Friday, 17 January 2025

"राष्ट्रपतींच्या हस्ते खेळरत्न पुरस्कारांचे वितरण: दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार, स्वप्निल कुसळे, सचिन खिल्लारी आणि मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन पुरस्कार प्रदान"





 


 

नवी दिल्ली 17: राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आयोजित भव्य सोहळ्यात 2024 च्या मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुन पुरस्कार आणि इतर राष्ट्रीय खेळ पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज करण्यात आले. पार पडलेल्या या सोहळ्यात देशभरातील अनेक खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांचा आज गौरव करण्यात आला.

यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन ब्रॉन्झ मेडल जिंकणारी शूटर मनु भाकर, शतरंज विश्व चॅम्पियन डी गुकेश, हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंह आणि पॅरा एथलीट प्रवीण कुमार यांना सर्वोच्च खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

महाराष्ट्राच्या खेळाडूंचा सन्मान

 

राष्ट्रीय खेळ पुरस्कारांत महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला. यंदा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये शूटिंगमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळे यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. रेल्वे कर्मचारी असलेल्या स्वप्निलने नेमबाजीच्या क्षेत्रात महाराष्ट्राला खाशाबा जाधवांनंतर ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. त्याचबरोबर स्वप्निलच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पॅरालिम्पिक 2024 मध्ये गोळाफेक प्रकारात कांस्यपदक मिळवणाऱ्या सचिन सर्जेराव खिलारी यालाही अर्जुन पुरस्कार देण्यात आला. 40 वर्षांनी शॉटपुट प्रकारात पदक जिंकणारा सचिन हा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. तसेच, महाराष्ट्राचे पॅरा जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांनाही अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

*****************

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.09  / दिनांक 17.01.2025

Thursday, 16 January 2025

महाराष्ट्र एनएसएसच्या 12 स्वयंसेवकांचा कर्तव्यपथावरील संचलनासाठी सराव








नवी दिल्ली 17 : प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)चे 12 आणि गोव्यातील 02 असे एकूण 14 स्वयंसेवक कर्तव्यपथावर तसेच जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये भर थंडीत कसून सराव करीत आहेत.


राजधानी दिल्ली येथे 76 व्या प्रजासत्ताक मुख्य कार्यक्रमासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने एन एस एसच्या सराव शिबिराला जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे सुरुवात झालेली आहे. या सराव शिबिरात देशभरातून राष्ट्रीय सेवा योजनेचे एकूण 200 स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. हे शिबिरार्थीं योग, कवायत, परेड संचलन सराव, बौद्धिक सत्र, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी आहेत.


महाराष्ट्रातील स्वयंसेवकांनी सांस्कृतिक कार्यक्रमात राज्यात साजरे होणारे विविध सणांचे सादरीकरण केले. या अंतर्गत ‘मकरसंक्रातीचे महाराष्ट्रातील महत्व’ या सादरीकरणाला उपस्थितांनी दाद दिली. या बरोबर 10 ते 12 जानेवारी रोजी सर्व शिबिरार्थी राष्ट्रीय युवक महोत्सवानिमित्त भारत मंडपम प्रगती मैदान येथे सहभागी झाले होते.


हे शिबिर 31 जानेवारी 2025 पर्यंत चालणार असून दररोज सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे सराव करीत असतात, अशी माहिती महाराष्ट्रातून एन एस एस च्या स्वयंसेवकांना घेऊन येणारे डॉ बी. एन. पुरंदरे कला, श्रीमती एस. जी. गुप्ता वाणिज्य व श्रीमती एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय, लोनावाळा कॉलेजचे प्राध्यापक डॉ. पवन शिनगारे सद्या कार्यक्रम अधिकारी म्हणून आलेले आहेत त्यांनी दिली.


महाराष्ट्रातील विद्यार्थी विद्यार्थिनींचा असणार समावेश


महाराष्ट्रातून एकूण बारा एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. यातील 11 विद्यार्थी विद्यार्थिनी हे मुख्य पथसंचलनात असणार आहेत. एकूण सहभागी झालेले स्वयंसेवक हे राज्यातील विविध कॉलेजमधून आहेत. सिटी प्रीमियर कॉलेजचा तेजस सोनसरे, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील श्रीमती जी. जी. खडसे कॉलेजचा हरीओम इंगळे, नाशिक जिल्ह्यातील ( निफाड, लासलगाव ) एन व्ही पी मंडल्स आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेजचा स्वरूप ठाकरे, वर्धा जिल्ह्यातील बजाज कॉलेज ऑफ सायन्सचा गुरु प्रसाद सतोने, मुंबई येथील के सी कॉलेजचा, आदित्य चंदोला, विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधला राहुल धर्मराज, केटीएचएम कॉलेज नाशिक येथील कविता शेवरे, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग फॉर वूमन पुणे येथील वेदिका राजेमाने, हुजूरपागा श्रीमती दुर्गाबाई मुकुंदास महिला विज्ञान महाविद्यालय पुणे येथील पूजा बोंडगे, महात्मा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क तलोडा येथील सुनिता उंद्या, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथील अभिज्ञा मानुरकर, श्री आर एल टी कॉलेज ऑफ सायन्स, अकोला येथील लीना आठवले असे एकूण बारा विद्यार्थी एन एस एस च्या शिबिरात सराव करीत आहेत.


गोवा राज्यातून दोन स्वयंसेवकांचा समावेश असून विद्या प्रबोधिनी कॉलेज ऑफ कॉमर्स एज्युकेशन कम्प्युटर अँड मॅनेजमेंट, प्रवरी येथील फाल्गुन प्रीओलकर आणि गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स खंडोला येथील अक्षता कलासगौदर चा समावेश आहे.


या शिबिरासाठी भारतातून 200 स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. यामधून 148 स्वयंसेवक कर्तव्यपथ येथे प्रजासत्ताक दिनी पथसंचलन करतील. हा एकूण चमु प्रधानमंत्री यांना आणि राष्ट्रपती यांनाही भेटणार आहेत आहेत.

000000
 

Sunday, 12 January 2025

राजधानीत राजमाता जिजाबाई आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी











नवी दिल्ली, 12 जानेवारी : राजमाता जिजाबाई आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.

कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र सदन निवासी आयुक्त नीवा जैन यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना पुष्पांजली वाहिली. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार, श्रीमती स्मिता शेलार व उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


*****************
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.06 / दिनांक 12.01.2025

 

Saturday, 11 January 2025

मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार



 

नवी दिल्ली, दि.11 :  मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार असल्याची माहिती, पानिपत शौर्य समितीचे आयोजक प्रदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

 

महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना श्री पाटील यांनी सांगितले, राज्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस प्रथमतःच हरियाणा राज्यात असलेल्या पानिपत येथील शौर्य स्मारकाला 14 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात येणार आहेत.

 

14 जानेवारीला पानिपतच्या युद्धाला 264 वर्ष पूर्ण झाले आहेत. वर्ष 1761 मध्ये झालेल्या अब्दाली आणि मराठ्यांच्या ऐतिहासिक युद्धातील वीरगती प्राप्त मराठ्यांच्या शौर्याचं स्मरण करण्यासाठी  14 जानेवारीला पानिपत येथे शौर्य स्मारक दिन साजरा केला जातो. मागील 19 वर्षांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाला यंदा राज्याचे मुख्यमंत्री प्रथमच उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली. यासह केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव आणि राज्यातून इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. 

असे असेल आयोजन

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता होणार आहे. महाराष्ट्र, दिल्ली, आणि पानिपत येथून मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित राहतील. यंदा ऑस्ट्रेलियातूनही काही नागरिक विशेषतः या कार्यक्रमासाठी येणार असल्याची माहिती आयोजकांनी सांगितले. 

 

000000000000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

वृत्त वि. क्र.05 / दिनांक 11.01.2025


 

महाराष्ट्र सदन येथे भौगोलिक मानांकन उत्पादने विक्री प्रदर्शन ग्रामीण उत्पादनांना शहरांशी जोडण्याचा प्रयत्न 13 जानेवारीपर्यंत विक्री प्रदर्शन





 

नवी दिल्ली, दि. 10: कस्तुरबा गांधी स्थित महाराष्ट्र सदन येथे नाबार्डच्या सहकार्याने आजपासून 13 जानेवारी दरम्यान भौगोलिक मानांकन (GI) असलेल्या उत्पादनांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 

या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील स्थानिक उत्पादनांचा समावेश असून, ग्रामीण भागातील उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे.

या प्रदर्शनाची उद्घाटन प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन यांच्या हस्ते आज झाले. यावेळी नाबार्ड चे सहाय्यक महाव्यवस्थापक रवींद्र मोरे उपस्थित होते यासह महाराष्ट्र सदन च्या व्यवस्थापिका भागवंती मेश्राम, बांधकाम विभागाचे अभियंते जे डी गंगवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या प्रदर्शनात नाशिक जिल्ह्यातील येवले मधील भौगोलिक मानांकन प्राप्त झालेले दिवटे पैठणी या दालनात पैठणी, सेमी पैठणी, हातमागच्या साड्या तसेच पैठणीच्या जॅकेट, टोपी, हॅन्डबॅग आहेत.

            नंदुरबार जिल्ह्यातील तालुका धडगाव येथील बोंदवाडे मधील 'आमु आखा एक से' या शेतकरी उत्पादक कंपनीची   आमचूर पावडर, तसेच या जिल्ह्यातील डॉक्टर हेडगेवार सेवा समितीतर्फे भौगोलिक मानांकन प्राप्त झालेली भडक लाल मिरचीचे दालन आहे. 

            कोल्हापूरमधील कोल्हापूर एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट येथील प्रसिद्ध गूळ, सातारा जिल्ह्यातील मिरज येथे तयार होणारे तानपुरा आणि सितार यांनाही मानाची भौगोलिक मानांकन मिळालेले असून या वाद्यांची छोटी प्रतिकृती मांडलेली आहे. 

 

            अकोला जिल्ह्यातील ग्रामपुत्रा जीविक शेती मिशन, शेतकरी उत्पादक कंपनी खापरवाडा यांचे सेंद्रिय मसाले आणि हळद यांचा समावेश आहे. 


अहिल्यानगर जिल्ह्यातील राधिका महिला बचत गट अंतर्गत तयार करण्यात येणारे काळा मसाला, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, शेंगदाणा, जवस, तीळ, कारळ यांच्या चटण्याही या  स्टॉलवर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

दिल्लीतील मराठी नागरिकांसह इतरही लोकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, भौगोलिक मानांकन मिळालेल्या वस्तू खरेदी कराव्या आणि ग्रामीण भागातील उत्पादकांना सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

प्रदर्शनस्थळ: महाराष्ट्र सदन, कस्तुरबा गांधी स्थित नवी दिल्ली

कालावधी: 10 जानेवारी ते 13 जानेवारी

वेळ: सकाळी 10:00 ते सायंकाळी 7:00

 


 

Wednesday, 25 December 2024

राजधानीत स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी






 

नवी दिल्ली, 25: भारतीय राजकारणातील महान विचारवंत आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची 100 वी जयंती महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली.

 

कॉपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार  यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

 

यावेळी सहायक निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 

 

*****************

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.157  / दिनांक 25.12.2024
 

Wednesday, 18 December 2024

डॉ.सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरुप’ या समिक्षात्क पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार


साहित्य अकादमी साहित्य पुरस्कारांची घोषणा

 

नवी दिल्ली, 18: मराठीतील सुप्रसिध्द समीक्षक डॉ. सुधीर रसाळ  यांना ‘विंदांचे गद्यरुप’ या समिक्षात्क पुस्तकासाठी मराठी भाषेकरिता  साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर करण्यात आला.

             अकादमीचे सचिव, के. श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नाव लौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने, येथील कॉपर्निकसमार्ग स्थित साहित्य अकादमीच्या रविंद्र सभागृहात वर्ष 2024 साठी साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 21 प्रादेशिक भाषांसाठी  साहित्य अकादमी साहित्य पुरस्कारांची  निवड व घोषणा करण्यात आली.

डॉ.सुधीर रसाळ यांच्या विषयी

डॉ.सुधीर रसाळ हे मराठीतील मान्यवर समीक्षक आणि लेखक आहेत. त्यांनी 1956 पासून मराठी वाङ्मयाची समीक्षा करत उल्लेखनीय योगदान दिले आहे. दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व करणारे रसाळ हे औरंगाबाद विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागाचे 1990 ते 1993 या काळात प्रमुख होते. साहित्य लेखन, समीक्षा आणि संपादन या क्षेत्रांत त्यांचा हातखंडा आहे.

ग्रंथसंपदा

डॉ.रसाळ यांच्या महत्त्वाच्या पुस्तकांमध्ये कविता आणि प्रतिमा, कवितानिरूपणे, मर्ढेकरांची कविता : आकलन आणि विश्लेषण, ना.घ. देशपांडे यांची कविता यांसारख्या ग्रंथांचा समावेश आहे. त्यांचे लेखन वाङ्मयीन जाणिवा, शैली, आणि संस्कृती यावर विशेष प्रकाश टाकते.

पुरस्कार आणि मानसन्मान

डॉ. रसाळ यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यामध्ये अशोक कीर्तकीर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार, गौरवमूर्ती पुरस्कार, आणि मराठवाडा साहित्य परिषदेचा पहिला जीवनगौरव पुरस्कार यांचा समावेश आहे. 2021 साली त्यांना अशोक केळकर मराठी-भाषा-अभ्यासक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

“विंदांचे गद्यरुप” या पुस्ताकाविषयी

मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांच्या “विंदाचे गद्यरुप” या समीक्षात्मक पुस्तकाला प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठी समीक्षेच्या क्षेत्रात सैद्धांतिक समीक्षेचा अभाव अधोरेखित करणारे हे पुस्तक साहित्य आणि वाङ्मय विषयक अनेक प्रश्नांना समर्थ उत्तरे देते.

डॉ. सुधीर रसाळ यांनी त्यांच्या समीक्षेत वाङ्मयकृतीच्या अस्तित्वाचा, तिच्या घटकांच्या परस्पर संबंधाचा आणि तिच्या मूल्यमापनासाठी योग्य निकष तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी समीक्षेच्या दीडशे वर्षांच्या इतिहासात काही निवडक समीक्षकांनीच अशा प्रकारचे सैद्धांतिक अभ्यास सादर केले आहेत. बा.सी मर्ढेकरांनी यांनी सर्व ललित कलांबाबत सिद्धांत मांडला, त्यानंतर विंदा करंदीकर यांनी वाङ्मयकलेच्या जीवनाविधी कलेवर आधारित वेगळा सिद्धांत मांडला.

परंतु करंदीकरांच्या या सिद्धांताला अपेक्षित मान्यता मिळाली नाही. त्यांच्या समीक्षेत केवळ सिद्धांत नव्हे, तर समग्र काव्यशास्त्र निर्माण करण्याची क्षमता होती.  डॉ.रसाळ यांनी  या पुस्तकातून पहिल्यांदाच विंदांच्या काव्यशास्त्राची सैध्दांतिक समीक्षा मांडली आहे.  

परिक्षक मंडळ व पारितोषिकाविषयी

श्री हरिश्चंद्र थोरट, श्री. वसंत आबाजी डहाके आणि डॉ. विद्या देवधर या साहित्यिकांचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार निवडीच्या परिक्षक मंडळात समावेश होता.  साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र, शाल आणि रुपये एक लाख रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.

साहित्य अकादमी पुरस्काराचे वितरण 8 मार्च 2025 रोजी कमानी ऑडिटोरियम येथे आयोजित होण्याची माहिती, सचिव श्री के. श्रीनिवासराव यांनी दिली.

 

000000000000

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र. 153/ दिनांक 18.12.2024

Thursday, 14 November 2024

राजधानीत बिरसा मुंडा यांची जयंती साजरी




नवी दिल्ली, 14: आदिवासी समाजाचे शूर योद्धा आणि स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांची जयंती महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली. महाराष्ट्र सदनातील कार्यक्रमात बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले.

 

कॉपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.  यावेळी महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

 

*****************

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र. 143/ दिनांक 15.11.2024


 

Wednesday, 9 October 2024

इतर मागासवर्गाच्या केंद्रीय यादीत महाराष्ट्रातील काही जाती, समुदायांचा समावेश करण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस


 


नवी दिल्ली, 09: राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने (एनसीबीसी) आज  केंद्र सरकारकडे (i) लोध, लोधा, लोधी (Lodh, Lodha, Lodhi) या ओबीसी जाती / समुदायांचा समावेश करण्याबाबत शिफारस केली आहे; तसेच (ii) बडगुजर (Badgujar), (iii) सूर्यवंशी गुजर (Suryavanshi Gujar), (iv) लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर (Leve Gujar, Reve Gujar, Reva Gujar); (v) डांगरी (Dangari); (vi) भोयर, पवार (Bhoyar, Pawar); (vii) कपेवार, मुन्नार कपेवार, मुन्नार कापू, तेलंगा, तेलंगी, पेंताररेड्डी, बुकेकरी (Kapewar, Munnar Kapewar, Munnar Kapu, Telanga, Telangi, Pentarreddy, Bukekari) जाती/समुदाय महाराष्ट्र राज्यासाठी इतर मागासवर्गीय (OBC) च्या केंद्रीय यादीत समावेश करण्याची विनंती केली आहे.

 

         याबाबत, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर आणि आयोगाचे सदस्य भुवन भूषण कमल यांचा समावेश असलेल्या आयोगाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने 17 ऑक्टोबर 2023 आणि 26 जुलै 2024 रोजी मुंबई येथे यासंदर्भात सुनावणी घेतली होती.  मंगळवारी 8 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्याच्या ओबीसींच्या केंद्रीय यादीत वरील जातींचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती, केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय विभागाने दिली आहे.

 

*****************

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र. 131/ दिनांक 09.10.2024

Monday, 7 October 2024

नवी दिल्लीत डावी कडवी विचारसरणी प्रभावीत क्षेत्राची सुरक्षा, विकासाबाबत आढावा बैठक




माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 नक्षलग्रस्त भागात रस्ते, पायाभूत सुविधा, इंटरनेट, उद्योग, आरोग्य आणि

शिक्षण क्षेत्रांत प्रभावी विकास कामे

नवी दिल्ली, दि.7: राज्यात डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी कारवायांना तोंड देण्यासाठी तसेच नक्षलग्रस्त भागातील स्थानिक रहिवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने केली आहे. माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राने मोठे यश मिळवले असून प्रथमच उत्तर गडचिरोली सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाले आहे. त्यामुळे याभागात भिती आणि दहशतीवर मात केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

 

नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली डावी कडवी विचारसरणी प्रभावीत क्षेत्राच्या सुरक्षा व विकासाबाबत आढावा बैठक झाली. यावेळी  नक्षलवादाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या कारवाईची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात 2014 ते 2024 या दहा वर्षांत माओवादविरोधी अभियान अधिक तीव्र झाले आहे.  सशस्त्र माओवादी कॅडरची संख्या 2013 मध्ये 550 होती, ती 2024 मध्ये अवघी 56 झाली आहे. गेल्या सहा वर्षात 96 सशस्त्र माओवादी मारले गेले, 161 पकडले गेले आणि 70 जणांनी आत्मसमर्पण केले,असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

 

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राने आमच्या सरकारच्या कार्यकाळात मोठे यश मिळवले असून प्रथमच उत्तर गडचिरोली सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाले आहे. अबुझमाड ते एमएमसी झोनपर्यंतच्या माओवाद्यांच्या विस्तार योजनेलाही मोठा धक्का बसला आहे. या कार्यकाळात एकाही व्यक्तीची माओवादी संघटनांमध्ये नव्याने भरती झालेली नाही. सुरक्षा दलाचा सदस्यही शहीद झाला नाही.  माओवाद्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अबुझमाडला लागून असलेल्या भामरागड परिसरातील एकूण 19 गावांनी माओवाद्यांना गावात येण्यास बंदी घातली आहे. हे आमच्या विकास धोरणाचे मोठे यश असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

माओवाद्यांविरुद्धच्या कारवाईत केंद्र सरकार आणि शेजारील राज्य छत्तीसगड यांच्या धोरणांना महाराष्ट्र शासनाचा संपूर्ण पाठिंबा असेल, अशी ग्वाही देतानाच स्थानिकांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि रोजगार योजना राबवून डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी कारवायांचा सामना करून याभागातील भीती, दहशतीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

 

गर्देवाडा सारख्या संवेदनशील भागात प्रथमच एसटी बस सेवा सुरू झाली.  काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्हा 71.88 मतदान टक्केवारीसह संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल होता. माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर बॅनर आणि पोस्टर्सद्वारे लोकांना मतदान न करण्याचे आवाहन केले होते. पण ते नाकारून लोकांनी बॅनर आणि पोस्टर्स फाडून ते जाळले आणि लोकशाहीवर आपला विश्वास व्यक्त केल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

  

नक्षलग्रस्त भागात रस्ते पायाभूत सुविधा, इंटरनेट नेटवर्क, उद्योग, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये प्रभावी विकास कामे झाली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे 20 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह लॉयड मेटल्स लिमिटेडसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे सुमारे 10 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. सूरजागड इस्पात लिमिटेड 10 हजार कोटी रुपये खर्चून अहेरी तहसीलमध्ये एकात्मिक स्टील प्लांटची स्थापना करणार आहे. यामुळे आणखी सात हजार स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. सूरजगड खाण 10 दशलक्ष टन वार्षिक क्षमतेसह कार्यरत आहे.

  

नक्षलग्रस्त भागात राज्य शासनाने गुंतवणूक आणि रोजगाराला चालना देण्यासाठी आणखी सहा लोह खाणींचा लिलाव केला आहे.  आदिवासी तरुणांमधील कौशल्य विकासाला चालना मिळण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजीजच्या सहकार्याने गडचिरोलीमध्ये संशोधन, नवोपक्रम आणि प्रशिक्षण यासाठी एक अत्याधुनिक केंद्र सुरू करण्यात आले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये त्याचे उद्घाटन झाल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. हे केंद्र वर्षाला 4800 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहे.

  

महाराष्ट्राला सुरक्षा संबंधित खर्च (SRE) योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य आणि नक्षलग्रस्त भागात अधिक एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) स्थापन करण्यासाठी आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे. नक्षलविरोधी कारवायांमध्ये महाराष्ट्र पोलिसांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आणि या जिल्ह्यांमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलिस दल अतिरिक्त तैनात करणे आणि नवीन पदांची आवश्यकता आहे. महाराष्ट्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून याकामी नेहमीच सहकार्य आणि पाठिंबा मिळत आहे. तो यापुढेही कायम राहील, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च 2026 पर्यंत संपूर्ण देशातून माओवाद संपवण्याची शपथ घेतली आहे त्याला महाराष्ट्राची साथ असेल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

  

****************

 आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र. 130, दि.07.10.2024