Saturday, 11 March 2023
राजधानीत यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी
मराठीसाठी ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, 11 : अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीसाठी 'उजव्या सोंड्यांच्या बाहुल्या' या कादंबरीला आज प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कादंबरीचे लेखक प्रवीण
बांदेकर यांनी स्वीकारला.
येथील कमानी सभागृहात आज साहित्य अकादमी
पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात
आले. या पुरस्कार अर्पण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे नामवंत साहित्यिक उपमन्यु चटर्जी,
साहित्य
अकादमीचे नवनियुक्त अध्यक्ष माधव कौशिक तसेच नवनियुक्त उपाध्यक्ष कुमुद शर्मा आणि
सचिव के.श्रीनिवास राव यांच्यासह 24 भाषेतील
पुरस्कारार्थी साहित्यीक व्यासपीठावर उपस्थित होते.
मराठी भाषेसाठी 'उजव्या सोंड्याच्या बाहुल्या' या प्रायोगिक कादंबरीला वर्ष 2022 चा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोंकणी भाषेसाठी
माया खरंगटे यांना त्यांच्या कोकणी
भाषेतील 'अमृतवेळ ' या कादंबरीसाठी प्रदान करण्यात आला.
प्रवीण बांदेकर यांच्या 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' या
कादंबरी विषयी
उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही एक
प्रायोगिक कादंबरी आहे. या कादंबरीचा विषय समकालीन संस्कृती वरच्या संकटाचे
नाट्यमय चित्रण यात केलेले आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण भागात लोकप्रिय
असलेल्या चित्रकथी सारख्या लोककला प्रकारांचा उत्कृष्ट वापर केल्याने कादंबरीचे
कथन तंत्र नाविन्यपूर्ण झालेले आहे. कादंबरीत अधून मधून कोकणी आणि गोव्यातील
बोलींच्या कलात्मक वापराने कादंबरीची कथनशैली समृद्ध झाली आहे. स्वतःची ओळख हरवून
बसलेल्या विचारवंतांच्या नोस्टॅलीजीयाचे चित्रणअतिशय संवेदनशीलतेने केलेले आहे. या
सर्व कथनामुळे उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही मराठी साहित्यकृती विशेष ठरली आहे.
मराठीतील सुप्रसिद्ध लेखक प्रवीण बांदेकर कवी समीक्षक आहेत त्यांचा जन्म
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झालेला आहे त्यांनी इंग्रजी व मराठी
साहित्यात यांनी केले आहे ते सावंतवाडी येथील शासकीय कनिष्ठ महाविद्यालयात
प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पूर्वी त्यांच्या येरू म्हणे, चाळेगत, ,इंडियन ॲनिमल
फार्म, चिनभिन असे साहित्य प्रकाशित झालेले
आहे. श्री बांदेकर यांना महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, जैन फाउंडेशनचा ना.धों महानोर पुरस्कार इत्यादी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार
प्राप्त झालेले आहेत.
00000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
अंजु निमसरकर /वि.वृ.क्र. 53 /दि.11.03.2023
Friday, 10 March 2023
‘श्री अन्न’ला केंद्र शासनाकडून रास्त दर मिळावा कृषी मंत्री अब्दुल सत्तार
नवी दिल्ली, दि. 10 मार्च : संयुक्त राष्ट्राने
वर्ष 2023 ला ‘मिलेट वर्ष’ (भरड धान्य) घोषित केले आहे. त्यामुळे
‘श्री अन्न’ (भरड धान्या)च्या पिकांबाबत आणि उपयुक्ततेची जागरूकता मोठया प्रमाणात वाढविली जात आहे. या भरड धान्याला
केंद्र शासनाकडून रास्त दर मिळावा, अशी मागणी राज्याचे कृषी अब्दुल सत्तार
यांनी आज येथे केली.
येथील पुसा रोडवरील भारतीय
कृषी संशोधन परीषद मधील भारत रत्न सी. सुब्रमण्यम सभागृहात भारतीय कृषी संशोधन परीषदेच्या
94 व्या वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री सत्तार
बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर, केंद्रीय
मत्स्यपालन, पशुपालन आणि डेयरी मंत्री पुरूषोत्तम रूपाला, महाराष्ट्राचे कृषी
मंत्री अब्दुल सत्तार, हिमाचल प्रदेशचे कृषी मंत्री चंदर कुमार, उत्तर प्रदेशचे
कृषी मंत्री सूर्य प्रताप शाही, निती आयोगाचे सदस्य रमेश चंद्र आणि सचिव मंचावर
उपस्थित होते. तर सभागृहात भारतीय कृषी संशोधन परीषदेचे सदस्य, कृषी विभागातील
विविध विभागाचे विभाग प्रमुख, शेती व तंत्रज्ञानाशी संबंधित वैज्ञानिक उपस्थित
होते.
श्री सत्तार पुढे
म्हणाले, या भरड धान्याला केंद्र
शासनाकडून ‘श्री अन्न’ (भरड धान्य) असे नामकरण करण्यात आले
आहे. ‘श्री अन्न’ मूळ भारतीय भरड धान्य असून जगाच्या 20% टक्के उत्पादन भारतात[d1] होते. 2023 हे वर्ष
मिलेट वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यामुळे भरड धान्याबाबत लोकांमध्ये
जागरूकता निर्माण केली जात आहे. याचे महत्व जनतेला पटवून दिले जात आहे. त्याचा
परिणाम भरड धान्याचा उत्पादनावर होणार असून, याचा लाभ 25 लाख हेक्टरमध्ये
होणाऱ्या शेतीला आणि शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी केंद्र शासनाकडून भरड धान्याला रास्त हमी भाव मिळावा, अशी मागणी श्री सत्तार यांनी
यावेळी केली. यासह हे भरड धान्य रेशनच्या माध्यमातूनही उपलब्ध करून देण्यात यावे, अशी
सूचना श्री सत्तार यावेळी केली.
राज्य शासनाने नुकतेच
सादर केलेल्या अर्थसंकल्पात कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी मोठा निधी उपलब्ध
करून दिला असल्याचे सांगत श्री सत्तार म्हणाले, राज्यातील चार कृषी विद्यापीठांमधल्या
पायाभूत सोयी सुविधेसाठी राज्य शासनाचा निधी प्राप्त होतो, तथापि केंद्राकडून मिळत
असलेल्या निधीमध्ये अधिक वाढ करण्यात
यावी, अशी मागणी केली.
केंद्र शासनाकडून छत्रपती संभाजी नगर येथे येथे एक
केंद्रीय विद्यापीठ उभारण्यात यावे, अशी मागणी करत या केंद्रीय विद्यापीठाच्या
माध्यमातून महिला महाविद्यालय सुरू करण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याचे त्यांनी
यावेळी सांगितले. यासह राज्यात बियाने केंद्र (सीड हब) असावे, केंद्राकडून होणाऱ्या योजनांची राज्य शासन
योग्यरीतीने अंमलबजावणी करीत आहे व यापुढे ही करणार असे आश्वासनही श्री सत्तार
यांनी यावेळी दिले.
महाराष्ट्र सदनाचे अपर निवासी आयुक्त म्हणून निवा जैन यांनी पदभार स्वीकारला
नवी दिल्ली , 10: महाराष्ट्र सदनाचे अपर निवासी आयुक्त म्हणून श्रीमती निवा जैन यांनी शुक्रवार 03 मार्च 2023 रोजी पदभार स्विकारला. तसेच, प्रभारी निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे यांची बदली विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती येथे झाल्यामुळे रिक्त असलेल्या निवासी आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभारही श्रीमती निवा जैन यांनी स्वीकारला आहे.
श्रीमती निवा जैन या भारतीय पोलिस सेवेतील 2008 च्या तुकडीचे महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी असून अपर पोलिस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, नागपूर शहर या पदावर यापूर्वी कार्यरत होत्या.
श्रीमती निवा जैन यांनी महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी आज श्रीमती निवा जैन यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी श्रीमती अरोरा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे करण्यात येणारे प्रसिध्द कार्य, तसेच परिचय केंद्राच्यातवीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचीही माहिती दिली.
Wednesday, 8 March 2023
महाराष्ट्राच्या तीन छायाचित्रकारांना पुरस्कार
आठ वे राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, दि. 8 मार्च : उत्कृष्ट
छायाचित्रणासाठी महाराष्ट्रातील तीन
छायाचित्रकारांना राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्काराने केंद्रीय माहिती प्रसारण
राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
येथील राष्ट्रीय
माध्यम केंद्रात मंगळवारी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने आठव्या
राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कारांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय
राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र, परिक्षक
मंडळाचे अध्यक्ष विजय क्रांती उपस्थित होते. कार्यक्रमात वेगवेगळया श्रेणीतील
उत्कृष्ट छायाचित्रणांसाठी 13 छायाचित्रकांराना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात
आले. यामध्ये महाराष्ट्रातील तीन छायाचित्रकारांचा समावेश आहे. कार्यक्रमस्थळी
केंद्रीय राज्य मंत्र्यांच्या हस्ते छायाचित्र
प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष माहिती पुस्तिकेचे
प्रकाशनही करण्यात आले.
व्यावसायिक
छायाचित्रकार श्रेणीतील ‘विशेष उल्लेख’ हा पुरस्कार मुंबईचे दिपज्योती
बनिक आणि पुण्याचे उमेश निकम यांना प्रदान करण्यात आला. तर, सर्वोत्कृष्ट
हौशी (अमॅच्योर) छायाचित्रकार या श्रेणीतील वार्षिक पुरस्कार पुण्याचे अरुण
साहा यांना प्रदान करण्यात आला.
ख्यातनाम
छायाचित्रकार सिप्रा दास यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट व्यावसायिक छायाचित्रकार श्रेणीतील पुरस्कार ससी कुमार रामचंद्रन यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पुरस्कार वितरण
सोहळ्यात व्यावसायिक आणि हौशी (अमॅच्योर) श्रेणीतील प्रत्येकी सहा पुरस्कारांसह एकूण
तेरा पुरस्कार प्रदान करण्यात आले. व्यावसायिक श्रेणीसाठी “जीवन आणि पाणी” हा विषय होता तर “भारताचा सांस्कृतिक वारसा” हा विषय हौशी श्रेणीसाठी पुरस्कार
प्रदान करण्यात आला.
जीवनगौरव
पुरस्कारासाठी एकूण 9 प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. व्यावसायिक
छायाचित्रकार श्रेणीसाठी एकूण 4,535 छायाचित्रांचा समावेश असलेल्या 462 प्रवेशिका प्राप्त
झाल्या. या प्रवेशिका 21 राज्ये आणि 4 केंद्रशासित
प्रदेशांमधून प्राप्त झाल्या होत्या. हौशी छायाचित्रकार श्रेणीमध्ये 24 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांमधून 6,838 छायाचित्रांचा
समावेश असलेल्या 874 प्रवेशिका प्राप्त झाल्या असल्याची माहिती परिक्षक मंडळाचे अध्यक्ष विजय क्रांती यांनी
कार्यक्रमात दिली.
जीवनगौरव
पारितोषिकांचे स्वरूप 3,00,000 रूपये रोख आणि मानचिन्ह असे आहे. व्यावसायिक आणि हौशी
या दोन्ही श्रेणींमध्ये अनुक्रमे. 50,000/- आणि 30,000/- रुपयांच्या रोख पुरस्कार आणि मानचिन्ह
असे प्रदान करण्यात आले.
00000
आम्हाला
ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
अंजु निमसरकर वि.वृ.क्र. 51/ दि.08.03.2023
Saturday, 4 March 2023
राजभाषेसह मराठी पुस्तकांना जागतिक पुस्तक मेळयात चांगली मागणी
नवी
दिल्ली, दि. 4 मार्च :
राजभाषेसह
मराठी पुस्तकांना जागतिक पुस्तक मेळयात चांगली मागणी असल्याचे चित्र पुस्तक मेळयात
दिसले.
येथील प्रगती मैदान येथे राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी)
यांच्या पुढाकाराने सध्या ‘जागतिक पुस्तक
मेळा 2023’ सुरू आहे. येथील हॉल क्रमांक 4, 5 येथे
आणि पहिल्या मजल्यावर लहान मोठी अनेक पुस्तकांची दालने आहेत. हा पुस्तक मेळा 25
फेब्रुवारीला सुरू झाला असून उद्या रविवार 5 मार्चला याची सांगता होणार आहे.
यावर्षी पुस्तक मेळयाची संकल्पना आज़ादी का अमृत महोत्सव अशी आहे. तसेच या पुस्तक
मेळयात फ्रांस भागीदार राष्ट्र आहे. याठिकाणी राजभाषा हिंदी सह इंग्रजी, मराठी आणि अन्य
भाषेतील पुस्तके आहेत.
याठिकाणी सकाळ प्रकाशन, जोत्सना प्रकाशन, विश्वकर्मा प्रकाशन,
माय मिरर प्रकाशन, वाणी प्रकाशन, अंटलांटा प्रकाशनाच्या दालनांमध्ये मराठी सह अन्य
भाषेतील पुस्तके मांडण्यात आलेली आहेत. पुस्तकांमध्ये मराठी साहित्य, अध्यात्मिक
पुस्तके आणि स्वयंविकासाची पुस्तके अधिक प्रमाणात खरेदी केली जात असल्याची माहिती
प्रकाशकांनी दिली.
राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्या मुख्य दालनात यावर्षीच्या
संकल्पनेवर स्वातंत्र्य चळवळीत योगदान असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे तसेच
स्वातंत्र्यानंतर आधूनिक भारताची रचना करणाऱ्या महानायकांच्या पुस्तकांची आकर्षक
मांडणी करण्यात आलेली आहे. यासह एनबीटीच्या अन्य दालनात बालकांपासून ते
वयोवृद्धापर्यंत मराठीची वाचनीय पुस्तके
विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
शुक्रवारी ‘सकाळ प्रकाशन’
तर्फे
ज्येष्ठ लेखिका मेधा देशमुख भास्करन यांच्या ‘अप
अगेंस्ट डार्कनेस’ या इंग्रजी
पुस्तकाचे प्रकाशन झाले. हे पुस्तक डॉ. गिरीश
कुलकर्णी यांच्या स्नेहालय या शरीर विक्रय करणाऱ्या महिलांसाठी केलेल्या कार्यावर आधारित
आहे. यावेळी श्रीमती भास्करन यांनी त्यांचे पुस्तक महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिले.
बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली ला ‘स्वच्छ सुजल शक्ति सन्मान’ प्रदान
नवी
दिल्ली, दि. 4 मार्च :
बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली या ग्राम पंचायतीला नळाव्दारे नियमित
स्वच्छ पाणी पुरवठा आणि त्याचे देखभाल व व्यवस्थापनाच्या उल्लेखनीय कार्यासाठी ‘स्वच्छ सुजल
शक्ति सन्मान 2023’ ने केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र
सिंह शेखावत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा पुस्कार नांदूर हवेलीच्या
सरपंच शेख मन्नाबी मुज़फ्फर पटेल यांनी
स्वीकारला.
येथील
विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ति मंत्रालयाच्यावतीने आज ‘स्वच्छ
सुजल शक्ति सन्मान 2023’ सोहळयाचे आयोजन करण्यात आले.
यासह ‘जलशक्ति अभियान :
कैच
द रेन 2023’ या कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रपती, केंद्रीय जलशक्ति मंत्री गजेंद्र सिंह शेखावत,
केंद्रीय जलशक्ति राज्यमंत्री प्रल्हाद
सिंह पटेल, विश्वेश्वर टुडू, केंद्रीय संचार राज्य मंत्री देवुसिंह चौहान, पेयजल
आणि स्वच्छता विभागाच्या सचिव विनी महाजन, जल संसाधन, नदीविकास सचिव पंकज कुमार व्यासपीठवर
उपस्थित होते.
या कार्यक्रमात केंद्रीय जलशक्ति मंत्रालयाच्यावतीने
देशभरातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये असणाऱ्या महिलांचा ‘स्वच्छ सुजल
शक्ति सन्मान 2023’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. यातील
18 माहिलांचा सन्मान राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र प्रदान करून करण्यात
आले. तर, 18 महिलांचा सन्मान केंद्रीय जलशक्ति मंत्री श्री शेखावत यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये बीड जिलह्यातील नांदूर हवेलीच्या सरपंच
शेख मन्नाबी पटेल यांनाही सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात केंद्रीय संचार मंत्रालयाच्यावतीने ‘माय
स्टॉप’ या विशेष डाक तिकीटीचे लोकार्पण
राष्ट्रपती यांच्याहस्ते आंतरराष्ट्रीय
महिलादिनाच्या औचित्याने जलशक्ति मंत्रालयाच्या प्रेरणेने करण्यात आले.
बीड
जिल्ह्यातील नांदूर हवेली ग्राम
पंचायतीमध्ये असा घडवला बदल
बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली- हिंगणी
हवेली-खामगाव-जप्ती पारगाव समुहाच्या ग्रामपंचायतच्या सरपंच शेख मन्नाबी पटेल
यांनी गावात जलजीवन मिशन अंतर्गत नळाव्दारे नियमित आणि स्वच्छ पाणी पुरवठा पूरविला जातो तसेच याची नीट देखभाल
आणि व्यवस्थापन केले जाते या उल्लेखनीय कामगिरीसाठी गौरविण्यात आले. या गावांमध्ये
100% नळ जोडणी असून गावतील प्रत्येक घरात नळ
असल्याचे (हर घर जल) घोषित करण्यात आले.
सर्वच कुटुंबे पाणीपट्टी जमा करतात. गावात सर्वांना कार्यान्वित नळ जोडणी मिळाली
आहे. गावातील सर्वच भागात समान दाबाने पाणी मिळते, त्यासाठी जलसुरक्षक यांना
प्रशिक्षण दिले असून गावात गृहभेटी दरम्यान वारंवार याबाबत माहिती घेतली जात असल्याचे
श्रीमती पटेल यांनी सांगितले.
यासह नियमित पाणीपुरवठा नसल्यास याबाबतच्या तक्रारींची
माहिती गृहभेटीदरम्यान किंवा जलसुरक्षक यांच्याकडे प्राप्त झाल्यास तात्काळ त्या तक्रारीचे निवारण
करण्यासाठी ग्रामपंचायत व सरपंच दखल घेतात. पुढच्या गृह भेटीत तक्रारीचे निवारण
झाले असल्याची खात्री करून घेतात. या नियमित भेंटीमुळे तक्रार पुस्तिकेची
अथवा तक्रार पेटीची आवश्यकता भासत नाही.
तक्रांरीचा निपटारा लगेच लागतो. गावातील
नळ पाईप लाईनमध्ये पाणी गळती किंवा तूट फूट नसल्याने नियमित शुद्ध पाणीपुरवठा होत असतो.
पाणी गुणवत्ता अभियानांतर्गत गावात पाणी तपासणी साठीची ‘एफ
टी के किट’ उपलब्ध आहे. त्याद्वारे, पाण्याचे
नियमित रासायनिक व अनुजैविक तपासणी केली जाते. तसेच, पाण्याचे नियमित क्लोरीनेशन केले जाते, अशी माहिती श्रीमती पटेल यांनी
पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिली.
याकार्यक्रमास राज्यातून रायगड जिल्ह्यातील सलविंदेच्या
सरपंच सोनल घुले, अहमदनगर जिल्ह्यातील अमरापूरच्या सरपंच संगीता पोटफोडे, पालघर
जिल्ह्यातील कुडन ग्रामपंचायतीच्या सरपंच विजया म्हात्रे, बीड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित
बापुराव पवार, राज्य पाणी पुरवठा विभागाच्या अवर सचिव राजेश्री सारंग, राज्य पाणी
आणि स्वच्छता मिशन चे समन्वयक किरण गुमरे, अर्पणा डानोरीकर सहाय्यक सल्लागार
हे राज्याचे प्रतिनिधी म्हणून आजच्या कार्यक्रमास उपस्थित होते.
000000
आम्हाला
ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
अंजु निमसरकर वि.वृ.क्र. 49/
दि.04.03.2023
Friday, 3 March 2023
सायकल ने पर्यावरणाचा संदेश देत स्वर्णिम चर्तुभुज वारी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम
नवी दिल्ली, 3 : स्वच्छ
भारत, पर्यावरणपूरक भारत, प्रदूषण
मुक्त भारत असा संदेश घेऊन नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन च्या काही वरिष्ठ सायकल
स्वारांनी देशाच्या स्वर्णिम चतुर्भज (Golden Quadrilateral) सायकल ने पुर्ण करण्याचा उपक्रम हाती घेतला. या प्रवासाच्या तिसऱ्या
टप्प्यात 4 हजार सहाशे किलोमिटरचा प्रवास करून
गुरूवारी पहाटे ही टिम दिल्लीत
दाखल झाली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र
परिचय केंद्राला भेट दिली.
नाशिक सायकलिस्ट
फाउंडेशन च्या 7 वरीष्ठ सायकलस्वारांनी स्वर्णिम चर्तुभुज प्रवास करण्याचा संकल्प
करून 17 फेब्रुवारीपासून या सायकल प्रवासाला सुरूवात केली असून 2 मार्चपर्यंत रिले पद्धती सायक्लिंग करून दिल्लीपर्यंतचा
4600 किमीचा प्रवास पूर्ण केला. या सायकल समूहाने परिचय केंद्राला भेट दिली.
यावेळी ही त्यांच्यातील ऊर्जा आणि ऊत्साह कायम दिसत होता. परिचय केंद्राच्या
माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांनी या चमुचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी त्यांनी
आपल्या सायकल प्रवासाविषयी सविस्तर माहिती दिली. नाशिक सायकलिस्ट फाँउडेंशन चे
चंद्रकांत नाईक (72 वर्ष) यांनी सांगितले, निश्चित अशा उद्देशासाठी सायकल
चालविणे हा आमचा संकल्प आहे. स्वर्णिम चतुर्भज हा सायकल प्रवास पूर्ण करीत असताना
वर्तमानाची गरज ओळखून स्वच्छ भारत, पर्यावरण पूरक भारत,
प्रदूषण मुक्त भारत असा संदेश देत या सायकल परिक्रमेला सुरवात झाली
असल्याचे नाईक यांनी सांगितले. त्यांच्या सायकल चमुमध्ये अनिल वराडे(68वर्ष) रमेश
धोटे (64 वर्ष),रविंद्र दुसाने (62 वर्ष), अविनाश लोखंडे (62वर्ष), मोहन देसाई (60 वर्ष),
संजय कुलकर्णी (60 वर्ष) केवळ वरिष्ठ नागरिक आहेत, हे विशेष. या चमुने 17 फेब्रुवारीला सुरूवात केली. प्रत्येक सायकलस्वार
किमान 20 किमी सायकल चालतो पुढे दुसरा सायकलस्वार चालतो. असे रिले पद्धतीने सायकल
चालवित असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मागील 12 वर्षांपासून
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन असून या फाउंडेशनमध्ये सर्वच वयोगटातील किमान 4 हजार
सायकलस्वार सदस्य आहेत. प्रत्येक
महिन्याला एक सायकल ट्रिप काढली जाते. यापूर्वी नर्मदा, गोदावरी
परिक्रमा पूर्ण केल्या आहेत. पानिपत वारी असेही उपक्रम राबविले आहे. यासह
पंढरपूरची, शिर्डीची, सिद्धिविनायक
सायकल वारीही काढली जाते. जन जागृतीपर
दिनविशेष उपक्रमातही फाउंडेशनच्या माध्यमातून सायकलवरून जन जागृती उपक्रम राबविले
जात असल्याचे चमुच्यावतीने सांगण्यात आले.
Wednesday, 1 March 2023
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली केंद्रीय गृह मंत्री यांची सदिच्छा भेट
नवी दिल्ली ,
01 : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज नार्थ ब्लॉक येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतली.
श्री. बैस यांनी केंद्रीय गृह मंत्री श्री शाह यांना पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची
मुर्ती भेट दिली. यावेळी केंद्रीय गृह
मंत्री श्री शाह यांनी श्री. बैस यांच्या
सोबत महाराष्ट्रासंबंधी चर्चा केली.
Tuesday, 28 February 2023
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली राष्ट्रपती यांची सदिच्छा भेट
नवी दिल्ली ,
28 : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे पत्नी श्रीमती रमाबाई बैस यांच्या समवेत
सदिच्छा भेट घेतली.
याप्रसंगी श्री. बैस यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना पुष्पगुच्छ
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती भेट दिली.
राष्ट्रपती यांनी यावेळी श्री. बैस यांच्या सोबत
महाराष्ट्रासंबंधी चर्चा केली.

















