Thursday, 20 April 2023

अपघातमुक्त सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील 6 बस चालकांचा ‘सुरक्षा पुरस्कारा’ने सन्मान

 

 

नवी दिल्ली, 19 : सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये अपघातमुक्त बस चालविणाऱ्या महाराष्ट्रातील 6 बस चालकांचा ‘सुरक्षा पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. देशभरातील एकूण 42  बस चालकांना यावेळी सन्मानित करण्यात आले.  यामध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळातील 2 ,नवी मुंबई महानगर पालिका परिवहनाचे 1,  सोलापूर महानगर पालिका महामंडळाचे 1,  पुणे महानगर पालिका परिवहन महामंडळ मर्यादितचे 1, बेस्ट चे 1 वाहन चालकांचा समावेश आहे.

            येथील कंस्टीट्यूशन क्लबमध्ये मंगळवारी सायंकाळी  ‘असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग्ज (एएसआरटीयू) च्यावतीने ‘हिरोज ऑन द रोड’या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सचिव अलका उपाध्याय यांच्या हस्ते अपघात मुक्त, निर्दोष सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून बस चालकांच्या कुटूंबीयांसोबत ‘सुरक्षा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यामध्ये 17 बस चालकांनी त्यांच्या एकूण सेवेत अपघात न करता 30 वर्षे सेवा दिलेली आहे.

या पुरस्कार विजेत्यांमध्‍ये महाराष्‍ट्रातील एकूण सहा बस  चालकांचा समावेश आहे. महाराष्‍ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन चालकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये किसन रामभाऊ घोडके (36 वर्ष अपघातमुक्त सेवा ) आणि मुल्ला मोहम्मद रफिक अब्दूल सत्तार (29 वर्ष अपघातमुक्त सेवा ) अशी या गुणवंत चालकांची नावे आहेत. तसेच नवी मुंबई महानगरपालिका वाहतूक सेवेतील नंदकुमार लवांड (26 वर्ष अपघातमुक्त सेवा) सोलापूर महानगरपालिका वाहतूक सेवेतील राजेंद्र महादेव आवटे (25 वर्ष अपघातमुक्त सेवा ), पुणे म‍हानगर परिवहन महामंडळातील करूण नारायण कुचेकर (24 वर्ष अपघातमुक्त सेवा ), बेस्ट सेवेतील गिरीजाशंकर लालताप्रसाद पांडे (21 वर्ष अपघातमुक्त सेवा ) यांचा  गौरव करण्‍यात आला.

सध्या, महानगरपालिका अंतर्गत 80 राज्य मार्ग परिवहन उपक्रम  हे एएसआरटीयू चे सदस्य आहेत. जे संयुक्तपणे अंदाजे 1,50,000 बस चालवतात आणि सुमारे 70 दशलक्ष प्रवाशांना परवडणारी आणि सुरक्षित वाहतूक सेवा  प्रदान करतात. एएसआरटीयूच्यावतीने प्रामुख्‍याने सार्वजनिक रस्ते वाहतुकीला प्रोत्साहन देण्‍यासाठी सुधारणा घडवून आणत आहेत. तसेच  नवनवीन  घडामोडींवर चर्चा करण्यासाठी, वाहतूकविषयक प्रमुख समस्या/आव्हाने ओळखण्यासाठी विविध बैठका, परिषदा आणि परिसंवाद/कार्यशाळा यांचे आयोजन करत आहे.  राज्य रस्ते वाहतूक उपक्रमांच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एक मंच म्हणून एएसआरटीयू  कार्यरत आहे. 

रस्ते अपघात कमी करण्यासाठी एसआरटीयूने केलेल्या काही उपाययोजना  चालकांसाठी जाहीर केल्या आहेत.  यामध्ये  भर्तीच्या टप्प्यातच सुशिक्षित आणि अनुभवी चालकाची निवड करणे. निवडलेल्या चालकांना भर्तीच्या वेळीच अद्यावत प्रशिक्षण देणे. वेळोवेळी प्रोत्साहन देण्‍यासाठी वाहनचालकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव  करणे.

---२---

 

 

---२--

 वाहना संदर्भात काही सूचना जाहीर केल्या आहेत. यामध्ये वेळापत्रकानुसार बसची देखभाल करणे तसेच ब्रेक, स्टीयरिंग, हेडलाइट्स, टायर इत्यादी सुरक्षेशी संबंधित तांत्रिक बाबींवर लक्ष केंद्रित करणे. चालकाच्या आसनाचे ‘अर्गोनॉमिक डिझाइन’ असने,  नेहमी वाहनाच्या दुरूस्तीची खात्री करणे.   कार्याचे वेळापत्रक आधी जाहीर करने,  चालकांना योग्य विश्रांतीच्या अंतरासह रोस्टर पद्धतीने काम करवून घेणे. सर्व सुविधांसह कर्मचाऱ्यांसाठी   प्रसाधनगृहांची व्यवस्था असने,  प्रोत्साहनपर   उपाय योजना आखणे,  वर्षातून किमान एकदा सर्व चालकांसाठी अद्यावत  प्रशिक्षण कार्यक्रम सुनिश्चित करणे.  डेपो, प्रदेश, विभाग आणि राज्य स्तरावर अपघातमुक्त सेवा चालकांना रोख पुरस्कार आणि प्रमाणपत्र देण्याचे उपक्रम  राबविणे.

लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सकारात्मक कामांचा ‘नागरी सेवा दिनी’ प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान

 


नवी दिल्ली, 20 : लोक प्रशासनातील सर्वोत्कृष्ट कार्यासाठी  राज्यातील लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांना शुक्रवार ला ‘नागरी  सेवा दिनी’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल.

 

दरवर्षी 21 एप्रिल हा दिवस ‘नागरी सेवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. आज विज्ञान भवनात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते 16  व्या नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. उद्या शुक्रवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान केला जाईल. यामध्ये राज्यातील लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांचा  समावेश आहे. 

 

लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या पुढाकाराने  आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ‘आरोग्यवर्धिनी’  प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत लातुर जिल्ह्यात  विविध सेवा दिल्या जातात. आरोग्यदायी जीवनशैलीच्या मार्गदर्शनापासून ते विविध आजारांचे निदान, उपाचार संदर्भ सेवा इत्यादींचा त्यामध्ये समावेश आहे.  या सर्व सेवांची व्याप्ती आणि गुणवत्तेच्या निकषावर लातूर जिल्ह्याची प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार जिल्हाध‍िकारी पृथ्वीराज बी. पी  हे  प्रधानमंत्री यांच्या हस्ते स्वीकारतील. 

 

       सोलापूर जिल्ह्याच्या तत्काल‍ीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात ‘ऑपरेशन परिर्वतन’ वर्ष 2021-22 मध्ये राबविण्यात आले होते.  सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने जिल्ह्यामध्ये अवैध दारू व्यवसायास आळा घालण्याकरीता  व त्याचे समूळ उच्चाटनासाठी   नावीन्यपूर्ण पद्धतीचा उपक्रम राबविला होता. त्यांच्या या उपक्रमास पोल‍ीस यंत्रणेचे सहकार्य आणि स्थानिकांची साथ यामुळे त्यांचे आयुष्य पालटले. त्यांच्या या कार्याची दखल घेत उद्या प्रधानमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाईल.  हा पुरस्कार सोलापूरचे सध्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे स्वीकारणार आहेत.  

 

राज्याला एकूण 6 वेळा ‘नागरी सेवा दिनी’ गौरविण्यात आले

यापुर्वी 2011 ला राज्यातील नवी मुंबई महानगर पालिकेच्या ई.टी.सी.  दिव्यांग शिक्षण व प्रशिक्षण  उप‍क्रमाला पुरस्कार मिळालेला आहे. याचवर्षी सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगर पंचायतीला चोवीस तास व्यक्तिगत मीटरव्दारे पाणी पुरविण्याच्या योजनेलाही पुरस्कार देऊन सन्मानित केले.  त्यांनतर 2015 ला गडचिरोली जिल्ह्यातील ‘जिल्हा कौशल्य विकास’ या उपक्रमास राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे. याच वर्षी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या  ‘पीक व कीटक देखरेख आणि सल्लागार प्रकल्पास’ (CROPSAP) संस्थात्मक श्रेणीतून पुरस्कृत करण्यात आले होते. वर्ष 2017 व 2018 मध्ये  प्रधानमंत्री ‘पीक व‍िमा योजने’ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अनुक्रमे जालना आणि बीड जिल्ह्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 

 

मुळ  महराष्ट्रातील मात्र अन्य राज्यातील कॅडर मिळालेले प्रशासकीय अधिकारी किरण गित्ते, अजित जोशी  यांना ही त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कांमासाठी ‘नागरी सेवा दिनी’ प्रधानमंत्री यांच्या हस्ते गौरविण्यात आलेले आहे. 

 

00000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अंजु निमसरकर /वि.वृ.क्र. 72 /दि.२०.४.२३

Tuesday, 18 April 2023

विदर्भ आणि मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मिळणार गती - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील




नवी दिल्ली दि. 18 : विदर्भ आणि मराठवाडा विभागाच्या दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या  प्रकल्पांना गती मिळणार असल्याची माहिती, राज्याचे महसुल, दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे सांगितले.

 

दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या  प्रकल्पांच्याअंमलबजावणी संदर्भात तसेच पशुसंवर्धन विषयाशी निगडीत आज महत्वपूर्ण बैठक झाली याबैठकीस केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग  मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थित त्यांच्या शासकीय निवास बैठकीचे आयोजन करण्यात आले. याबैठकीस केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव‍िकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री पुरूषोत्तम रूपाला  यांच्यासह केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            बैठकीनंतर श्री विखे पाटील यांनी सांगितले, दुग्ध विकास आणि पशु संवर्धन संदर्भात पहिला टप्पा पुर्ण झालेला असून दुसऱ्‍ या टप्प्याची सुरूवात करण्यासंदर्भात आज महत्वाची बैठक झाली. यामध्ये  येणाऱ्या अडचणी केंद्र शासनासमोर  मांडण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाने सर्वोतोपरी मदत करू असे सकारात्मक आश्वासन दिले असून दुसऱ्या टप्प्याचे काम मिशन मोडवर करण्यात येईल, अशी माहिती श्री विखे पाटील दिली.

            श्री विखे पाटील म्हणाले,  विदर्भ आणि मराठवाडा विभागात दुग्धविकास प्रकल्पालाच्या प्रथम टप्प्यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश होता, आता यामध्ये गडचिरोली या जिल्ह्याचाही समावेश करण्यात आलेला आहे. मराठवाडयातील धाराशिव, लातूर, नांदेड, जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रथम टप्प्याच्या सुरूवातीला शेतकऱ्यांकडून प्रतिदिन  170 लीटर दुध मदर डेयरी घेत असे आता प्रतिदिन 3 लाख लीटरपर्यंत क्षमतेत वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. 

            दुसऱ्या टप्प्यात 11 हजार जनावरांचे वाटप करण्यात येणार  असून  20 हजार मेट्रीक टन प्रजनन क्षम पशु खाद्य देण्यात येणार असल्याचेही श्री विखे पाटील यांनी सांगितले.  यासह 12 हजार एकर क्षेत्रात पशु खाद्याची लागवड करण्यात येणार आहे. सोबतच 10 हजार कडबा कुट्टी यंत्र लावण्यात येतील. 1 लाख 62 हजार वांझ जनावरांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तर,  10 लाख कृत्रिम रेतन करण्यात येईल अशी माहिती ही त्यांनी दिली. राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाकडून  11 हजार बायोगॅस चे युनिट वाटप केले जाईल. प्रत्येका जिल्ह्यात मोबाईल वेटनरी युनिट सुरू करण्यात येणार असल्याचे   माहिती श्री विखे पाटील सांगितले.

00000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अंजु निमसरकर /वि.वृ.क्र. 70 /दि.18.4.23                              

 

राज्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न : कृषी मंत्री अब्दुल सत्तार

 



नवी दिल्ली, दि. 18 : मक्याच्या लागवडीपासून ते विक्रीपर्यंतची प्रक्रिया सुदृढ झाल्यास मका उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होईल आणि ते सक्षम होतील. यासाठी राज्यशासन कटिबद्ध असून याविषयाशी निगडीत उद्योजक साखळीला सर्वोतोपरी मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे, असे  प्रतिपादन, राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे केले. 

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फ‍िकी) च्या पुढाकाराने आणि येस बँकेच्या सहकार्याने ‘मका समिट 2023’ चे आयोजन मंडी हाऊस येथील फिकीच्या सभागृहात करण्यात आले. त्यावेळी मंत्री. श्री. सत्तार बोलत होते. या सत्रात राज्याचे कृषी मंत्री श्री सत्तार, केंद्रीय कृषी विभागाचे सचिव मनोज अहूजा, फिकीचे टी. आर. केशवन यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

 मंत्री श्री सत्तार पुढे म्हणाले, महाराष्ट्रात साडेआठ लाख हेक्टर जमीनीवर मक्याची लागवड केली जाते. वर्षाला 24 लाख टनाचे  उत्पादन होत आहे. मात्र, मका या पीकाकडे आतापर्यंत पाहिजे तसे लक्ष दिले जात नव्हते. मका हे अतिशय महत्वाचे भरडधान्य असून ते शरीरास पोषकही आहे.  सध्या  मिलेट्स वर्ष असल्यामुळे मका या भरड धान्याला अधिक महत्व प्राप्त होत आहे.

 श्री सत्तार पुढे म्हणाले, मका उत्पादनपासून  ते विक्रीपर्यंतची संपूर्ण प्रक्रीया सुदृढ करणे  गरजेचे आहे. यामध्ये भाग भांडवलदार (स्टेक होल्डर), साठवणुक करणारे, स्टार्ट अप, दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या साखळीला मजबुत करणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित (MAIDCL) च्या वतीने दिल्या जाणाऱ्या सवलतींची माहिती त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र राज्य  यासंदर्भात आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवेल, असे ठोस आश्वासन श्री सत्तार यांनी दिले. बैठकीनंतर राज्यात येऊ इच्छिणाऱ्या विविध उद्योजक, भागभांडवलदार नवउद्योजकांशी मका पिकाशी निगडीत विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.  

थेट रासायनिक  फवारणी मुळे आजार होण्याची शक्यता बळावत असल्याने ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यात यावी. याकरीता  ड्रोन खरेदीसाठी केंद्राकडून अनुदान मिळावे, याबाबत केंद्रीय कृषी सचिव मनोज अहूजा यांच्याशी चर्चा केली असल्याची, माहितीही श्री सत्तार यांनी यावेळी दिली.

Monday, 17 April 2023

महाराष्ट्राचा 5 राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान


प्रथम क्रमांकाचे तीन तर व्दितीय व तृतीय क्रमांकाचा प्रत्येकी एक पुरस्कार   

नवी दिल्ली, दि. 17 : ग्रामपंचायतींमध्ये सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील 5 ग्रामपंचायतींना   राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी,  कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकाचा  पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला व्दितीय क्रमांकाच्या  आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अलाबाद या ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाच्या पुरस्काने  केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

            येथील विज्ञान भवनात केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज विभागाच्यावतीने 17 ते 21 एप्रिलपर्यंत ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत आज राष्ट्रीय पंचायत पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास राष्ट्रपती श्रीमती मुर्मू , केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री गिरिराज सिंह, केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कप‍िल पाटील, विभागाचे सचिव सुनील कुमार व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी काही प्रमुख पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले तर, काही पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

           

            संयुक्त राष्ट्राने ठरविलेल्या विविध 9  श्रेणीतील सतत विकासाच्या मानकांनुसार  द्रारिद्रयमुक्त आणि सुधारित उपजीवीका श्रेणीत सर्वोत्कृष्ट कार्य करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील तालुका पलुस येथील खंडोबाचीवाडी  आणि स्वच्छ आणि हरित पंचायत म्हणुन कुंडल  या ग्राम पंचायतींना राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यासह दोन्ही ग्रामपंचायतींच्या बँक खात्यात थेट प्रत्येकी एक कोटी रूपयांची रकम जमा करण्यात आली. खंडोबाचीवाडीचे  सरपंच धंनजय गायकवाड, उपसरपंच उत्तम जाधव, ग्रामसेवक स्वप्नगंधा बाबर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या छोट्याशा गावाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी २८ बचत गटांची निर्मीत केली. या माध्यमातून गावातील महिलांना २८ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले. या रक्कमेतुन महिलांनी कापड दुकान, शिलाई व्यवसाय, किराणा व्यवसाय, मिरची कांडप, ब्युटी पार्लर, कुक्कुटपालन, पशुपालन व दुग्धव्यवसाय, शेळीपालन असे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १४ घरकुलांना मंजुर मिळाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत गावातील ३४९ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनेंतर्गत गावातील २२ दिव्यांग व महिलांना संजय गांधी निराधार पेन्शन योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ दिला जात आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत अन्नसुरक्षा योजनेचा ३६७ लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत ४०३ लाभार्थींचे खाती उघडण्यात आली  असून  विविध शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळवुन दिल्याबद्दल ग्रामपंचायत खंडोबाचीवाडी देशात अव्वल ठरली आहे.

            स्वच्छ आणि हरित पंचायत या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कुंडल ग्राम पंचायतीला गौरविण्यात आले. पुरस्कार सरपंच दगडू खाडे, गट विकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, ग्रामसेवक महादेव यल्लाटे यांनी स्वीकारला. गावामध्ये ५ लाख लिटर प्रतिदिन क्षमतेचा वेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्लॅन्ट आहे. ३५ सोलर स्ट्रिटलाईट आहेत व सर्व रस्त्यांवर आणि संपुर्ण गावातील घरांमध्ये एलईडी बल्ब आहेत. गाव संपुर्ण हगणदारी मुक्त आहे. पर्यावरण पुरक घनकचरा व सांडपाणी प्रकल्प गावामध्ये उभारण्यात आला आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळ्या २०० डस्टबिनद्वारे गोळा केला जातो. गावात १५०० एकर  जैविक पद्धतीने शेती करण्यात येते. त्यांच्या या कार्याची दखल केंद्रीय स्तरावर घेण्यात आली.  

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतीला ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार आज राष्ट्रपती यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार सरपंच संतोष टिकेकर, गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी,  ग्रामसेवक अस्लम हूसेन शेख यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या ग्राम पंचायतीने सोलर पॅनल, पवनचक्की, बॉयोगॅसच्या माध्यमातून 15 हजार वॅट विद्युत निर्मित केली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी आज ग्रामपंचायतीचा गौरव झाला.


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला कार्बन न्युट्रल विशेष पंचायतीचा  व्द‍ितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सरपंच  जयश्री द‍िवेकर, उपसरपंच कपिंद्र पेरे, जिल्हा परिषद अधिकारी विकास मिना, उपमुख्य अधिकारी शिवराज केंद्र,   ग्रामसेवक पुंडलिक पाटील यांनी स्वीकारला. कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी या ग्रामपंचायतीने नावीण्यपूर्ण योजना राबविल्या आहेत. या गावाने रस्त्यांच्या दोन्ही कडेला फळ भाज्यांची झाडे लावली आहेत. प्रदूषण मुक्त गाव होण्याचा मान या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे. व्यासपीठावरून केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री  कप‍िल पाटील यांनी या गावाच्या कामाचा उल्लेख आपल्या भाषणात केला.


कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामधील अलाबाद या ग्रामपंचायतीला महिला अनुकूल पंचायत या श्रेणीतील  तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने  गौरविण्यात आले. पुरस्कार सरपंच लता कांबळे, ग्रामसेवक अनिकेष पाटील यांनी स्वीकारला. आलाबादची लोकसंख्या १८८३ असून महिलांची संख्या ८४८ असून ती ५०%  पेक्षा जास्त आहे. ग्रामपंचायत आलाबादने  महिला सक्षमीकरण आणि बाल विकासावर काम केले. शाळाबाह्य मुली, कमी वजनाच्या मुली आणि अशक्त मुली आणि महिला यावर ग्रामपंचायतने विशेष भर दिला. महिला सभेच्या वेळी ग्रामपंचायत महिलांना एकत्र करण्यासाठी छोट्या कार्यक्रमांचे आयोजन करीत असते.  ग्रामपंचायतींमध्ये लसीकरण मोहिमेसाठी किंवा आरोग्य तपासणीसाठी महिलांना एकत्र करने अवघड होते. अशावेळी आशा सेविका, एएनएम, अंगवाडी सेविका यांच्या मदतीने महिलांना त्यांच्या घरी लसीकरण करून त्यांना योग्य उपचार दिले जाते. किशोरवयीन मुलींना लैंगिक शिक्षण  दिले जाते,आणि त्यांच्या शिक्षकांच्या मदतीने प्राथमिक शाळा आणि हायस्कूलमध्ये जनजागृती केली जाते.

ग्रामपंचायत आलाबाद, गावाला महिला-स्नेही पंचायत बनवणे. यासाठी महिला आणि मुलींच्या प्रत्येक कामाची काळजी घेण्यासाठी ग्रामपंचायतीने समित्या स्थापन केल्या आहेत. आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि प्रेरिका ताई नोंदी घेत असतात आणि गरोदर/स्तनपान करणाऱ्या, मुलगी आणि सर्व महिलांच्या समस्या सोडवण्याचा नेहमी प्रयत्न करतात. या कामाची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावर आज अलाबाद ग्रामपंचायतीला सन्मानित करण्यात आले.

0000

 

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अंजु निमसरकर वि.वृ.क्र.68/दि.17.04.2023