Tuesday, 31 January 2017

राज्यातील दोन शहिदांना उत्तम जीवन रक्षा पदक प्रदान
















नवी दिल्ली 31 : उत्तराखंड येथे वर्ष 2013 मधे आलेल्या नैसर्गीक आपत्तीच्या वेळी आपल्या प्राणांची आहूती देऊन भाविकांना वाचविणारे शहीद शशीकांत रमेश पवार, शहीद गणेश अहीरराव या जवानांना आज मरणोत्तर उत्तम जीवन रक्षा पदक प्रदान करण्यात आले. हे पदक शही द जवान श्री पवार यांची पत्नी  श्रीमती सुवर्णा शशीकांत पवार तसेच  शहीद श्री  अहीरराव यांची पत्नी श्रीमती योगीता यांनी  स्वीकारले.  
            राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) च्या 12 वा स्थापना दिवसानिमित्त विज्ञान भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची अध्यक्षता गृहराज्य मंत्री किरेण रीजीजू यांनी केली. याप्रसंगी  श्री रिजीजू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
जून 2013 मध्ये उत्तराखंड येथे नैसर्गीक आपत्ती झाली होती. त्यावेळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने अभुतपुर्वक कामगिरी करून येथे अडकलेल्या भाविकांना सुखरूप बाहेर काढले होते. या कार्यादरम्यान राज्यातील जवान शशीकांत रमेश पवार आणि गणेश अहीरराव हे शहीद झाले. वर्ष 2014 च्या प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संध्येला या जवनांना उत्तम जीवन रक्षा पदक जाहीर झाले होते.

यासह वर्ष 2015 मध्ये हेड कॉस्टेबल अन्ना जलिंदर तांबे यांना ऊत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले होते, आज श्री तांबे यांना हे पदक प्रदान करण्यात आले. 

Sunday, 29 January 2017

राजधानीत हुतात्म्यांना आदरांजली




नवी दिल्ली, 30 : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणा-या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 2 मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून महाराष्ट्र सदनात तसेच महाराष्ट्र परिचय केंद्रात सोमवारी हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त संजय आघाव, राजीव मलीक, अजित सिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.
  महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना आदरांजली
 महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना मौन पाळून आदराजंली वाहण्यात आली. यावेळी उपसंचालक दयानंद कांबळे  यांच्यासह  कार्यालयातील अधिकारी  कर्मचारी उपस्थित होते.

00000

Saturday, 28 January 2017

महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिस-या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान











नवी दिल्ली, 28 : लोकमान्य टिळकांच्या योगदानावर आधारित`बाळ गंगाधर टिळकया महाराष्ट्राच्या चित्ररथाला शनिवारी सर्वोत्तम पथसंचलनाचा तिस-या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्‍ते शनिवारी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य  विभागाचे  उपसचिव संजय भोकरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.   

            कँन्टॉनमेंट बोर्डाच्या रंगशाला सभागृहात एका शानदार समारंभात प्रजासत्ताक दिनी पार पडलेल्या पथ संचलनातील चित्ररथ पुरस्कार विजेत्या राज्यांना श्री.भामरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. लोकमान्य टिळकांच्या 160 व्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्याच्यावतीने यावर्षी टिळकांच्या जीवनावर आधारीत 'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक' हा चित्ररथ सादर करण्यात आला होता.  
शुक्रवारी उशिरा रात्री संरक्षण मंत्रालयाच्यावतीने राजपथावरील चित्ररथ पथसंचलनाचा निकाल जाहीर करण्यात आला.  अरूणाचल प्रदेशला  प्रथम, त्रिपुरा ला द्वितीय तर महाराष्ट्राला तिस-या क्रमांकाचा  पुरस्कार जाहीर झाला .

महाराष्ट्राच्यावतीने श्री. भोकरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्रासह अरूणाच प्रदेशला प्रथम तर त्रिपुराला  द्वितीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.  अरूणाचल प्रदेशच्या वतीने राजपथावर याक नृत्य प्रदर्शित करण्यात आले होते. त्रिपुराच्या चित्ररथाच्या माध्यमातून रियांग हे आदिवासी नृत्य प्रदर्शित करण्यात आले होते. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी प्रत्येक राज्याच्या कलाकारांच्या चमूची भेट घेतली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. यावर्षी राजपथावर 17 राज्यांचे आणि 6  केंद्रीय मंत्रालयांचे असे एकूण २३ चित्ररथ प्रदर्शित करण्यात आले होते.
                                     राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाची गौरवशाली परंपरा कायम
महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दिल्लीतील राजपथावर राज्याचे वैशिष्टय दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची दीर्घ परंपरा आहे. 1980 मध्ये शिवराज्याभिषेक या चित्ररथास, 1983 मध्ये बैल पोळा या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला. यानंतर लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे शताब्दीवर्ष’, हापूस आंबा’, बापू स्मृती या चित्ररथांनी 1993 ते 1995 असे सलग तीन वर्ष महाराष्ट्राला प्रथम पारितोषिकाचा बहुमान मिळवून दिला. 1986 मध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महाराष्ट्राचे योगदान या चित्ररथास द्वितीय पारितोषीक प्राप्त झाले होते. 1988मधे राज्याच्यावतीने प्रदर्शित करण्यात आलेल्या लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासीक खटला यास द्वितीय पारितोषीक मिळाले होते. 2007 मधे जेजुरीचा खंडेराय या चित्ररथास तृतिय तर 2009 मधे धनगर या चित्ररथास द्वितीय पारितोषीक मिळाले आहे. 
           2015 मध्ये सादर करण्यात आलेल्या पंढरीची वारी या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला होता. यावर्षी तिसरा क्रमांक मिळवून महाराष्ट्राने राजपथावरील चित्ररथांची गौरवशाली परंपरा कायम ठेवली आहे.  

                                   ००००००

Friday, 27 January 2017

मुंबई उत्पादन आणि सीमा शुल्क विभागाच्या 5 अधिका-यांना राष्ट्रपती पुरस्कार





नवी दिल्ली 27, : मुंबई क्षेत्रातील उत्पादन आणि सीमा शुल्क विभागाच्या 5 अधिका-यांना उल्लेखनीय योगदानासाठी केंद्रीय अर्थ मंत्री अरूण जेटली  यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्काराने आज सन्मानीत करण्यात आले.
केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क मंडळाच्यावतीने येथील माळवनकर  सभागृहात आयोजित जागतिक सीमा शुल्क दिवस २०१७ चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली होते. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री  संतोष गंगवार,  महसूल सचिव डॉ हसमुख आडिया, केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क सचिव नजीब शहा आदी उपस्थित होते.
यावेळी एकूण 34 उत्पादन आणि सीमा शुल्क विभागच्या अधिका-यांना राष्ट्रपती प्रशस्ती पत्राने सन्मानीत करण्यात आले.  मुंबई क्षेत्रातील या विभागाच्या 5 अधिका-यांनमध्ये  आयुक्त सीमा शुल्क, उत्पादन शुल्क आणि सेवा कर अपीलीय प्राधिकरणाचे (सेस्टेट), प्राधिकृत प्रतिनिधी हितेश अजीत शाह, केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे, सहायक आयुक्त महेंद्र प्रताप सिंग सेंगर, वरिष्ठ गुप्तचर महसूल महासंचालनालयाच्या क्षेत्रीय युनिटचे, गुप्तचर अधिकारी, गणेश राय, बृहद आयकर युनिटचे अधीक्षक पी.ए. विंसेंट, जोखीम व्यवस्थापन विभागाचे प्रतिबंधात्मक अधिकारी अय्यर गणपति रमन वी. यांना केंद्रीय अर्थ मंत्री अरूण जेटली यांनी प्रमाण पत्र देऊन सन्मानीत केले.

याप्रसंगी डब्लु.सी.ओ. प्रमाणपत्राचे वितरण केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईच्या आरएमडी विभागाचे अतिरीक्त संचालक पंकज बोडखे यांना प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

लष्करातील चार मराठी अधिका-यांना परम विशिष्ठ सेवा पदक जाहीर





नवी दिल्ली, 27 : भारतीय लष्कारातील मानाच्या समजल्या जाणा-या परम विशिष्ठ सेवा पदकावर(पीव्हीएसएम)महाराष्ट्राच्या चार लष्करी अधिका-यांनी नाम मुद्रा कोरली आहे.  
        दरवर्षी प्रजासत्ताक दिनी भारतीय लष्कराच्यावतीने शौर्य व विशिष्ठ सेवेसाठी पुरस्कार जाहीर केले जातात. मुळचे महाराष्ट्राचे व लष्करात सेवारत असणा-या अधिका-यांनी यावर्षी या पुरस्कारांवर छाप सोडली आहे. लष्करातील सर्वोच्च पदक म्हणून संबोधले जाणारे परम विशीष्ठ सेवा पदक लेफ्टनन जनरल(ले.ज.) राजीव वसंत कानीटकर, ले.ज.अशोक भिम शिवाने, ले.ज. अविनाश लक्ष्मण चव्हाण आणि ले.ज. विनोद गुलाबराव खंडारे यांना जाहीर झाले आहेत. यांसह विविध श्रेणींमध्ये लष्करी अधिका-यांना दिल्या जाणा-या  पुरस्कारांवर मराठी मोहर उमटली आहे. शहीद नायक पांडुरंग गावडे यांना मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्कार जाहीर झाला.         
ले.ज. राजेंद्र रामराव निंभोरकर यांना उत्तम युध्द सेवा पदक पुरस्कार जाहीर झाले आहे. अतिविशीष्ठ सेवा पदक पुरस्कार ले.ज.अशोक आंब्रे आणि ले.ज. मनोज मुकुंद नरवने यांना जाहीर झाले आहेत.
           शहीद नायक पांडुरंग महादेव गावडे यांना मरणोत्तर शौर्य चक्र
राष्ट्रीय रायफल्सचे नायक पांडुरंग महादेव गावडे यांना मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्कार जाहीर झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील नायक पांडुरंग गावडे जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात चक द्रुगमुल्ला येथे दहशतवाद्यांशी उडालेल्या भीषण चकमकीत गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान २२ मे २०१६  रोजी नायक गावडे यांचा  मृत्यू झाला.  
राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल अमिताभ वालावलकर यांना युध्द सेवा पदक पुरस्कार जाहीर झाला आहे.   
लष्करात शौर्य गाजविण्यासाठी देण्यात येणारे सेना पदक राज्यातील 5 अधिका-यांना जाहीर झाले आहे.महाराष्ट्राचे ले.कर्नल. रनजीतसिंह पवार यांना मरणोत्तर सेना पदक जाहीर झाले आहे. मेजर(मे) राघवेंद्रकुमार येंडे, मे.अर्जुन अर्मोद चव्हाण, मे. ऋषीकेश अरूण बरडे , कॅप्टन मानस सुधाकर जोंधळे  आणि सुभोदार सुनिल नामदेव पाटील यांना सेना पदक जाहीर झाले आहे.  
कर्नल अनिलकुमार जोशी यांना सेना पदक जाहीर झाले आहे. ब्रिगेडीयर संदीप महाजन, कर्नल धनंजय एम.भोसले यांना विशिष्ठ सेवा पदक जाहीर झाले आहे. लष्कराच्या वायुसेवेचे मेजर नितीन शिवाजीराव भिकाने यांना मेघदूत या विशिष्ठ ऑपरेशनसाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी लेफ्टनन कर्नल राजेश विलास हाकरे, मेजर हर्षल वासुदेव कचरे, मेजर सुमीत जोशी आणि स्पेशल परपज रायफलचे अभय हरिभाऊ पगारे यांना ऑपरेशन रक्षक मध्ये केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे.  


0000 

Thursday, 26 January 2017

राजधानीत 68 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा : राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाचे शानदार प्रदर्शन












नवी दिल्ली, 26 : देशाचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबु धाबीचे क्राऊन युवराज तथा संयुक्त अरब अमीरातच्या सशस्त्र दलाचे उप सर्वोच्च कमांडर शेख मुहम्मद बिन जायद अल नाहयान  यांच्या उपस्थितीत आज राजपथावर पार पडलेल्या 68 व्या प्रजासत्ताक दिन सोहळयात महाराष्ट्राच्या चित्ररथाचे शानदार प्रदर्शन बघायला मिळाले.

राजपथावर देशाच्या समृध्द सांस्कृतिक वारसा व शस्त्रसज्जते सोबतच 17 राज्यांचे चित्ररथ तसेच 6 केंदीय मंत्रालयाच्या योजनांवर आधारीत चित्ररथाने लक्ष वेधले. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त पथ संचलनामध्ये महाराष्ट्राची नीशा पाटीलचा सहभागाने ऊर अभिमानाने दाटून आला. यासह एनसीसी आणि एनएसएसच्या पथकांमध्येही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी राजपथावर सहभाग नोंदवून महाराष्ट्राची पंरपरा कायम ठेवली.
  
        प्रजासत्ताक दिनाच्या सकाळी देशाच्या राजधानीत पसरलेले धुके, जोडीला असलेली कडाक्याची थंडी यास न जुमानता दिल्लीकर व देश-विदेशातून राजपथावर अलोट जनसमुदाय जमला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजपथावर आगमन झाले. देशासाठी शहीद झालेल्या वीर सैनिकांच्या स्मरनार्थ सदैव तेवत राहणा-या इंडियागेटस्थितअमर जवान ज्योतीला पंतप्रधानांनी देशवासीयांच्यावतीने आदरांजली वाहिली. यावर्षीच्या प्रजासत्ताकदिनाचे विशेष पाहुणे अबु धाबीचे क्राऊन युवराज तथा संयुक्त अरब अमीरातच्या सशस्त्र दलाचे उप सर्वोच्च कमांडर शेख मुहम्मद बिन जायद अल नाहयान  आणि राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे राजपथावर आगमन झाले. उपराष्ट्रपती हामीद अन्सारी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ध्वजारोहण केले यानंतर, राष्ट्रगीत व त्यासोबतच 21 तोफांची सलामी देण्यात आली. असम रेजीमेंटच्या 35 व्या तुकडीचे  हवीलदार हंगपन दादा (13622536एन) यांना त्यांच्या अभुतपूर्व शौर्य व बलीदानासाठी मरणोत्तर सर्वोच्च शौर्य पदक अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पत्नी श्रीमती चेसन लोवांग दादा यांनी हा सन्मान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते स्वीकारला.
विविध सैन्य दलाचे पथक

            यावर्षी संयुक्त अरब अमिरात यांचे सैन्य दलाच्या पथकाने पथसंचलनात भाग घेतला. भारताची शस्त्र सज्जता दर्शविणा-या सेनेच्या तीनही दलांचे पथक, आकर्षक चित्ररथ , सेनेच्या सैनिकांचे आणि बॅड पथकांचे पथसंचलन, सिमा सुरक्षा दलाचे घोडदल, उंटदल यांचे पथसंचलन आणि बायकर्सच्या चित्तथरारक कसरती तसेच असमानी करतबीने  उपस्थितांच्या टाळया मिळवत होते.

              वैशिष्टयपूर्ण व वैविध्यपूर्ण संस्कृती दर्शविणा-या एकूण 17 राज्यांचे आणि 6 केंद्रांतील मंत्रालयांनी तयार केलेल्या आकर्षक चित्ररथांच्या पथसंचलनाने उपस्थितांचा उत्साह व्दिगुणीत केला.
           
असामान्य शौर्य दाखविणा-या देशभरातील राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त 25 मुला-मुलींनी यावेळी उघडया जिप्सीमधून उपस्थितांना अभिवादन केले. जळगावची नीशा पाटील हीचा यामध्ये समावेश होता. 

राजपथावर लोकमान्य टिळक यांच्यावर आधारीत चित्ररथ

महाराष्ट्राच्यावतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे व्यक्तीमत्व दर्शविणारा चित्ररथ राजपथावर प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा टिळक युग जीवंत झाल्यासारखे जाणवले. राजपथाच्या सलामी मंचापुढून जात असतांना महाराष्ट्रासह देशातील अनेक नेत्यांनी उभे राहून या चित्ररथाला मानवंदना दिली.
 लोकमान्य टिळकांच्या 160 व्या जयंती निमित्त या चित्ररथाच्या माध्यमातून देशवासियांना  टिळकांचे बहुआयामी व्यक्तीमत्व आणि स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान दर्शविण्यात आले. भारत देश पारतंत्र्यात असताना लोकमान्य टिळकांनी मराठाकेसरीवृत्तपत्रातून केलेली सामाजिक जागृकता आणि ब्रिटीशांना दिलेले सडेतोड उत्तर, छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि गणेशोत्सव सुरु करून भारतीयांना संघटीत करण्याचे केलेले कार्य, टिळकांवर चालविण्यात आलेले खटले, शिक्षण, शारीरिक शिक्षणाला दिलेले प्रोत्साहन आदीं बाबींना या चित्ररथाच्या माध्यमातून दर्शविण्यात आले.
चित्ररथाच्या प्रारंभी लोकमान्य टिळकांचा 15 फुट उंचीचा पुतळा होता. ते अग्रलेख लिहीताना दर्शविण्यात आले. पुतळयाच्या मागे एक प्रिंटीग प्रेस दर्शविण्यात आली. त्यातून छपाई होणारे केसरीमराठा वृत्तपत्र दर्शविण्यात आले. चित्ररथाच्या मध्यभागी फिरते मंदिर दर्शविण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती  मुर्तीची स्थापना करतानाचे दृष्य होते. चित्ररथाच्या उजव्या आणि डाव्या बाजुला बंगालच्या फाळणीनंतर टिळकांवर चालविण्यात आलेला मुंबई उच्च न्यायालयातील खटला आणि मंडाले येथील तुरुंगवास दर्शविण्यात आला. चित्ररथाच्या शेवटच्या भागात मल्लखांब आणि कुस्तीकरणारे मुले  प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करताना दिसले. टिळकांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अधोरेखित करण्यासाठी बाकावर बसलेला शाळकरी विद्यार्थ्यांची प्रतिकृती ठेवण्यात  आली. 

       स्वराज्य हा माझा जन्म सिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच ही  टिळकांची उदघोषणा चित्ररथा सोबत ऐकायला मिळली.  टिळक युग पुन्हा एकदा नजरे समोरून गेले. या चित्ररथाच्या  दोन्ही बाजुला पयल नमन हो करितो वंदन, तुम्ही ऐका हो गुणीजन , मी करितो कथन.. या गितावर नृत्य करणारे कलाकार हेाते.

राजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्रातील २३ एनसीसी कॅडेटस सहभागी

मानाचे समजण्यात येणा-या राजपथावरील पथसंचलनात देशभरातील १४४ एनसीसी कॅडेटस सहभागी झालेत. त्यामध्ये महाराष्ट्राच्या २३ कॅडेट्सने सहभाग नोंदविला.
 

महाराष्ट्राचे  14  एनएसएस स्वयंसेवक पथसंचलनात सहभागी
         
राजपथावरील पथ संचलनात महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) 14 आणि गोव्यातील 2 अशा  एकूण 16 विद्यार्थी- विद्यार्थीनीं सहभाग नोंदविला. यामध्ये पश्चिम विभागात समावेश असणा-या महाराष्ट्रातून 7 विद्यार्थी आणि 7 विद्यार्थीनी तर गोव्यातून प्रत्येकी 1 विद्यार्थी आणि 1  विद्यार्थीनी असे एकूण 16 स्वयंसेवकांनी आज राजपथावरील पथ संचलनात सहभाग घेतला.


Wednesday, 25 January 2017

महाराष्ट्र परिचय केंद्रात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा




नवी दिल्ली 25 : 7 वा राष्ट्रीय मतदार दिवस महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी कार्यालयातील उपस्थित अधिकारी कर्मचा-यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवून, देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, नि:पक्षपाती व शांततापूर्ण…………….. न पडता मताधिकाराचा वापर करू अशी  शपथ दिली.

Tuesday, 24 January 2017

महाराष्ट्रातील चौघांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर



 नवी दिल्ली, दि. २५ : राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या अनुमतीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे जीवन रक्षा पदक पुरस्कार २०१६आज जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील गोविंद  लक्ष्मण तुपे यांना उत्तम जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहे. तर जीवन रक्षा पदक पुरस्कार  तेजस ब्रिजलाल सोनवणे, मनोज सुधाकरराव बारहाते आणि निलकांत रमेश हरिकांत्रा यांना जाहीर झाला आहे. 
देशातील ३६ नागरीकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यातील ७ व्यक्तिंना हे पुरस्कार  मरणोत्तर जाहीर झाले आहेत.सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार५ जणांना जाहीर झाले आहेत. उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार ८ जणांना आणि जीवन रक्षा पदक पुरस्कार२३ जणांना जाहीर झाले आहेत. पुरस्काराचे स्वरूप पदक, केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि डिमांड ड्राफ्ट स्वरूपात पुरस्कार राशी असे आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काही कालावधीने देशातील संबंधीत राज्य शासनाच्यावतीने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.   
                                                                     ०००००