Thursday, 29 October 2020




 धरण पुनर्वसन व सुधारणा प्रकल्पाला केंद्रीय कॅब‍िनेटची मंजुरी


महाराष्ट्रातील 167 धरणांच्या समावेश

नवी दिल्ली, 29  : धरण पुनर्वसन व सुधारणा प्रकल्पास प्रकल्पास आज
केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पातंर्गत देशभरातील 736
धरणांचा समावेश असून महाराष्ट्रातील 167 धरणे आहेत.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झाालेल्या कॅबिनेटने धरण
पुनर्वसन व सुधारणा प्रकल्प (DRIP), टप्पा II आणि III ला मंजुरी दिली आहे
. या अंतर्गत देशभरातील 736 धरणांचे पुनर्वसन व सुधारणा केली जाईल.
यासाठी जागतिक बँक आणि  एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक
(एआयआयबी) आर्थिक मदत करणार आहे. यासंदर्भातील विषयाला आज केंद्रीय
कॅबिनेटने मंजुरी दिली आहे.

या प्रकल्पातील टप्पा 1 व 2 साठी 10,211 कोटी रूपयांचा निधी अपेक्ष‍ित
असून हा प्रकल्प पुर्ण होण्यासाठी 10 वर्षांचा कालावधी लागेल. प्रत्येक
टप्पा सहा  वर्षांचा असणार आहे. एप्रिल 2021 ते मार्च 2031 पर्यंत हा
कालावधी राहणार असून या दरम्यान दोन वर्षांची पुनरावृत्ती (ओवरलैपिंग) चा
समावेश आहे. या प्रकल्पासाठी बाहेरून 7.000 कोटी रूपये आणि उरर्वीत 3.211
कोटी रूपये कार्यान्वयित एजेंसी (आईए)कडून वहन केले जातील. केंद्र सरकार
ऋण देयता च्या स्वरूपात 1024 कोटी रूपये देईल.

या प्रकल्पातंर्गत निवड झालेल्या धरणांची सुरक्षा आणि कार्यक्षमता
सुधारणे,  धरणांचा विकास शाश्वत रीतीने करणे. धरणांच्या सुरक्ष‍िततेसाठी
केंद्र व राज्यामंध्ये संस्थात्मक व्यवस्था मजबुत करणे.  धरणे संबंधित
व‍िभागांचे सशक्तीकरण करणे.  धरणांच्या माध्यमांतुन महसुल मिळविता येतो
का हे तपासणे यासह प्रकल्प व्यवस्थापण करणे या घटकांचा समावेश राहील

Wednesday, 28 October 2020

महाराष्ट्रातील 100 कुंभार कुटुंबांना ‘इलेक्ट्रिक चाके’ प्रदान


   

नवी दिल्ली, 28 : खादी ग्रामोद्योग आयोगाच्या कुंभार सशक्तीकरण योजनेंतर्गत महाराष्ट्रातील नांदेड आणि परभणी  जिल्हयातील 100 कुंभार कुटुंबांना आज इलेक्ट्रिक चाके प्रदान करण्यात आली.

            केंद्रीय सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या खादी ग्रामोद्योग आयोगाच्यावतीने देशातील कुंभारांना सक्षम बनविण्यासाठी ‘कुंभार सशक्तीकरण योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गंत महाराष्ट्रातील नांदेड जिल्हयातील दहा तर परभणी जिल्हयातील पाच गावातील 100 कुंभारांना प्रशिक्षण देण्यात आले. आज केंद्रीय सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते या कुंभारांना दूरदृष्य प्रणालीद्वारे इलेक्ट्रीक चाके प्रदान करण्यात आली. खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना  यावेळी उपस्थित होते.

देशातील कुंभारांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर सुरू करण्यात आलेला हा पहिलाच उपक्रम असल्याचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रासह देशाच्या अन्य दुर्गम भागात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल असेही ते म्हणाले, त्यांनी  यावेळी लाभार्थी कुंभारांसोबत संवाद साधला

 या योजनेंतर्गत देशभरातील कुंभारांना 18,000 इलेक्ट्रिक चाके प्रदान करण्यात आली असून त्याचा सुमारे 80,000 लोकांना लाभ मिळाल्याचे खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी यावेळी  सांगितले.  

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic

                                        000000 

वृत विशेष क्र. 98 / दि.28.10.2020

 

              

 


Thursday, 15 October 2020

राजधानीत भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी




 

          

नवी दिल्ली, 15 : थोर शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. . पी .जे. अब्दुल कलाम यांची जयंती

आज महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली.

  

        कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या  सभागृहात  आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त  तथा

अपर मुख्यसचिव शामलाल गोयल यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त तथा सचिव डॉ. निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

                                                            00000

रितेश भुयार/वि.वृ.क्र.97 /दि.15.10.2020

Wednesday, 14 October 2020

शैक्षणिक सुधारणांसाठी ‘स्टार्स’ प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी

 



प्रकल्पात महाराष्ट्रासह इतर 5 राज्यांचा समावेश

नवी दिल्ली 14 : शैक्षणिक सुधारणांसाठी केंद्रीय कॅबिनेटने आज स्टार्स प्रकल्पाला मंजुरी दिली. या प्रकल्पात महाराष्ट्रसह अन्य 5 राज्यांचा समावेश आहे

स्ट्रेंगथनिंग टीचिंग-लर्निंग एंड रिजल्ट्स फॉर स्टेट्स (एसटीएआरएस) ची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी 5,718 कोटी रूपयांची आवश्यकता भासणार आहे. यासाठी जागतिक बँकने 500 अमेरिकी डॉलर  (कमाल 3,700 कोटी रूपये) मदत जाहिर केली आहे. या प्रकल्पाला आज कॅबिनेटने मंजुरी दिली.

स्टार्स प्रकल्प केंद्र प्रायोजित आहे. हा प्रकल्प केंद्रीय शिक्षण आणि साक्षरता मंत्रालयाच्या राष्ट्रीय मुल्याकंन केंद्र, पारख या स्वतंत्र आणि स्वायत्त संस्थेअंतर्गत राबविण्यात येणार आहे.

स्टार्स प्रकल्प 6 राज्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, केरळ, आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे. या प्रकल्पा अंतर्गत शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध नावीण्यपूर्ण कार्यक्रमांना पाठींबा दिला जाईल. या प्रकल्पाबरोबरच गुजरात, तामिळनाडू, उत्तराखंड, झारखंड, आणि आसाम राज्यांमध्ये शालेय शिक्षणाशी निगडीत प्रकल्प राबविण्यासाठी आशियाई विकास बँक (एडीबी) आर्थिक सहाय्य करणार आहे. सर्व राज्ये एकमेकांसोबत अनुभव आणि उत्कृष्ट शिक्षण पद्धतींची देवाण-घेवाण  करतील.

स्टार्स प्रकल्पाचा उद्देश शिक्षणातील गुणवत्तापुर्ण, दर्जेदार शिक्षण प्रत्येकाला मिळावे हा आहे. या प्रकल्पामध्ये राज्यातील निवडक शाळेंमध्ये शालेय शिक्षण प्रणालीतील गुणदोषाचे विश्लेषण करून सुधारणा करण्यात येईल. आर्थिकबाबींशी निगडीत विषयांवरही विश्लेषणात्मक कार्य केले जाईल.

पर्यावरणाची हानी न करता ई-वस्तुंची विल्हेवाट लावणे गरजेचे ; शामलाल गोयल




                      

नवी दिल्ली दि. 14 : सद्या माहिती तंत्रज्ञानाचे युग असून मोठया प्रमाणात ईलेक्ट्रॉनिक कचरा निर्माण होत आहे, अशात पर्यावरणाला हानी न पोहचवता या ई-कच-याची  विल्हेवाट योग्य्‍ा प्रकारे होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त तथा अपरमुख्य सचिव शामलाल गोयल यांनी केले आहे.

 

            कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या सभागृहामध्ये आयोजित  तिस-या आंतरराष्ट्रीय ई-कचरा (E-Waste) दिनाच्या कार्यक्रमात श्री गोयल बोलत होते. गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त तथा सचिव डॉ. निधी पांडे, केंद्रीय पर्यावरण विभागाचे  वरिष्ठ संचालक तथा ज्येष्ठ वैज्ञानिक श्री.धर्मेन्द्र गुप्ता,  करो संभवया सामाजिक संस्थेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी संदीप भार्गव, महाराष्ट्र सदनाचे  सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार  यावेळी  उपस्थित होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. गोयल म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोठया प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक  अर्थात्‍ ई-वस्तू  जसे संगणक,लॅपटॉप,मोबाईल, चार्जर,बॅटरी,माउुस,पेन ड्राईव्ह,सीडी,डीव्हीडी, पेन ड्राईव,कीबोर्ड इत्यादी विविध प्रकारच्या वस्तुंची खरेदी मोठया प्रमाणावर केली जाते. मात्र, या वस्तुंचा वापर संपल्यानंतर या वस्तुंची विल्हेवाट पर्यावरणाला हानी न पोहोचवता योग्य त्याप्रकारे लावण्याची जबाबदारी आपण कटाक्षाने पार पाडली पाहिजे ही काळाची गरज आहे. याप्रकारची ई कचरा दिनानिमित्त प्रतिज्ञाच  आपण सर्वांनी घेतली पाहिजे असे श्री गोयल म्हणाले.

आपण सर्वांनी या ई-कचरा दिनानिमित्त आपल्या घरापासून सुरूवात केली पाहिजे असे मत  श्री.धर्मेन्द्र गुप्ता गुप्ता  यांनी  यावेळी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. संदीप भार्गव यांनी ई-कचरा या विषयाबाबत सखेाल माहितीपर सादरीकरण केले. यावेळी ई-वेस्टबाबत बोलताना त्यांनी भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखावयाचा असेल तर या विषयाबाबत लोकांमध्ये मोठया प्रमाणात जनजागृती होणे महत्वाचे असल्याचे सांगितले.  देशभरात तसेच जगभरात वाढत्या प्रमाणात ई-वस्तुंचा वापर होत असल्याने ई-वेस्ट बाबत सर्वांना साक्षर करणे अतिशय महत्वाचे आहे. या संदर्भातील अनेक महत्वाच्या लहान-सहान बाबींसंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.

 धर्मेन्द्र गुप्ता यांच्या हस्ते महाराष्ट्र सदनातील स्वागत कक्षात ई-वेस्ट एकत्रित करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या कचरा पेटीचे  उदघाटन करण्यात आले.

 

              आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic

                                        000000 

 

 


 

दयानंद कांबळे यांना ‘सुर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार’

 



नवी दिल्ली दि. 14 : जनसंपर्क आणि समाजमाध्यम क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांना आज सुर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कारप्रदान करण्यात आला.

        येथील इंडिया हॅबीटॅट सेंटरमध्ये पुणे स्थित सुर्यदत्ता शैक्षणिक संस्थेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना  सुर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार-2020’ ने  गौरविण्यात आलेसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडीया आणि ज्येष्ट नेते शाम जाजु यांच्या हस्ते यावेळी एक आंतरराष्ट्रीय आणि पाच राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले .

                 जनसंपर्क क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी श्री कांबळे यांचा सन्मान

            दयानंद कांबळे यांनी गेल्या 25 वर्षांपासून माध्यम व जनसंपर्क क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे .श्री. कांबळे हे गेल्या सात वर्षांपासून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिल्ली स्थित महाराष्ट्र परिचय केंद्र या कार्यालयाचे उपसंचालक म्हणून  कार्यरत आहेत. 

दिल्ली स्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माहिती कार्यालयांच्या संघटनेचे (सिप्रा)अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील  शासकीय  जनसंपर्क कार्यशाळांचे  यशस्वी आयोजन केले आहे. कार्यालयाच्या मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेतील ट्विटर हँडल, फेसबुक, युटयूब, ब्लॉग आदी समाजमाध्यमांचा प्रभावी उपयोग करून  त्यांनी शासनातील जनसंपर्काचे उत्तम कार्य केले आहे. तसेच त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र परिचय केंद्राला केंद्रीय मंत्री , राज्यातील मंत्री, खासदार, आमदार, कला, साहित्य, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींनी  भेटी दिल्या आहेत.

       त्याआधी त्यांनी दैनिक लोकमत आणि दैनिक एकमत या वृत्तपत्रांमध्ये कार्य केले आहे. तसेच कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे कार्यही केले आहे.

          या कार्यक्रमात आचार्य डॉ. लोकेश मुनी यांना सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रातील योगदानासाठी आंतरराष्ट्रीय सुर्य गौरव पुरस्कारप्रदान करण्यात आला. वरिष्ठ पत्रकार तथा इंडिया टुडे वृत्तपत्राचे माजी वरिष्ठ संपादक एस. व्यंकट नारायण आणि आय टिव्ही चे मुख्य राजकीय संपादक मनिष अवस्थी यांना  पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सुर्यगौरव राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी संस्कृती विद्यापीठाच्या संचालक  डॉ. दिव्या तंवर आणि द ग्लोबल टेक्नॉलॉजी नेटवर्कचे विजय मिश्रा यांना सन्मानित करण्यात आले.

                                        000000 

 


Tuesday, 13 October 2020

मुंबईसह अन्य महानगरांमध्ये सीजीआयच्या सहाय्याने शाळांमध्ये नाविण्यपूर्ण उपक्रम

 

नवी दिल्ली, 13 : मुंबईसह, बंगळूर, चेन्नई आणि  हैद्राबाद येथील  100 शांळामध्ये अटल टिंकरिंग लॅब (एटिल) अंतर्गत नाविण्यपूर्ण कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने अटल इनोव्हेशन मिशन (AIM) आणि निति आयोगने, सीजीआय इंडिया सोबत करार केला आहे.

सीजीआय इंडिया ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी असून अटल टिंकरिंग लॅब अंतर्गत येणा-या 100 शाळांना तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वी व नाविण्यपूर्ण सहकार्य करण्यासाठी तयार झाली आहे.

          करारातंर्गत सीजीआयने, मुंबईसह, बंगळूर, चेन्नई,  हैद्राबाद येथील 100 शाळा दत्तक घेतल्या आहेत. सीजीआय इंडियाचे तांत्रिक प्रशिक्षक विद्यार्थ्यांमधील तंत्रज्ञानाविषयी गोडी वाढवून त्यांना व्यावहारिक प्रशिक्षण देतील. सीजीआय निवडक शाळांमध्ये शिक्षकांसाठी तंत्रज्ञानाविषयक प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा  आयोजित करतील.

अटल इनोव्हेशन मिशन केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. यातंर्गत भारत सरकार देशभरातील नाविण्यपूर्ण, उद्योजकता संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे कार्य करते. अटल इनोव्हेशन मिशनतंर्गत येणा-या एटीएलमध्ये देशभरातील 2.5 दशलक्षाहून अधिक शाळेकरी विद्यार्थी सामाविष्ट आहेत. एटीएलतंर्गत असणा-या प्रयोगशाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वत: काही वेगळे करण्यासाठी प्रशिक्षण किट दिली जाते. विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला यामुळे अधिक वाव मिळतो. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा उत्कृष्टपणे करता येईल  याचे यातंर्गत प्रशिक्षण दिले जाते.

Tuesday, 6 October 2020

महाराष्ट्रातील दोन स्टार्टअपला राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार




नवी दिल्ली दि. 6 : महाराष्ट्रातून मुंबई येथील दोन स्टार्टअपनी सर्वोत्तम कामगिरी करत मानाचा 'राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार' पटकाविला आहे.

          आरोग्य सेवा श्रेणीमध्ये ‘वेल्दी थेरपेटिक्स प्रायव्हेट लिमीटेड’ आणि नागरी सेवा श्रेणीमध्ये ‘तरलटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमीटेड’ला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

                       केंद्रीय  वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या वतीने  येथील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात आज ‘राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार-2020’चा निकाल जाहीर झाला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग तथा रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि विभागाचे सहसचिव अनिल अग्रवाल यावेळी उपस्थित होते तर  केंद्रीय वाणिज्य व उद्योग विभागाचे राज्यमंत्री सोम प्रकाश हे दूरदृष्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले.

 

देशामध्ये रोजगाराला चालना देण्यासाठी व  नवसंकल्पना प्रत्यक्षात उतरवून नाविन्यपूर्ण उत्पादने व पयार्यी सेवा व्यवस्था निर्माण व्हावी या उद्देशाने ‘राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार’ सुरु करण्यात आला आहे. एकूण 12  श्रेणींमध्ये विविध 35 गटात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील दोन स्टार्टअपचा यात समावेश आहे.

  ‘वेल्दी थेरपेटिक्स’ ला आरोग्य सेवांमधील सर्वोत्तम स्टार्टअपचा पुरस्कार 

    आरोग्य सेवा श्रेणीमध्ये एकूण चार गटात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशभरातील 21 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमधून एकूण 249 स्टार्टअपमध्ये या पुरस्कारासाठी स्पर्धा होती. यामधून आरोग्य सेवा पुरविण्याच्या गटात मुंबई येथील ‘वेल्दी थेरपेटिक्स प्रायव्हेट लिमीटेड’ ला सर्वोत्तम स्टार्टअपचा  पुरस्कार जाहीर झाला आहे. या संस्थेने रूग्णांसाठी ‘मॉनिटरींग डॅश बोर्ड’ तयार केले असून या माध्यमातून रूग्णांना सतर्कता संदेश पुरविण्यात येतात. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली कार्यरत या सुविधेच्या माध्यमातून रूग्णांना  गुणात्मक सेवा उपलब्ध झाली आहे.

            ‘तरलटेक सोल्युशन्स’ ला नागरी सेवांमधील सर्वोत्तम स्टार्टअपचा मान              

नागरी सेवा श्रेणीमध्येही एकूण चार गटात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशभरातून सहभागी एकूण 137 स्टार्टअपमध्ये या पुरस्कारासाठी चुरस होती. यामधून ‘जल व जल जाळे निर्माण करण्याच्या’ गटात मुंबई येथील ‘तरलटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमीटेड’ ला सर्वोत्तम स्टार्टअपचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अन्य साधनांअभावी हात पंपावर अवलंबून असणा-या लोकांसाठी या संस्थेने हात पंप विकसीत करून स्वच्छ पाणी  पुरवठा करण्यात नाविन्यपूर्ण कार्य केले आहे.

 

  5 लाख रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप असून विजेत्या स्टार्टअपला आपल्या प्रकल्पाबाबत कामाची मागणी नोंदविण्यासाठी संबंधित सार्वजनिक प्राधिकृत अधिकारी, कॉर्पोरेट संस्थांपूढे कामाचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. 

 

              आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic

                                        000000 

रितेश भुयार /वृत विशेष क्र.92 / दि.06.10.2020

 

 


 

महाराष्ट्रला 8 सीएनजी स्टेशन

 




नवी दिल्ली, 06 :  केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक गॅस व पोलाद मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज पर्यावरणपुरक कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) ची व्यापकता वाढविण्याच्या उद्देशाने देशभर 42 सीएनजी आणि टोरेंट गॅसचे 3 सिटी गेट स्टेशन्सचे लोकार्पण करण्यात आले. यापैकी 8 महाराष्ट्रामध्ये आहेत.

केंद्रीय मंत्री श्री प्रधान यांनी आज आयोजित कार्यक्रमात  व्हिडिओ कॉन्फरन्सींगव्दारे सर्व 42  सीएनजी आणि 3 सिटी गेट स्टेशन्स जोडली. या कार्यक्रमात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि देशभरातील वितरक ज्यांना सीएनजी आणि सिटी गॅस स्टेशन प्राप्त झालेली आहेत ते उपस्थित होते.

   आज जोडलेल्या 42 सीएनजी स्टेशन्समध्ये 14 उत्तरप्रदेश, 8 महाराष्ट्र, 6 गुजरात, 4 पंजाब आणि 5-5 तेंलगाना आणि राजस्थान येथे आहेत. सात राज्य, 1 केंद्र शासित प्रदेशातील एकूण 32 जिल्ह्यांमध्ये टोरेंट गॅसला सिटी गॅस वितरण नेटवर्क पसरविण्याचे अधिकार आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पंजाब मध्ये एक-एक सिटी स्टेशन आहे.

Friday, 2 October 2020

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी




    

 

नवी दिल्ली, 2 : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती

आज महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली.

 

        कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या  सभागृहात  आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त  तथा अपर मुख्यसचिव श्यामलाल गोयल यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त तथा सचिव निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही  यावेळी प्रतिमेस पुष्पअर्पण करून आदरांजली वाहिली.

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

                                                            00000

रितेश भुयार/वि.वृ.क्र.91 /दि.02.10.2020