Friday, 13 July 2018

“स्वच्छ सर्वेक्षण - ग्रामीण 2018” ची घोषणा



महाराष्ट्रातील 340 गावांमध्ये होणार सर्वेक्षण
नवी दिल्ली, 13 :  केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने आज स्वच्छ सर्वेक्षण  -  ग्रामीण 2018 ची घोषणा करण्यात आली. हे सर्वेक्षण 1 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ट ठरणा-या राज्यांना तसेच जिल्ह्यांना  2 आक्टोबर या गांधी जयंतीच्या दिनी  सन्मानित करण्यात येणार आहे.
येथील प्रवासी भारतीय केंद्रात, केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत स्वच्छ सर्वेक्षण - ग्रामीण 2018 ची घोषणा विभागाचे सचिव परमेश्ववरन अय्यर यांनी केली. यावेळी स्वच्छ भारत मिशनचे संयुक्त सचिव अरूण बरोका आणि स्वच्छता पेयजल विभागाचे  महासंचालक अक्षय राऊत उपस्थित होते.
स्वच्छ सर्वेक्षण - ग्रामीण 2018 मध्ये देशभरातील सर्वच 698 जिल्हे सहभागी असून प्रत्येक जिल्ह्यामधून 10 गावे याप्रमाणे 6 हजार 980 गांवाचा समावेश असणार आहे. महाराष्ट्रातील 340 गावांमध्ये हे सर्वेक्षण होणार आहे. तसेच, देशभरातील एकूण 34 हजार 900 सार्वजनिक ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
सरकारी शाळा, अंगणवाडी केंद्र,  प्राथमिक आरोग्य केंद्र, पंचायत भवन  आठवडी बाजार, धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले जाणार. या सर्वेक्षणातंर्गत ग्रामीण भागातील 50 लाख नागरीकांची स्वच्छते विषयक प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविली जाईल.
स्वच्छ सर्वेक्षण - ग्रामीण 2018 अंतर्गत प्रत्येकी 3 ते 4  गावांचे सरपंच, स्वच्छताग्रही, ग्रामपंचायत सदस्य, देखरेख समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शिक्षकांच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे. यासोबतच प्रत्येकी 7 ते  8 गावांमध्ये सामान्य नागरीक तसेच सामुहिक बैठकांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाईल. प्रत्येक जिल्ह्यातील सर्वेक्षणामध्ये सहभागी असणा-या सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण अंतर्गत झालेले सर्वेक्षणाची आकडेवारी ग्राह्य धरली जाईल. आतापर्यंत बांधलेल्या आणि वापरात असलेल्या शौचालयांची माहिती  घेतली जाईल.
अशी ठरेल जिल्ह्यांची क्रमवारी
उत्तम गुणवत्तापूर्ण कामगिरी केलेल्या जिल्ह्यांची क्रमवारी ठरविण्यासाठी मंत्रालयाने एकात्मक व्यवस्थापन माहिती प्रणाली (आयएमआयएस) विकसीत केली आहे.  या माध्यामातून 35 टक्के प्रत्यक्ष स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया, 35 टक्के उपयोगात येणा-या सेवांची प्रगती,  30 टक्के प्रत्यक्ष पाहणी  केली जाईल.
आयएमआयएस प्रणालीतंर्गत उपयोगात येणा-या सेवांमध्ये स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण अंतर्गत  स्वच्छतेसाठी निवडलेले गावे,  हगणदारी मुक्त गावांची स्थिती,  हगणदारी मुक्त गावांची पडताळणी,  जुन्या पडक्या शौचालयाचे नव्याने बांधकामांची पाहणी केली  जाईल.
प्रत्यक्ष पाहणी माहितीतंर्गत सरकारी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडी बाजार, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाऊन शौचालय सुविधा, वापरात असणारे शौचालय, शौचालयाची स्वच्छता, कच-याचे व्यवस्थापन, या ठिकाणी वापरण्यात येणा-या पाण्याची स्वच्छता यासर्व बाबींचा  विचार केला जाईल.
प्रत्यक्ष स्थानिक नागारिकांची प्रतिक्रिया उपक्रमातंर्गत लोकांना प्रत्यक्ष भेटून त्याआधारे माहिती  गोळा केली जाईल. यातंर्गत स्वच्छताग्रही खुली बैठक, व्यक्तीगत मुलाखती, सामुहिक चर्चा करून प्रतिक्रिया घेण्यात येईल. गावाची पाहणी गेली जाईल, यामध्ये गावाची स्वच्छता, घन तसेच द्रव्य कचरा व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापनासाठी गावपातळीवर राबविण्यात आलेला नावीन्यपूर्ण उपक्रम याची पाहणी केली जाईल. स्थानिक नागरिकांकडून प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रीया नोंदविली जाईल, यामध्ये अभियानाबाबत लोकांमध्ये असणारी जागृकता, स्वच्छ भारत मिशन बद्दलची प्रतिक्रिया, घन व द्रव्य कचरा व्यवस्थापनाचे स्थानिक पुढाकाराने  वापरण्यात आलेले सुरक्षित उपाययोजनेची नोंद घेतली जाईल. याशिवाय गावातील प्रभावी लोकांना भेटून त्यांची अभियानाबाबतची प्रतिक्रिया, गावातील घन आणि द्रव्य कचरा व्यवस्थापनाची विल्लेवाट कशी लावता येईल याबाबतची काही नवीन माहिती असल्यास गोळा केली जाईल.


No comments:

Post a Comment