Saturday, 12 October 2019

महाराष्ट्र सदनात महर्षि वाल्मिकी यांची जयंती साजरी











नवी दिल्ली दि. १३ : महर्षि वाल्मिकी यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.

  
            कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी  यावेळी उपस्थित होते . उपस्थित अधिकारी –कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic 
         000000
रितेश भुयार /वृत विशेष क्र.232 / दि.13.10.2019





सरस आजिवीका मेळाव्यात महाराष्ट्राच्या हस्तकला व व्यंजनांची रेलचेल














              जावळी घोंगडी, काळा तांदूळ आणि पुरणाचे मांडे खास आकर्षण

नवी दिल्ली दि. १२ : सरस आजिवीका मेळाव्यात महाराष्ट्रातील महिला बचत गटांच्या स्टॉल्सवरील हस्तकलेच्या वस्तू आणि खास महाराष्ट्रीय व्यंजनांची मोठी रेलचेल दिसून येत आहे. वैशिष्टयपूर्ण जावळी घोंगडी, काळा तांदूळ आणि पुरणाचे मांडे येथे भेट देणा-यांचे खास आकर्षण ठरले आहे.

             केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ‘दिनदयाल उपध्याय अंत्योद-राष्ट्रीय आजिवीका योजनेंतर्गत’ येथील इंडिया गेट वरील राजपथ लॉनवर 10 ते 23 ऑक्टोबर 2019 दरम्यान सरस आजिवीका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या हस्ते या मेळाव्याचे आज उद्घाटन झाले. विभागाचे सचिव अमरजित सिन्हा आणि अतिरीक्त सचिव उपमा चौधरी यावेळी मंचावर उपस्थित होत्या. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानाच्या (उमेद) मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला आणि दिल्ली स्थित महाराष्ट्र सदनाचे गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल यावेळी उपस्थित होते.

 या मेळाव्यात देशातील 29 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांतील एकूण 500 महिला बचत गट सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या ‘राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानाअंतर्गत’ (उमेद) कार्यरत राज्यातील 10 महिला बचत गटांनी या मेळाव्यात  सहभाग घेतला आहे.

                                                   जावळी घोंगडीने घातली भुरळ      
        या मेळाव्यातील हॉल क्रमांक 2 मध्ये महाराष्ट्राच्या हस्तकला व खाद्यपदार्थांची स्टॉल्स आहेत. यात पुणे जिल्हयातील इंदापूर येथील हिरकणी बचत गटाने उभारलेला विविध घोंगडयांचा स्टॉल्स येथे भेट देणा-यांचे आकर्षण ठरला आहे. या स्टॉल वरील जावळी घोंगडी ही पाठ दुखी, मनक्यांचे दुखने यात फायदेशीर असून रक्ताभिसरणासाठीही ही उत्तम मानली जाते. मेंढीच्या लोकरीपासून निर्मित चार प्रकारच्या घोंगडया याठिकाणी विक्रीसाठी  ठेवण्यात आल्या  आहेत.
            
चंद्रपूर जिल्हयातील नागभिड तालुक्याच्या चिंधीचक गावचा वैष्णवी बचतगटावरील काळा तांदूळ येथील खास आकर्षण आहे. ॲसिडीटी, मधुमेह आणि हृदय विकार या आजारासाठी काळा तांदूळ उपयुक्त असल्याने याची मागणी मोठया प्रमाणात दिसून येते. ब्राऊन तांदूळ, सुंगधी मोहरा आणि चकोरा तांदूळही या स्टॉलवर विक्रीस ठेवण्यात आला आहे.

            या हॉलमध्ये नंदुरबार येथील दशमा बचतगट, वर्धा येथील उद्योगिनी बचतगट आणि सातारा जिल्हयातील वाई येथील संस्कृती बचत गटांनी वैविद्यपूर्ण मसाले, पापड आणि डाळींपासून निर्मित खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले आहेत.  
                                    पुरणाचे मांडे ठरले खवय्यांचे आकर्षण
         
या मेळाव्यातील फुड कोर्टमध्ये खवय्यांसाठी महाराष्ट्रीय लज्जतदार व्यंजनांची खास मेजवाणीच आहे. येथे रत्नागिरी येथील जिजामाता बचतगट आणि नाशिक जिल्हयातील निफाड येथील माऊली बचतगट यांचा  खास महाराष्ट्रीय व्यंजनांचा स्टॉल असून येथील पुरणाचे मांडे खवय्यांचे आकर्षण ठरले आहे. यासोबतच पुरण पोळी, वडापाव, थालीपीठ, भेळ, सोलकडी, पोहे, उकडीचे मोदक, प्रॉन मसाला, चिकन पकोडा, फिश फ्राय आदी जिन्नस याठिकाणी  खवय्यांसाठी उपलब्ध आहेत.
             
 या मेळाव्यातील हॉल क्रमांक एक मध्ये महाराष्ट्रातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या विविध कला कुसरीच्या वस्तुंचे स्टॉल्स आहेत. यात  गडचिरोली जिल्हयातील धानोरा तालुक्याच्या मोहली गावचा शारदा बचतगट, भंडारा जिल्हयातील मोहाडी तालुक्याच्या आंधळगाव येथील यशस्वी बचतगट,धुळे जिल्हयातील फागणे गावचा राधाकृष्ण बचतगट, औरंगाबाद जिल्हयातील पैठण तालुक्याच्या म्हारोंलागावचा रेणुका बचतगट, नाशिक जिल्हयातील येवला तालुक्याच्या नेऊरगाव येथील श्रीगणेश बचतगटाचा स्टॉलही येथे मांडण्यात आला आहे.

            दरम्यान, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव अमरजित सिन्हा आणि अतिरीक्त सचिव उपमा चौधरी तसेच दिल्ली स्थित महाराष्ट्र सदनाचे गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल यांनी या मेळाव्यातील महाराष्ट्राच्या महिला बचत गटांच्या स्टॉल्सला भेट दिली.  

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic 
         000000
रितेश भुयार /वृत विशेष क्र.231 / दि.11.10.2019






Friday, 11 October 2019

सरस आजिवीका मेळाव्यात महाराष्ट्रातील महिला बचतगटांचे 10 स्टॉल्स






नवी दिल्ली दि. ११ : केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने येथील इंडिया गेट वरील राजपथ लॉनवर आयोजित सरस आजिवीका मेळाव्यात राज्याची हस्तकला व खाद्य संस्कृती दर्शविणारे महिला बचतगटांचे 10 स्टॉल सहभागी झाले आहेत.

            केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ‘दिनदयाल उपध्याय अंत्योद-राष्ट्रीय आजिवीका योजनेंतर्गत’ येथील इंडिया गेट वरील राजपथ लॉनवर सरस आजिवीका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात देशातील 29 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांतील एकूण 500 महिला बचत गट सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातील 10 महिला बचत गटांनी यात सहभाग घेतला आहे.

             राज्यातील वैशिष्टपूर्ण  मसाले, पापड, लोणचे आदि जिन्नस या मेळाव्यात विक्रीसाठी असून राज्यातील 4 महिला बचत गटांचे स्टॉल्स  येथे लावण्यात आले आहेत. राज्यातील हस्तकलेची ओळख करून देणारे 4 आणि खाद्य संस्कृती दर्शविणारे 2 असे एकूण 10 बचत गटांचे स्टॉल्स  या ठिकाणी आहेत.

            10 ते 23 ऑक्टोबर 2019 पर्यंत चालणा-या  सरस आजिवीका मेळाव्याचे  शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानाच्या (उमेद) मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यावेळी उपस्थित राहणार आहेत.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic 
         000000
रितेश भुयार /वृत विशेष क्र.230 / दि.11.10.2019





‘कायाकल्प’ राष्ट्रीय पुरस्कार : नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम














                                 अमरावती व श्रीरामपुरचाही सन्मान
                                        
नवी दिल्ली दि. ११ : स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणारे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम ठरले आहे. आज केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते या रूग्णालयाला कायाकल्प राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर जिल्हयातील श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालय आणि पिंपरी चिंचवड येथील डि.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
            केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने येथील इंडिया हॅबीटॅट सेंटर मध्ये आयोजित कार्यक्रमात रूग्णालय व रूग्णालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्यात केंद्र शासनाच्या मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणा-या देशातील रुग्णालयांना कायाकल्प राष्ट्रीय पुरस्कार 2018-19’ने गौरविण्यात आले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि  विभागाच्या सचिव प्रिती सुदान यावेळी मंचावर उपस्थित होत्या.

 केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत देशभरातील रूग्णालये, संस्था आणि  विविध राज्यांतील रूग्णालयांना एकूण 90 पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. तसचे देशातील एकूण 11 खाजगी रूग्णालयांना यावेळी  विविध श्रेणींमध्ये  पुरस्कार प्रदान करण्यात आले.                               
             
                                           नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय प्रथम
            राज्यांच्या श्रेणी मध्ये महाराष्ट्रातून तीन रुग्णालयांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. केंद्र शासनाच्या स्वच्छता मानकांची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी करणारे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यातून प्रथम ठरले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निखील सैदाने यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 50 लाख रूपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

                                                 अमरावती व श्रीरामपूरचाही सन्मान
         
            स्वच्छता मानकांची उत्तम अंमलबजावणी करणारे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय हे कायाकल्प पुरस्कार स्पर्धेत राज्यात उपविजेते ठरले. अमरावतीचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. श्यामसुंदर निकम आणि  जिल्हा गुणवत्ता आश्वासक समन्वयक डॉ. मंगेश राऊत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 20 लाख रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

              अहमदनगर जिल्हयातील श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालय हे ग्रामीण रूग्णालयांमधून राज्यात प्रथम ठरले. या रूग्णालयाचाही कायाकल्प पुरस्काराने सन्मान करण्यात आला. राज्याच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक  डॉ. विजय कंदेवाड आणि अहमदनगर जिल्हयाचे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व्यवस्थापक अशोक कोठारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 15 लाख रूपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

                      पिंपरी चिंचवड येथील डि.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचाही सन्मान

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने यावर्षी प्रथमच कायाकल्प पुरस्कार स्पर्धेअंतर्गत खाजगी रुग्णालयांनाही सहभागी करून घेतले. देशभरातील 643 खाजगी रूग्णालयांनी यात सहभाग घेतला होता  पैकी 11 रूग्णालयांची या पुरस्कारासाठी निवड झाली . खाजगी रूग्णालयांच्या प्रथम श्रेणीत पुणे जिल्हयातील पिंपरी चिंचवड येथील डि.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णालय व संशोधन संस्थेने प्रथम क्रमांक पटकाविला. संस्थंचे विश्वस्त तथा खजिनदार डॉ. यशराज पाटील, रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एस.एस.चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार स्वरूपात मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.                               
           यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ हर्षवर्धन, राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि सचिव प्रिती सुदान यांनी  उपस्थितांना संबोधित केले.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic 
         000000
रितेश भुयार /वृत विशेष क्र.229 / दि.11.10.2019



Monday, 7 October 2019

‘इफ्फी’च्या इंडियन पॅनोरमात 6 मराठी चित्रपट
















नवी दिल्ली, 07 : गोव्यात आयोजित होणा-या50व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या’ (इफ्फी) इंडियन पॅनोरमामध्ये यावर्षीचे 41 सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार असून यात 6 मराठी चित्रपटांनी स्थान मिळविले आहे.
            इफ्फीचे हे 50 वे वर्ष असून 20 ते 28 नोव्हेंबर 2019 दरम्यान, या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. 76 देशांचे एकूण 200 चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित होणार असून इंडियन पॅनोरमा या मानाच्या विभागात 5 फिचर आणि 1 नॉन फिचर असे एकूण 6 मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
            इंडियन पॅनोरमात 26 फिचर आणि 15 नॉन फिचर असे एकूण 41 भारतीय भाषांतील चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यावर्षी सर्वोत्कृष्ट ठरलेल्या भारतीय चित्रपटांची या विभागात निवड करण्यात आली आहे.

                              आनंदी गोपाळ’, ‘भोंगा’ अशा दर्जेदार मराठी चित्रपटांची मेजवाणी

            फिचर चित्रपटांमध्ये समीर विद्वंस दिग्दर्शीत ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे. स्त्री-शिक्षण आणि परदेशगमन या गोष्टींचा विचारही झाला नव्हता ,अशा काळात गोपाळ विनायक जोशी या पोस्टमास्तराची 18 वर्षाची पत्नी आनंदी जोशी इंग्रजी भाषा शिकते. एवढेच नव्हे तर वैद्यकीय अभ्यासासाठी स्वत:च्या हिमतीवर अमेरिकेला जाते. नेटाने अभ्यासक्रम पूर्ण करते. हेच देशातील पहिल्या महिला डॉक्टर  आंनदी जोशी या कर्तृत्ववान स्त्रीचे चरित्र या चित्रपटात दर्शविण्यात आले आहे. 

शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शीत ‘भोंगा’ चित्रपट हा फिचर चित्रपटांच्या श्रेणीत प्रदर्शीत होणार आहे.  धर्म जीवनापेक्षा मोठा असतो की जीवन धर्मापेक्षा मोठे या सामाजिक विषयावर हा चित्रपट आधारीत आहे.
‘माई घाट : क्राईम नंबर 103/2005’ हा अनंत महादेवन दिग्दर्शीत चित्रपट फिचर चित्रपटांच्या श्रेणीत प्रदर्शीत होणार आहे. एका आईने पोलीस यंत्रणे विरूध्द दिलेल्या लढयाची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. यासोबतच आदित्य राठी व गायत्री पाटील दिग्दर्शीत ‘फोटो प्रेम’ आणि ‘तुझ्या आईला’ हा संजय ढाकणे दिग्दर्शीत चित्रपट फिचर चित्रपटांच्या श्रेणीत प्रदर्शीत होणार आहे.
           
 गणेश शेलार दिग्दर्शीत ‘गढूळ’ हा मराठी चित्रपट नॉन फिचर श्रेणीमध्ये प्रदर्शीत होणार आहे. वडिलांच्या मृत्युमुळे आई आणि मुलाच्या नात्याला आलेले दु:खदायक वळण व या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचा सामना असे या चित्रपटाचे कथानक आहे. 

यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट ठरलेला ‘हेल्लारो’ हा गुजराती  चित्रपट इफ्फीच्या इंडियन पॅनोरमामध्ये फिचर चित्रपटांतील तर ‘नुरेह’ हा नॉन फिचर चित्रपटांतील स्वागताचा चित्रपट असणार आहे.
                                                             ०००००
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वृत विशेष क्र.228 / दि.7.10.2019

                               




Thursday, 3 October 2019

शारदा दाते यांना वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कार












                         
                        राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, 03 : कोल्हापूर जिल्हयातील इचलकरंजी येथील शारदा दाते यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते  आज ‘वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्यावतीने १ ऑक्टोबर या आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरीक दिनाचे औचित्य साधून विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात ‘वयोश्रेष्ठ  पुरस्कार-२०१९’ वितरीत करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गहलोत, राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर आणि विभागाच्या सचिव निलम साहनी,अतिरीक्त सचिव उपमा श्रीवास्तव  यावेळी मंचावर उपस्थित होत्या.

उल्लेखनीय योगदानासाठी १२ श्रेणींमध्ये देशातील व्यक्ती व संस्थांना यावेळी एकूण  १५ पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्वत:च्या असाध्य रोगावर मात करत आपल्या गतीमंद मुलाला इंटर नॅशनल सेलिब्रेटी पर्यंत पोहोचवण्याची किमया करणाऱ्या इंचलकरंजी येथील शारदा दाते यांना यावेळी ‘वयोश्रेष्ठ प्रतिष्ठीत माता पुरस्काराने’ सन्माने गौरविण्यात आले. २ लाख ५० हजार रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

शारदा दाते स्वत: कर्करोगाने ग्रस्त असून लग्नानंतर तब्बल १० वर्षांनी त्यांच्या पोटी प्रथमेश हा गतिमंद मुलगा जन्माला आला. असाध्य रोगाच्या अंतरयातना आणि मुलाच्या बाहय यातना अशा कठीण समयी डगमगून न जाता  त्यांनी परिस्थितीचा  धिटाईने सामना केला. आपल्या गतिमंद मुलाच्या प्रगतीसाठी त्यांनी कष्ट उपसले व मुलाला घडवत मातृत्वाचा आदर्श निर्माण केला. मुलावर उपचार सुरु असतानाच त्याचे शिक्षणही पूर्ण केले आणि त्याला स्वत:च्या पायावर उभे केले. प्रथमेश सारख्या गतीमंद मुलांच्या कल्याणासाठी कार्यरत संस्थांसोबत गेल्या १० वर्षांपासून श्रीमती दाते जुळल्या असून आपले योगदान देत आहेत.

इचलकरंजी येथील डि.के.टी.ई. संस्थेच्या टेक्स्टाइल इंजिनिअरींग कॉलेजमध्ये गेल्या ११ वर्षांपासून प्रथमेश हा ग्रंथपाल सहायक म्हणून कार्यरत आहे. त्याच्या कर्तुत्वाचा सन्मान म्हणून प्रथमेशला राष्ट्रीय दिव्यांग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रथमेशच्या आदर्शवत कार्याचे कौतुक म्हणून त्याला स्वानुभवकथनासाठी देश -विदेशातून आमंत्रणही येतात तो आता इंटरनॅशनल सेलिब्रेटी  झाला आहे.     

शारदा दाते या आईच्या कष्टाचेच हे फळ असून गौरवाची बाब म्हणजे आपल्या  मुलाला घडवत त्याला राष्ट्रीय पुरस्कार विजेता बनविणा-या मातेलाही आज राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शारदा दाते यांनी समाजापुढे घालून दिलेल्या श्रेष्ठ मातेच्या आदर्शामुळेच त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले .
                                              *****
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वृत विशेष क्र.227 / दि.03.10.2019
                              


Wednesday, 2 October 2019

राजधानीत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी









             सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत राबविले जागरूकता अभियान
नवी दिल्ली, 02 :  राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी  प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी येथील सांगली मेस वसतीमध्ये जागरूकता अभियानही राबविण्यात आले.
            कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी -कर्मचा-यांनीही यावेळी  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

            गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल यांनी उपस्थित अधिकारी –कर्मचा-यांना सिंगल यूज प्लास्टिकचा उपयोग टाळण्याबाबत शपथ दिली. यावेळी, उपसंचालक श्री. कांबळे यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या योगदानाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
         
             कापडी पिशव्यांचे वाटप करून दिला सिंगल प्लास्टिक यूज ला गुडबाय करण्याचा संदेश
            तत्पूर्वी, महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र सदनाच्या परिसारातील सांगली मेस वसतीमध्ये सिंगल प्लास्टिक यूज टाळण्यासाठी जागरूकता अभियाही राबविण्यात आले. गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल आणि  निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी कर्मचारी या अभियानात सहभागी झाले होते. सांगली मेस वसतीच्या प्रत्येक घरात जावून त्यांना यावेळी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आणि सिंगल प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर टाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 
                                               *****
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वृत विशेष क्र.226 / दि.02.10.2019