Thursday, 19 December 2019

महाराष्ट्राला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे पाच राष्ट्रीय पुरस्कार





     
  राज्यशासनाच्या ‘उमेद’अभियानाची व मनरेगांतर्गत जलसंधारण कामाची दखल
नवी दिल्ली, 19 : दिनदयाल अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानांतर्गत उमेद अभियानाच्या कृषी आजीविका क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत(मनरेगा) जलसंधारणाच्या उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाला आज राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री  नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्यासाठी  आज महाराष्ट्राला पाच राष्ट्रीय  पुरस्कार प्रदान करण्यात आले.
            मनरेगांतर्गत रोजगार निर्मितीत उल्लेखनीय कार्यासाठी अमरावती जिल्हयाला सन्मानित करण्यात आले. यवतमाळ जिल्हयातील  बिटरगावचे सरपंच प्रकाश पेंधे आणि नंदूरबार जिल्हयातील भादवड गावचे ग्रामसेवक अशोक सूर्यवंशी यांना प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) च्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
              येथील पुसा परिसरातील सी. सुब्रमन्यम सभागृहात केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती, मंत्रालयाचे सचिव अमरजित सिन्हा , अवरसचिव अलका उपाध्याय यावेळी मंचावर उपस्थित होत्या.
            केंद्रीय ग्रामीण मंत्रालयाच्यावतीने देशभर राबविण्यात येणा-या विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय योगदान देणा-या राज्यांना व संस्थांना विविध श्रेणींमध्ये एकूण 266 पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राला यावेळी पाच पुरस्कार प्रदान करण्यात आले.
            दिनदयाल अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानांतर्गत कृषी आजीविका क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला (उमेद) देशातून पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उमेदच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी आर. विमला आणि अन्य अधिका-यांनी हा पुरस्कार स्वीकारला. उमेद अंतर्गत राज्यात महिलांसाठी  शाश्वत शेती वर भर देत महिलांना शेती  पूरक  व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आले. महिला किसान सशक्तीकरण कार्यक्रमांर्तगत राज्यात 5 लाख महिला शेतक-यांना सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. राज्यात 3 हजार कृषी सखींच्या माध्यमातून महिला बचत गटांना शाश्वत शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतीमध्ये ब्रह्मास्त्र, निमास्त्र, गांडूळखत आदिंचा वापर असे विविध कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले याच कार्याची दखल घेऊन उमेदला गौरविण्यात आले.
             महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत (मनरेगा) जलसंधारणाच्या उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाला राज्यांच्या श्रेणीत तिस-या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्याच्या मनरेगा कार्यक्रमाचे माजी सहायक  आयुक्त तथा नागपूर जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मनरेगांतर्गत राज्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्यात आले. राज्यातील 143 तालुक्यांतील ब्लॉकमध्ये या योजनेंतर्गत जलसंधारणाचा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला. या योजनेंतर्गत मागील वर्षी 40 हजार जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली तसेच या योजनेंतर्गत जलसंधारणाच्या कामांवर 70 टक्यांपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आला.
            मनरेगांतर्गत रोजगार निर्मितीत उल्लेखनीय कार्यासाठी अमरावती जिल्हा राज्यात प्रथम ठरला असून या जिल्हयाला आज सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी शैलेश नवल, धारणी प्रकल्प अधिकारी मिताली सेठी, उपजिल्हाधिकारी मणिष गायकवाड आणि  जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी  माया वानखडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मनरेगाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीमुळे जिल्हयात मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून जिल्हयात मूलभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) च्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रातून एका सरपंचाला व एका ग्रामसेवकाला सन्मानित करण्यात आले. यात यवतमाळ जिल्हयातील उमरखेड तालुक्यातील बिटरगावचे सरपंच प्रकाश पेंधे आणि नंदूरबार जिल्हयातील नवापूर तालुक्याच्या भादवडगावचे ग्रामसेवक अशोक सूर्यवंशी यांचा समावेश आहे. उभय सरपंच आणि ग्रामसेवकांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत(ग्रामीण) आर्थिक वर्ष 2016-17  आणि 2017-18 मध्ये शासनाने ठरवून दिलेले घरबांधणीचे उद्दिष्टय कमी वेळात  पूर्ण केले आहे.
            सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी  केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री  नरेंद्र सिंह तोमर आणि  राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी उपस्थितांना संबोधित केले.   
                महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.271/  दिनांक 19.12.2019 



Wednesday, 18 December 2019

‘कदाचित अजूनही’ काव्य संग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार

                         
नवी दिल्ली, 18 :  प्रसिध्द मराठी कवयित्री अनुराधा पाटील यांच्या 'कदाचित अजूनही' या काव्य संग्रहास वर्ष 2019 साठीचा सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर झाला आहे.
साहित्य अकादमीच्यावतीने आज वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांनी  प्रसिध्दी पत्रकारद्वारे देशातील 23 प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट साहित्यकृती व लेखकांच्या नावांची  घोषणा केली. कवयित्री अनुराधा पाटील यांच्या 'कदाचित अजूनही' या काव्य संग्रहाची मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून निवड करण्यात आली.

                            'कदाचित अजूनही' या काव्यसंग्रहाविषयी 
स्वतंत्र प्रतिभाशक्तीमुळे मराठी कवितेवर स्वतंत्र मुद्रा उमटविणा-या प्रसिध्द कवयित्री अनुराधा पाटील यांचा 'कदाचित अजूनही' हा पाचवा काव्यसंग्रह आहे. या काव्य संग्रहातील कवितांच्या माध्यमातून त्या संयत विवेकशील सुरात माणसातल्या चांगुलपणाला आवाहन करतात. या सगळया कवितांमिळून एक प्रार्थनाच जनु त्या मानवजातीसाठी करीत आहेत. या संग्रहातील कविता स्त्री दु:खाची दुखरी नस नेमकी पकडून संवादी होतात. या काव्यसंग्रहात राने-वने, झाडे-झुडपे, नद्या-समुद्र-वारे, चंद्र-सूर्य असा निसर्ग मोठया प्रमाणावर येतो. या सर्व कविता ग्रामीण संस्कृती, शेती संस्कृती आणि एतद्देशीय पंरपरेशी घट्ट नाते सांगणा-या आहेत. बदलत्या ग्रामीण जीवनाचे चित्रण या काव्य संग्रहात असून गावाकडील जीवनाच्या नव्या दु:खी कंगो-यांचे तटस्थ दर्शनही घडते. मुंबई येथील शब्द प्रकाशनाने 'कदाचित अजूनही' हा 128 पृष्ठांचा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.

अनुराधा पाटील गेल्या 40 वर्षांपासून सातत्याने कविता लिहत आल्या असून ‘दिगंत’,  ‘दिवसेंदिवस’, ‘तरीही’, ‘वाळूच्या पत्रात मांडलेला खेळ’ हे त्यांचे  प्रसिध्द काव्य संग्रह आहेत.

            या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे असून पुढील वर्षी  25 फेब्रुवारी 2020 रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिध्द साहित्यिक डॉ आसाराम लोमटे,  लक्ष्मण माने आणि वासुदेव सावंत  यांचा समावेश होता.                            
              
                महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.270/  दिनांक 18.12.2019 

Tuesday, 17 December 2019

महाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख



नवी दिल्ली, 17 :  केंद्रशानाने महाराष्ट्राचे सुपुत्र ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची भारतीय सैन्यदलाचे  नवे लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत येत्या 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून ले.जनरल नरवणे हे त्यांचा पदभार स्विकारतील.

श्री. नरवणे यांच्या रुपाने मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्वोच्च पदी विराजमान होणार आहे. यापदावरील ते दुसरे मराठी अधिकारी असतील. यापूर्वी जनरल अरूण कुमार वैद्य या मराठी अधिका-याला 1983 ते 1986 या कालावधीत देशाच्या लष्कर प्रमुखपदाचा बहुमान मिळाला आहे.

 केंद्र सरकार व संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ समितीने सेवा ज्येष्ठतेनुसार श्री नरवणे यांची देशाचे आगामी लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. मूळ पुण्याचे असलेले श्री नरवणे सध्या भारतीय लष्काराचे  उपप्रमुख असून विद्यमान लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत येत्या 31 डिसेंबरला निवृत्त होत असल्याने    लष्करप्रमुख म्हणून त्यांना बढती देण्यात येत आहे. 
                            ले. जनरल मनोज नरवणे यांच्या विषयी
ले.जनरल नरवणे यांनी याच वर्षी सप्टेंबर महिन्यात व्हाइस चीफ ऑफ आर्मी स्टाफ पदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्याआधी  ते सैन्याच्या पूर्वेकडच्या भागाची जबाबदारी सांभाळत होते. भारताच्या चीनशी संलग्न सुमारे 4,000 कि.मी. लांब सीमेच्या रक्षणाची जबाबदारी नरवणे यांनी समर्थपणे सांभाळली आहे.

श्री. नरवणे यांचे वडील मुकुंद नरवणे हे हवाई दलातील निवृत्त अधिकारी आहेत. त्यांच्या आई सुधा या प्रसिद्ध लेखिका आणि आकाशवाणीच्या निवेदक होत्या. ले.जनरल नरवणे यांचे शालेय शिक्षण पुण्यातील 'ज्ञानप्रबोधिनी'त झाले आहे. चित्रकलेची आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून ते जून 1980 मध्ये ते '7 सीख लाइट इन्फंट्री'मधून लष्करात दाखल झाले.

जम्मू-काश्मीर मधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय रायफल्सचे त्यांनी नेतृत्व केले. आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे 'इन्स्पेक्टर जनरल', स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील 'जनरल ऑफिसर इन कमांडिंग', लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महू स्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. श्री. नरवणे यांनी सोपविण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी चोखपणे पूर्ण पाडत आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केले. या कामगिरीची वेळोवेळी दखल घेण्यात आली.
                महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.269/  दिनांक 17.12.2019 


Monday, 16 December 2019

राजधानीत ‘महाराष्ट्रीय स्नेह संवर्धक समाज’शताब्दी महोत्सव













                     तीन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी
                      
नवी दिल्ली, 16 : राजधानी दिल्लीतील सर्वात जुनी मराठी संस्था म्हणून लौकिक असलेल्या महाराष्ट्रीय स्नेह संवर्धक समाजाच्या शताब्दी वर्षा निमित्त 21 ते 23 डिसेंबर 2019 या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

            महाराष्ट्राची संस्कृती ,पंरपंरा जपण्यासाठी व राज्यातील उत्सव साजरे करण्यासाठी मराठी माणसांनी मिळून राजधानी दिल्लीत 1919 मध्ये ‘महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाज’ या संस्थेची स्थापना केली. सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक  क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या या संस्थेचे यावर्षी शताब्दी वर्ष असून या निमित्ताने शताब्दी महोत्सवात तीन दिवसांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

            महोत्सवाच्या पहिल्या दिवशी 21 डिसेंबर 2019 ला पहाडगंज स्थित महाराष्ट्र रंगायन सभागृहात सायंकाळी 6.30 वाजता मुग्धा वैशंपायन आणि धनंजय म्हसकर यांच्या गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. दिल्ली स्थित इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.

            महोत्सवात दुस-या दिवशी 22 डिसेंबर ला महाराष्ट्र रंगायन सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता गोव्यातील मोले येथील पाईकदेव भोलानाथ संस्था निर्मित ‘संगीत करवीर सौदामिनी’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील.
           
महोत्सवाच्या समारोपीय दिवशी 23 डिसेंबर ला महाराष्ट्र रंगायन सभागृहात सायंकाळी 6.30 वाजता ‘मैफल सुरांची आणि गप्पांची’ हा प्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले यांच्या गप्पांचा कार्यक्रम सादर होणार आहे. यानंतर शताब्दीवर्षा निमित्त प्रकाशित विशेष स्मरणीकेचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण व संस्थेच्या सभासदांचा सत्कार करण्यात येणार आहे.
                                                                संस्थे विषयी
                            
1919 मध्ये स्थापन झालेल्या ‘महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाज’ या संस्थेने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातही आपले योगदान दिले आहे. व्यवसाय व नोकरी निमित्त  दिल्लीत निवासी  मराठी माणसांना आपल्या पाल्यांना मराठीतून शिक्षण देता यावे म्हणून संस्थेने ‘महाराष्ट्रीय शैक्षणिक,सांस्कृतिक संस्थेची’ स्थापना करून पहाडगंज भागात 1929 मध्ये नुतन मराठी प्राथमिक शाळेची स्थापना केली. आज वरिष्ठ माध्यमिक शाळेत याचे रुपांतर झाले आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण, प्रसिध्द कलाकार उत्तरा बावकर, प्रसिध्द उद्योजक अशोक शिंदे आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांचा समावेश आहे.
विविध कामांनिमित्त तसेच पर्यटनासाठी दिल्लीत येणा-या महाराष्ट्रातील जनतेची रास्त्‍दरात निवासी व्यवस्था व्हावी या उद्देशाने संस्थेने पहाडगंज भागात ‘दिल्ली महाराष्ट्रीय समाज ट्रस्ट’ ची स्थापना करून बृह्नमहाराष्ट्र या अतिथीगृह उभारले.
                                                                     ००००
     महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.268/  दिनांक 16.12.2019 



Thursday, 12 December 2019

महिला सुरक्षेसाठी महाराष्ट्राला 195 कोटींचा निधी














                
नवी दिल्ली, 12 : महिला सुरक्षेच्या विविध योजनांतर्गत केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला 195 कोटी 54 लाख 30 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.  

            केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने देशातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी चालविण्यात येणा-या निर्भयाफंड, वनस्टॉप सेंटर, महिला हेल्पलाईन या योजनांसाठी राज्य व केंद्रशासीत प्रदेशांना निधी वितरीत करण्यात आला आहे. महाराष्ट्राला या योजनांतर्गत एकूण 195 कोटी 54 लाख 30 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.   
                                          निर्भया फंड’ अंतर्गत राज्याला 149 कोटींचा निधी
            महिला सुरक्षेसाठी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने ‘निर्भया फंड’ तयार करण्यात आला असून देशातील राज्य व केंद्रशासीत प्रदेशांना याअंतर्गत निधी वितरीत करण्यात आला आहे. महाराष्ट्राला ‘निर्भया फंड’ अंतर्गत एकूण 149 कोटी 40 लाख 6 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. याच कार्यक्रमांतर्गत राज्याच्या विधी व न्याय विभागाला 31 कोटी 5 लाखांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

                                                  ‘वन स्टॉप सेंटर’ उभारण्यासाठी 14 कोटी
अडचणीत सापडलेल्या महिलांना तत्काळ मदत पोचविण्यासाठी देशभर वन स्टॉप सेंटर उभारण्यात आले आहेत, महाराष्ट्रात असे सेंटर उभारण्यासाठी 14 कोटी 46 लाख 54 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
अडचणीत सापडलेल्या महिलांना तत्काळ संपर्क करता यावा म्हणून सुरु करण्यात आलेल्या ‘महिला हेल्पलाईनचे’ सार्वत्रीकरण करण्यासाठी महाराष्ट्राला 62 लाख 70 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

केंद्रीय महिला व बाल कल्याण  मंत्री  स्मृती इराणी  यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही  माहिती दिली.
    महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.267/  दिनांक 12.12.2019 


Wednesday, 11 December 2019

अहमदनगरच्या चित्रकाराचे राजधानीत वारली चित्रांचे अनोखे प्रदर्शन









नवी दिल्ली दि. 11 : कला साधनेतून वारली या आदिवासींच्या समृध्द कलेला कॅनवासवर चित्रीत करणारे  अहमदनगर येथील चित्रकार अरविंद कुडिया यांच्या वारली चित्रांचे अनोखे प्रदर्शन राजधानी दिल्लीत देश-विदेशातील कला रसिकांचे आकर्षण ठरत आहे.

पालघर , मुरबाड, जव्हार भागातील आदिवासींच्या समृध्द सांस्कृतिक वैभवाचा गेल्या 22 वर्षांपासून अभ्यास करणारे अरविंद कुडिया यांनी प्रथमच वारली या लहान आकारातील चित्रांसाठी प्रसिध्द असलेल्या कलेला भव्य आकारात प्रदर्शीत करण्याचा अनोखा प्रयोग केला आहे. येथील मंडीहाऊस परिसरात स्थित ललीत कला अकादमीच्या कला दालनात ही प्रदर्शनी लावण्यात आली असून 6X6 ते .7X17 फुट अशा भव्य आकारातील तब्बल 12 चित्र या ठिकाणी  प्रदर्शन व विक्रीसाठी  आहेत.

चित्रांच्या वैशिष्टयांवर दृष्टीक्षेप
        या प्रदर्शनीच्या  दर्शनी भागात ‘कुलदेवी’ ही आदिवासींची ग्रामदेवता या मध्यवर्ती कल्पनेवर आधारीत  कलाकृती कला रसीकांना आकर्षीत करते. 6X6 फुट आकारातील या कलाकृतीमध्ये देविची पुजा करण्यासाठी जाणारे  आदिवासी , वारली जीवनशैली तसेच आदिवासी लोकं मुंगींची पुजा करतानाचा प्रसंग दर्शविला आहे.
            ‘वारली  पाडा’ या 6X6 फुट आकाराच्या कलाकृतीत पालघाट येथील आदिवसींची कुलदेवता दर्शविण्यात आली आहे. देवचौक आणि त्यात चंद्र-सूर्य, धान्याची कोठी, तारपा आदि प्रतिक शोभून दिसतात. पावासामुळे आदिवासींच्या जीवनात आलेली समृध्दी विविध प्रतिकांच्या प्रभावी वापरातून या कलाकृतीमध्ये दर्शविण्यात आली आहे.
            ‘ध्यान’ ही मध्यवर्ती कल्पना मांडणारी 6X6 फुटाची कलाकृती ‘शुन्यातून शुन्याकडे’ जाण्याचा आध्यात्मिक प्रवास दर्शविते. या कलाकृतीत भगावान गौतम बुध्दांच्या ध्यानावस्थेतील 5 प्रतिमा बोलक्या आहेत. त्राटक ध्यानाच्या सकारात्मक वलयाने आदिवासी परिसर वेढल्याचा संदेश श्री. कुडिया यांनी या कलाकृतीत कौशल्याने मांडला आहे.
या प्रदर्शनीत 7X17 फुटांच्या भव्य तीन कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. ‘तारपा नृत्य’या कलाकृतीत आदिवासींचे पारंपरिक तारपानृत्य, त्याचे आदिवासींच्या जीवनातील महत्व लग्न प्रसंगी आणि भाताचे चांगले पीक झाल्यावर व्यक्त होणारा आनंद आदी  प्रसंगांच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. ‘कृष्ण लिला’ आणि  ‘कल्पवृक्ष’ या भव्य कलाकृतींमध्ये भगवान  कृष्णाच्या कालिया मर्दन, पुतनावध आदी 10 प्रसंग आणि मोठया कल्पवृक्षाखाली ध्यानावस्थेत बसलेली व्यक्ती दर्शविली आहे.
याशिवाय भगवान गौतम बुध्दांच्या जन्मापासून ते बुध्दत्वापर्यंतचा प्रवास दर्शविणारी ‘बुध्द’ ही कलाकृती, समृध्द वारली परंपरेतून संन्यस्थाचा प्रवास दर्शविणारी ‘अंतस’ ही कलाकृती, ‘गोवर्धन’ ही भगवान कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलण्याचा प्रसंग कलात्मकरित्या मांडणारी कलाकृती या ठिकाणी कलारसीकांचे आकर्षण ठरत आहेत. ही सर्व चित्र ॲक्रालिक रंगांची असून कॅनव्हासवर चित्रीत करण्यात आली आहेत.

नाशिक येथील मंजू चव्हाण यांच्या चित्रांचे प्रदर्शन
        ललीत कला अकादमीच्याच कला दालनात नाशिक येथील श्रीमती मंजू चव्हाण यांच्या चित्रांचे प्रदर्शन पहावयास मिळते. महाराष्ट्राची संस्कृती या मध्यवर्ती कल्पनेवर आधारीत  1X1.5 फुट ते 3 X4 फुट आकारातील एकूण 37 चित्र या ठिकाणी प्रदर्शीत करण्यात आली आहेत. यात वाडासंस्कृती, लोकजीवन, नागरी जीवन, लेण्या, मंदिर आदींचा समावेश आहे.

            ही प्रदर्शनी 13 डिसेंबर 2019 पर्यंत दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी नि:शुल्क उपलब्ध राहणार आहे.           
  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :     http://twitter.com/micnewdelhi
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.266/  दिनांक  ११.१२.२०१९ 


Saturday, 7 December 2019

राजधानीत संत जगनाडे महाराज जयंती साजरी




नवी दिल्ली दि. 8 : संत जगनाडे महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल, सहायक निवासी विजय कायरकर यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.



महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/micnewdelhi
000000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.265/ दिनांक ०८.१२.२०१९

रत्नागिरीचा चैतन्य परब आकाशवाणीच्या शास्त्रीय गायन स्पर्धेत देशात दुसरा


                            आकाशवाणीच्या विशेष समारंभात होणार सत्कार

नवी दिल्ली, दि. 7 : रत्नागिरीच्या चैतन्य परब या बाल कलाकाराने आकाशवाणीच्या शास्त्रीय गायन (ख्याल गायन) स्पर्धेत देशातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे. 17 डिसेंबर रोजी  दिल्ली येथे आकाशवाणीच्या  विशेष समारंभात चैतन्यला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

            आकाशवाणीच्यावतीने दरवर्षी संगीताच्या विविध प्रकारात स्पर्धा घेतल्या जातात. युवा कलाकाराला प्रोत्साहन आणि राष्ट्रीय मंच उपलब्ध व्हावा या उद्देशाने या स्पर्धांचे देशपातळीवर आयोजन केले जाते. ही स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा दोन टप्प्यात घेतली जाते. आकाशवाणी रत्नागिरी केंद्रात झालेली प्राथमिक फेरी यशस्वी पार पडून चैतन्यची  दिल्लीतील अंतिम फेरीसाठी निवड झाली होती.

या अंतिम फेरीसाठी कोलकाता, दिल्ली, मुंबई, पुणे आदी केंद्रातून स्पर्धक दाखल झाले होते. तज्ज्ञ परीक्षक मंडळाने शास्त्रीय संगीत (ख्याल गायन) मुलांच्या गटात दिल्लीच्या पुलकीत शर्मा याची प्रथम तर रत्नागिरीच्या चैतन्य परब ची  द्वितीय क्रमांकासाठी निवड केली.

चैतन्य हा रत्नागिरीतील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात 11व्या इयत्तेत शिकत आहे. चैतन्यने संगीताचे सुरूवातीचे शिक्षण त्याची आई  विनया परब यांच्याकडे घेतले. गेली चार वर्षे तो किराणा घराण्याचे आघाडीचे गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्याकडे शास्त्रीय गायनाची तालीम घेत आहे. चैतन्यने सहाव्या वर्षी अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या गायनाची पहिली परीक्षा दिली. तसेच त्याने मंडळाची हार्मोनियममधील मध्यमा प्रथम ही परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. चैतन्य सध्या गायनाची उपांत्य विशारद ही परीक्षा देत आहे.  

 महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :               http://twitter.com/micnewdelhi
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.264/  दिनांक  ०७.१२.२०१९ 



Friday, 6 December 2019

महामानवाला अभिवादन












 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त आज राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या मुख्यालयात  आयोजित कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री रामदास आठवले आणि  राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य ॲड सुलेखा कुंभारे यांनी महामानवाला अभिवादन केले.