Thursday, 17 November 2016

महाराष्ट्रातील रस्त्यांच्या कामासाठी केंद्राकडून ३ हजार ९५४ कोटींचा निधी

नवी दिल्ली, दि. १७ : केंद्र शासनाच्या स्थायी आर्थिक समितीने महाराष्ट्रातील २३५.३९४ किलो मिटर लांबीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी ३९५४.२८ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे.
            केंद्र शासनाच्या स्थायी आर्थिक समितीने नुकतेच देशातील ८ राज्यांतील ४७६.३८६ किलो  मिटर लांबीच्या रस्त्यांच्या कामांसाठी ६०६७.९ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रातील चार रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांचा यात समावेश आहे.
            राज्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० वरील गडचिरोली-मुल शहरांदरम्यानच्या ४१.६१७ किलो मिटर लांबीच्या दुपदरी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी  ४८४.१५ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. याच महामार्गावरील मुल-चंद्रपूर शहरांदरम्यान ३९.६७४ किलो मिटर लांबीच्या दुपदरी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १६२.३४ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. चौपदरी व सहापदरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२११(  नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५२) वरील औरंगाबाद-तालेवाडी दरम्यानच्या ८६.८७२ किलो मिटर लांबीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २०२८.९१ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.  चौपदरी व सहापदरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२११( नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५२) वरील ६७.२३१ किलो मिटर लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १२७८.८८ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.
        महाराष्ट्रासह मणीपूर, नागालँड, अरूणाचल प्रदेश, गोवा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यातील रस्ते दुरस्तीच्या कामांसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
                                                                  00000000

नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी ९७५ कोटींचा करार

नवी दिल्ली, दि. १७: नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी केंद्रीय आर्थिक व्यवहार विभाग आणि फ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सी (एएफडी) बँक यांच्यात आज ९७५ कोटींचा करार झाला . 
नॉर्थ ब्लॉकस्थित केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाचे सह सचिव एस.सेल्वा कुमार, भारतातील फ्रान्सचे राजदूत अलेक्झेंडर झिग्लर आणि   एएफडी बँक समुहाचे दक्षिण आशिया विभागाचे संचालक निकोलस फॉरेंज यांनी करारावर स्वाक्ष-या केल्या. केंद्रीय नगर विकास विभाग मंत्रालयाच्या मेट्रो रेल प्रकल्प विभागाचे संचालक जनार्दन प्रसाद, नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमीटेड(एनएमआरसीएल)चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.   
              अलेक्झेंडर झिग्लर यावेळी म्हणाले, नागपूर मेट्रोला निधी उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत असून मेट्रोच्या प्रत्यक्ष परिचलनामुळे शहराची वाहतूक व्यवस्था अधिक बळकट होणार आहे. फ्रान्स देश वातावरण बदलाचा पक्षधर असून नागपूर मेट्रोचे बहुतांश परिचलन हे सौर उर्जेवर चालणार असल्याने आमची पसंती नागपूर मेट्रोला राहीली आहे. नागपूर मेट्रोच्या कामासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. या आधी बेंगलुरू आणि कोची मेट्रोसाठी फ्रान्सने कर्ज उपलब्ध करून दिले आहे. आजच्या  करारामुळे भारत आणि फ्रान्स दरम्यान संबंध दृढ होण्यास मदत होणार असल्याचे झिग्लर म्हणाले.      
 ब्रिजेश दीक्षित म्हणाले,आजच्या करारामुळे फ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सी बँकेंकडून नागपूर मेट्रोच्या महत्वाच्या कामांसाठी निधी उपलब्ध होण्याचा मार्ग प्रशस्थ झाला. यामुळे मेट्रोच्या कामाला गती येणार असून प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर मेट्रोचे काम प्रगती पथावर असून आतापर्यंत २० टक्के काम पूर्ण झाले आहे. नागपूर मेट्रो रेल्वेच्या परिचलनासाठी एकूण विजेच्या २/३ वीज ही सौर उर्जेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार आहे. अशा पध्दतीचा भारतातील हा  पहीला मेट्रो रेल प्रकल्प असणार आहे  यामाध्यमातून मोठया प्रमाणात उर्जेची बचत होणार आहे. नागपूर मेट्रोसाठी जागतिक स्तरावरील उत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे.  सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली असल्याचे श्री. दीक्षित म्हणाले.आजच्या करारासाठी त्यांनी महाराष्ट्र शासन,केंद्रीय नगर विकास मंत्रालय आणि केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विभाग आणि एएफडी बँक समुहाचे  त्यांनी आभार मानले. 
करारानुसार नागपूर मेट्रोच्या कामांसाठी एएफडी बँक २० वर्ष मुदतीसाठी  ९७५ कोटी रूपये(१३० मिलीयन युरो) कर्ज स्वरूपात देणार आहे. कर्ज रूपाने उपलब्ध होणा-या रकमेतून नागपूर मेट्रोचे सिग्नलींग, टेली कॉम, ऑटोमॅटीक फेअर कलेक्शन सिस्टिम(एएफसी), लिफ्ट आणि एस्केलेटर सुविधा आदी कामे करण्यात येणार आहेत.
नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमीटेड आणि केएफडब्ल्यु बँक यांच्या दरम्यान प्रकल्प करार होणार आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. कराराचे स्थळ व तारिख येत्या लकवरच निश्चित होणार असल्याचे श्री ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.
 याआधी, १ एप्रिल २०१६ ला नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी जर्मनीची केएफडब्ल्यु बँक आणि केंद्रसरकार यांच्यात ३ हजार ७५० कोटी रूपयांचा करार झाला आहे.

Wednesday, 16 November 2016

नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी ९७५ कोटींचा करार

नवी दिल्ली, दि. १६ : नागपूर मेट्रो प्रकल्पाला फ्रान्स बँकेकडून  ९७५ कोटी रूपयांचे कर्ज मिळणार आहे, यासंदर्भात १७ नोव्हेंबर २०१६  रोजी केंद्रीय आर्थिक व्यवहार विभाग, फ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सी (एएफडी) बँक आणि नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्यात करार होत आहे. 
             येथील नॉर्थब्लॉकस्थित केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाच्या कार्यालयात दुपारी ४.०० वाजता केंद्र शासनाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे सहसचिव सेल्वा कुमार, भारतातील फ्रान्सचे राजदूत अलेक्झेंडर झिग्लर, एएफडी बँक समुहाचे दक्षिण आशिया विभागाचे संचालक निकोलस फॉरेंज आणि नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमीटेड(एनएमआरसीएल)चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या उपस्थितीत हा करार होणार आहे. करारानुसार नागपूर मेट्रोच्या कामांसाठी एएफडी बँक २० वर्ष मुदतीसाठी  ९७५ कोटी रूपये(१३० मिलीयन युरो) कर्ज स्वरूपात देणार आहे. कर्ज रूपाने उपलब्ध होणा-या रकमेतून नागपूर मेट्रोचे सिग्नलींग, टेली कॉम, ऑटोमॅटीक फेअर कलेक्शन सिस्टिम(एएफसी), लिफ्ट आणि एस्केलेटर सुविधा आदी कामे करण्यात येणार आहेत.
केंद्र सरकार आणि एएफडी बँके दरम्यान होणा-या करारानंतर नागपूर मेट्राचे या करारासंदर्भातील प्रत्यक्ष काम सुरू होण्याआधी नागपूर मेट्रोरेल कॉर्पोरेशन लिमीटेड आणि एएफडी बँके दरम्यान नागपूर येथे प्रकल्प करार होणार आहे. महाराष्ट्र शासन,केंद्रीय नगर विकास मंत्रालय आणि केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या महत्वपूर्ण सहकार्याने एएफडी बँक समुहाकडून हे कर्ज उपलब्ध झाले आहे.  
            याआधी, १ एप्रिल २०१६ ला नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी जर्मनीची केएफडब्ल्यु बँक आणि केंद्रसरकार यांच्यात ३ हजार ७५० कोटी रूपयांचा करार झाला आहे.

                                                                  00000000 

Monday, 14 November 2016

महाराष्ट्रातील दोन संस्थांना राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार

नवी दिल्ली दि. 14 : गोंदिया येथील युवा जागृती संस्था आणि मुंबई येथील कड्ल्स फाउंडेशन या संस्थांना बालकांकरिता केलेल्या उत्तम सेवेसाठी  राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 केंद्रीय महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाच्यावतीने बाल दिनानिमित्त राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉल मध्ये आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते विविध श्रेणीत  राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी  केंद्रीय महिला व बालकल्याण विकासमंत्री मनेका गांधी यावेळी उपस्थित होत्या.

        या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते २०१५ चे राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आले. गोंदिया येथील युवा जागृती संस्थेचे प्रमुख गोपालदास अग्रवाल यांना यावेळी राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. ३ लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. श्री. अग्रवाल यांच्यासह मुंबई येथील कड्ल्स फाउंडेशनचाही सन्मान करण्यात आला. संस्थेच्या संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पुरोनिता दत्ता बहल यांनी पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्रातील या संस्थांसह देशातील ५ संस्था आणि ३ व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
            श्री.अग्रवाल यांनी १९७४ पासून युवा जागृती संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत बालकांच्या विकासासाठी केलेल्या महत्वपूर्ण कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. युवा जागृती संस्थेच्या माध्यमातून शेकडो मुलांची पोलिओ शस्त्रकिया,मुलांच्या डोळ्याची शस्त्रक्रीया, तिरळेपणाची शस्त्रक्रीया नि:शुल्कपणे करण्यात आली. लहान मुलांचे जन्मत: किंवा अपघाताने फाटलेले ओठ व टाळूंची नि:शुल्क शस्त्रीक्रिया करण्याचे कार्य‍  संस्थेने केले आहे.    
            बालकांच्या पोषण आहारासाठी कार्य करण-या कड्ल्स फाउंडेशनचा राष्ट्रीय सन्मान यावेळी झाला. मुंबईतील लोअरपरेल भागात कड्ल्स फाउंडेशनची स्थापना २०१२ मध्ये झाली. ही संस्था कर्करोगाने ग्रस्त बालकांसाठी समग्र पोषक आहार पुरविण्याचे कार्य करीत आहे. संस्थेच्या या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. ही संस्था देशातील ११ इस्पितळालीत गरजू मुलांसाठी पोषक आहार पुरविण्याचे कार्य करीत आहे. इस्तिपतळांमध्ये तज्ज्ञांच्या माध्यमातून बालकांच्या पोषक आहारा बद्दल विविध मार्गदर्शन शिबीरही आयोजित करते.

IITF 2016: Industry Minister Shir Subhash Desai interact with Media

डिजीटल महाराष्ट्र दालनाचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उदघाटन

नवी दिल्ली दि. 14 : डिजीटल महाराष्ट्र दालनाच्या माध्यमातून देश-विदेशातील जनतेला महाराष्ट्राच्या उद्योग, तंत्रज्ञान व दळणवळण क्षेत्रातील प्रगतीची माहिती मिळणार असल्याचा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. 
प्रगती मैदान येथे आजपासून सुरु झालेल्या 36व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात श्री. सुभाष देसाई यांच्या हस्ते एका शानदार कार्यक्रमात डिजीटल महाराष्ट्र दालनाचे उदघाटन झाले. उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, खादी व ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष विशाल चोरडिया, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्वा चंद्रा, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव दौंड, खादी व ग्रामोद्योग महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रिचा बागला, सचिव तथा महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला, राजशिष्टाचार व गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र यावेळी उपस्थित होते.
श्री देसाई म्हणाले, महाराष्ट्र दालनामध्ये ग्रामपंचायतींना इंटरनेटच्या माध्यमातून जोडणारी ई-चावडी, भूमापनासाठी वापरण्यात येणारी ई-मोजणी, राज्याची वनसंपदा व उद्योग क्षेत्रासह दळणवळण क्षेत्रातील प्रगती दर्शविणारी आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात झालेली परदेशी गुंतवणूक व या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला रोजगार हे डिजीटल स्वरुपात ठळकपणे दर्शविण्यात आले आहे. शासकीय कामकाज पारदर्शी व जलद गतीने होण्यासाठी राज्य सरकार राबवित असलेली  “आपले सरकार” ही संकल्पना तसेच, राज्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पाची  माहिती डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करुन  मांडण्यात आली आहे. या मांडणीमुळे महाराष्ट्र दालनास भेट देणा-या देश विदेशातील ग्राहक व जनतेला डिजीटल महाराष्ट्राची  ओळख होणार आहे.
            राज्य शासनाने 14 हस्तकलांसाठी समूह विकास योजना सुरु केली असून या माध्यमातून हस्तकलाकारांच्या वस्तुंना जागतिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्य शासनाच्या उद्योग विषयक विविध योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली .
डिजीटल महाराष्ट्र सीडी व पुस्तिकेचे  विमोचन
उद्योग मंत्री सुभाष देसाई व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी महाराष्ट्राची डिजीटल क्षेत्रातील प्रगती दर्शविणारी सीडी व माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.    
दरम्यान, येथील हंसध्वनी सभागृहात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते 36व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे थाटात उदघाटन झाले. यावर्षीच्या भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात देश-विदेशातील ७००० कंपनी सहभागी झाल्या आहेत. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेसह २४ देशांच्या एकूण २४० कंपन्यांचे उत्पादन येथे विक्री व प्रदर्शनासाठी लावण्यात आल्या  आहेत. ‘डिजीटल इंडिया’ ही  मेळाव्याची मुख्य संकल्पना असून दक्षिण कोरिया हा मेळाव्याचा भागीदार देश आहे. बेलारूस हा फोकस देश आहे. हरियाणा हे फोकस राज्य असून मध्यप्रदेश आणि झारखंड ही भागीदार राज्य आहेत. दिनांक १४ ते १८ नोव्हेंबर पर्यंत केवळ व्यापारी वर्गासाठी हा मेळावा खुला राहणार आहे. १९ नोव्हेंबर पासून सर्वसामान्य जनतेसाठी मेळावा खुला होईल. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत या मेळाव्यात प्रवेश मिळणार आहे.         

डिजीटल महाराष्ट्र दालनाचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली दि. 14 : डिजीटल महाराष्ट्र दालनाच्या माध्यमातून देश-विदेशातील जनतेला महाराष्ट्राच्या उद्योग, तंत्रज्ञान व दळणवळण क्षेत्रातील प्रगतीची माहिती मिळणार असल्याचा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. 
प्रगती मैदान येथे आजपासून सुरु झालेल्या 36व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात श्री. सुभाष देसाई यांच्या हस्ते एका शानदार कार्यक्रमात डिजीटल महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन झाले. उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, खादी व ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष विशाल चोरडिया, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्वा चंद्रा, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव दौंड, खादी व ग्रामोद्योग महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रिचा बागला, सचिव तथा महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला, राजशिष्टाचार व गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र यावेळी उपस्थित होते.