाकरे पुढे म्हणाले, एकूणच इंडो-पॅसिफिक भूभागाकडे पाहताना त्यांच्यात सांस्कृत‍िक साम्य अथवा विरोधाभास दिसतो. तथापि, जागतिक पातळीवरील समस्या जवळपास सारख्याच आहेत. यामध्ये कुपोषण, मुख स्वास्थ्य, अस्वच्छता, मातृ स्वास्थ्य, सद्या त्यात महामारीच्या आधीचे आणि नंतरचे बदल असे प्रश्न सर्वांना कमी अधिक प्रमाणात सारखेच  भेडसावत आहेत. मात्र, शाश्वत विकासाच्या दिशेन वाटचाल करताना स्वच्छ पाणी, स्वच्छ ऊर्जा, ग्रीन स्टील, ग्रीन सिमेंट यामध्ये होणा-या गुंतवणूकीबद्दल विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

विकास महत्वाचाच आहे. विकास होत असताना तो  लघु अथवा दिर्घकाळाचा  होत आहे का हे पाहणे गरजेचे आहे. शाश्वत विकासासाठी आवश्यक असणारे  चिंतन गरजेचे असल्याचे श्री ठाकरे यांनी यावेळी नमूद केले. शाश्वत विकास करायाचा असल्यास आज, उद्याचा विचार करून चालणार नाही तर, येणा-या पिढयांसाठी हा विचार होणे गरजेचे असल्याचे सांगत आपल्या समोर असणारी वाढती लोकसंख्या, बदलते पर्यावरण, सामाजिक राजकीय बदल अशा समस्या आहेत. यासाठी ऊर्जा सुरक्षा, खाद्यान्न सुरक्षा, आरोग्याची काळजी वर्तमानात या बाबी फार महत्वाच्या असल्याचे श्री ठाकरे यांनी यावेळी मांडले. या समस्या सोडविण्यासाठी विविध वैश्विक मंचांवर चर्चा होणे गरजेची असल्याचे त्यांनी व्यक्त केले. राज्य म्हणून काही योजनांची अंमलबजावणी करता येऊ शकते, पंरतु देशपातळीवरील समस्या सोडविण्यासाठी सर्वांनुमते निर्णय होणे देशाच्या आणि राज्याचा विकासाला पुढे घेऊन जाणारे ठरेल असेही ते यावेळी म्हणाले.

 

सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या माध्यमातून राज्यातील महानगरांचा विकास होत आहे

राज्यातील महानगरांच्या विकासात सार्वजनिक खाजगी भागीदारी महत्वाची असून या माध्यामातून या शहरांचा विकास होत असल्याचे श्री ठाकरे यांनी या पर‍िसंवादात सांगितले. राज्यातील मुंबई, पुणे ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक, औंरगाबाद ही शहरे झपाटयाने वाढत आहेत. यामध्ये लोकसहभाग‍िता महत्वाची असल्याचे त्यांनी व्यक्त केले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. जगाचे लक्ष या शहराकडे असून राज्य सरकार म्हणून आमची जबाबदारी धोरण बनविण्याची आणि ती राबविण्याची आहे. यासह येथे आर्थिक गुंतवणूक होत असताना येथील सुव्यवस्था राखणे, या शहराचे सौदर्यींकरण करणेही महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे, असेही  ते म्हणाले.

सार्वजन‍िक वित्त आणि खाजगी वित्त वापरण्यासदंर्भातील विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री ठाकरे म्हणाले, कोरोना नंतरच्या काळात आपण जगत आहोत, वर्तमानात सर्वच बाबतीत संतुलन राखणे गरजेचे असून राज्य सरकार म्हणून शासनाचा प्रयत्न आहे. सार्वजनिक वित्त असो वा खाजगी वित्त असो यामध्ये संतुलन ठेवावेच लागेल तेव्हाच शाश्वत विकास साधला जाऊ शकतो असे श्री ठाकरे म्हणाले.

रायसीना  डायलॉग या कार्यक्रमात खासदार शशी थरूर यांनी  श्री ठाकरे यांची वायुप्रदूषण संकटावर मात कशी करता येऊ शकते, राज्य सरकार यासाठी काय पाऊले उचलली आहेत यावषियावर त्यांच्याशी संवाद साधला.  

हरित वित्तपुरवठा आणि ऊर्जा परिवर्तन क्षेत्रात महाराष्ट्र आणि जपान यांच्यातील द्विपक्षीय सहाकार्य वाढविण्यासाठी  श्री ठाकरे आणि जपान बँकेचे गव्हर्नर तदाशी मैदा यांच्याशी आज  चर्चा केली.

Tuesday, 26 April 2022

नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड हे रेल्वेसाठी ही वापरले जावे : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

 






केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे राज्याची मागणी

नवी दिल्ली, 26 एप्रिल : नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड रेल्वेसाठीही वापरले जावे, यासह राज्यांच्या विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली व याबाबत त्यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याची माहिती, राज्याचे पर्यटन्‍ व पर्यावरण मंत्री, अदित्य ठाकरे यांनी आज  येथे दिली.

      येथील रेल भवनात श्री ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री वैषणव यांची भेट घेतली. या बैठकीत राज्यातील विविध रेल्वे विषयांसोबत मुंबईतील रेल्‍्वे विषयक प्रकल्पांविषयी चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर श्री ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड चे सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोर्कापण झाले. या कार्डच्या माध्यमातून ‘टॉप इन-टॉप आऊट’ करता येऊ शकते, या कार्डची सेवा बेस्टसाठी वापरली जाईल. या कार्डच्या माध्यमातून डिजीटल सेवेचा उपयोग करता येईल. देशातील सर्व मेट्रोसाठी हे कार्ड वापरता येऊ शकेल, तसेच हे कार्ड रेल्वेसाठी ही वापरता यावे व यासाठीची लागणारी प्रक्रिया केंद्रीय रेल्वे विभागाकडून करण्यात यावी, ही विनंती राज्याच्यावतीने करण्यात आल्याचे श्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. या मागणीवर रेल्वे मंत्रालयाचे सकारात्म्क काम सुरू असून याबाबत श्री वैष्णव यांनी सांगितली असल्याची  माहिती श्री ठाकरे यांनी यावेळी दिली. यावेळी खासदार अनिल देसाई आणि प्र‍ियंका चर्तुवेदी उपस्थित होते.

मुंबईतील रेल्वेविषयक समस्या सोडविण्यासाठी नोडल अधिका-याची नेमणूक

      मुंबईतील विविध रेल्वेविषयक समस्या सोडविण्यासाठी समन्वयक म्हणून नोडल अधिकारी नेमला जाईल, अशी माहिती, श्री ठाकरे यांची पत्रकारांना दिली.

      डिलाईल रोडवरील पुल तसेच मुंबईतील रेल्वेच्या अधिनस्थ येणारे पुल संदर्भातील काही परवानग्या तसेच मेट्रो लेन, रेल्वे क्रासिंगच्या, पावसामुळे साचलेल्या पाण्याने निर्माण  होणा-या समस्यांसह इतरविषयी समन्वय साधण्यासाठी रेल्वे विभागाकडून नोडल अधिका-याची नेमणूक केली जाईल. जेणे करून मुंबईच्या रेल्वेविषयक समस्या सोडविण्याला अधिक गती प्राप्त्‍ होईल, अशी माहिती श्री ठाकरे यांनी दिली.  

      धारावी परिसरातील रेल्वे विकासासाठी रेल्वे सोबत राज्य सरकाराचा करार झालेला आहे. यासंदर्भात रेल्वेला निधीही राज्य शासनाने दिलेला आहे. या विषयी सकारात्मक चर्चा झाली असून या सर्व कामांना अधिेक गती मिळावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्री ठाकरे यांनी सांगितले.

     श्री ठाकरे यांनी महाराष्ट्र सदन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प्‍ अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी सदनची पाहणी केली तसेच  अधिका-यांसोबत आढावा बैठक घेतली.

Thursday, 14 April 2022

राजधानीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी









नवी दिल्ली, दि. 14 : प्रख्यात नायशास्त्रज्ञ ,अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, समाजसुधारक व भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती आज उभय महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात तसेच कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त तथा निवासी आयुक्त (अ.का.) डॉ राजेश अडपावार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
0000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
वि.वृ.क्र. 66/दि.14.04.2022


 

Monday, 11 April 2022

राजधानीत महात्मा फुले जयंती साजरी






नवी दिल्ली, दि. 11 : थोर समाज सुधारक व क्रांतिकारक विचारवंत महात्मा जोतीबा फुले यांची जयंती आज उभय महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात तसेच कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त तथा निवासी आयुक्त (अ.का.) डॉ राजेश अडपावार यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थापिका भागवंती मेश्राम यांच्यासह उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात महात्मा फुले यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
0000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
वि.वृ.क्र.65/दि.11.04.2022


 

Thursday, 7 April 2022

आमदार डॉ. किरण लहामटे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट





नवी दिल्ली, 7 : अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली.

परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ. का.)अमरज्योत कौर अरोरा यांनी डॉ. लहामटे यांचे स्वागत केले. तसेच, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित ‘महामुंबईचा महाविकास’ पुस्तिका त्यांना भेट स्वरुपात दिली. उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती अरोरा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे प्रका‍शित करण्यात येणारी प्रकाशने, प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय, कार्यालयाच्या सोशल मिडीयाहून देण्यात येणारी माहिती, दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांशी साधण्यात येणाऱ्या समन्वयाबाबत माहिती दिली. तसेच, परिचय केंद्राच्यातवीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही दिली. डॉ. लहामटे यांनी परिचय केंद्राच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
0000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वि.वृ.क्र. 63 / दि. 7.04.2022