Tuesday, 25 September 2018

जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्र भागीदार राज्य



नवी दिल्ली,  25 : 2 ते  5 ऑक्टोबर 2018 दरम्यान होणा-या जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्र भागीदार राज्य असणार आहे.
            राष्ट्रीय मिडीया केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय ऊर्जा मंत्री (स्वतंत्र प्रभार) आर. के. सिंह यांनी ही माहिती दिली. आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विज्ञान भवनात 2 ऑक्टोबरला सांयकाळी 6.30 ला होणार असून पुढील कार्यक्रम हा इंडिया एक्स्पो मार्ट, ग्रेटर नोएडा येथे होणार आहे.
            2 ते 5 ऑक्टोबर दरम्यान होणा-या जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूक परिषदेमध्ये ‘आंतराराष्ट्रीय सौर आघाडी’ ची पहिली बैठक, इंडियन ओशन रिम असोसिऐशनची (आयओआरए)  नवीनीकरण ऊर्जा मंत्रालयीन’ बैठक ‘जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूक परिषद’ आणि प्रदर्शन (रिइन्वेस्ट-2018) कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. या जागतिक परिषदेत जगातील 50 पेक्षा अधिक  राष्ट्र सहभागी होणार असल्याची माहिती  केंद्रीय मंत्री सिंह यांनी दिली.
आंतराराष्ट्रीय परिषदेत भागीदार राज्य म्हणून महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्रालय सहभागी होणार आहे. महाराष्ट्र सोबतच कर्नाटक, गुजरात तसेच अन्य काही राज्यही सहभागी होणार आहेत.
            ग्रेटर नोएडा येथे होणा-या रि-इन्वेस्ट परिषदेच्या ठिकाणी प्रदर्शन असणार आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाच्यावतीने 3 हजार चौरस वर्ग फुटाचे दालन उभारण्यात येणार आहे. या दालनामध्ये महाराष्ट्राने अक्षय ऊर्जा, सौर ऊर्जा क्षेत्रात केलेली यशस्वी कामगिरी येथे मांडण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) चे नोडल अधिकारी महेश आवाड यांनी दिली.
            राज्य सरकारने 31 मार्च 2018 पर्यंत 8343 मेगावॅटची सौर क्षमता स्थापित केलेली आहे याची माहिती देणारा लघूपट, संगणकीकृत सादरीकरण येथे मांडण्यात येणार आहे. यासोबत राज्यामध्ये ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’, ‘मुख्यमंत्री सौर पेयजल योजने’मध्ये केलेली कामगिरीही या ठिाकणी दर्शविण्यात येणार असल्याचेही श्री आवाड यांनी माहिती दिली.
            सौर व अक्षय ऊर्जेच्या दूस-या जागतीक ऊर्जा परिषदेचा उद्देश ऊर्जेची क्षमता वाढविण्यासाठी वैश्विक पातळीवर  प्रयत्न करणे, वैश्विक गुंतवणूक समुहाला जोडणे हा आहे. आयोजित 3 दिवसीय  रि-इन्वेस्ट परिषदेत क्लीनटेक, भविष्यात वापरात येणारे ऊर्जेची पर्यायी व्यवस्था, अक्षय ऊर्जा निर्माता, विकासक, गुंतवणुकदार, या क्षेत्रात अभिनव कल्पना मांडणारे व्यक्ती,  या क्षेत्रात यशस्वी व्यक्तींना आमंत्रित करून चर्चा केली जाणार आहे. या रि-इन्वेस्ट परिषदेत 600 पेक्षा अधिक दिग्गज उद्योजक आणि 10, हजार प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता असल्याची माहिती श्री सिंह यांनी दिली.

राजधानीत पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी














         
नवी दिल्ली दि. 25 :  पंडित दीनदयाल उपाध्याय यांची  जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.    
            कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त (अ.का.) समीर सहाय यांनी  पंडित  दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.    
          महाराष्ट्र परिचय केंद्रात पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

 महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यालयात उपस्थित अधिकारी- कर्मचा-यांनी यावेळी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
000000

    रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 352/  दिनांक २५.०९.२०१८ 
           

Friday, 21 September 2018

नेमबाज राही सरनोबत आणि क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना अर्जुन पुरस्कार

 



राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा  
             रुस्तम- ए-हिंद दादू दत्तात्रय चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार                               
नवी दिल्ली, 21 :  क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणा-या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली . महाराष्ट्र कन्या नेमबाज राही सरनोबत आणि क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना अर्जुन पुरस्कार तर रुस्तम- ए- हिंद दादू दत्तात्रय चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार  जाहीर झाला आहे.
            केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०१८ ची घोषणा करण्यात आली. मानाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारोत्तोलक एस.मीराबाई चानू आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांची निवड करण्यात आली आहे. एकूण ६ श्रेणींमध्ये ३५ खेळाडू व प्रशिक्षक आणि ३ संस्थाना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंगळवार दिनांक २५ सप्टेंबर २०१८ रोजी राष्ट्रपती भवनात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
                                रूस्तम -ए- हिंद  दादू दत्तात्रय चौगुले यांच्या विषयी
            मुळचे अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथील दादू चौगुले हे कुस्तीनिमित्त वयाच्या सातव्या वर्षी कोल्हापुरातील मोतीबाग तालीममध्ये दाखल झाले. हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले. न्यूझीलंड येथे १९७४ मध्ये ख्राईस्टचर्च येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी रौप्यपदकाची कमाई केली. दादू चौगुले यांनी १९७० मध्ये पुणे येथे व १९७१ साली आलिबाग येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत  ‘महाराष्ट्र केसरी’ हा किताब पटकावला.
दादू चौगुले यांनी ३ मार्च १९७३ ला मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुपर हेवी गटात ‘रुस्तम-ए-हिंद’ हा मानाचा किताब पटकावला. त्यानंतर ३ एप्रिल १९७३ ला नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत सुपर हेवी गटात ‘महान भारत केसरी’ हा किताब पटकावला.  
सुवर्णकन्या राही सरनोबत  
                     कोल्हापुरात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यर राही सरनोबत या नेमबाजीमधील २५ मीटर ०.२२ स्पोर्टस पिस्तल प्रकारातील आघाडीच्या नेमबाज आहेत. नुकतेच जाकार्ता (इंडोनेशिया) येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत त्यांनी भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले
 त्यांनी २००८ साली झालेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्णपदक पटकाविले. त्यानंतर तिने २०१० साली नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. २०११ साली आशियाई स्पर्धेत त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. याच काळात ग्लासगो येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकाविले. अशी कामगिरी करणा-या त्या पहिल्या भारतीय महिला  ठरल्या. ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक, तर इचिऑनमध्ये २०१४ साली झालेल्या आशियाई स्पर्धेत याच प्रकारात तिने कांस्यपदक पटकावले.
क्रिकेटपटू स्मृती मानधना 
              मुंबईत जन्मलेल्या स्मृती मानधनाचे बालपण सांगलीत गेले. वयाच्या ९ व्या वर्षीच महाराष्ट्राच्या १५ वर्षांखालील क्रिकेट संघात त्यांची निवड झाली. वयाच्या ११ व्या वर्षी  महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघात वर्णी लागली होती. १९ वर्षांखालील संघातून खेळताना त्यांनी गुजरातविरुद्ध नाबाद २२४ धावांची खेळी केली होती. अशी कामगिरी करणा-या त्या पहिली महिला खेळाडू ठरल्या. १० एप्रिल २०१३ ला त्यांनी एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. त्यांनी ४४ एकदिवसीय सामन्यात १६०० धावा केल्या आहेत. प्रसंगी ऑफ ब्रेक गोलंदाजी करणाऱ्या मानधना यांनी भारतीय संघात सलामीच्या फलंदाज म्हणून आपला ठसा उमटविला आहे.
                                               असे आहे पुरस्कारांचे स्वरूप
            साडे सात लाख रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र असे राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे स्वरुप आहे. अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जातील. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार विजेत्यांना चषक आणि प्रमाणपत्र दिले जाईल. आंतर विद्यापीठ स्पर्धेत अव्वल कामगिरी करणाऱ्या गुरुनानकदेव  विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आजाद चषक, १० लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहेत.  
   राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०१८ साठी निवड झालेल्या खेळाडू व संस्थांची नावे खालील प्रमाणे आहेत.             
  1. राजीव गांधी खेलरत्न-2018
·         एस. मीराबाई चानू- भारोत्तोलन
·         विराट कोहली- क्रिकेट
  1. द्रोणाचार्य पुरस्कार– 2018
·         सुभेदार चेनंदा अच्चय्या कुटप्पा– मुष्टियुद्ध
·         विजय शर्मा– भारोत्तोलन
·         ए. श्रीनिवास राव- टेबल टेनिस
·         सुखदेव सिंग पन्नू- धावपटू
·         क्लॅरेन्स लोगो- हॉकी (जीवनगौरव)
·         तारक सिन्हा- क्रिकेट (जीवनगौरव)
·         जीवन कुमार शर्मा- ज्युडो ( जीवनगौरव)
·         व्ही.आर.बीडू- धावपटू (जीवनगौरव)
  1. अर्जुन पुरस्कार- 2018
·         नीरज चोप्रा-धावपटू
·         नायब सुभेदार जीनसन जॉनसन-धावपटू
·         हीमा दास- धावपटू
·         नेलाकुरथी सिक्की रेड्डी- बॅडमिंटन
·         सुभेदार सतीश कुमार- मुष्टियुद्ध
·         स्मृती मानधना- क्रिकेट
·         शुभंकर शर्मा- गोल्फ
·         मनप्रित सिंग-हॉकी
·         सविता-हॉकी
·         कर्नल रवी राठोड- पोलो
·         राही सरनोबत- नेमबाजी
·         अंकुर मित्तल- नेमबाजी
·         श्रेयसी सिंग- नेमबाजी
·         मनिका बत्रा- टेबल टेनिस
·         जी. साथियन- टेबल टेनिस
·         रोहन बोपन्ना- टेनिस
·         सुमित- कुस्ती
·         पुजा कडियन- वुशू
·         अंकूर धामा- पॅरा ॲथलिटिक्स
·         मनोज सरकार- पॅरा बॅडमिंटन
  1. ध्यानचंद पुरस्कार- 2018
·         सत्यदेव प्रसाद- तिरंदाजी
·         भारत कुमार छेत्री- हॉकी
·         बॉबी अलॉयसियस- धावपटू
·         चौगले दादू दत्तात्रय- कुस्ती
  1. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार- 2018
·         उदयोन्मुख आणि युवा प्रतिभेची निवड आणि प्रोत्साहन- राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड
·         कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून खेळांना प्रोत्साहन- जेएसडब्ल्यू स्पोर्टस्
·         विकासासाठी खेळ- इशा आउटरीच
  1. मौलाना अबुल कलाम आजाद चषक 2017-18
·         गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसर

                  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
0000
रितेश भुयार,/ वृत्त वि. क्र.३५१ / दिनांक  २१.०९.२०१८  



Wednesday, 19 September 2018

इंदूर – बुधनी नव्या रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी



या रेल्वे मार्गामुळे इंदूर ते मुंबई प्रवास वेळ कमी होणार
नवी दिल्ली , 19 : इंदोर (मांगलियागांव) – बुधनी या 205.5 किलो मिटर रेल्वे मार्गाला आज केंद्रीय मंत्री मंडळाने मान्यता दिली. या रेल्वे मार्गामुळे इंदूर ते मुंबई प्रवास वेळ कमी होणार आहे.
            आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत इंदूर (मांगलियागांव) ते बुधनी या भागातील  205.5 किलो मिटर रेल्वे मार्गाला पूर्ण विद्युतीकरणासह मान्यता मिळाली आहे. या रेल्वे प्रकल्पासाठी अंदाजित खर्च 3261.82 कोटी रूपये आहे.
या रेल्वे मार्गाचा उद्देश प्रोदशिक असमतोल दूर करणे आणि मागास भागाचा विकास करणे हा आहे. यामुळे या रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात आली. या  प्रकल्पामुळे जबलपूर ते इंदूर रेल्वे मार्गाचे अंतर 68 किलो मिटरने कमी होईल. इंदूर ते मुंबई आणि दक्षिण भारताकडील रेल्वे प्रवासाच्या यामुळे वेळेत बचत होणार आहे. सध्या या मार्गावरील प्रवास हा भोपाळ रेल्वे मार्गावरून होत असतो. नवीन प्रस्तावित  रेल्वे मार्ग बनल्यामुळे या भागात औद्योगिक वसाहत निर्माण होण्यास मदत होईल.
            प्रस्तावित रेल्वे मार्गाचे काम बुधनी रेल्वे यार्डपासून सुरू होईल. हे काम पुढे पश्चिम रेल्वे मार्गावरील इंदोर जवळील मांगलियागांवपर्यत असेल. या मार्गावर 10 नवीन रेल्वे स्थानकेही उभाण्यात येणार आहेत. यापैकी 7 स्थानकावर रेल्वे थांबणार आहे. या नवीन मार्गामुळे सिहोर, देवास आणि इंदूर जिल्ह्याला लाभ होईल. बुधनी ते इंदूर दरम्यान थेट संपर्क स्थापित होईल.

Tuesday, 18 September 2018

महाराष्ट्रातील 3 शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार



लातूर जिल्ह्याचा विशेष सन्मान
नवी दिल्ली , 18 : महाराष्ट्रातील लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील 3 शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ या राष्ट्रीय पुरस्काराने केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्य हस्ते आज गौरविण्यात आले, तर लातूर जिल्ह्याचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
            येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाच्यावतीने ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी  केंद्रीय पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर, केंद्रीय शालेय शिक्षण  विभागाच्या सचिव रिना रे, सहसचिव मनिष गर्ग, सीबीएससीच्या अध्यक्ष अनिता करवाल उपस्थित होते.
            याप्रसंगी देशभरातील एकूण 52 शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापैकी 37 शाळा या ग्रामीण भागातील तर 15 शाळा शहरी भागातील आहेत.  एकूण 52 पैकी  45 शाळा या शासकीय अथवा शासकीय अनुदान प्राप्त आहेत. 7 शाळा खाजगी आहेत. आज प्रदान झालेल्या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, 50 हजार रूपये रोख असे आहे. 50 हजार रूपये शाळांच्या खात्यात डिजीटल सेवेतंर्गत जमा करण्यात आलेले आहेत.
लातूर जिल्ह्याला 3 पुरस्कार
            महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विभागातर्फे चालविण्यात येणा-या लातूर जिल्ह्यातील दोन शाळांना आज सन्मानित करण्यात आले. यामध्ये निलंगा तालुक्यातील जाऊ येथील मुलींची शासकीय निवासी शाळेस स्वच्छतेचे सर्व मापदंड पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त मिलींद शंभरकर, शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय  मुख्यम आणि विद्यार्थ्यीं यांनी  पुरस्कार स्वीकारला.
            लातूर जिल्ह्यातीलच रेणापूर तालुक्यामधील बाऊची येथील  मुलींची शासकीय निवासी शाळेला स्वच्छतेचे निकष पूर्ण केल्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सामाजिक न्याय आयुक्त, शाळेचे मुख्याध्यापक श्री जमादार आणि विद्यार्थी यांनी स्वीकारला.

            लातूर जिल्ह्यातील दोन शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे या जिल्ह्याला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, सामाजिक न्याय विभागाचे  जिल्हा प्रमुख श्री बाबासाहेब आरवत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. देशभरातील केवळ 9 जिल्ह्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हिंगोलीतील गोटेवाडीच्या आश्रम शाळेला पुरस्कार
हिंगोली जिल्ह्यातील गोटीवाडी येथील ‘पोस्ट बेसिक आश्रम शाळे’ला स्वच्छतेच्या सर्व कसोटया पुर्ण केल्याबद्दल ‘स्वच्छ विद्यालय’ या  राष्ट्रीय पुरस्काराने गौरिवण्यात आले. पुरस्कार आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक डॉ. विशाल राठोड, मुख्याध्यापक साहेबराव आवचर आणि विद्यार्थी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.


Monday, 17 September 2018

केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयातर्फे महाराष्ट्रात 325 ‘चाचणी सराव केंद्र’



नवी दिल्ली , 17 : विद्यार्थ्यांना विविध प्रवेश परीक्षांचा सराव ऑनलाईन व्हावा, यासाठी  केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाच्यातर्फे देशभरात 3400 ‘चाचणी सराव केंद्र’ सुरू करण्यात आलेली आहेत. त्यापैकी,  महाराष्ट्रात 325 ‘चाचणी सराव केंद्रे आहेत.
केंद्रीय  मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी दिल्ली येथून  देशभरात सुरू करण्यात आलेल्या चाचणी सराव केंद्राचे उद्घाटन गुगल हँगआऊटच्याव्दारे केले.  622 जिल्ह्यांमध्ये एकूण 3400 चाचणी केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. यापैकी महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांमध्ये 325 चाचणी सराव केंद्र राहतील. या सराव केंद्राचा लाभ  689 केंद्रीय विद्यालय, 403 जवाहर नवोदय विद्यालयांही होणार आहे.
केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाअंतर्गत येणा-या नॅशनल टेस्टींग एजन्सी (एनटीए) च्या माध्यातून  चाचणी सराव केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. एनटीएकडून प्रॉकट्सि ॲप ही तयार करण्यात आलेला आहे. विद्यार्थी याचाही उपयोग करू शकतील.
उच्च शिक्षणासाठी विविध प्रवेश परीक्षा ऑनलाईन घेतल्या जातात. यासाठी  विद्यार्थ्यांचा सराव व्हावा, म्हणून  चाचणी सराव केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. या केंद्राच्या माध्यमाने सर्वच स्तरातील विद्यार्थी प्रवेश परीक्षेपूर्वी वारंवार सराव करून तयार होतील. यामध्ये पुर्ण पारदर्शकता पाळली जाईल.  
‘चाचणी सराव केंद्र’ दर शनिवारी आणि रविवारी सुरू राहतील.  दर शनिवारी या केंद्राची वेळ 02:30 ते 5:30 अशी असणार आहे.  तर दर रविवारी दोन शिफ्टमध्ये  11:00  ते 02:00  आणि 02:30 ते 05.30 या वेळेत सुरू राहतील. एका वेळी केंद्रात किमान 30 संगणक किंवा लॅपटॉप इंटरनेट कनेक्शनसह उपलब्ध राहतील. एसएमएसव्दारे विद्यार्थी आपले नाव नोंदवून  सराव केंद्राचा लाभ घेऊ शकतील.

महाराष्ट्रातील औद्योगिक संस्थांना 10 ‘राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार’ प्रदान





 
 
नवी दिल्ली , 17 : औद्योगिक सुरक्षा, उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करणा-या महाराष्ट्रातील औद्योगिक संस्थांना 10 ‘राष्ट्रीय सुरक्षा पुरस्काराने’ केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोष गंगावार यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
            येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्यावतीने आज विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधत वर्ष २०१६ चे‘विश्वकर्मा राष्ट्रीय पुरस्कार’ आणि ‘राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सचिव हरीलाल सावरिया, सहसचिव अनुराधा प्रसाद तसेच वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी विविध श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील औद्योगिक संस्थांना एकूण 10 राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
         2.5 लाख श्रम तासांपेक्षा अधिक व 5 लाख श्रम तासांपर्यत काम करणा-या औद्योगिक कंपनीच्या श्रेणीमध्ये पुणे येथील सनसवाडी भागातील कुपर स्टँडर्डऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमीटेड ही कंपनी विजेती ठरली तर श्रेणीमध्ये ठाणे जिल्हयातील भिवंडी येथील गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरींग कंपनी लिमीटेड ही कपंनीही विजेती ठरली असून आज या संस्थांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
          अपघात मुक्त वर्षाच्या आधारावर 2.5 लाख श्रम तासांपेक्षा अधिक व 5 लाख श्रम तासांपर्यत काम करणा-या श्रेणीमध्ये रायगड जिल्हयातील तळोजाएमआयडीसी भागातील एसकेएम स्टील्स लिमिटेड विजेती कंपनी ठरली आहे या कपंनीस आज पुरस्काराने गौरविण्यातआले.
          अपघात मुक्त वर्षाच्या आधारावर 1 लाख श्रम तासांपेक्षा अधिक व 2.5 लाख श्रम तासांपर्यत काम करणा-या कंपनीच्या श्रेणीमध्येही पुणे येथील सनसवाडीभागातील कुपर स्टँडर्ड ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमीटेड विजेती ठरली आहे याच श्रेणीमध्ये ठाणे जिल्ह्यातील भिंवडी येथील गोदरेज एण्ड बॉयस मैन्यू कपंनी विजेती ठरली आहे. या कपंनीना आज राष्ट्रीय सुरक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
          50 हजार श्रमतांसापेक्षा अधिक व 1 लाख श्रम तासांपर्यंत काम करणा-या संस्थाच्या श्रेणीमध्येही रायगड जिल्हयातील तळोजा एमआयडीसी भागातील एसकेएमस्टील्स लिमिटेड विजेती कंपनी ठरली असून यासाठीही या कंपनीला पुरस्कार प्रदान करण्यात आले. याच श्रेणीमध्ये या श्रेणीमध्येच नागपूर येथील बुटीबोरी भागातीलरिलायंस सिमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड उपविजेती ठरली असून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
            अपघात मुक्त वर्षाच्या आधारावर तसेच 5 लाख श्रम तासांपेक्षा अधिक आणि 10 लाख श्रम तासांपर्यंत काम करणा-या कंपनींच्या श्रेणीमध्ये रायगड जिल्हयातीलरोहा तालुक्यातील अमडोशी येथील सुप्रीम पेट्रोकेमिकल लिमीटेड कंपनीला याच श्रेणीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील वळुंज, गंगापूर येथील गरवारे इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनीही उपविजेती ठरली आहे. या कंपनीसही पुरस्काने सन्मानित करण्यात आले.
          5 लाख श्रम तासांपेक्षा अधिक आणि 10 लाख श्रम तासांपर्यंत काम करणा-या कंपनींच्या श्रेणीमध्ये रायगड जिल्ह्यातील रोहा येथील सुप्रीम पेट्रोकेम लिमिटेड कंपनी तसेच या श्रेणीमध्येच औरंगाबाद जिल्ह्यातील वळुंज येथील गरवारे पॉलिस्टर लिमिटेड ही कंपनी उपविजेता ठरली आहे या औद्योगिक संस्थाना आज पुस्काराने सन्मानित करण्यात आले.
          आज दिलेल्या पुरस्कारांमध्ये प्रमाणापत्र व रोख रक्कम होती. रोख रक्कम कपंनींच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे.