Saturday, 13 March 2021

प्रसिध्द लेखिका सई परांजपे यांना साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार प्रदान



 

    

 

नवी दिल्ली, १३ : प्रसिध्द लेखिका, नाटककार, दिग्दर्शिका सई परांजपे यांना आणि मग एक दिवस या अनुवादित पुस्तकासाठी आज मराठी भाषेकरिता अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            साहित्य अकादमीच्यावतीने येथील कोपर्निकस मार्गस्थित कमानी सभागृहात आयोजित साहित्योत्सवाच्या दुस-या दिवशी वर्ष २०१९ च्या साहित्य अकादमी अनुवाद पुरस्काराचे अकादमीचे अध्यक्ष प्रा. चंद्रशेखर कंबार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी हिंदी भाषेतील प्रख्यात कथा लेखिका चित्रा मुद्गल उपस्थित होत्या. या समारंभात एकूण १९ प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती व अनुवादकांना  पुरस्कार प्रदान करण्यात आले.

प्रसिध्द अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्याअँड देन वन डेया आत्मचरित्राचा मराठी अनुवाद असलेले आणि मग एक दिवस या पुस्तकाच्या लेखिका सई परांजपे यांना प्रा. चंद्रशेखर कंबार यांच्या हस्ते या समारंभात मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५० हजार रूपये , ताम्रपत्र  असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सई परांजपे यांनी आणि मग एक दिवस या पुस्तकाचा ओघवता व रसाळ अनुवाद केला त्यामुळेच हे कथन प्रामाणिक व परखड झाले आहे. छोटया छायाचित्रांच्या बारा पृष्ठांच्या दृष्यभागाने या पुस्तकाच्या आशयात जीवंतपणा आला आहे. हे पुस्तक रंजक आणि नाटयपूर्ण आणि साहित्यिक अंगानेही उत्तम ठरल्याने या पुस्तकाने मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवादीत पुस्तकाचा मान मिळविला आहे. आज या लाकृतीला व लेखिकेला मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .   

 आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

                                                            00000

रितेश भुयार/वि.वृ.क्र. 42/दि.13.03.2021  

Friday, 12 March 2021

साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर




  उद्या कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार ; आबा महाजन यांनाबाल साहित्य पुरस्कार

नवी दिल्ली, १२ : प्रसिध्द लेखक नंदा खरे यांच्या 'उद्या' या  कांदबरीस वर्ष 2020 साठीचा सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर झाला. तसेच प्रसिध्द बाल साहित्यिक आबा महाजन लिखित आबाची गोष्ट या लघुकथा संग्रहास बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित  साहित्य अकादमी पुरस्कार २०२०ची  आज घोषणा झाली. अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील भाषांकरिता साहित्य अकादमी पुरस्कार तसेच २१ लेखकांना बाल साहित्य पुरस्कार तर १८ भाषांकरिता युवा पुरस्कारविजेत्यांची घोषणा करण्यात आली.

साहित्य अकादमीने आज २० प्रादेशिक भाषांतील सात कविता संग्रह, चार कादंब-या, पाच कथा संग्रह ,दोन नाटके, एक संस्मरण आणि एक महाकाव्य या सर्वोत्कृष्ट कलाकृतींना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर केला. यात मराठी भाषेसाठी प्रसिध्द लेखक नंदा खरे यांच्या उद्या कादंबरीस हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

            या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे असून यावर्षी विशेष समारंभात  पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिध्द साहित्यिक वसंत आबाजी डहाके, सतीश काळसेकर आणि डॉ. निशिकांत मिराजकर यांचा समावेश होता.  मल्याळम, नेपाळी , उडिया आणि राजस्थानी भाषेसाठीचे पुरस्कार येत्या काळात घोषित करण्यात येणार आहेत.

                                                                उद्या विषयी

उद्या हा मागील तीनशे वर्षांपासूनचा लेखकाच्या मनातील सल आहे. लेखकाने कमालीच्या अस्वस्थतेतून वर्तमानाचा वेध घेत या कादंबरीत भविष्याचा बहुआयामी पट सादर केला आहे. या कादंबरीत  सुदीप जोशी, अरुण सन्मार्गी, सच्चिदानंद भाकरे, सानिका धुरू या प्रमुख पात्रांच्या आयुष्यावर सहजगत्या प्रकाश टाकला आहे. सायबर क्राइम आयुक्त झालेला अरुण सन्मार्गी हा अभिव्यक्ती व वर्तन विश्लेषक आहे. सुदीप जोशी हा महिकादळ या मुंबईतील एका प्रमुख पक्षाच्या संघटनेच्या  प्रमुख नेत्याचा लेखनिक आहे.अशा प्रकारे कादंबरीतील सर्व पात्रांना या कादंबरीत उत्तम रित्या न्याय देण्यात आला आहे.  

                    आबाची गोष्ट बाल साहित्य पुरस्काराची मानकरी  

          
           
साहित्य अकादमीच्या वर्ष २०२० च्या बाल साहित्य पुरस्कारासाठी  प्रादेशिक भाषांमधील  साहित्य कलाकृतींची निवड करण्यात आली आहे. मराठी साहित्यामधून आबा महाजन लिखित आबाची गोष्टया लघुकथा संग्रहाची बालसाहित्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ५० हजार रूपये आणि ताम्रपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून यावर्षी  विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी भाषेकरिता डॉ. चंद्रकांत पाटील , कृष्णात खोत आणि के.टी. ढाले पाटील यांचा परिक्षक मंडळामध्ये समावेश होता

                       मराठी भाषेसाठी युवा पुरस्काराची लवकरच घोषणा

             साहित्य अकादमीच्या वर्ष २०२० च्या युवा पुरस्कारांचीही आज घोषणा करण्यात आली.  एकूण १८ प्रादेशिक भाषांतील युवा लेखकांना हे पुरस्कार जाहीर झाले. येत्या काळात मराठीसह गुजराती, सिंधी, बंगाली, राजस्थानी आणि मल्याळम या भाषांसाठी युवा पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार असल्याचे साहित्य अकादमीच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 

                             

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

                              http://twitter.com/micnewdelhi                        

 000000 

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.४२/दिनांक १२.०३.२०२१

 


 

राजधानीत यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी





                            

नवी दिल्ली, १२ : महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, माजी उप पंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त निधी पांडे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

     महाराष्ट्र परिचय केंद्रात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थित अधिकारी- कर्मचा-यांनी  यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.                           

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

                              http://twitter.com/micnewdelhi                        

 000000