Tuesday, 8 March 2022

नारीशक्ती पुरस्कार विजेत्यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट











                  समाजसेवेसाठी झटण्याचा व्यक्त केला मनोदय                           

 नवी दिल्ली, ०८ :  कथक नृत्यांगणा सायली अगावणे, सर्प मित्र वनिता बोराडे आणि उद्योजिका कमल कुंभार या  राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्कार  विजेत्यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला  सदिच्छा भेट दिली. पुरस्कार ही कामाची  पावती  मानून आप-आपल्या क्षेत्रात समाजासाठी  उत्तमोत्तम कार्य करण्याचा मनोदय या तिन्ही पुरस्कार  विजेत्यांनी  यावेळी  व्यक्त केला.  

         सायली अगावणे यांना दिव्यांग मुलांसाठी नृत्य शाळा सुरु करायची आहे. वनिता बोराडे यांना पर्यावरण रक्षणासाठी सापांचे रक्षण व्हावे म्हणून आपल्या संस्थेच्या माध्यमातून जनजागृतीपर विविध उपक्रम राबवायचे आहेत, तर  कमल कुंभार यांना वर्षाकाठी ९ हजार महिलांना शेतीपूरक प्रशिक्षण दयायचे आहे.     

         राष्ट्रपती  रामनाथ  कोविंद  यांच्या  हस्ते  या तिघींना आज मानाच्या नारीशक्ती  पुरस्काराने  गौरविण्यात आले, या पार्श्वभूमीवर त्यांना महाराष्ट्र परिचय केंद्रात आमंत्रित करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.)अमरज्योत कौर अरोरा यांनी या तिन्ही पुरस्कार विजेत्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. माहिती अधिकारी अंजु निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह पुरस्कार विजेत्यांचे  कुटुंबिय यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी झालेल्या अनौपचारिक चर्चेत या तिघिंनी आपल्या कार्याविषयी माहिती दिली.  

             पुणे  येथील सायली अगावणे डाऊनसिंड्रोमग्रस्त असून त्यांनी अपंगत्वावर मात करत कथक  नृत्यांगणा म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वयाच्या ९ व्या वर्षापासूनच कथकचे धडे गिरवायला सुरुवात केली. या नृत्यात पारंगत होत त्यांनी राज्यासह दिल्ली, कटक तसेच परदेशात कोलंबो, बँकॉक, सिंगापुर आणि लंडन येथे नृत्य सादर केले आहे. कथक सोबतच वेस्टर्न डान्सचेही वेगवेगळे प्रकार सायलीने आत्मसात केले आहेत.१२ नृत्यप्रकार आत्मसात करून प्रत्येक नृत्याचे २० असे एकूण २४० स्टेज प्रोग्राम त्यांनी सादर केले आहेत. कोरोना काळातही योगा, कथकसह १२ नृत्यांचा सराव आणि स्केटिंग व पेंटिंग या आवडी जपल्याचेही सायलीने सांगितले. स्केटींग डान्सर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सायलीला आपल्या  सारख्या  दिव्यांग मुलांसाठी नृत्य शाळाही  सुरु करायची आहे.  

            बुलढाणा जिल्हयातील मेहकर तालुक्यातील बोथा येथील वनिता बोराडे यांना वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आल. डोंगराळ भागात वास्तव्य असल्याने आजुबाजूला वन्यजीवांचा सतत वावर असायचा. यातूनच पुढे साप पकडण्याचा छंद जडला. माहेरी या छंदाला काही जुन्या रुढी व समजामुळे विरोध झाला. मात्र, लग्नानंतर पतीने प्रोत्साहन दिले व पुढे पहिल्या सर्प मित्र म्हणून आपल्या नावाची नोंद झाल्याचे वनिता बोराडे सांगतात. गेल्या ३० वर्षांपासून ५१ हजार सापांना पकडून वनविभागाच्या माध्यमातून सुरक्षित जंगलामध्ये सोडल्याचे सांगतांना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान जाणवले. गैरसमजामुळे सापांना मारण्याचा प्रघात पाहून याविषयी समाज प्रबोधन करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले. श्रीमती बोराडे यांच्या सर्प संरक्षण कार्याची दखल घेत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद घेण्यात आली आहे. विविध पुरस्कारांनीही त्यांना गौरविण्यात आले असून येत्या काळात ‘सोयरे वनचरे’ या आपल्या संस्थेच्या माध्यमातून सर्प रक्षणासह पर्यावरण रक्षणासाठी जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्याचा मनोदयही त्यांनी यावेळी  व्यक्त केला.                     

           उस्मानाबाद जिल्हयातील हिंगळजवाडी येथील कमल कुंभार या उद्योजिका असून  पशुपालन क्षेत्रात महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. गेल्या २३ वर्षांपासून महिला बचतगट,बांगळया विकण्याचा व्यवसाय,आशा कार्यकर्ता, ऊर्जासखी असा प्रवास करत कमल कुंभार यांनी उद्योजिका म्हणून आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. उद्योजक म्हणून येणाऱ्या अडचणी व त्यावर यशस्वीपणे मात करण्याच्या त्यांच्या अनुभवाच्या जोरावर आज त्या हजारो महिलांना प्रशिक्षण देत आहेत. सद्या त्या शेळी पालन, कुक्कुट पालन, गांडूळखत, घोडेपालन, सेंद्रीय पालेभाज्या हे व्यवसाय सांभाळतात. त्यांनी आतापर्यंत २० हजार महिलांना शेतीपूरक व्यवसाय  प्रशिक्षण दिले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे कोरोना काळातही  गेल्या दोन वर्षात त्यांनी ५ हजार महिलांना प्रशिक्षण दिले असून यातील ३ हजार महिलांनी स्वत:चे शेतीपूरक व्यवसाय थाटले आहेत. येत्याकाळात वर्षाकाठी ९ हजार  महिलांना शेतीपूरक प्रशिक्षण देण्याचा त्यांचा मानस आहे.  

              या तिन्ही  पुरस्कार विजेत्यांना  माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्यावतीने प्रकाशित ‘महामुंबईचा विकास’ ही पुस्तिकाही  भेट स्वरुपात देण्यात आली. सायली अगावणे यांनी यावेळी कार्यालयाच्या ग्रंथालयासाठी  आई मनिषा अगावणे लिखित ‘अमेझींग चाईल्ड सायली’( एक सत्य कथा) हे पुस्तक  भेट दिले. सायलीची  बहीण  जुईली यावेळी उपस्थित होती. वनिता बोराडे आणि त्यांचे पती डी भास्कर यांनी यावेळी ‘सोयरे वनचरे’ या संस्थेची दिनदर्शिका भेट स्वरूपात दिली.

                                              00000  

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     

रितेश भुयार/ वि.वृ.क्र. ४८ /दि. ०८. ०३. २०२२

 

             

 

 

 

 

महाराष्ट्रातील तीन महिला नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित

 

            


नवी दिल्ली, 8  : देभभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या 28 महिलांचा आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘नारीशक्ती पुरस्कार’ प्रदान करून सन्मान करण्यात आला. यामध्ये पुण्यातील डाऊन सिंड्रोमप्रभावित कथक नृत्यांगणा  सायली अगावणे, बुलढाना जिल्ह्यातील सर्पमित्र वन‍िता बोराडे आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सामाजिक उद्योजिका कमल कुंभार या तीन महिलांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय      महिला दिनाचे औचित्य साधत आज केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने ‘नारीशक्ती पुरस्कार’ वितरण सोहळयाचे आयोजन राष्ट्रपती भवन येथे करण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती ईराणी, अन्य केंद्रीय मंत्रीगण तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी, डाऊन सिंड्रोमप्रभावित कथक नृत्यांगणा सायली अगावणे, विनिता बोराडे या भारतातील पहिल्या महिला सर्पमित्र यांना वर्ष 2020साठी नारीशक्ती पुरस्काराने गौरिविण्यात आले.  वर्ष 2021 साठी सामाजिक उद्योजिका कमल कुंभार यांचा नारीशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डाऊन सिंड्रोमप्रभावित कथक नृत्यांगणा  सायली अगावणे

पुण्याची असणारी डाऊन सिंड्रोमप्रभावित सायली अगावणे ही प्रसिद्ध कथक नृत्यांगणा आहे. शारिरीक आणि बौध्दिक कमतरता असून देखील सायली ने कथक या भारतीय शास्त्रीय नृत्यात आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.   सायली हीने आतापर्यंत 1000 पेक्षा अधिक सार्वजनिक कार्यक्रम सादर केलेले आहेत. ग्लोबल ओलंपियाड डांस स्पर्धेत सायली ने कांस्यपदक जिंकलेले आहे. वर्ष 2012 मध्ये सायलीला केंद्रीय  सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते.  डाऊन सिंड्रोम आंतराराष्ट्रीय संस्था लंडनआणि स्कॉटलंड कडूनही तीला  ‘विश्व डाउन सिंड्रोम दिवस पुरस्कार’ प्रदान करण्यात आलेला आहे.

प्रथम सर्पमित्र महिला वनिता जगदेव बोराडे

बुलढाणा जिल्ह्याच्या असणा-या भारतातील  प्रथम सर्पमित्र महिला अशी वनिता जगदेव बोराडे यांची ओळख आहे. त्यांनी आतापर्यंत 51 हजारापेक्षा जास्त सापांना लोक वस्तीतून पकडून जंगलात, नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडल्याचा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला आहे.  वनचरे फाउंडेशन या संस्थेच्यामाध्यमातून वन्यजीव व साप यांच्या विषयी शिक्षण-प्रशिक्षण  कार्यशाळा त्या घेतात. सापांविषयी   शास्त्रीयरीतीने  जन जागरण तथा प्रबोधन करीत असतात.  भारत सरकाराच्या डाक विभागाने  त्यांच्या नावे  तिकिट काढून त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.

सामाजिक उद्योजिका कमल कुंभार

उस्मानाबाद जिल्ह्यातील  हिंगळजवाडी येथील सामाजिक उद्योजिका कमल कुंभार यांना त्यांच्या स्वंयरोजगारातील नवकल्पना आणि हजारो महिलांना प्रशिक्षत केल्याबद्दल त्यांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल आज राष्ट्रपती यांच्या हस्ते वर्ष 2021 च्या नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  

श्रीमती कुंभार यांनी 1998 मध्ये  कमल कुक्कुटपालन आणि एकता सखी प्रोडयूसर कंपनी सुरू केली. ज्या अंतर्गत त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील  दूष्काळग्रस्त  भागातील जवळपास 3000 हजार महिलांना मदत केलेली आहे. श्रीमती कुभांर यांनी  प्रीम‍ियम चिकन प्रजातीसाठी  एक पोल्ट्री ऑपरेशन स्थापित केले आहे.  

यासह एसएसपी योजनेचे स्वच्छ ऊर्जा कार्यक्रमामध्ये ऊर्जा सखीच्या रूपात प्रशिक्षण घेऊन हजारो महिलांही त्यांनी प्रशिक्ष‍ित  केलेले आहे. जवळपास 5000 महिलांना सुक्ष्म उद्योग सुरू करण्यात आतापर्यंत  त्यांनी मदत केलेली आहे.  त्यांना वर्ष 2017 मध्ये नीति आयोगाचा विमेन ट्रांसफॉर्मिंग इंडिया पुरस्काराने सन्मानित करण्यातआलेले आहे.     

 

        0000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     

अंजू निमसरकर /वि.वृ.क्र. 49 /दि.8.०३.२०२२

Monday, 7 March 2022

Maharashtra’s Three WomenTo Be Felicitated With ‘Nari Shakti Puraskar’




 

New Delhi, 7:  The Women and institutions who have made exceptional contribution as the game changers and catalysts of positive change in the society will be felicitated with the prestigious ‘Nari Shakti Puraskar’ on Tuesday, the International Womens’ Day at the hands of the President, Shri RamnathKovind. Three women have been nominated from Maharashtra.

A total of 28 women will be conferred the prestigious ‘Nari Shakti Puraskar’. The felicitation will be held at RashtrapatiBhavan on the 8th of March in a special ceremony. The award ceremony for the year 2020 could not be held in 2021 due to prevalent situation created by COVID-19 pandemic.

A total of 28 Nari Shakti Puraskars (14 each for both years) will be conferred on the individuals in recognition of their exceptional work in rendering distinguished services towards empowerment of women, especially vulnerable and marginalized women, across the country. Three women from Maharashtra include Smt. VanitaBorade, first Woman Snake Rescuer, Smt. SayleeAgavane, and an excellent Kathak Dancer suffering from Down syndrome and Smt. Kamal Kumbhar for her exceptional work as a social entrepreneur.

 ‘Nari Shakti Puraskar’ is an initiative of the Ministry of Women and Child Development to acknowledge the exceptional contribution made by individuals and institutions, to celebrate women as game changers and catalysts of positive change in the society.

The Winners of the Nari Shakti Puraskar for the Year 2020 are from fields as diverse as entrepreneurship, agriculture, innovation, social work, arts and crafts whereas the Winners of the Nari Shakti Puraskar for the Year 2021 include Women from the fields of linguistics, entrepreneurship, agriculture, social work, arts and crafts, disability rights etc.

 


महाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार'

 









राष्ट्रपतींच्या हस्ते होणार मंगळवारी होणार सन्मानित

नवी दिल्ली, 7 दिल्ली : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकरणा-या एकूण 28 महिलांना ‘नारीशक्ती पुरस्कार’ आज जाहीर आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन महिलांचा समावेश आहे. हे पुरस्कार वर्ष 2020 व 2021 साठीचे आहेत.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत आज केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने ‘नारीशक्ती पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये डाऊन सिंड्रोमप्रभावित सायली आगवणे, कथक नृत्यागणा, विनिता बोराडे या पहिल्या महिला सर्पमित्र यांना वर्ष 2020साठी तर वर्ष 2021साठी सामाजिक उद्योजिका  कमल कुंभार यांना जाहीर झाला आहे. उद्या मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्यादिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काचे वितरण करण्यात येणार आहे.

कोव‍िड महासाथीमुळे वर्ष 2020 च्या पुरस्कारांचे वितरण होऊ शकले नाही.  8 मार्च, मंगळवारी रोजी वर्ष 2020 आणि 2021 च्या पुरस्कारांचे वितरण होणार आहेत. या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री तसेच अन्य मंत्री वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.

या कार्यक्रमामध्ये एकूण 28 पुरस्कार (वर्ष 2020 आणि 2021 साठी प्रत्येकी 14) एक पुरस्कार संयुक्तपणे दोन महिलांना देण्यात येणार आहे. समाजातल्या असुरक्षित आणि उपेक्षित महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष सेवा कार्य करणा-या महिलांच्या बहुमोल कार्याची घेतलेली दखल म्हणून 29 महिलांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची पोचपावती म्हणून या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. अनेक महिला समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणतात, या महिला समाजाला दिशादर्शक असे काम करतात. त्यांचा कार्याचा गौरव व्हावा म्हणुन त्यांना नारी शक्ती पुरस्काराने गौरविण्यात येते.

2020 च्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांमध्ये उद्योजकता, कृषी, नवकल्पना उपक्रम, सामाजिक कार्य, कला आणि हस्तकला, एसटीईएमएमआणि वन्यजीव संवर्धन अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महिलांचा समावेश आहे. तसेच 2021च्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्या महिलांमध्ये भाषाशास्त्र, उद्योजकता, कृषी, सामाजिक कार्य, कला आणि हस्तकला, मर्चंट नेव्ही, एसटीईएमएम, शिक्षण आणि साहित्य, दिव्यांग अधिकारासाठी कार्य करणा-या महिला यांचा समावेश आहे.

बार्टीच्या महासंचालकांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट



                  

नवी दिल्ली, ७ :  डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी  आज महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली.

           परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ. का.)अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री.  गजभिये यांचे स्वागत केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्यावतीने प्रकाशित ‘महामुंबईचा विकास’ ही पुस्तिकाही गजभिये यांना भेट स्वरुपात देण्यात आली. माहिती अधिकारी अंजू निमसरकर आणि उपसंपादक रितेश भुयार यावेळी उपस्थित होते. यावेळी  महाराष्ट्र परिचय केंद्र आणि  बार्टीच्या कार्याविषयी अनौपचारिक चर्चा झाली.                 

          यावेळी श्रीमती अरोरा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे प्रका‍शित करण्यात येणारी प्रकाशने, प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय, कार्यालयाच्या सोशल मिडीयाहून देण्यात येणारी माहिती, दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांशी साधण्यात येणारा समन्वयाबाबत माहिती दिली. तसेच, परिचय केंद्राच्यातवीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही दिली. श्री. गजभिये यांनी परिचय केंद्राच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.  

           श्री. गजभिये यांनी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था म्हणून बार्टीद्वारे करण्यात येणाऱ्या वैविद्यपूर्ण कार्याविषयी माहिती दिली. या संस्थेद्वारे चालणारे संशोधन व प्रशिक्षण कार्य, सामाजिक समता विषयक चालणारे  संशोधन कार्य, बार्टीच्यावतीने आयोजित करण्यात येणारे सम्मेलने, व्याख्यान,चर्चासत्र ,परिसंवाद आदिंविषयीही  त्यांनी  माहिती दिली. या संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात येणारी  पुस्तके, नियतकालिके आणि संशोधनात्मक निबंध आदिंबाबतही  त्यांनी  माहिती  दिली.                                

 ‍                                                             00000  

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     

वि.वृ.क्र. ४६ /दि.७.०३.२०२२

 

             

 

 



 

Thursday, 3 March 2022

गुरुवारी महाराष्ट्रातील ८७ विद्यार्थी युक्रेनमधून दिल्लीत दाखल






महाराष्ट्र सदनाद्वारे १२६ विद्यार्थी स्वगृही सुखरूप परतले
नवी दिल्ली ,दि. ३ : गुरुवारी सात विशेष विमानांनी महाराष्ट्रातील ८७ विद्यार्थी युक्रेनमधून दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनाद्वारे गेल्या पाच दिवसात १२६ विद्यार्थ्यांना सुखरूप स्वगृही पाठविण्यात आले आहे.
युध्दजन्य युक्रेनदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारची ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरु आहे. देशातील अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांसह या मोहिमेंतर्गत २७ फेब्रुवारी २०२२च्या मध्यरात्रीपासून ते गुरुवार दुपारपर्यंत विशेष विमानांनी महाराष्ट्रातील २४९ विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले आहेत.
थोडक्यात तपशील

एयर इंडियाच्या विशेष विमानाने २७ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन विशेष विमानांनी महाराष्ट्रातील ५८ विद्यार्थी दाखल झाले .२८ फेब्रुवारीला दोन विशेष विमानांनी १४ तर १ मार्च रोजी तीन विमानांनी २६ विद्यार्थी दाखल झालेत. २ मार्च रोजी ५ विमानांनी ६४ विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले. तर ३ मार्च रोजी सर्वाधिक ७ विमानांनी ८७ विद्यार्थी युक्रेनमधून दिल्लीत दाखल झालेत.

महाराष्ट्र सदनाद्वारे १२६ विद्यार्थी स्वगृही सुखरूप परत
युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे,यासाठी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव समीरकुमार बिस्वास यांच्या नेतृत्वाखाली २६ फेब्रुवारी २०२२ रोजी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला. दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी या कक्षाद्वारे विमानाचे तिकीट काढून देण्यात येत आहेत.

मुंबई येथे सर्वाधिक ७८ विद्यार्थी परतले

या विद्यार्थ्यांना राज्यातील महत्वाच्या विमानतळांद्वारे स्वगृही पोहचविण्यात येत असून आतापर्यंत सर्वाधिक s७८ विद्यार्थी मुंबईला परतले आहेत. पुणे येथे २३, नागपूर येथे १२ तर औरंगाबाद येथे ७ विद्यार्थी परतले आहेत. तीन विद्यार्थी नांदेडमार्गे मुंबई गेलेत तर दोन विद्यार्थी हैद्राबाद व एक विद्यार्थी गोव्याहून महाराष्ट्रात स्वगृही सुखरूप पोहचला आहे.

महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र शासनासोबत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत.

दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनाच्या सहकार्यकक्षाद्वारे विमानतळाहून महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना उपलब्धतेनुसार विमानाद्वारे सुखरुप स्वगृही पोहचविण्यात येत आहे. महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षामध्ये एकूण २५ अधिकारी-कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत.

युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांना आप-आपल्या राज्यात सुखरुप पोहचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
0000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार/ वि.वृ.क्र. 45/ दि.03.03.2022


 

राष्ट्रीय आपत्तीनिधीतून महाराष्ट्राला ३५५ कोटींचा निधी मंजूर

 

नवी दिल्ली ,दि. ३ : महाराष्ट्रात आलेल्या पूर स्थितीच्या नुकसानापोटी केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत राज्याला आज ३५५.३९ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर झाला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीने पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशासाठी पूर आणि भूस्खलनाच्या नुकसानापोटी 1,682.11 कोटी रुपयांची अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर केली.

महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या केंद्रशासीत प्रदेशामध्ये वर्ष2021 मध्ये आलेल्या पूर आणि भूस्खलन या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानापोटी या पाच राज्यांना 1,664.25 कोटी आणि पुद्दुचेरीला 17.86 कोटी रुपयांची अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर केली आहे.

केंद्राकडून आज मंजूर ही अतिरिक्त मदत केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) मध्ये राज्यांसाठी जारी केलेल्या निधीपेक्षा अधिकचा निधी आहे.
0000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार/ वि.वृ.क्र.44 / दि. 3.03.2022