Friday, 31 May 2024

राजधानीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी






नवी दिल्ली, ३१: प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांची  जयंती आज  उभय  महाराष्ट्र सदन   महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

             कॉपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात तसेच कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांच्या पुतळयास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही  पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांच्या पुतळयास व  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांना अभिवादन

            महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात  राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित  कर्मचाऱ्यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

*****************

आम्हाला एक्सवर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.65 / दिनांक 31.05.2024

 

 

 

 

Tuesday, 28 May 2024

राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी





नवी दिल्ली, २८:  थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची  जयंती  महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय आज केंद्रात साजरी करण्यात आली.  

कॉपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात, निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रूपिंदरसिंग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रेरक प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त  स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी  कर्मचाऱ्यांनीही  यावेळी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 

 

 महाराष्ट्र परिचय केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन  

थोर विचारवंत-साहित्यिक स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली. परिचय केंद्राच्या उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी कार्यालयातील उपस्थित कर्मचाऱ्‍यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 

*****************

आम्हाला एक्सवर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.64  / दिनांक 28.05.2024

 

 

 


 

Tuesday, 21 May 2024

राजधानीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त घेतली शपथ





नवी दिल्ली दि. 21 : देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची  33 वी पुण्यतिथी  दहशतवाद व हिंसाचार विरोधीदिनानिमित्त, महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात शपथ घेण्यात आली . 

कॉपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना,  आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभिर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु, तसेच मानवी जिवीत मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु
अशी शपथ उपस्थितांना दिली.
याप्रसंगी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार, डॉ स्मिता शेलार यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र परिचय केंद्रात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त घेतली शपथ 

            महाराष्ट्र परिचय केंद्रात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त, कार्यालयात उपस्थित कर्मचा-यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथ दिली.

*****************

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.63  / दिनांक 21.05.2024


 

Tuesday, 14 May 2024

राजधानीत छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी





 

नवी दिल्ली , 14: स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची  जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली. 

 

कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त व प्रधान सचिव रूपिंदर सिंग यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ राजेश अडपावार व स्मिता शेलार यासोबत इतर वरिष्ठ अधिका-यांनीही त्यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहिली.

 

महाराष्ट्र परिचय केंद्रात छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

 

            महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.  कार्यालयातील उपस्थित कर्मचाऱ्यांनीही यावेळी त्यांना श्रध्दाजंली वाहिली.

******************

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.62/ दिनांक 14.05.2024

 

 


Friday, 10 May 2024

राजधानीत महात्मा बसवेश्वर जयंती साजरी






नवी दिल्ली, 10: सामाजिक क्रांतीचे उद्गाते, थोर समाजसेवक, महात्मा बसवेश्वर यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली. 

पर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन

 महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  त्‍यांच्यासह कार्यालयात उपस्थित सर्व कर्मचा-यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

******************

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.61/ दिनांक 10.05.2024

 

 

 

 

Thursday, 9 May 2024

महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान







 



तीन मान्यवरांना पद्म भूषण, तर तीन मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
एकूण दोन पद्मविभूषण, आठ पद्मभूषण आणि 55 पद्मश्री पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, 09: देशातील सर्वोच्च नागरी ‘पद्म पुरस्कार-2024’ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. एकूण 65 पुरस्कार प्रदान झाले असून, यात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले.

राष्ट्रपती भवनात संध्याकाळी संपन्न झालेल्या या भव्य सोहळ्यात, राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर तसेच अन्य वरिष्ठ केंद्रीय मंत्रीगण उपस्थित होते. दुस-या टप्प्यात पार पडलेल्या या पद्मपुरस्कार समारंभात दोन पद्मविभुषण, आठ पद्मभुषण व 55 पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पद्मविभूषण या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराचा सन्मान तामिळ सुपरस्टार चिरंजीवी आणि अभिनेत्री-नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना प्रदान करण्यात आले. या दोन्ही कलाकारांनी भारतीय सिनेमा आणि कला क्षेत्रात अमिट योगदान दिले आहे.

महाराष्ट्र राज्यातून सहा मान्यवरांना विविध क्षेत्रात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल गौरविण्यात आले. यात होर्मुसजी एन कामा यांना साहित्य, शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रात, डॉ अश्विन मेहता यांना औषधी क्षेत्रात, कुंदन व्यास यांना साहित्य, शिक्षण, पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मभूषण पुरस्कार’ तर शंकरबाबा पापळकर यांना समाजसेवा क्षेत्रात, उदय विश्वनाथ देशपांडे यांना क्रीडा व मल्लखांब प्रशिक्षण क्षेत्रात, चंद्रशेखर महादेवराव मेश्राम यांना औषधी क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी ‘पद्मश्री पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्रातील पद्मपुरस्कार प्राप्त मान्यवरांविषयी

होर्मुसजी एन कामा (साहित्य आणि अध्यापन)- श्री होर्मुसजी एन कामा यांना साहित्य, शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रात अमूल्य कामगिरी केल्याबद्दल आज त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी संचालक, मुंबई समाचार 2018-2019 या वर्षासाठी ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन (ABC) चे अध्यक्षपद भूषविले आहे. ते यापूर्वी इंडियन न्यूजपेपर सोसायटी (INS) चे दोन टर्म तसेच प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) आणि मीडिया रिसर्च यूजर्स कौन्सिल (MRUC) चे अध्यक्ष होते. श्री होर्मुसजी कामा हे आजपर्यंत INS, PTI आणि MRUC च्या बोर्डावर सक्रिय सदस्य आहेत.

डॉ. अश्विन मेहता (औषधी) - डॉ. अश्विन बी मेहता हे मुंबईतील प्रख्यात आणि प्रतिष्ठित इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट असून, या क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्याबद्दल आज त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. या क्षेत्रात त्यांना मागील 38 वर्षांचा दांडगा अनुभव आहे. ते जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई येथे कार्डिओलॉजीचे संचालक आहेत. श्री मेहता हे सद्या लीलावती हॉस्पिटल, ब्रीच कँडी हॉस्पिटल, एस आर मेहता हॉस्पिटल, हरकिसोनदास हॉस्पिटल, वेस्टर्न रेल्वे हॉस्पिटल, कमबल्ला हिल हॉस्पिटल आणि सैफी हॉस्पिटलमध्ये मानद सल्लागार हृदयरोगतज्ज्ञ आहेत.

कुंदन व्यास - पत्रकारितेच्या क्षेत्रात अतुलनीय कार्य करणा-या कुंदन व्यास यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी महत्त्वपूर्ण पदांवर वैविध्यपूर्ण कामे केले आहे. कुंदन व्यास हे जन्मभूमी वृत्तपत्राचे मुख्य संपादक आहेत. ते वर्ष 2010-11 मध्ये इंडियन न्यूजपेपर सोसायटी (INS) चे अध्यक्ष होते आणि महाराष्ट्र सरकारने त्यांना 2015 मध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित केले आहे.

डॉ शंकरबाबा पापळकर –अनाथ, बेवारस तसेच दिव्यांग मुलांचे आधारवड असलेले शंकरबाबा पापळकर हे अमरावती जिल्ह्यातील अचलपुर तालुक्यातील आहेत. तेथील वझ्झर येथे अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहच्या माध्यमातून अशा मुलांचे संगोपन तसेच पुर्नवसनाचे त्यांचे अखंड व्रत सुरू आहे. शंकरबाबांच्या बालगृहात राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून बेवारस दिव्यांग मुले-मुली आजीवन पुनर्वसनासाठी दाखल होतात. सध्या या बालगृहात, 98 मुली आणि 25 मुले असे एकूण 123 मतिमंद, अपंग, अंध, निराधार, निराश्रित मुले वास्तव्यास आहेत. अशाप्रकारचा बालगृह देशात एकमेव पुनर्वसन केंद्र आहे, जे आदर्श बालगृह म्हणून प्रचलित असून, या आश्रमातील मुलांच्या संगोपन व पुनर्वसनासाठी, शंकरबाबा पूर्णत: समर्पित असतात.

डॉ. चंद्रशेखर महादेवराव मेश्राम – न्यूरोलॉजीच्या क्षेत्रात, डॉ मेश्राम, 1987 पासून कार्यरत असून त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत आज त्यांना प्रतिष्ठित असे पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रात डॉ मेश्राम गेल्या 37 वर्षांपासून अविरत काम करीत आहेत.
वर्ष 2022 मध्ये वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त म्हणून त्यांची निवड झाली. या पदावर निवड झालेले ते देशातील पहिले न्यूरोलॉजिस्ट आहेत व वयाच्या 65व्या वर्षी त्यांनी हा इतिहास रचला. 123 सदस्य देश असलेल्या वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे जगात फक्त तीन विश्वस्त असून, ते यापैकी एक आहेत. एका छोट्या गावातून शालेय शिक्षण पूर्ण करून, वर्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीच्या विश्वस्त पदापर्यंत त्यांच्या कार्याने मोठी झेप घेतली आहे. मुख्य समन्वयक, सार्वजनिक आरोग्य शैक्षणिक उपक्रम, इंडियन अकादमी ऑफ न्यूरोलॉजी, सार्वजनिक आरोग्य शिक्षणासाठी वर्तमानपत्रांमध्ये 400 प्रकाशने प्रसिध्दआहेत. मागील 30 वर्षांपासून सार्वजनिक आरोग्य शिक्षण कार्यक्रम आयोजित करत असून, पक्षाघात, स्मृतिभ्रंश, पार्किन्सन्स रोग, मिरगी, डोकेदुखी, ऑटिसम, मेंदूज्वर आदि रोगांवर वर्षभर जनजागरणाचे कार्यक्रम करत असतात. वैद्यकीय शिक्षण नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, चंदीगडमधून एमडी मेडिसिन, एमडी न्यूरोलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे.

उदय देशपांडे - क्रीडा क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी बजावणारे आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. जागतिक स्तरावर या खेळाला लोकप्रिय करण्यासाठी आणि अनेक मल्लखांबपट्टू घडवण्यासाठी उदय देशपांडे यांनी अथक परिश्रम घेत, या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे. 50 देशांतील 5,000 हून अधिक खेडाळूंना वैयक्तिकरित्या प्रशिक्षित करून महिला, दिव्यांगजन, अनाथ, आदिवासी आणि ज्येष्ठ नागरिकांसह विविध गटांना मल्लखांबची ओळख त्यांनी करून दिली आहे. विश्व मल्लखांब फेडरेशनचे संचालक म्हणून जागतिक पातळीवर या खेळाला नेण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.

देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार- पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात. कला, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा आदि विविध शाखा/कार्यक्रमांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मविभूषण’ दिला जातो; उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला या पुरस्कारांची घोषणा होत असते.

हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी मार्च अथवा एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात प्रदान केले जातात. वर्ष 2024 साठी, राष्ट्रपतींनी 132 पद्म पुरस्कार प्रदान करायला मान्यता दिली होती. यामध्ये 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश होता. 2 मे 2024 रोजी पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्पयात तीन पद्मविभूषण, आठ पद्मभूषण आणि 55 पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. तर दुस-या व अंतिम टप्प्यात दोन पद्मविभूषण, आठ पद्मभूषण आणि 55 पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. एकूण संपूर्ण सोहळ्यातील विजेत्यांमध्ये 30 महिला आहेत आणि परदेशी/एनआरआय/पीआयओ/ओसीआय या श्रेणीतील 8 मान्यवर आणि 9 मरणोत्तर पुरस्कारप्राप्त मान्यवरांचाही समावेश आहे.

श्री. प्यारेलाल शर्मा यांना कला क्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार जाहिर करण्यात आला होता. तथापि, आज झालेल्या पुरस्कार सोहळ्यास प्यारेलाल शर्मा उपस्थित राहिले नाहीत.

*****************
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.60 / दिनांक 09.05.2024

Wednesday, 8 May 2024

प्रामाणिकतेने कार्य केल्यास यश नक्कीच लाभेल : पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापळकर






 



परिचय केंद्रास सदिच्छा भेट

नवी दिल्ली, 8 : प्रामाणिकतेने तसेच कठोर परिश्रमपूर्वक काम केल्यास त्या कामाला  नक्कीच यश मिळेल, असे प्रेरणादायी मार्गदर्शन पद्मश्री पुरस्कार घोषित, अनाथ मुलांचे नाथ आणि थोर समाजसेवक डॉ. शंकरबाबा पापळकर  यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेटी दरम्यान केले.

गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते डॉ.पापळकर यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी डॉ. पापळकर यांच्यासोबत त्यांच्या मानसकन्या गांधारी आणि मानसपुत्र योगश दिल्लीत आले असून या सोहळ्यात उपस्थित राहतील.

पुरस्कार सोहळ्याच्या पूर्वसंध्येला, डॉ. पापळकर यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली. यावेळी डॉ.पापळकर यांचे  स्वागत उपसंचालक (माहिती) श्रीमती अमरज्योत कौर अरोरा यांनी  शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले.  यावेळी त्यांचे सोबत सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, श्री नितीन पाटील, संपादक- रोजगार नोकरी संदर्भ संजय नाथे, अनाम प्रेम संस्थेचे सदस्य प्रशांत भाट, मानसकन्या गांधारी आणि मानसपुत्र योगश यांचेही स्वागत श्रीमती अमरज्योत कौर अरोरा यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

 डॉ. पापळकर यांनी त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अत्यंत आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली. "हा पुरस्कार मला नाही तर अनाथ मुलांना मिळाला आहे," तसेच "या मुलांसाठी काम करणे हे माझे जीवन आहे आणि मी माझ्या आयुष्याचा शेवटपर्यंत हे कार्य करत राहीन," अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

डॉ. पापळकर यांनी समाजसेवेतील त्यांच्या कार्याबद्दल आणि अनाथ मुलांसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल माहिती देतांना सांगितले की, अमरावती जिल्ह्यातील परतवड्यात 14 फेब्रुवारी 1942 रोजी त्यांचा जन्म झाला. धोब्याचा व्यवसाय पासून ते पत्रकारिता केल्यापासून ते रस्त्यावरच्या अनाथ, अपंग, गतिमंद आणि दिव्यांग मुलांच्या वेदनांनी त्रस्त झाल्याचे त्यांनी त्यांचा जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. वंचित घटकांसाठी संगोपन आणि पुनरुत्थानासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, 1990 च्या दशकात त्यांनी वझ्झर या गावात "स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृह" नावाचा आश्रम स्थापन केला. या आश्रमात अपंग, बेवारस, गतिमंद आणि अपंग मुलांचा सांभाळ करून ते भारतात एक रोल मॉडेल बनले आहे.

 शासकीय कुठलेही अनुदान न घेता हा आश्रम सुरू आहे. समाजाकडून मिळणाऱ्या दानावर आणि शेगाव संस्थान आणि अंबादास पंथ बालगृहाचे संचालक प्रभाकर वैद्य यांच्याकडून मिळणाऱ्या मदतीवर हा आश्रम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. या मुलांना स्वावलंबी बनवणे हे त्यांचे ध्येय असल्याचे सांगत, या मुलांना त्यांचे नाव दिल्याचे त्यांनी सांगितले.

 आश्रम सुरू झाल्यानंतर 200 मूले आश्रमात होती, असे सांगत,  आश्रमातल्या 30 मूकबधिर-गतिमंद मुलामुलींचे लग्न लावल्याचे त्यांनी माहिती दिली. आतापर्यंत आश्रमातील 12 जण शासकीय सेवेत रुजू झाले आहेत आणि यासोबत त्यांना जगण्याचा अधिकार मिळाल्याचे सांगत, त्यांनी आनंद व्यक्त केला. सद्या त्यांच्या आश्रमात 98 मुली व 25 मुले अशी एकूण 123 मुले वास्तव्यास असून, डॉ. पापळकर त्यांचे संगोपन व शिक्षणापासून ते पुनर्वसन करीत असल्याचेही त्यांनी सांगतिले. तसेच आश्रमात डॉ पापळकर यांनी मुलांच्या सहायाने 15000 वृक्ष लावून वनराई फुलविली आहे.

 बेवारस आणि दिव्यांगांच्या पुनर्वसनावर त्यांनी लक्ष केंद्रित करत, दिव्यांगांच्या पुनर्वसनाबाबत यावेळी चिंताही व्यक्ती केली.  शासकीय कायद्यानुसार 18 वर्षावरील मुलांना रिमांड मधून काढून टाकले जाते, याची खंत व्यक्त करत, 18 वर्षांपर्यंत ठेवणा-या रिमांड होम च्या कायद्यात आवश्यक बदल घडवून अशा मुलांसाठी संगोपन तसेच पुनर्वसनासाठी पाऊले उचलण्याची त्यांनी यावेळी इच्छा व्यक्त केली.

गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांग, मतिमंद, मुकबधीर, दृष्टीहीन आणि निराश्रित मुलांना आश्रय देऊन त्यांच्या संगोपनाची अतिशय कठीण जबाबदारी डॉ.पापळकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. या अतुलनीय कार्याची भारत सरकारने दखल घेऊन उद्या दि.09 मे रोजी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

 

00000000000000000000

 आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत क्र. 59/ दिनांक 08.05.2024