Saturday, 4 January 2020

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी 24 जानेवारीला पोटनिवडणूक




नवी दिल्ली, 04 : श्री. धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी 24 जानेवारी 2020 ला पोट निवडणूक  घेण्यात  येणार  असून त्याच दिवशी मतमोजणी  होणार  आहे

             मागीलवर्षी 24 ऑक्टोबरला विधानपरिषदेचे आमदार धनंजय मुंडे हे विधानसभेवर निवडून गेल्याने वरिष्ठ सदनाची ही जागा रिक्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने शुक्रवारी  विधानपरिषदेच्या या रिक्त जागेसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

             आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 7 जानेवारीला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी  असून 15 जानेवारीला उमेदवारी अर्जांची छानणी होईल. 17 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर 24 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडून निकाल जाहीर होईल.
 या  विधानपरिषद सदस्यपदाची  कालमर्यादा 7 जुलै 2022 पर्यंत  आहे

                                                               *****
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वृत विशेष क्र.04 / दि.04.01.2020


Friday, 3 January 2020

यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणूक 31 जानेवारीला







नवी दिल्ली, 03 : राज्यातील यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी 31 जानेवारी 2020 ला पोट निवडणूक  घेण्यात  येणार  असून 4 फेब्रुवारीला  मतमोजणी  होणार  आहे
            यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधानपरिषदेचे आमदार तानाजी सांवत हे विधानसभेवर निवडून गेल्याने ही जागा रिक्त झाली  आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने आज यवतमाळ विधानपरिषदेच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.


     असा असणार पोट निवडणुकीचा कार्यक्रम

            यवतमाळ विधान परिषदेच्या जागेसाठी 31 जानेवारी 2020 ला मतदान घेण्यात येणार आहे. 7 जानेवारीला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी  असून 15  जानेवारीला उमेदवारी अर्जांची छानणी होईल. 17 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर 4 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडून निकाल जाहीर होईल.
यवतमाळ विधानपरिषद सदस्यपदाची कालमर्यादा 5 डिसेंबर  2020 पर्यंत  आहे

                                                              *****

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा    http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वृत विशेष क्र.03 / दि.03.01.2020


राजधानीत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी





















नवी दिल्ली , 03 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १८९ वी जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे  साजरी करण्यात आली.  

            कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त  अजितसिंह नेगी  यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई  फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 
  महाराष्ट्र परिचय केंद्रात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. उपस्थित अभ्यागत, अधिकारी व कर्मचा-यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
           महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                                                     http://twitter.com/micnewdelhi    
                                       000000   
  रितेश भुयार /वृत्त वि. क्र. ०२ /  दिनांक  03/01/2020     






Wednesday, 1 January 2020

मराठी भाषेचे वैभव वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे : डॉ. ज्ञानेश्वर मुळे

                      
 

 

 

                     





                               मराठी भाषा संवर्धन पंधरवडाचे उद्घाटन

नवी दिल्ली, 1 : मराठी भाषेत मोठी वैचारीक संपदा असून या भाषेचे वैभव वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे आवाहन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आजमराठी भाषा संवर्धन पंधरवडाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

            महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने 1 ते 15 जानेवारी 2020 दरम्यानमराठी भाषा संवर्धन पंधरवडाचे आयोजन करण्यात आले असून आज महाराष्ट्र सदनात डॉ. मुळे यांच्या हस्ते पंधरवडाचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यावेळी मंचावर उपस्थित होते.

             यावेळी डॉ.मुळे म्हणाले, महाराष्ट्राचे भौगोलिक व सांस्कृतिक वैविद्य जपत मराठी भाषेत मोठी वैचारीक संपदा निर्माण झाली  आहे. या भाषेने विविध लोककलांना जन्म दिला, या भाषेत नाटक,कविता असे अनेकानेक साहित्य लिहील्या गेले असून ही वैचारीक संपदा जपत मराठीचे  वैभव वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. महाराष्ट्राबाहेर राहणारा मराठी माणूस हा या भाषेचा दूत आहे म्हणून हे वैभव वाढविण्यात  त्याची  महत्वाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखीत केले.

            महाराष्ट्राबाहेर जिथे-जिथे मराठी माणसं आहेत तिथे त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमांतून मराठी  भाषेच्या संवर्धनात सहभाग घेतला पाहिजे. मराठी सोबतच देशातील अन्य भाषांतील साहित्यांचीही देवाण घेवाण या निमित्ताने व्हावी असेही  डॉ. मुळे म्हणाले

              भाषिक गैरसमजामुळे आपल्याला पाश्चात्यांच्या भाषा आपल्या भाषांपेक्षा महत्वाच्या वाटायला लागतात. मुख्यत्वे  इंग्रजी भाषा बोलता आली की नोकरी मिळते आणि इंग्रजी जगभर बोलली जाते हा मोठा गैरसमज आहे. आपल्याला मातृभाषाच चांगली बोलता यायला हवी. तसेच, इंग्रजी भाषा जगभर बोलली जात नाही. जपान मध्ये जपानी, जर्मनी मध्ये जर्मन, फ्रांस मध्ये फ्रेंच, आफ्रिकन देशांमध्ये फ्रेंच किंवा स्पॅनिच भाषा बोलली जाते. अशात आपण मात्र, गैरसमजाला बळी पडतो परिणामी आपण आपल्या भाषेपासून दूर जातो असेही डॉ. मुळे यांनी सांगितले.

          जगातल्या 50 टक्के भाषा या भारतीय उपखंडात पसरलेल्या असून या भाषांनी आपले वैविद्य जपले आहे. भाषेतील वैविद्यामुळे  नवनवीन कल्पनांचा जन्म होतो आणि भाषेतील वैविद्य गेले तर जग निरस होईल  . प्रत्येक  भाषेत  ज्ञान  ओतप्रोत  भरले असून  भाषिक  देवाण-घेवाणीने ते अधिक समृध्द होते असेही डॉ. मुळे म्हणाले.

            निवासी आयुक्त समीर सहाय, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे  यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर उपसंपादक रितेश भुयार  यांनी सूत्रसंचालन केले.

                                                          दिवाळी अंकांचे प्रदर्शन

          मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने आज महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने  महाराष्ट्र सदनात दिवाळी अंकांच्या प्रदर्श लावण्यात आले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रदर्शनात गृह लक्ष्मी, आवाजमिळून सा-याजनी, चार चौघी, श्री व सौ, अंतर्नाद, जत्रा, किशोर, अक्षरधारा, तारांगण, कालनिर्णय, उत्तम कथा, निरंजन, अन्नपुर्णा, लोकसत्ता, महाराष्ट्रटाईम्स,लोकमत-दिपोत्सव, साप्ताहिक सकाळ, तरूण भारत, प्रभात, झी मराठी आदी 125 दिवाळी  अंक मांडण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र लोकराज्य, महाराष्ट्र अहेडही या प्रदर्शनात मांडण्यात  आले.

यावेळी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल आणि महाराष्ट्र परिचय  केंद्राचे उपसंचालक  दयानंद कांबळे उपस्थित होते.
000000 

रितेश भुयार /वृत्त वि. क्र. ०१ दिनांक  01/01/2020