Thursday, 18 February 2021

नागपूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संग्रहालयासाठी केंद्राकडून 4.25 कोटींचा निधी वितरीत

 



 

नवी दिल्ली, 18: नागपूरजवळील चिंचोळी येथील शांतीवन या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संग्रहालयासाठी केंद्र शासनाने 4.25 कोटी रूपयांचा  निधी बुधवारी वितरीत केला.

 

            भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त नागपूरजवळील शांतीवन, (चिंचोळी) येथील बाबासाहेबांच्या स्मृती संग्रहालयाच्या पुनर्निर्माणासाठी केंद्र शासनाने वर्ष 2016 मध्ये 17.3 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी पहिला हप्त्याचा 4.25 कोटी रूपयांचा निधी  नोव्हेंबर 2016  मध्ये दिला. दुस-या हप्त्याचा 4.25 कोटी रूपयांचा  निधी बुधवार 17 फेब्रुवारी 2021 ला  वितरीत करण्यात आला.

 

            शांतीवनमधील संग्रहालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अस्ती जतन करून ठेवल्या आहेत. याशिवाय  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खाजगी आयुष्याशी निगडीत जवळपास 400 पेक्षा अधिक वस्तु आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वापरत असलेले कपडे यामध्ये सदरा, कोट, कुर्ते, टाय, मोजे आहेत. यासह वकीली करीत असतानाचा बॉरीस्टर गाऊन येथे आहे. त्यांचे हस्तलिखीत  पत्रे, ग्रामोफोन, छड़ी, टेबल-खुर्ची, पेन, टाइपराइटर अशा अनेक वस्तु या संग्रहालयात आहेत.

 

            शांतीवन, चिंचोळीच्या संग्रहालयाचे लोकार्पण येत्या 6 डिसेंबर 2021 रोजी डॉ.  बाबसाहेब आंबेडकर यांचया महापरिनिर्वाणाच्या दिवशी होईल, अशी अपेक्षा डॉ. आंबेडकर फॉऊंडेशनचे उपाध्यक्ष अशोक मेंढे यांनी व्यक्त केली आहे.

Tuesday, 16 February 2021

साडेतीन वर्षाच्या चिमुकलीने घेतला ‘कुसुमाग्रज काव्यवाचन उपक्रमा’त सहभाग


 

                         

 नवी दिल्ली, 16 : बालपणीच टिव्ही कार्टून, मोबाईल गेममध्ये रमणा-या पिढीची  प्रतिनिधी तरीही यास अपवाद असलेली गडचिरोली जिल्हयाची विनंती झाडे साहित्यात रमणारी आहे. वयाच्या साडेतीन वर्षातच  तिने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची कणा ही कविता तोंडपाठ करून परिचय केंद्राच्या कविता वाचन उपक्रमात सहभाग नोंदवला. या उपक्रमात सहभागी होणारी ती सर्वात कमी वयाची साहित्य रसिक ठरली आहे.

              मराठी भाषा गौरव दिन या  ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी  वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या जयंती  दिनाच्यानिमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राने कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात राज्यातून व राज्याबाहेरूनही साहित्य रसिक सहभागी होत आहेत. या उपक्रमातील  वैशिष्टयपूर्ण बाब म्हणजे गडचिरोली जिल्हयातील कुरखेड येथील विनंती झाडे या चिमुकलीचा सहभाग. बोबडे बोल असले तरी विनंतीने मात्र उत्तम लयीत कणा ही कविता सादर करून या उपक्रमातील सर्वात लहान सहभागकर्तीचा मान मिळविला आहे.

             चिमुकली विनंती दोन वर्षाची असल्यापासूनच बोलायला लागली व बडबडगीते, पाठयपुस्तकातील कविता ती आई वंदना झाडे यांच्या मागावून म्हणू लागली. ब-याच रचना तिच्या पाठही झाल्या. तिची आई वंदना यांना आवडणारी कुसुमाग्रजांची कणा ही  कविता  त्यांनी आपल्या मुलीलाही  शिकवली व चिमुकल्या विनंतीने ही  कविता तोंडपाठच  केली. विनंतीचे वडील तुळशीदास झाडे यांना प्राध्यापक मित्राकडून महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कविता वाचन उपक्रमाची माहिती समजली व त्यांनी आपल्या मुलीला या उपक्रमात सहभागी करण्याचे ठरविले. कुरखेडच्या गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाच्या प्रांगणातील लॉनवर विनंती व तिच्या आई-वडिलांनी मोर्चा वळवला व तिचा कणा कविता सादरीकरणाचा व्हिडीयो तयार करून घेतला. परिचय केंद्राला हा व्हिडीयो पाठवला व संपादक मंडळाने या व्हिडीयोची निवड केली आणि हे सादरीकरण उपक्रमातही सहभागी करून घेतले.

            विनंतीच्या आईने  मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून त्या गृहिणी आहेत. तिचे वडील कुरखेड येथील गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. कोरोना महामारीमुळे अंगणवाडीत जाता येत नसल्याने  विनंती हिरमुसली आहे तर मोठी झाल्यावर शिक्षिका व्हायचे तिचे स्वप्न आहे.     

                                               आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     

                                                                        00000

रितेश भुयार  /वृत्त वि. क्र. 27  /  दिनांक  16.02.2021

Monday, 15 February 2021

राजधानीत संत सेवालाल महाराज जयंती साजरी




               



नवी दिल्ली, 15 : संत सेवालाल महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली.

            कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात गुंतवणुक आणि राजशिष्टाचार आयुक्त निधी पांडे  यांनी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

      महाराष्ट्र परिचय केंद्रात संत सेवालाल महाराजांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहीली.  यावेळी स्वतंत्र पत्रकार निवेदिता खांडेकर आणि उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 


Wednesday, 10 February 2021

कुसुमाग्रजांच्या कविता वाचन उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन


 

नवी दिल्ली, 10:  मराठी भाषा गौरव दिनया  ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी  वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या जयंती  दिनाच्यानिमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राने कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन साहित्य रसिकांना करण्यात येत आहे.

 

            राजधानी दिल्लीतून राज्य शासनाच्या प्रसिध्दी विषयक कामांसह मराठी भाषा व महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख दर्शविणारे कार्यक्रम व उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र परिचय केंद्राची खास ओळख आहे. वि.वा.शिरवाडकरांनी मराठी साहित्यात दिलेल्या भरीव योगदानाचा कृतज्ञभाव व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत परिचय केंद्राने त्यांच्या कविता वाचन उपक्रमाचे आयोजन केले आहे. मराठी भाषा अवगत असणा-या सर्व नागरिकांनी  या उपक्रमात सहभागी होवून कुसुमाग्रजांच्या कविता पुन्हा जनतेपर्यंत पोहचावे या उद्देशाने परिचय केंद्राने  हा उपक्रम आखला आहे. उत्तम सादरीकरणास परिचय केंद्राच्या समाजमाध्यमांद्वारे प्रसिध्दी देण्यात येणार आहे.

                                                    मराठी भाषा गौरव दिन आणि कुसुमाग्रज

 विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्‍कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान  आहे. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार म्हणून त्यांची ख्याती आहे. कुसुमाग्रजया टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले. प्रसिध्द साहित्यिक वि.स.खांडेकरांनंतर मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे ते दुसरे मराठी साहित्यिक. कुसुमाग्रजांच्या स्मृतिला अभिवादन म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे त्यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून  साजरा करण्यात येतो.

वि.वा शिरवाडकरांचे  एकूण २४ कविता संग्रह , ३ कादंब-या, १६ कथा संग्रह, १९ नाटके, ५ नाटिका व एकांकी आणि ४ लेखसंग्रह आदी साहित्य प्रसिध्द आहे. १९६४ मधील गोव्याच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९७४ मध्ये त्यांच्या नटसम्राट  ह्या नाटकाला साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले तर याच कलाकृतीला १९८७ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कारही  मिळाला.

                       या कविता संग्रहातील कविता वाचनाचे आवाहन

            कुसुमाग्रजांचे एकूण २४ कविता संग्रह प्रकाशित आहेत. यामध्ये जीवनलहरी , विशाखा , समिधा , किनारा, मेघदूत अनुवाद, मराठी माती, स्वगत ,जाईचा कुंज बालांसाठी कविता, हिमरेषा , वादळवेल, रसयात्रा, छंदोमयी, मुक्तायन, श्रावण, प्रवासी पक्षी, पाथेय, बालबोध मेव्यातील कुसुमाग्रज, माधवी, महावृक्ष, करार एका ता-याशी, चाफा, मारवा, अक्षरबाग, थांब सहेली या काव्यसंग्रहांचा समावेश आहे.  

         कुसुमाग्रजांच्या  या २४ काव्य संग्रहातील निवडक कविता  व्हिडीओ  स्वरूपात  या कार्यालयास पाठवावे. सुस्पष्टोच्चार व उत्तम सादरीकरण असणा-या कविता वाचनाची कार्यालयाच्या संपादन मंडळाकडून निवड झाल्यावर आमच्या ट्विटर, फेसबुक, युटयूब, इंस्टाग्राम आदीं द्वारे  प्रसिध्दी देण्यात येईल.

कविता वाचना-या व्यक्तीने स्वत:चा अल्प परिचय,  कुसुमाग्रजांची जी कविता वाचनार आहात त्या  कवितेचे शिर्षक व कविता संग्रहाचे नाव याची थोडक्यात माहिती दयावी. कार्यालयाच्यावतीने दिनांक १४ ते २७ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचे व्हिडीओ प्रसारीत करण्यात येणार आहेत. व्हिडीओ निवडीचे संपूर्ण अधिकार कार्यालयाच्या संपादन मंडळाकडे असतील. तेव्हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचे व्हिडीओ तयार करून आम्हाला पाठवा. ९८९९११४११३० आणि ९८७१७४२७६७ या  व्हाट्सअप क्रमांकांवर रचना पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.        

                                             

           

                     आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     

                                                                        00000

रितेश भुयार  /वृत्त वि. क्र. 24  /  दिनांक  10.02.2021

Tuesday, 9 February 2021

महाराष्ट्र ‘हिरक’ महोत्सव

 


                महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धा                       

 नवी दिल्ली, 9 : महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे हे  हिरक महोत्सवी वर्ष आहे. गेल्या ६० वर्षात  महाराष्ट्राने विविध क्षेत्रांमध्ये केलेली  प्रगती उल्लेखनीय आहे, याचेच औचित्य साधत महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने महाराष्ट्र गौरव गीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र   शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिनस्त दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्र आपल्या वैशिष्टयपूर्ण उपक्रमांसाठी प्रसिध्द आहे. वैविद्यपूर्ण उपक्रमांच्या श्रृखंलेमध्ये महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत परिचय केंद्राने महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धा आयोजनाचा अभिनव  उपक्रम आखला आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रासह देश-विदेशात वास्तव्यास असणा-या व मराठी भाषा अवगत असणा-या व्यक्तींनी या उपक्रमात मोठया संख्येने सक्रीय सहभाग देण्याचे आवाहन परिचय केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

                          हिरकमहोत्सव महाराष्ट्राचा

            महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे हिरक महोत्सवी वर्ष सुरु आहे. स्वातंत्र्य चळवळीत देशाचे नेतृत्व करणा-या महाराष्ट्राने समाजप्रबोधन आणि सामाजिक विकासात केलेले कार्य देशातील अन्य राज्यांसाठी प्रेरणादायी आहे. राज्यातील धुरीणांनी  राज्याच्या विकासाचे स्वप्न बाळगून त्या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी अविरत कष्ट उपसले. सध्या  महाराष्ट्र हे देशात उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य असून देशातील सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक राज्यात झाली आहे . देशातील  सर्वात चांगल्या पायाभूत सुविधा महाराष्ट्रात आहेत. राज्यातील सिंचन प्रकल्पांनी शेती विकासाला गती दिली आहे. सहकार चळवळीने राज्याच्या ग्रामीण भागाचे चित्र पालटविले आहे. वंचित उपेक्षित घटकांबरोबर महिला आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  महाराष्ट्राने अनेक कल्याणकारी  योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. महाराष्ट्राने देशाला रोजगार हमी योजना’, ‘माहितीचा अधिकार सारखे प्रभावी कार्यक्रम दिले. राज्याने उद्योग,सहकार,ऊर्जा,शिक्षण,पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात अद्वितीय कार्य केले  जे इतर राज्यांसाठी दिशादर्शक ठरत आहे.      

            महाराष्ट्राची हीच गौरवशाली पंरपरा महाराष्ट्र गौरव गीतामध्ये प्रतिबिंबीत व्हावी या उद्देशाने परिचय केंद्राने महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे.

 

                                                                        स्पर्धेचे नियम व अटी

1)    18 वर्षांवरील मराठी भाषा अवगत असणा-या सर्व नागरीकांस ही स्पर्धा खुली राहील.

        2) महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धेसाठी स्पर्धकाला एक व जास्तीत-जास्त दोन स्वरचित गीत पाठवता येतील.

3) महाराष्ट्र गौरव गीत पाठविणा-या स्पर्धकाने त्यांचे गीत ही स्वत:चीच रचना असल्याचे लेखी प्रतिज्ञा पत्र     

    परिचय केंद्रास देणे आवश्यक आहे.

4)  पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संमती पत्रही सोबत जोडणे

आवश्यक आहे.              

           5)  पुरस्का विजेत्यांची निवड करण्यासाठी  परिचय केंद्रातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल.   

                 निवड समितीने घेतलेला निर्णय स्पर्धकांवर बंधनकारक राहील.

 

                                                      आम्हाला खालील पत्त्यावर गीत पाठवावे  

 

या स्पर्धेसाठी  १० एप्रिल २०२१ पर्यंत गीत पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  स्पर्धकाने प्रतिज्ञापत्र आणि संमती पत्रासह आपली गीत रचना महाराष्ट्र परिचय केंद्र, -8,स्टेट एम्पोरिया बिल्डींग, बाबा खडकसिंह मार्ग, नवी दिल्ली-11001.या आमच्या कार्यालयाच्या पत्यावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांमध्ये टपालाद्वारे पाठवावी. संबंधित रचना, प्रतिज्ञापत्र व संमतीपत्राची एक प्रत माहितीसाठी आमच्या कार्यालयीन ईमेल micnewdelhi@gmail.com वरही पाठवावी.

परिक्षक मंडळ व पुरस्काराविषयी

या स्पर्धेसाठी प्राप्त गीत रचनेची निवड ही या कार्यालयाद्वारे नेमण्यात आलेल्या साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींच्या एका परिक्षक मंडळाकडून करण्यात येईल. स्पर्धेत पहिल्या तीन ठरणा-या रचनांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. स्पर्धेचा निकाल 1 मे 2021 या महाराष्ट्र दिनी जाहीर कण्यात येईल.पहिल्या तीन उत्तम गीत रचनांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र स्वरुपात पुरस्कार प्रदान करण्यात येईल.   

           

                     आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     

                                                                        00000

रितेश भुयार  /वृत्त वि. क्र. 23  /  दिनांक  9.02.2021

 

महाराष्ट्रातील आदिवासींच्या हातमागाला दिल्लीकरांचा उत्सर्फुत प्रतिसाद

 














आदि महोत्सवात महाराष्ट्रातील 11 दालनांचा समावेश

 

नवी दिल्ली, 09 : राज्यातील आदिवासींच्या हातमागाला दिल्लीकरांचा उत्सर्फुत प्रतिसाद मिळत असून नागपूर, भंडारा जिल्ह्यातील हातमाग कारागीरांनी तयार केलेल्या टिशु, टसर, कोसा, सिल्क, कॉटनच्या साडया,  कापड, सलावर-कुर्ती, दुपट्ट्यांना आदि महोत्सवात चांगलीच पंसती मिळत आहे.

 

            येथील आयएनए परिसरातील दिल्ली हाटमध्ये केंद्रीय आदिवासी मंत्रालया अतंर्गत येणा-या भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास संघ (ट्रायफेड)च्यावतीने  1 फेब्रुवारीपासून  आदि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आदिवासी संस्कृती आणि त्यांनी बनविलेल्या हस्तशिल्प आणि हातमागाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आदिमहोत्सवाची सुरूवात सन 2017 झाली.  या महोत्सवाचे उद्घाटन उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले. याठिकाणी सर्वच राज्यातील दालने आहेत.  महाराष्ट्रातील एकूण 11 दालनांचा समावेश यामध्ये आहे.  

नागपुरातील परसाराम औद्योगिक हातमाग विनकर सहकारी उद्योगाकडून टिशु-आणि टसर धाग्यांचा मिलाफ करून बनविलेल्या साडीला आदि महोत्सवात मागणी असल्याचे प्रवीण बडवे यांनी सांगितले.  त्यांची तीसरी पिढी विणकामाचे काम करते. त्यांनी टिशु आणि टसरच्या धाग्यांना मिळवून नवीन प्रकाराची साडी बनविली. ही साडी गोल्डन रंगाची दिसते. त्यात पदरामध्ये मोर पिसाराही ठेवला. त्यांच्या कलाकृतीला दिल्लीकरांनी पसंती दर्शविली असून त्यांच्या या साडीला मागणी आहे.

भंडारा जिल्ह्यातील ओरोमीरा महिला वण्य उद्योगाचे भोजराज सोनकुसरे, कोसा हॅन्डलुमचे  राजु सोनकुसरे, व्हुमन रूरल डेवल्पमेंट वेलफेयरचे नारायण बारापात्रे यांची कपडयांची दालने आहेत. यामध्ये करावती काठी, कोसा, टसर, बाटीक, नागपूरी कॉटन, सिल्क अशा वेगवेगळया प्रकारच्या साडी, कापड, सलवार-कुर्ते, दुपट्टे,  आदि आहेत. यांच्याही दालनाला उत्तम प्रतिसाद असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वांचे पांरपारिक व्यवसाय हा हातमागाचा आहे. शासनाचे सहकार्य असल्यामुळे त्यांना राजधानीत त्यांची कला दाखविण्याची संधी मिळल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

            महाराष्ट्रातील  आदिवासी संस्कृतीचे प्रतिक वारली चित्रकला आणि तारपा या दोन्हींची दालने दिल्ली हाटमध्ये आहेत. वारली चित्रकलेमधील निर्सग आणि जीवनसंस्कृती बघणा-यांचे मन मोहुन घेते. येथे येणारे पर्यटक वारली चित्रकलेप्रती  जिज्ञासा आणि कुतुहलाने विचारपूस करून खदेरी करीत असल्याचे पालघर जिल्ह्यामधील डहाणुतील  वारली चित्रकार  दिलीप बाहोठा यांनी सांगितले. डहाणुतीलच वाघह‍डी पोस्ट कसातील  आदिवासी युवा सेवा संघाचे दालन येथे आहे. या दालनामध्ये सुंदर वारली नक्षीकाम केलेले पेन स्टँन्ड, टिकप स्टँन्ड, बुके स्टॅन्ड, साडी, बॅग यासोबतच तारपाकृत सौदर्य प्रसाधने आहेत. जे बघुन पर्यटक आकृष्ट होतात.

            गोंदियातील सालेकसा येथील आदिवासी  स्वयं कला संस्थानच्यावतीने येथे खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहे.  यांच्या स्टॉलवर वडा पाव, साबुदाना वडा आणि पुरण पोळी खाण्यासाठी खवय्यांची प्रचंड गर्दी आहे. आदि महोत्सवात दरवर्षी येत असल्याचे संस्थेचे मुन्नालाल ऊईके यांनी सांगीतले.

            आदि महोत्सव 15 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी माफक शुल्क दरात खुले आहे.