Monday, 31 October 2022

राजधानीत सरदार पटेल जयंती आणि इंदिरा गांधी यांचा स्मृतीदिन साजरा

 

     










नवी दिल्ली, ३१ : देशाचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची  जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे  साजरी करण्यात आली. तर  देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

             कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सचिव तथा निवासी आयुक्त (अ.का.) डॉ. निधी पांडे यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार, निलेश केदार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी -कर्मचारी  उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

            सरदार वल्लभाई पटेल यांची जयंतीनिमित्त भ्रष्टाचार मुक्त भारत-विकसित भारतया संकल्पनेतंर्गत भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच  इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून पाळण्यात येते. यानिमित्तही शपथ घेण्यात आली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात सरदार पटेल व इंदिरा गांधी  यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात  सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन  साजरा करण्यात आला. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा  यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. माहिती अधिकारी अंजु निमसरकर-कांबळे यांच्यासह उपस्थित कर्मचा-यांनी यावेळी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

            श्रीमती अरोरा यांनी यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना भ्रष्टाचार निर्मूलानाची प्रतिज्ञा तसेच राष्ट्रीय एकता दिवस ची  शपथ दिली.      

रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारले जाईल : केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर




नवी दिल्ली, दि. 31 : पुण्याजवळील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी) उभारले जाण्याची महत्वपूर्ण घोषणा आज केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

येथील सीजीओ कॉमप्लेक्स मधील सीइजी सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्री चंद्रशेखर यांनी रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारले जाईल तसेच सीडॅक च्यावतीने इलेक्ट्रॉनिक्स डिझाईनिंग प्रकल्पही महाराष्ट्रात येणार असल्याची महत्वाची घोषणा केली.

रांजणगाव (फेस III) येथील होऊ घातलेल्या  इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी) मुळे येत्या काळात जवळपास 5 हजार रोजगार उपलब्ध होणार असल्याचे श्री चंद्रशेखर म्हणाले. या प्रकल्पासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पाठपुरावा केले असल्याचे श्री चंद्रशेखर यांनी यावेळी  सांगितले.

ईएमसीच्या प्रकल्प विकासासाठी एकूण 492.85 कोटी रूपये अंदाजित खर्च येणार असून 207.98 कोटी रूपयें केंद्र सरकार तर 284.87 कोटी रूपये महाराष्ट्र शासनच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाव्दारे गुंतव‍िले जातील. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 2 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक भविष्यात आकर्षीत केली जाणार असल्याचेही श्री चंद्रशेखर यांनी सांगितले.

या प्रकल्पातंर्गत अँकर क्लायंट मेसर्स आयएफबी रेफ्रिजरेशन मर्यादित ने या ठिकाणी 40 हजार एकर जमीन घेतली असून या कपंनी ने सुमारे 450 कोटी रूपयांची गुंतवणूक केलेली आहे. यासह 297.11 एकर जमीनीपैकी 200 एकर जमीन विविध इलेक्ट्रॉनिक औद्योगिक समुहांना वाटप केली जाईल, याठिकाणी इलेक्ट्रॉनिक उत्पादन आणि त्याशी निगडीत साखळी विकसित केली जाईल. पुढील 32 महिन्यांमध्ये येथील पायाभूत सुविधा पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, अशी अपेक्षा श्री चंद्रशेखर यांनी यावेळी व्यक्त केली.

तामिळनाडू, कर्नाटक, नोएडा, तिरूपती या चार ठिकाणी ईएमसी प्रकल्प आहेत. आता महाराष्ट्रातही असा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने आता रांजणगाव हा परिसर इलेक्ट्रॉनिक हब म्हणून ओळखले जाईल, असा आशावाद श्री चंद्रशेखर यांनी व्यक्त केली.

सी-डॅकच्या माध्यमातून इलेक्‍ट्रॉनिक्स डिसाईनिंग प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार

 सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग,  इंडिया (सी डॅक) ही संस्था पुण्यात आहे.  या संस्थेच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स डिझाईनिंग चा एक प्रकल्पही महाराष्ट्रात होणार असल्याची माहिती श्री चंद्रशेखर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पाची किंमत साधारण 1 हजार कोटी रूपये असणार असल्याचे श्री चंद्रशेखर यांनी सांगितले.

पुढील काळात केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाच्यावतीने याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी रोड शो चे आयोजन केले जाणार असल्याचेही श्री चंद्रशेखर यांनी यावेळी सांगितले.


Sunday, 30 October 2022

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शहीद पोलीसांना श्रध्दांजली : राष्ट्रीय पोलीस स्मारकाला दिली भेट

 


 







नवी दिल्ली, दि. 30 :  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राष्ट्रीय पोलीस  स्मारकाला भेट देत देशासाठी प्राणांचे बलिदान देणा-या वीर जवानांना श्रध्दांजली वाहिली.

               येथील चाणक्य पुरी स्थित ‘राष्ट्रीय पोलीस स्मारका’ स राज्यपालांनी भेट दिली. यावेळी  केंद्रीय गृहमंत्रालय विभागाचे सह संचालक मनदिप सिंग तुली आणि महानिरीक्षक सशस्त्र सीमा बल आर. भुमला यांनी   राज्यपालांचे स्वागत केले.

           याप्रसंगी राज्यपालांना ‘सलामी गार्डस’ ने सलामी दिली.  शहीद झालेल्या जवानांना मौन राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्यपांलानी  राष्ट्रीय पोलीस  स्मारकाच्या केंद्रस्थानी असलेल्या मुख्य शिल्पाच्या ठिकाणी  पुष्पचक्र अर्पण करून देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना श्रध्दांजली वाहिली.  

            यानंतर येथे असलेल्या पोलीस संग्रहालयास राज्यपांलानी भेट दिली. या ठिकाणी ज्या पोलीसांनी त्यांचे कार्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिले, त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी येथे ‘शौर्य भिंत’  बांधण्यात आलेली आहे. यासह सुरूवातीपासून  आतापर्यंत पोलीस व्यवस्थेतील बदल येथे सुसज्ज्‍रीत्या  दर्शविण्यात आलेले आहे. हे पाहताना राज्यपालांनी शहीद पोलीसांच्या स्मृतीस नमन  करून आदार  व्यक्त केला .

Friday, 28 October 2022

महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार ! सुरजकुंड येथील बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची माहिती






सुरजकुंड, हरयाणा, दि. 28 ऑक्टोबर सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात डेडिकेटेड सायबर इंटिलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरजकुंड येथील चिंतन शिबिरात दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेत देशभरातील विविध राज्यांचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांचे दोन दिवसांचे चिंतन शिबिर हरयाणातील सुरजकुंड येथे आयोजित करण्यात आले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या बैठकीला संबोधित केले. राष्ट्रीय सुरक्षेच्या अनेक विषयांवर या बैठकीत मंथन करण्यात आले. या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सायबर इंटिलिजन्स युनिट हा एक समर्पित सिंगल प्लॅटफॉर्म असेल. या माध्यमांतून सायबर गुन्ह्यांना आळा घालणारे जागतिक मॉडेल तयार होईल. सरकारी आणि खाजगी बँका, वित्तीय संस्था, सोशल मीडिया संस्था, नियामक संस्था, सायबर पोलिस, तंत्रज्ञ असे सर्व या व्यासपीठावर एकत्रित राहणार असून, त्यातून गतिमान प्रतिसादाची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर असेल. अलिकडच्या काळात आर्थिक आणि सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अन्य गुन्ह्यांच्या तुलनेत येणार्‍या काळात कदाचित या गुन्ह्यांचीच संख्या अधिक असेल. ही संस्था आधीच त्यादृष्टीने सज्जता असेल.

ही बैठक आयोजित केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणताही गुन्हा किंवा कायदा-सुव्यवस्था हा प्रश्न केवळ कोणत्याही एका राज्याचा प्रश्न नसतो, तर अनेक राज्यांना एकाचवेळी त्याचा सामना करावा लागतो. या बैठकीच्या माध्यमांतून केंद्र आणि राज्यात समन्वयाची उत्तम व्यवस्था तयार करण्यात आली, याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांचे मी विशेष आभार मानतो.

सीसीटीएनएसमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक गतीने कार्यवाही पूर्ण केली. अ‍ॅम्बीसच्या माध्यमांतून सुद्धा मोठी प्रगती राज्य सरकार करते आहे. सुमारे 6 लाखांहून अधिक गुन्हेगारांचे बायोमेट्रीक तयार करण्यात आले आहेत. याला सीसीटीएनएसशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे नाव बदलून अन्य राज्यांत पुन्हा गुन्हे करतात, अशांना ओळखणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे सोपे होणार आहे. सीसीटीव्हीच्या जाळ्याला सायबर पोलिसांशी जोडल्यामुळे गुन्ह्यांचा तपास वेगाने होणार आहे. चालान प्रणाली आणि एकच ऑनलाईन कोर्ट यामुळे मनुष्यबळाची सुद्धा बचत होते आहे. ऑनलाईन ट्रेनिंग प्रणालीमुळे प्रशिक्षणाला गती मिळते आहे. राज्यात 20 हजार पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवाईला गती देण्यात आली असून, यात केंद्र सरकारची मोठी मदत मिळत आहे. शहरी नक्षलवादाचा धोका मोठा आहे. त्याविरोधात कठोर पाऊले उचलली जात आहेत. तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांतून अपराध सिद्धीचा दर वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न होतो आहे. सागरी सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात येत आहे, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिली.


 

Thursday, 20 October 2022

दक्षिण फ्रांस येथील मार्सिलिस बंदरावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक उभारावे : विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर

 

नवी दिल्ली, 20 : दक्षिण फ्रांस  येथील मार्सिलिस बंदरावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक उभारण्यात यावे, असे निवेदन विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या कडे केली.

येथील नार्थ ब्लॉकमध्ये केंद्रीय श्री. शाह यांची भेट घेऊन दक्षिण फ्रांस येथील मार्सिलिस बंदरावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक उभारण्यात यावे, या संदर्भात चर्चा केली असल्याची, माहिती भेटीनंतर, श्री नार्वेकरांनी दिली.

श्री नार्वेकर यांनी सांगितले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीशांच्या ताब्यातून सुटका करून देशाच्या स्वातंत्र्य लढा सुरू ठेवण्यासाठी दक्षिण फ्रांसच्या मार्सेलिस बंदरामध्ये बोटीतून उडी घेतली होती. या ऐतिहासिक घटनेला यावर्षी 112 वर्ष पूर्ण होत आहेत. इतिहासामध्ये या घटनेला अनन्यसाधारण महत्व आहे. या ठ‍िकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक असावे, अशी भारतीयांची अपेक्षा आहे. या स्मारकाच्या संकल्पनेबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचा ही पाठिंबा असल्याची माहिती श्री नार्वेकर यांनी यावेळी दिली.

याविषयावर परराष्ट्र व्यवहार मंत्री यांची भेट घेतली असल्याचे श्री नार्वेकर यांनी सांगितले. तसेच, यासंदर्भात राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून योग्य समन्वय आणि सहकार्य व्हावे, यासाठी आजची बैठक होती. यासंदर्भात पुढील दिशा ठरविली जाईल, अशीही माहिती श्री नार्वेकर यांनी दिली.

000000

Saturday, 15 October 2022

महाराष्ट्र सदनात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी



नवी दिल्ली, 15 : थोर शास्त्रज्ञ ,माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सचिव तथा निवासी आयुक्त (अ.का.) डॉ.निधी पांडे यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, सहायक निवासी आयुक्त (अ.का.) निलेश केदारे यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
000000
वृत्त वि. क्र. 161 / दिनांक 15.10.2022   
 

Sunday, 9 October 2022

महाराष्ट्र सदनात महर्षि वाल्मिकी‍ जयंती साजरी



 


 

नवी दिल्ली, 9 : रामायण महाकाव्याचे रचनाकार महर्षि वाल्मिकी यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. 

 

            कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी  महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी अभियंता (स्थापत्य) जे.पी.गंगवार,सहायक निवासी आयुक्त (अ.का.) निलेश केदारे  यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 

 

 महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

                                                   http://twitter.com/micnewdelhi       

 000000 

वृत्त वि. क्र. १६०  / दिनांक  .१०.2022                                           

Tuesday, 4 October 2022

कोल्हापूर-मुंबई दरम्यान विमानसेवेस नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या हस्ते सुरुवात









कोल्हापूर विमानतळाच्या देशांतर्गत टर्मिनलचे मार्च २०२३ मध्ये उद्घाटन-
नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

नवी दिल्ली , ४ : केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी उडान योजनेंतर्गत आज नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे कोल्हापूर-मुंबई दरम्यान विमानसेवेचे उद्घाटन केले.

येथील नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या राजीव गांधी भवनात आयोजित कार्यक्रमात नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते विभागाचे राज्यमंत्री जनरल(निवृत्त) व्ही.के. सिंह, अपर सचिव उषा पाधी यांच्या उपस्थितीत कोल्हापूर -मुंबई विमानसेवेचे दूरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले. पुढील वर्षी मार्च महिन्यात कोल्हापूर विमानतळाच्या देशांतर्गत टर्मिनलचे(डोमेस्टिक टर्मिनल) उद्घाटन करण्यात येईल ,असे आश्वासन श्री.सिंधिया यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमास कोल्हापूर विमानतळाहून खासदार सर्वश्री संजय मंडलिक, ध्यैर्यशिल माने,धनंजय महाडिक आदि तसेच पंढरपूर येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उडान योजनेंतर्गंत देशातील २ टियर आणि ३ टियर शहरांना विमानसेवेने जोडण्याच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर आणि मुंबई शहरांमध्ये ही विमानसेवा सुरु झाली आहे. या उभय शहरांदरम्यान स्टार एअरच्यावतीने आठवडयात मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवसांमध्ये ही विमानसेवा असेल.

मार्च २०२३ मध्ये कोल्हापूर विमानतळाच्या देशांतर्गत टर्मिनलचे उद्घाटन

श्री सिंधिया आपल्या संबोधनात म्हणाले की, देशातील जनतेला रास्तदरात विमानसेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने ‘उडान योजना’ सुरु केली आहे. आतापर्यंत देशातील ४३३ मार्गांवर ही सेवा सुरु झाली असून १ कोटींच्यावर जनतेने या सेवेचा लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले. मार्च २०२३ मध्ये कोल्हापूर विमातळाच्या देशांतर्गत टर्मीनलचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे आश्वासनही श्री सिंधिया यांनी यावेळी दिले.
0000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार/ वि.वृ.क्र. १५९/दि. ०४.१०.२०२२

 

Direct Flights between Kolhapur – Mumbai Inaugurated by MoCA Minister Expansion of Kolhapur Airport to be commissioned in November 2022



 


New Delhi 4, : In order to make the air travel affordable for the common citizen of the country, the launch of direct flight between Kolhapur and Mumbai was inaugurated at the hands of Minister of Civil Aviation, Shri Jyotiraditya Scindia via Video conferencing  today.

 

            The flight launched under the ambitious RCS UDAN Scheme of Ministry of Civil Aviation, will provide air connectivity to tier-2, and tier -3 cities and affordable air travel to all.

 

            The Union Minister of State for Civil Aviation, Gen.Vijay Kumar Singh (Retd.) was present at the inauguration venue at Rajiv Gandhi Bhavan. The event was graced by Member of Parliament, Shri Sanjay Mandlik and Shri Dhairyasheel Mane (Hatkanangale), Rajyasabha MP, Shri Dhananjay Mahadik from Kolhapur airport and Maharashta’s Higher and Technical Education Minister Shri Chandrakant Patil participated from Pandharpur.  Addl.Secretary Ministry of Civil Aviation Smt.Usha  Padhe and other Senior dignitaries were also present at this VC event.

 

 

Informing about the flight operations, Shri Scindia said, the flight will operate between Kolhapur and Mumbai thrice a week-Tuesday, Thursday and Saturday. Adding further he assured that the expansion the apron of Kolhapur airport will be commissioned in November and domestic terminal building will be inaugurated in March 2023.

 

Monday, 3 October 2022

Bye-election for vacant Andheri-East Assembly Constituency Seat on Nov 3


 


 

New Delhi, 3: The Bye-Election for the vacant seat of Andheri-East Constituency (166) of Maharashtra Vidhan Sabha will be held on November 3, 2022 and the last date for filling in Nominations will be October 14, 2022.

The Election Commission of India has announced the schedule for bye-elections for 7 vacant seats of Legislative Assemblies in 6 states including Maharashtra.

            The seat had fallen vacant due to the sudden death of Andheri-East Constituency MLA, Shri Ramesh Latke while on his trip to Dubai. Any Vidhan Sabha seat falling vacant, due to any reasons has to be filled in by the Election Commission of India, within six months of its falling vacant. Accordingly the bye-election will be held for this seat. And to fill in this seat, the Election Commission of India has announced that elections will be held on November 3, 2022 for a total of 7 seats including Andheri-East assembly constituency in six states. Two in Bihar, one each in Haryana, Telangana, Uttar Pradesh and Odisha. The results will be announced on November 6, 2022.

Schedule for Bye-Election Assembly Constituencies

The election notification for these elections will be issued on October 7, 2022. Last date of Nominations is 14th October and scrutiny of Nominations will be held on 15th November. Last date for withdrawal of candidatures is till October 17. The voting to these assembly constituencies will be held on November 3 and the results will be announced on November 6, 2022. The entire election process will be completed on November 8, 2022.

अंधेरी-पूर्व विधानसभा मतदार संघाच्या रिक्त जागेसाठी ३ नोव्हेंबरला पोट निवडणूक




नवी दिल्ली , ३ : महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी-पूर्व मतदार संघाच्या(१६६) रिक्त जागेसाठी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी पोट निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख १४ ऑक्टोबर २०२२ आहे.

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह ६ राज्यांतील विधानसभेच्या ७ रिक्त जागांसाठी पोट निवडणुकांचा आज कार्यक्रम जाहीर केला.

अंधेरी-पूर्व मतदार संघाचे आमदार रमेश लटके यांचे दुबई दौऱ्यावर असताना झालेल्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. विधानसभेच्या रिक्त जागेवर सहा महिन्याच्या आत पोटनिवडणूक घेणे बंधनकारक असते. त्यानुसार,अंधेरी-पूर्व विधानसभा मतदार संघासह बिहारमधील दोन तर हरियाणा,तेलंगणा,उत्तर प्रदेश आणि ओडिशा राज्यातील प्रत्येकी एक अशा एकूण ७ जागांसाठी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी निवडणूक घेण्यात येणार असल्याचे भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले असून ६ नोव्हेंबर २०२२ रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

                                           असा आहे निवडणूक कार्यक्रम

या निवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार. १४ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची अंतिम तारिख असून १५ नाव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होणार. १७ ऑक्टोबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. ३ नोव्हेंबर रोजी मदतदान होणार असून ६ नोव्हेंबर २०२२ रोजी मतमोजणी होवून निकाल घोषित होतील. ८ नोव्हेंबर २०२२ रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.
0000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार/ वि.वृ.क्र. १५८/दि. ०३.१०.२०२२
 

Sunday, 2 October 2022

महाराष्ट्र सदनात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी



 


नवी दिल्ली, 2 : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त (अ.का.) निलेश केदारे, निवासी अभियंता (स्थापत्य) जे.पी.गंगवार यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
000000
वृत्त वि. क्र. 157 / दिनांक 2.10.2022                                            

Saturday, 1 October 2022

‘स्वच्छ सर्वेक्षणात’ महाराष्ट्राची मोहोर ; राज्याला एकूण 23 पुरस्कार




                   

           राज्यातील तीन शहरे आणि एका कटकमंडळाचा राष्ट्रपतींच्या हस्‍ते सन्मान

 नवी दिल्ली दि. 1 : ‘स्वच्छ सर्वेक्षण -2022’ अंतर्गत पाचगणीला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा तर कराड  शहराला याच श्रेणीत तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने राष्ट्रपती  द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. नवी मुंबई महानगर पलिका आणि देवळाली कटक मंडळाचाही (कॅन्टॉनमेंट बोर्ड) राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला.

      ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ चा  तिस-या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला असून विविध श्रेणींमध्ये राज्याला आज  एकूण 23 पुरस्कार प्रदान करण्यात आले.

             केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने येथील तालकटोरा स्टेडियमध्ये ‘स्वच्छ सर्व्हेक्षण-2022’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध श्रेणीतील सर्वोत्तम 12 पुरस्कारांचे यावेळी  वितरण करण्यात आले. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी, राज्यमंत्री कौशल किशोर आणि सचिव मनोज जोशी यावेळी उपस्थित  होते.

पाचगणी ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहर

              महाराष्ट्रातील तीन शहरांना यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. देशातील १ लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांच्या श्रेणीत सातारा जिल्हयातील पाचगणी शहराने उत्तम कामगिरी करत पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. याच श्रेणीत कराड नगरपरिषदेला तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या उभय शहरांनी शहर स्वच्छता आणि सुशोभीकरणात उत्तम कामगिरी केली असून स्थानिकांचाही त्यास उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

       एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत नवी मुंबई शहराला तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

                                   राष्ट्रपतींच्या हस्ते  देवळाली कटक मंडळाचा सन्मान

             देशातील एकूण 62 कटक मंडळांमध्ये घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या नाशिकमधील देवळाली कटक मंडळाला सर्वोत्तम कटकमंडळाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महासंचालक अजय कुमार शर्मा  आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

                         महाराष्ट्राला ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’चा तिस-या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान

                    100 नागरी स्थानिक स्वराज संस्थांपेक्षा जास्त संख्या असलेल्या राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्राला केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्यशासनाच्या नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुध्द देवळीकर आणि अन्य अधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

          या पुरस्कारांसोबतच अहमदनगर कटकमंडळ, बारामती,भोकर,गडचिरोली,गेवराई,कर्जत,कुरखेडा,लोणावळा,मिराभाईंदर,मुर्गुड,नरखेड,पंढरपूर,पन्हाळा,पिंपरी चिंचवड,रहिमतपूर, सासवड, शेलू आणि श्रीरामपूर या शहरांनाही विविध श्रेणींमध्ये  केंद्रीय गृहनिर्माण व शहरी राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

                                                   http://twitter.com/micnewdelhi       

 000000 

रितेश भुयार /वृत्त वि. क्र. १५६  / दिनांक  .१०.2022