Tuesday, 17 September 2019

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतली उपराष्ट्रपती व केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट














नवी दिल्ली, 17 : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतली.

            महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच उपराष्ट्रपती यांची ६, मौलाना आझादरोड या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यानंतर त्यांनी नॉर्थब्लॉक येथे केंद्रीय गृहमंत्रालयात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. 
      
  
 आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                              
                ०००००
 रितेश भुयार /वृत्त वि. क्र.217/ दिनांक 17.09.2019 
                                             


Saturday, 14 September 2019

महाराष्ट्रातील आठ केंद्रीय संस्थांना हिंदी राजभाषा पुरस्कार








नवी दिल्ली, 14 : दैनंदिन व्यवहारात राष्ट्रभाषा हिंदीचा प्रभावी वापर केल्याबद्दल महाराष्ट्रातील आठ केंद्रीय संस्थांना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हिंदी राजभाषा पुरस्काराने गौरविण्यात आले.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाच्यावतीने येथील विज्ञान भवनात हिंदी भाषा दिनाचे औचित्यसाधून वर्ष 2018-19 च्या “राजभाषा किर्ती पुरस्कार” तथा “राजभाषा गौरव पुरस्कारांचे” वितरण करण्यात आले. यावेळी केंदीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि जी. किशन रेड्डी तसेच राजभाषा विभागाच्या सचिव अनुराधा मित्रा मंच्यावर उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात केंद्रीय मंत्रालय, केंद्र शासनाचे सार्वजनिक उपक्रम, केंद्र शासनाची विविध मंडळ, राष्ट्रीयकृत बँका, नगर राजभाषा कार्यान्वयन समिती तसेच केंद्र सरकारचे अधिकरी-कर्मचारी यांना हिंदी भाषेतील उल्लेखीनीय योगदानासाठी एकूण 43 पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्र शासनाचे महाराष्ट्रातील 3 सार्वजनिक उपक्रम, 2 मंडळ, 2 नगर राजभाषा कार्यान्वयन समित्या आणि 1 राष्ट्रीयकृत बँक अशा एकूण 8 संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

तीन सार्वजनिक उपक्रमांचा सन्मान

देशातील सार्वजनिक उपक्रमांना ३ श्रेणीमध्ये यावेळी सन्मानित करण्यात आले. “ख” श्रेणीत तीनही पुरस्कार महाराष्ट्रातील सार्वजनिक उपक्रमांना प्रदान करण्यात आले. क्रमश: मुंबई येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मुकेशकुमार सुराणा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याच श्रेणीत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडला द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी पुरस्कार स्वीकारला. भारतीय निर्यात कर्ज हमी महामंडळ लिमिटेड (ईसीजीसी) ला तृतीय पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक गीता मुरलीधर यांनी पुरस्कार स्वीकारला.



दोन मंडळांचा गौरव

यावेळी तीन श्रेणीमध्ये केंद्र शासनाच्या एकूण ९ मंडळांना सन्मानित करण्यात आले. यात मुंबई येथील भाखडा ब्यास प्रबंध बोर्डला “ख” श्रेणी मध्ये प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष देवेंद्रकुमार शर्मा यांनी पुरस्कार स्वीकारला. याच श्रेणीत मुंबई येथील राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रीकी संस्थेला दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे आफताब आलम यांनी पुरस्कार स्वीकारला.

“बँक ऑफ महाराष्ट्र” चा सन्मान

देशातील एकूण सहा राष्ट्रीयकृत बँकांना यावेळी तीन श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्रला “ख” श्रेणीमधील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्यकार्यपालन अधिकारी ए.एस.राजीव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

दोन नगर राजभाषा कार्यान्वयन समित्यांचा गौरव

या कार्यक्रमात तीन श्रेणीमध्ये देशातील एकूण सहा नगर राजभाषा कार्यान्वयन समित्यांचा गौरव करण्यात आला. “ख” श्रेणीत महाराष्ट्रातील दोन समित्यांना अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नवी मुंबई येथील नगर राजभाषा कार्यान्वयन समितीला प्रदान करण्यात आला. समितीचे अध्यक्ष तथा कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता आणि समितीचे सदस्य सचिव दीपक त्रिपाठी यांनी पुरस्कार स्वीकारला. दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार रत्नागिरी येथील नगर राजभाषा कार्यान्वयन समितीला प्रदान करण्यात आला. समितीचे अध्यक्ष तथा बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक अतुल सातपुते तसेच समितीचे सदस्य सचिव तथा राजभाषा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक रमेश गायकवाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते “ई-सरल हिंदी वाक्य कोष” आणि “ई-महाशब्द कोष” या मोबाईल एपचे लोकार्पण करण्यात आले. तसेच हिंदी भाषेचे महत्व विषद करणारा “भारत की आवाज हिंदी” हा लघुपट दाखविण्यात आला.
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
०००००
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.216/ दिनांक 14.09.2019

Monday, 9 September 2019

ग्रामीण रस्ते सुधारासाठी महाराष्ट्राला 1 हजार 440 कोटींचे कर्ज



नवी दिल्ली, 9 :  मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या सुधारांसाठी एशियाई विकास बँकेने (एडिबी) केंद्र सरकारला १ हजार ४४० कोटींचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. कर्ज रूपात उपलब्ध होणा-या निधीतून राज्याच्या ३४ जिल्हयांतील ग्रामीण रस्त्यांचा सुधारणा करण्यात येणार आहे.
           
 येथील नॉर्थ ब्लॉक स्थित केंद्रीय आर्थिक विकास विभागाच्या कार्यालयात राज्यातील ग्रामीण रस्ते सुधारणांकरिता  एशियाई विकास बँक आणि भारत सरकार यांच्या मध्ये १ हजार ४४० कोटींच्या कर्जाच्या करारावर स्वाक्ष-या झाल्या. एडिबी बँकेचे भारतातील वरिष्ठ अधिकारी सब्यासाची मित्रा आणि  केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाचे अतिरीक्त सचिव समीर खरे यांनी करारावर स्वाक्ष-या केल्या.
यासोबतच केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाचे उपसचिव वॉल्टर डी मेलो , मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव तथा महाराष्ट्र राज्य ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण किडे यांच्यामध्ये  प्रकल्प करारावर स्वाक्ष-या झाल्या.  
या करारामुळे राज्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास होऊन या भागातील शेती उत्पादकता वाढेल. पर्यायाने शेतकरी कल्याण साधण्यास मदत होईल व ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल, असे  केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाचे अतिरीक्त सचिव समीर खरे यांनी यावेळी  सांगितले.

                 34 जिल्हयांतील 2 हजार 152 किमी रस्त्यांचा सुधार
राज्यात रस्त्यांचे मोठे जाळे असून एकूण रस्त्यांपैकी दोन तृतियांश रस्ते हे ग्रामीण भागातील आहेत. या करारानुसार राज्याच्या 34 जिल्हयातील  2 हजार 152 किलो मिटर लांबिच्या 799 रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे. या निधीच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागातील रस्ते सर्व ऋतुंमध्ये उपयुक्त ठरतील असे बनविण्यात येणार आहेत. मुख्यत्वे पावसाळयात या रस्त्यांवरून  विना अडथळा व सुलभरित्या दळण-वळण  करता येणार आहे. रस्ते सुधारांमध्ये सुरक्षा हा केंद्र बिंदू असणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे वित्तीय नियंत्रक सुनिल मोने यांनी दिली.
            आजच्या करारासोबतच, या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवेळी रस्ते व्यवस्थापन, रस्ते सुरक्षा, सर्व ऋतुपूरक बांधकाम प्रारूप आणि वेब आधारीत प्रकल्प देखरेखीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण रस्ते विकास संस्थेला 1 दशलक्ष डॉलर्सचा तांत्रिक सहायता निधी कर्जस्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला आहे.   
 आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                              
                                                          ०००००
 रितेश भुयार /वृत्त वि. क्र.२१५/ दिनांक ९.०९.२०१ 
                                             


Saturday, 7 September 2019

राजधानीत राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी
















नवी दिल्ली, 7 : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

   महाराष्ट्र परिचय केंद्रात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन
 महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित अधिकारी- कर्मचारी व अभ्यागतांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                              
                                                          ०००००
 रितेश भुयार /वृत्त वि. क्र.२१४/ दिनांक ७.०९.२०१८ 


                                             





Friday, 6 September 2019

‘स्वच्छता महोत्सव’ : उत्कृष्ट संवाद उपक्रमासाठी महाराष्ट्राला विशेष पुरस्कार













      
              चंद्रपूर जिल्हयातील किरण बगमारे ठरल्या उत्कृष्ट स्वच्छाग्रही
                                                   
नवी दिल्ली , : शाश्वत स्वच्छता मोहिमेंतर्गत उत्कृष्ट संवाद उपक्रमासाठी आज केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते महाराष्ट्राला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. चंद्रपूर जिल्हयातील किरण बगमारे या महाराष्ट्रातील उत्कृष्ट स्वच्छाग्रही ठरल्या असून त्यांनाही गौरविण्यात आले.

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला स्वच्छ प्रतिष्ठित स्थळासाठी तर सोलापूर जिल्हयातील तमलवाडी टोल प्लाझा ला स्वच्छ टोल प्लाझा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.   
           
            केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्यावतीने आज येथील विज्ञान भवनात ‘स्वच्छता महोत्सव -2019’चे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमात केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते विविध श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया, पेयजल व स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर यावेळी मंचावर उपस्थित होते.

                        या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला शाश्वत स्वच्छता मोहिमेंतर्गत उत्कृष्ट संवाद उपक्रमासाठी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे आणि पाणी व स्वच्छता सहायक संस्थेचे संचालक राहुल चाकोरे यांनी हा  पुरस्कार स्वीकारला.

                            किरण बगमारे ठरल्या महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट स्वच्छाग्रही  
या कार्यक्रमात देशभरातील सर्वोत्कृष्ट 27 स्वच्छाग्रही महिलांना सन्मानित करण्यात आले. चंद्रपूर जिल्हयातील ब्रह्मपुरी तालुक्याच्या जुगनाळा गावातील किरण बगमारे यांचा महाराष्ट्रातून सर्वोत्कृष्ट स्वच्छाग्रही म्हणून सन्मान करण्यात आला. त्यांच्यासोबत चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे आणि मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले  उपस्थित होते.

किरण बगमारे यांनी 2 हजार लोकवस्तीच्या जुगनाळा गावाला हागणदारीमुक्त करण्यात मोलाची भूमिका बजावली. तसेच, गावातील महाविद्यालयीन मुलांचा युवकगट आणि 19 महिला बचत गटांतील 215 महिलांचा स्वतंत्र महिलागट तयार करून गावात स्वच्छता जागृतीचे कार्य केले. गावातील सार्वजनिक शौचालयांवर देखरेख ठेवून येथे स्वच्छता व अनुषांगीक बाबीं पुरविल्या. श्रीमती बगमारे यांच्या स्वच्छता विषयक कार्याची दखल घेवून त्यांना सन्मानित करण्यात आले.
                         मुंबई येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला देशातील स्वच्छ प्रतिष्ठित स्थळाचा दुस-या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मध्य रेल्वेचे मुख्य अभियंते श्यामसुंदर कालरा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
            सोलापूर जिल्हयातील तुळजापूर तालुक्यातील  जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्र 52 वरील तमलवाडी टोल प्लाझा ला स्वच्छ टोला प्लाझा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाचे मुख्य महाव्यवस्थापक राजीव सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

 महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
000000000
रितेश भुयार/वृ. वि. क्र. 216 /दिनांक 6. 09. 2019