Friday, 30 August 2019

महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी सर्वाधिक 1 लाख 23 हजार घरे मंजूर





नवी दिल्ली, 30 : केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)’ अंतर्गत आज महाराष्ट्राला सर्वाधिक 1 लाख 22 हजार829 घरे मंजूर झाली आहेत. या मंजुरीसोबतच आतापर्यंत एकूण 11 लाख 20 हजार घरांच्या मंजुरीसह महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक घरे मंजूर झालेले तिसरे राज्य ठरले आहे.

        केंद्रीय गृह निर्माण व नगर विकास मंत्रालयाच्या केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या आज झालेल्या 46 व्या बैठकीत देशातील 10 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांसाठी एकूण 2 लाख 98 हजार 783 घरे मंजूर करण्यात आली आहेत. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार  सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीत महाराष्ट्राला 62 प्रकल्पांसाठी सर्वाधिक एकूण  1 लाख 22 हजार829 घरे मंजूर करण्यात आली आहेत.

    प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत  केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या 46 व्या बैठकीत महाराष्ट्रासह  (1,22,829), तामिनाडू (52,305), उत्तरप्रदेश (45,770), मध्यप्रदेश(27,827), बिहार (18,036), जम्मू आणि काश्मीर(12,699), पंजाब (10,234), छत्तीसगड (6,960), हिमाचल प्रदेश (1,189) आणि  अरूणाचल प्रदेश (944)  या  10 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांसाठी या बैठकीत एकूण 2  लाख 98 हजार 783 घरे मंजूर करण्यात आली आहेत.

बैठकीत एकूण 15 हजार 109 कोटी खर्चाच्या 865 प्रकल्पांसाठी केंद्र शासनाने 4,482 कोटींचा सहायता निधी मंजूर केला आहे.    
                   
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीने आतापर्यंत देशभरात विविध राज्यांकरिता  88 लाख 16 हजार  घरांना मंजुरी  दिली आहे. यात एकूण 11 लाख 20 घरांच्या मंजुरीसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे. 13 लाख 96 हजार घरांच्या मंजुरीसह उत्तर प्रदेश पहिल्या तर 12 लाख 48 हजार घरांच्या मंजुरीसह आंध्र प्रदेश दुस-या स्थानावर आहे.
  
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                                                                    0000
 रितेश भुयार/वि.वृ.क्र 209 / दि. 30-08-20019


Thursday, 29 August 2019

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय सुरु करण्यास केंद्राची मंजुरी


                                         
नवी दिल्ली, 29 : महाराष्ट्र शासनाच्यावतीने नागपूर  येथे उभारण्यात आलेले  गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्राहालय सुरु करण्याच्या राज्यशासनाच्या प्रस्तावाला आज केंद्रीय वने- पर्यावरण व हवामानबदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

             केंद्रीय वने पर्यावरण व हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे  केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली आहे.  नागपूर  शहराच्या वायव्येकडे असलेल्या गोरेवाडा तलाव परिसरात महाराष्ट्र शासनाने आंतरराष्ट्रीय प्राणी संग्राहालय उभारले आहे. या प्राणी संग्रहालय उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून या वर्षा अखेर ते  पूर्ण होणार आहे. आजच्या मंजुरीमुळे आता या कामालाही वेग येणार असून पर्यटकांना गोरेवाडा प्राणी संग्रहालय बघण्याची मोठी पर्वणीच उपलब्ध होणार आहे.
वनसंवर्धन कायद्याच्या मंजुरी नंतर डिसेंबर २०१७ मध्ये या प्राणीसंग्रहालयाच्या बांधकामास सुरुवात झाली. १० मार्च २०१९ रोजी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या बृहत विकास आराखड्याला  मुंजरी दिली होती.    

दरम्यान, या प्राणी संग्रहालयात इंडियन सफारी अंतर्गत बिबटे व अस्वल या प्राण्यांच्या सफारीला मंजुरी देण्याबाबतचा प्रस्ताव राज्यशासनाने १२ ऑगस्ट २०१९ रोजी  केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला होता. या पार्श्वभूमीवर २५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयांतर्गत कार्यरत केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या अधिका-यांनी  प्रत्यक्ष स्थळाला भेट देवून पाहणी केली होती. या अधिका-यांनी मंत्रालयाकडे आपला अहवाल सोपवला होता त्यानुसार  गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्राहालयात इंडियन सफारीला मंजुरी मिळाली असून या सफारीच्या माध्यमातून आता पर्यटकांना अस्वल व बिबट जवळून बघता येणार आहेत.                                                         
गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील इंडियन सफारी ११२ हेक्‍टरमध्ये विकसित करण्यात येत आहे. या सफारीमध्ये तृणभक्षक, वाघ, बिबट, अस्वल सफारीचा समावेश असणार आहे. खासगी आणि सार्वजनिक सहभागातून ५६४ हेक्‍टरमध्ये इंडियन, अफ्रिकन सफारी, बायो पार्क, नाइट सफारी, बर्ड पार्क विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी एस्सेल वर्ल्डने पुढाकार घेतला असून, बांधा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एफडीसीएम एस्सेल वर्ल्ड गोरेवाडा झू प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. हा प्रकल्प ४५२ कोटींचा आहे. यात २५२ कोटींचा वाटा एस्सेल वर्ल्डचा असून २००  कोटी रुपये राज्य सरकारचे राहणार आहेत.       

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                                                                 000000000
 रितेश भुयार/वि.वृ.क्र 207 / दि. 29-08-20019




मर्झबान पटेल यांना द्रोणाचार्य तर नितीन किर्तने यांना ध्यानचंद पुरस्कार प्रदान






                     प्रभात कोळीचा ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने’ सन्मान

नवी दिल्ली, 29 : महाराष्ट्राचे सुपूत्र मर्झबान पटेल यांना हॉकीतील योगदानासाठी  द्रोणाचार्य जीवनगौरव तर नितीन किर्तने यांना टेनिस मधील योगदानासाठी ध्यानचंद पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. जलतरणपटू प्रभात कोळी यास मानाचा ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने आज राष्ट्रपती भवनाच्या दरबारहॉल मध्ये ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार- २०१९’ चे वितरण करण्यात आले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू, मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन आदी मंत्री, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या सचिव उपमा चौधरी  यांच्यासह विविध क्षेत्रातातील मान्यवर  यावेळी उपस्थित होते.
  या शानदार कार्यक्रमात हॉकीप्रशिक्षक मर्झबान पटेल यांना द्रोणाचार्य जीवनगौरव तर टेनिस प्रशिक्षक नितीन किर्तने यांना ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात आला. सागरी जलतरणातील उत्तम कामगिरीसाठी जलतरणपटू प्रभात कोळी यास मानाच्या ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने’ गौरविण्यात आले. प्रत्येकी पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या तिन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.
                                 मर्झबान पटेल यांनी घडविले ऑल्मिपीयन खेळाडू
          हॉकी प्रशिक्षक मर्झबान पटेल यांनी गॅवीन फरेरा, विरेंद्र स्केना, नासिर खान, युवराज वाल्मीकी, ॲड्रीन डिसुजा, देवेंद्र वल्मिकी आदी ऑल्म्पिीक हॉकी खेळाडू  घडवले आहेत. हॉकी प्रशिक्षक म्हणून निवृत्ती झाल्यानंतर पटेल यांनी  खेळाप्रती आपली प्रतिबध्दता दाखवून प्रशिक्षण कार्य सुरुच ठेवले. पटेल हे गेल्या चार दशकांपासून मुंबईत गोरगरीब मुलांना हॉकीचे मोफत प्रशिक्षण देत आहेत. मर्झबान पटेल यांनी हॉकी प्रशिक्षक म्हणून दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेवून त्यांना द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले .
                                      टेनिस प्रशिक्षक नितीन किर्तने यांच्या योगदानाची दखल 
मुंबईतील नितीन किर्तने यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा, आशियाकप, दक्षिण आशिया क्रीडा  स्पर्धांसह राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विविध पदक जिंकली आहेत. वयाच्या 5 व्या वर्षापासूनच त्यांनी टेनिस खेळायला सुरुवात केली. डावखुरे खेळाडू असणारे किर्तने यांनी एकेरी आणि दुहेरी टेनिस स्पर्धेत सहभाग घेवून उत्तम रँकींग मिळविली आहे. निवृत्ती नंतर त्यांनी अनेक युवा टेनिसपटूंना प्रशिक्षण दिले त्यांच्या योगदानाची दखल घेवून त्यांना ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
                सागरी जलतरणातील साहसासाठी प्रभात कोळीचा सन्मान  
         सर्वात कमी वयात जपान सुकानु चॅनल पार करण्यासाठी आणि महिन्यापेक्षाही कमी कालावधित दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शेजारील सहा खुले वॉटर ब्रॉडकास्ट पूर्ण करण्याच्या कामगिरीसाठी  प्रभात कोळी याची  ‘लिमका बुक ऑफ नॅशनल रेकॉर्डमध्ये’ नोंद झाली आहे. नवी मुंबई येथील नेरूळ भागातील प्रभात कोळी या १९ वर्षाच्या युवा जलतरणपटुने न्यूझीलंडमधील कूक स्ट्रीट, इंग्लीश खाडी, कॅटलिना, कैवी, सुगारु, नॉर्थ चॅनल, जिब्राल्टरची सामुद्रधुनी आणि केपटाऊनचा समुद्र असे आठ खडतर टप्पे पूर्ण केले आहेत. त्यातील काही टप्प्यांत सर्वात तरूण खेळाडू म्हणून त्याच्या नावाची नोंद  झाली आहे.  प्रभातच्या साहसी कार्याची नोंद घेवून त्याला ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने’ गौरविण्यात आले आहे.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                                                                 000000000
 रितेश भुयार/वि.वृ.क्र 206 / दि. 29-08-20019


 
        

सीएसआरचा 0.25 टक्के निधी वनक्षेत्रासाठी अनिवार्य करण्यात यावा : वने मंत्री सुधीर मुनगंटीवार













                              राज्याच्या वन विभागाला 3 हजार 844 कोटींचा निधी प्रदान
 
नवी दिल्ली, 29 : व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) कायद्यात तरतूदकरून यामधील 0.25 टक्के निधी वनक्षेत्रविकासासाठी वापरणे अनिवार्य करण्यात यावा अशी, सूचना राज्याचे वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज  येथे आयोजित राज्यांच्या वनमंत्र्याच्या परिषदेत केली.

            या बैठकीत केंद्रीय वने-पर्यावरण व हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या वाटयाचा ‘वनीकरण भरपाई निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरणातील’(कँपा) ३ हजार८४४ कोटींचा धनादेशही श्री मुनगंटीवार यांनी स्वीकारला.

            इंदिरा पर्यावरण भवन येथे आज केंद्रीय वने पर्यावरण व हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली देशातील सर्व राज्यांच्या वन मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. मंत्रालयाचे राज्यमंत्री बाबूल सुप्रियो , महाराष्ट्राचे वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध राज्यांचे वनमंत्री याबैठकीस उपस्थित होते.  राज्याच्या वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेही यावेळी उपस्थित होते.

            याबैठकीत विविध राज्यांच्या वनमंत्र्यांनी सूचना मांडल्या. यावेळी श्री. मुनगंटीवार म्हणाले, देशातील वनसंवर्धनासाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज आहे. विविध उद्योगांकडून सीएसआरच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांसाठी वापरण्यात येणा-या २ टक्के निधीपैकी ०.२५ टक्के निधीचा उपयोग वनक्षेत्र विकासासाठी करणे अनिवार्य करण्याची सूचना त्यांनी केली. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, एप्रिल २०१४ मध्ये देशात सीएसआर कायदा अंमलात आला. या कायद्यानुसार ५ कोटींपेंक्षा जास्त नफा मिळविणा-या उद्योगांना सामाजिक दायीत्वाच्या भावनेतून एकूण नफ्याच्या २ टक्के निधी हा सामाजिक कार्यांवर खर्च करणे अनिवार्य आहे. मात्र, कोणत्या क्षेत्रासाठी यातील किती निधी खर्च करावे असे बंधन नाही. तेव्हा, सीएसआर कायद्यात तरतूद करून सीएसआर मधील 0.25 टक्के निधी हा केवळ वनक्षेत्रविकासासाठी वापरणे अनिवार्य करण्यात यावा अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

             ‘वन से धन तक’ आणि ‘जंगल से जीवन के मंगल तक’ या न्याया प्रमाणे देशातील वनक्षेत्राच्या विकासासह या क्षेत्रात रोजगाराच्या मोठया संधीही उपलब्ध करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी केंद्र शासनाने देशातील वनक्षेत्रात   कार्यरत उद्योगांना आयकरात सूट दयावी अशी मागीणीही त्यांनी केली. राज्यात राबविण्यात येत असलेल्या ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाविषयी त्यांनी यावेळी माहिती दिली. राज्यात ‘हरित सेना’ स्थापन करून लोकसहभागातून वन, वन्यजीव संवर्धन  व संरक्षणाकरिता राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली.

                               राज्याच्या वन विभागाला 3 हजार 844 कोटींचा कँपा निधी

            याबैठकीत केंद्र शासनाकडे ‘वनीकरण भरपाई निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरणातील’ (कँपा) अंतर्गत विविध राज्यांचा जमा असलेला निधी प्रदान करण्यात आला. कँपाअंतर्गत गेल्या १२ वर्षांचा महाराष्ट्राच्या वाटयाचा ३ हजार८४४ कोटींचा निधी यावेळी श्री मुनगंटीवार यांनी धनादेश स्वरूपात स्वीकारला. राज्याला हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री मुनगंटीवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय वने पर्यावरण व हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांचे आभार मानले.    
            
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                                                                 000000000
 रितेश भुयार/वि.वृ.क्र 205 / दि. 29-08-20019





Wednesday, 28 August 2019

आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्वेता रतनपुराला कांस्यपदक

















                             तुषार फडतरे आणि ओंकार गुरव यांना उत्कृष्ट पदक  
नवी दिल्ली, 28 : रशियातील कझान शहरात आयोजित आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्वेता रतनपुराने कांस्यपदक पटकाविले तर तुषार फडतरे आणि ओंकार गुरव यांनी उत्कृष्ट पदक पटकावली आहेत.

            रशियातील कझान शहरात आयोजित आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागी 48 सदस्यीय भारताच्या चमुने  विविध कौशल्य स्पर्धेत उत्तम कामगिरी करत 1 सुवर्ण ,1 रजत ,2 कांस्य पदक आणि 15 उत्कृष्ट पदकांची कमाई केली आहे. यात महाराष्ट्र कन्या श्वेता रतनपुराने उत्तम कामगिरी करत ग्राफीक डिझाईन टेक्नॉलॉजी मध्ये कांस्य पदक पटकाविले आहे. तुषार फडतरे याने ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीमध्ये तर ओंकार गुरव याने मोबाईल रोबोटिक मध्ये प्रत्येकी उत्कृष्ट पदक मिळविली आहेत.
           
            आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत एकूण 63 देशातील 1 हजार 350 स्पर्धाकांनी  एकूण 53 कौशल्य प्रकारात सहभाग घेतला होता. भारताने 1 सुवर्ण ,1 रजत ,2 कांस्य  आणि 15 उत्कृष्ट पदकांची कमाई करत या स्पर्धेत 13 वे स्थान मिळविले आहे.
            दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवडीसाठी केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्यावतीने दिल्लीत  ३ ते ५ ऑक्टोबर २०१८ दरम्यान राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत सर्वाधिक 23 पदक मिळवून महाराष्ट्र देशात अव्वल ठरला होता. या स्पर्धेत तुषार फडतरे याने सुवर्ण तर श्वेता रतनपुरा आणि ओंकार गुरव यांनी रजत पदकाची कमाई केली होती.
            
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                                                                 000000000
 रितेश भुयार/वि.वृ.क्र 204 / दि. 28-08-20019





सांगली आणि वर्धा येथील समुदाय रेडिओ केंद्रांचा राष्ट्रीय सन्मान













नवी दिल्ली, 28 : सांगली जिल्हयातील ‘येरळावाणी’ आणि वर्धा येथील ‘एमगिरी’ समुदाय रेडिओ केंद्रांना उत्तम कार्यक्रम निर्मितीसाठी आज केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते समुदाय रेडिओ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

            माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने येथील डॉ.आंबेडकर राष्ट्रीय केंद्रात आयोजित कार्यक्रमात श्री. जावडेकर यांच्या हस्ते वर्ष ‘समुदाय रेडिओ राष्ट्रीय पुरस्कार 2018-19’ चे वितरण करण्यात आले. यावेळी मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी मंचावर उपस्थित होते.

यावेळी  एकूण पाच श्रेणींमध्ये वर्ष  2018आणि 2019 या दोन वर्षांसाठी एकूण 30 पुरस्कार प्रदान करण्यात आले. सांगली जिल्हयातील ‘येरळावाणी’ समुदाय केंद्राला वर्ष 2019 साठी ‘स्थानिक संस्कृती जोपासना’ श्रेणीत दुस-या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  या रेडिओ केंद्राचे संचालक उदय गोडबोले यांनी पुरस्कार स्वीकारला. 30 हजार रूपये रोख, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

 वर्धा येथील ‘एमगिरी’ समुदाय रेडिओ केंद्राला वर्ष 2018 साठी ‘संकल्पना आधारीत’ श्रेणीत तिस-या क्रमांकाच्या पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. या रेडिओ केंद्राचे समन्वयक अमोल देशमुख यांनी पुरस्कार स्वीकारला. 20 हजार रूपये रोख, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  

                                  येरळावाणीवरिल ‘जान गालीच्या’विषयक कार्यक्रम ठरला श्रेष्ट
            जत तालुक्यातील माडग्याळी मेंढीच्या खास लोकरीपासून तयार होणारा ‘जान गालीचा’ त्याची निर्मिती प्रक्रिया व या हस्तकलेच्या परंपरेविषयी येरळावाणी समुदाय रेडिओ केंद्राने  कार्यक्रम प्रसारीत केला होता. हा कार्यक्रम देशभरातून सर्वोत्कृष्ट ठरला म्हणूनच ‘स्थानिक संस्कृती जोपासना’ श्रेणीत या कार्यक्रमाला दुस-या क्रमांकाच्या पुरस्काराचा बहुमान  मिळाला. सांगली जिल्हयातील जत तालुक्याच्या जालिहाड गावात ‘येरडा प्रोजेक्ट सोसायटीच्या’ माध्यमातून एफएम 91.2 फ्रिक्वेंशीवर ‘येरळावाणी’ हा समुदाय रेडिओ चालविण्यात येतो. जत तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त 22 गावांमध्ये विविध विकास कामांमध्ये कार्यरत येरडा सोसायटीने 2011 मध्ये  ‘येरळावाणी’ समुदाय रेडिओ सुरु केला.                                      
एमगिरी केंद्रावरील ‘उंच माझा झोका’ची राष्ट्रीय पातळीवर दखल 
        वर्धा आणि यवतमाळ जिल्हयातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा व घटस्फोटीत महिलांसाठी कार्यरत ‘एकल महिला संघटनेतील’700 महिलांच्या प्रेरणादायी स्वानुभवावर आधारीत एमगिरी समुदाय रेडिओ केंद्राच्या ‘उंच माझा झोका’ या कार्यक्रमाची या पुरस्काराच्या रुपाने राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली.  ‘संकल्पना आधारीत’ श्रेणीत या केंद्राने तिसरा क्रमांक पटकविला आहे. केंद्रीय सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्याशी संलग्न असलेल्या वर्धा येथील महात्मा गांधी ग्रामीण उद्योगिकरण संघटनेने 2013 मध्ये 90.4 फ्रिक्वेंशीवरील ‘एमगिरी’ या समुदाय रेडिओ केंद्राची सुरुवात केली. गेल्या दीड वर्षा पासून या केंद्राहून उंचमाझा झोका हा साप्ताहिक कार्यक्रम प्रसारीत करण्यात येत आहे.
                       
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                                                                 000000000
 रितेश भुयार/वि.वृ.क्र 203 / दि. 28-08-20019





मुद्रा योजना: महाराष्ट्रात 84 हजार कोटींचे कर्ज वितरण 'तरूण' कर्ज गटात महाराष्ट्र देशात अव्वल




नवी दिल्ली दि. 28 : असंघटीत  लघु उद्योगांच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेत गेल्या चार वर्षात महाराष्ट्राने 84,837 कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. मुद्रा योजनेत सर्वाधिक कर्ज वितरित करणा-या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुस-या स्थानावर आहे, तर या योजनेच्या तरुण कर्ज प्रकरणात महाराष्ट्राने देशात सर्वाधिक 24,138 कोटी रूपये कर्ज वितरण करून अव्वल स्थान राखले आहे.
       देशातील असंघटीत लघु उद्योगांच्या विकासासाठी व त्यांच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी एप्रिल 2015 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत शिशु, किशोर आणि तरूण अशा तीन प्रकारात कर्ज पुरवठा करण्यात येतो. शिशु कर्ज प्रकारात 50 हजार रुपयांपर्यंत, किशोर कर्ज प्रकारात 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत तर तरुण कर्ज प्रकारात 5 ते 10 लाखांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो.
देशात 9 लाख 47 हजार कोटी कर्ज वितरण
मुद्रा योजनेअंतर्गत एप्रिल 2015 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत 19 कोटी 93 लाख कर्ज प्रकरणे मंजुर करण्यात आली असून यासाठी 9 लाख 47 हजार कोटी रुपयांचे कर्ज आतापर्यंत वितरित करण्यात आले आहे. गेल्या एका वर्षात देशात सुमारे 3 लाख कोटींहून अधिक कर्ज वितरित करण्यात आले आहे.
  
महाराष्ट्रात दीड कोटीहुन अधिक कर्ज प्रकरणे मंजूर
महाराष्ट्रात एप्रिल 2015 ते ऑगस्ट 2019 या सव्वा चार वर्षाच्या कालावधीत 1 कोटी 62 लाख 5828 कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली. या कर्ज प्रकरणांसाठी  आजपर्यंत 87,028 कोटी रुपये मंजूर करण्यात आले तर 84,837 कोटी रूपये प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2019 या एका वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राने 4 लाख 75 हजार कर्ज प्रकरणे मंजूर करून 27,394 कोटी रुपये प्रत्यक्ष कर्ज वितरित केले आहे.
तरूण कर्ज प्रकारात महाराष्ट्र अव्वल : 24 हजार कोटींचे कर्ज वितरण
प्रधानमंत्री मुद्रा योजनेत तरूण कर्ज प्रकारात सर्वाधिक 5 ते 10 लाखांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. या कर्ज प्रकारात महाराष्ट्राने एप्रिल 2015 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत 3 लाख 59 हजार 840 कर्ज प्रकरणांसाठी 24,996 कोटी रुपये मंजूर केले तर प्रत्यक्षात 24,138 कोटी रूपयांचे कर्ज लाभार्थ्यांना वितरित केले आहे. देशात या प्रकारात सर्वाधिक कर्ज वितरित करुन महाराष्ट्राने सलग चौथ्या वर्षी अव्वल स्थान कायम राखले आहे.  ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2019 या  एका वर्षाच्या कालावधीत राज्यांने 1 लाख 34 हजार 617 कर्ज प्रकरणे मंजूर करून 7,609 कोटी रूपयांचे कर्ज वितरित केले आहे.
शिशु कर्ज प्रकारात 34 हजार कोटी कर्ज
50 हजार रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येणा-या शिशु कर्ज प्रकारात एप्रिल 2015 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत  राज्यात 1 कोटी 44 लाख 63 हजार 970 कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली. या कर्ज प्रकरणांसाठी 35,246 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले तर प्रत्यक्षात  34,771 कोटी रुपये लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. गेल्या एक वर्षाच्या कालावधित 40 लाखांहुन अधिक कर्ज प्रकरणे या प्रकारात मंजुर करण्यात आली असुन यासाठी  10,989 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
किशोर कर्ज गटात 25 हजार कोटींचे कर्ज
किशोर कर्ज प्रकारात 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो.  गेल्या सव्वा चार वर्षात महाराष्ट्राने या कर्ज गटात  13 लाख 82 हजार कर्ज प्रकरणे मंजूर केली असून यासाठी  26,785 कोटी रूपये मंजूर केली तर  25,927 कोटी रुपये प्रत्यक्षात वितरित करण्यात आले आहेत. गेल्या एक वर्षाच्या कालावधीत 8,797 कोटी रूपये या कर्ज प्रकारात महाराष्ट्राने वितरित केले आहेत.
गेल्या एका वर्षात 27 हजार कोटींचे कर्ज वितरण
मुद्रा योजनेत महाराष्ट्राने ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2019 या एका वर्षाच्या कालावधित  सर्व कर्ज प्रकारात मिळुन 27,394 कोटी रूपयांचे कर्ज वितरित केले आहे. शिशु कर्ज गटात गेल्या एका  वर्षात 10,989 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. किशोर कर्ज गटात गेल्या  एका वर्षात 8,797 कोटी रूपये या कर्ज प्रकारात महाराष्ट्राने वितरित केले आहेत, तर तरूण कर्ज गटात गेल्या एका वर्षात 7,609 कोटी रूपयांचे कर्ज वितरित केले आहे.
देशात सर्वाधिक  कर्ज वितरित करणा-या राज्यांमध्ये कर्नाटक प्रथम स्थानी असून तमिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यांनी 50 हजार कोटींहून अधिक कर्ज वितरित केले आहे.   
 
  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
**********

दयानंद कांबळे /वृत्त वि.क्र. 202   दि.28 .8.2019

Tuesday, 27 August 2019

महाराष्ट्राचा जलतरणपटू प्रभात कोळीला ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ जाहीर





नवी दिल्ली, 26 : नवी मुंबई येथील जलतरणपटू प्रभात कोळी यास, आज मानाचा ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ जाहीर झाला आहे . 29 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार -2018’ ची आज घोषणा करण्यात आली. विविध साहसी प्रकारांत एकूण 6 खेळाडुंची निवड या पुरस्कारासाठी झाली असून महाराष्ट्राचा युवा जलतरणपटू प्रभात कोळी याच्या सागरी जलतरणातील साहसाची नोंद घेवून त्याला हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

5 लाख रूपये, स्मृती चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून राष्ट्रपती भवनात 29 ऑगस्ट 2019 रोजी ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण’ समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
            सागरी जलतरणातील महाराष्ट्राचा हिरा, प्रभात कोळी

        नवी मुंबई येथील नेरूळ भागातील प्रभात कोळी या 19 वर्षाच्या युवा जलतरणपटूने नुकतेच दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनचा 8 कि.मी. चा समुद्र पार केला. हाच, त्याचा जगातील मान्यता प्राप्त आठवा समुद्र किनारा पार करण्याचा विक्रमही ठरला. न्यूझीलंडमधील कूक स्ट्रीट, इंग्लीश खाडी, कॅटलिना, कैवी, सुगारु, नॉर्थ चॅनल आणि जिब्राल्टरची सामुद्रधुनी असे एकूण सात खडतर टप्पे प्रभातने यापूर्वी पूर्ण केले आहेत. त्यातील काही टप्प्यांत सर्वात तरूण खेळाडू म्हणून त्याच्या नावाची नोदं झाली आहे  .  

प्रभात हा कोळी कुटुंबातला, त्यामुळे समुद्राशी त्याचे घट्ट नाते आहे. वडील राजू कोळी मासेमारी व्यवसायात आहेत. प्रभातने 2012 मध्ये ‘धरमतर ते गेटवे’ हे सर्व नव्या सागरी जलतरणपटूंचे प्राथमिक आव्हान लिलया पार केले. वयाच्या 14 व्या वर्षीच ‘कासा ते खंदेरी’ हा धोकादायक मानला जाणारा सागरी पट्टा पार करून प्रभातने आपल्यातील साहसी जलतरणपटूची चुणूक जगाला दाखवून दिली होती. वडील राजू आणि आई शिल्पा कोळी यांनी स्वत:चे रो हाऊस विकून प्रभातच्या सागरी जलतरणावर लक्ष केंद्रीत केले, त्याला या क्षेत्रात प्रोत्साहन दिले. परिणामी, 2014 पर्यंत प्रभातने भारतातील काही समुद्रमार्ग पार केल्यानंतर 2015 मध्ये इंग्लिश खाडीचे खडतर आव्हान पूर्ण केले. त्याआधी, अराऊंड जर्सी हा 66 कि.मी. चा अतिशय थंड पाण्याचा पट्टा ओलांडून पराक्रम केला.      
देशात विविध साहसी खेळांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविणा-या खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या कार्याची दखल म्हणून दरवर्षी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने  ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो.       

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                                                                 000000000
 रितेश भुयार/वि.वृ.क्र 201 / दि. 27-08-20019










Monday, 26 August 2019

‘म-हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियम मध्ये
























                              
      गणेशमूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला सुरुवात  
नवी दिल्ली, 26 : महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्लीस्थित म-हाटी महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमूर्ती आणि पुजेच्या साहित्याचे प्रदर्शन व विक्रीला सुरुवात झाली आहे. अनेक मान्यवरांनी  गणेशमूर्ती राखीव करून ठेवल्या आहेत. गणेशमूर्तींची विक्री  2 सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार आहे.

            महाराष्ट्रातील मूर्तीकारांच्या कलेला वाव मिळावा व त्यांच्या मुर्त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच, दिल्लीतील मराठी व अमराठी गणेशभक्तांना गणेशमूर्ती उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने दिल्लीस्थित महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळातर्फे गेल्या 27 वर्षांपासून गणेशमूर्ती व पुजेच्या साहित्याची विक्री व प्रदर्शन भरवण्यात येत आहे. दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात 39 गणेश मंडळांत गणेशोत्सव साजरा होतो. त्यासोबतच अमराठी भक्तांचाही गणेशोत्सवात मोठया प्रमाणात सहभाग वाढला आहे.

        महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमूर्ती व पूजेचे साहित्य खरेदीसाठी लोकांची लगबग दिसून येत आहे. दिल्लीस्थित त्रिभुवनदास जव्हेरी, नंदा एस्कोर्ट , सरीन कंपनी ,करोलबागस्थित श्रीगणेश मराठा मंडळ आदिंसह अन्य  गणेश मंडळांनी मोठया गणरायाच्या मूर्ती राखीव करून ठेवल्या आहेत.

         ठाणे येथील मंदार सुर्यकांत शिंदे हे मागील 21 वर्षांपासून गणेशमूर्ती विक्रीकरिता दिल्लीतील म-हाटीएम्पोरियमध्ये येतात. यंदा लहान मोठया आकाराच्या एकूण 1400 गणेशमूर्ती येथे आहेत. यात 1200 मुर्त्या इकोफ्रेंडली आहेत तर उर्वरित 200 मुर्त्या प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या आहेत. 6 इंच ते 7 फुटापर्यंतच्या गणरायाच्या मूर्ती येथे उपलब्ध आहेत. 700 रूपयांपासून ते 60 हजार रूपयांपर्यंत गणेशमूर्तींची किंमत आहे.  
महामंडळाच्या बाबा खडकसिंह मार्गवरिल म-हाटी महाराष्ट्र एम्पोरियम या दालनात गणेशचतुर्थी अर्थात दिनांक 2  सप्टेंबर पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे. अधिक माहिती करिता 011-23363366 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करता येवू शकतो.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                                                                 000000000
 रितेश भुयार/वि.वृ.क्र 200 / दि. 26-08-20019