नवी दिल्ली, २४ : पंचायतीराज व्यवस्थेच्या विकेंद्रीकरणासाठी महाराष्ट्राला देशातील दुस-या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या ग्राम विकास व पंचायतीराज मंत्री पंकजा मुंडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राज्यातील १७ स्थानिक स्वराज्य संस्थांचाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्यावतीने झारखंड राज्यातील जमशेदपूर येथील जे.आर.डी. टाटा क्रीडा संकुलात आज राष्ट्रीय पंचयातीराज दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध राज्यांना पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायतीराज तथा पेयजल आणि स्वच्छता मंत्री चौधरी बिरेन्द्र सिंह, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवरदास उपस्थित होते. महाराष्ट्राच्यावतीने ग्रामविकास व वित्त राज्यमंत्री दिपक केसरकर, सचिव व्ही गिरीराज उपस्थित होते.
पंचयातीराज व्यवस्थेत उत्तम कार्य करणा-या राज्यांना यावेळी विविध श्रेणींमधे वर्ष 2014-15 साठी चे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पंचायतराज व्यवस्थेच्या प्रभावी विकेंद्रीकरणासाठी महाराष्ट्राला दुस-या क्रमांकाचा ‘संचयी विकेंद्रीकरण सूचकांक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. देशातील चार राज्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. केरळ राज्याचा पहिल्या, कर्नाटकचा तिस-या तर सिक्कीमचा चौथ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
सातारा जिल्हा परिषदेचा सन्मान
पंचायतीराज व्यवस्थेची उत्तम अंमलबजावणी करणा-या सातारा जिल्हा परिषदेचा केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायतीराज तथा पेयजल आणि स्वच्छता मंत्री चौधरी बिरेन्द्र सिंह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जिल्हापरिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष प्रदीप साळुंखे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
वाडीभागाई ग्रामपंचायतीला राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार
ग्रामसभांची सातत्यपूर्ण व गुणात्मक अमंलबजावणी केल्याबद्दल सांगली जिल्हयातील शिराळा तालुक्यातील वाडीभागाई ग्रामपंचायतीचा राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सरपंच रामचंद्र पाटील, उपसरपंच संतोष लुगडे आणि ग्रामसेवक बाबासाहेब नागरगोजे यांनी पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्रासह देशातील 20 राज्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीला या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
राज्यातील दोन पंचायत समित्यांचा सन्मान
वर्धा जिल्हयातील कारंजा(घाडगे) आणि सातारा जिल्हयातील कराड पंचायत समितीचा राष्ट्रीय पंचायती सक्षमीकरण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कारंजा(घाडगे) पंचायत समितीच्या सभापती संगिता खोडे, उपसभापती शुभांगी फडके आणि गटविकास अधिकारी बाळा यावले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सातारा जिल्हयातील कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील आणि गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
चौदा ग्रामपंचायतींचा बहुमान
या कार्यक्रमात राज्यातील चौदा ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. सांगली जिल्हयातील तीन तर नागपूर आणि चंद्रपूर जिल्हयातील प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सांगली जिल्हयातील तासगांव तालुक्यातील आरवडे आणि मातकुंटी ग्रामपंचायतीचा यावेळी सन्मान करण्यात आला. आरवडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रकाश चव्हाण आणि ग्रामसेवक विजय मस्कर यांनी पुरस्कार स्वीकारला. मातकुंटी ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना पाटील, उपसरपंच बंडोपंत निकम आणि ग्रामसेवक दीपक भंडारे यांनी पुरस्कार स्वीकारला. सांगली जिल्हयातीलच शिराळा तालुक्यातील वाडीभागाई ग्रामपंचायतीचे सरपंच रामचंद्र पाटील, उपसरपंच संतोष लुगडे आणि ग्रामसेवक बाबासाहेब नागरगोजे यांनी पुरस्कार स्वीकारला.
नागपूर जिल्हयातील कामठी तालुक्यातील महालगाव आणि हिंगणा तालुक्यातील वागदरा ग्रामपंचायतींचा यावेळी सन्मान करण्यात आला. महालगावच्या सरपंच दिपाली चाणेकर आणि उपसरपंच जिजाबाई निधन यांनी पुरस्कार स्वीकारला. वागदरा ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच कल्पना फुलकर, उपसरपंच लक्ष्मी देवगाडे आणि ग्रामसेवक रमेश साळुंखे यांनी पुरस्कार स्वीकारला.
चंद्रपूर जिल्हयातील ब्रहृमपुरी तालुक्यातील भूज आणि बल्लारपूर तालुक्यातील लावरी ग्रामपंचायतींचा यावेळी सन्मान करण्यात आला. भूज ग्रामपंचायतीच्यावतीने माजी सरपंच सुरेश ठिकरे यांनी तर लावरी ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच वैशाली पोतराजे, उपसरपंच धिरज निरंजने आणि ग्रामसेवक वर्षा मानकर यांनी पुरस्कार स्वीकारला.
भंडारा जिल्यातील लाखनी तालुक्यातील शिवनी मोगरा ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामपंचायत सदस्य मोहनराव कुठे यांनी पुरस्कार स्वीकारला. नाशिक जिल्हयातील दुगाव ग्रामपंचायतीला देण्यात आलेला पुरस्कार सरपंच किरण गायकवाड आणि उपसरपंच विकास वाघ यांनी स्वीकारला.
उस्मानाबाद जिल्हयातील उमरगा तालुक्यातील तालमोदच्या सरपंच मनिषा सुगिरे, उपसरपंच सतीश मोरे आणि ग्रामसेवक शेषराव कांबळे यांनी पुरस्कार स्वीकारला. ,अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातील लोणी बु. ग्रामपंचायतीचे सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे आणि ग्रामसेवक कविता अहेर यांनी पुरस्कार स्वीकारला. सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील गोळवण-कुमामे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष लाड आणि ग्रामसेवक भुषण बलाम यांनी पुरस्कार स्वीकारला.
अकोला जिल्हयातील बारशीटाकळी तालुक्यातील बाभा ग्राम पंचायतीच्या सरपंच अर्चना पाटील आणि गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारे. सातारा जिल्हयातील फलटण तालुक्यातील खर्डेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच अरूणा टिळेकर, उपसरपंच सोमनाथ जगताप आणि गजानन राणवारे यांनी पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्रासह उल्लेखनीय काम करणा-या देशातील स्थानिक स्वराज्य व्यवस्थेतील 183 संस्थाचा राष्ट्रीय पंचायती सक्षमीकरण पुरस्काराने गौरव करण्यात आला.
केंद्रीय पंचायतीराज मंत्रालयाच्यावतीने वर्ष २०१० पासून ‘२४ एप्रिल’ हा राष्ट्रीय पंचायतीराज दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रथमच दिल्ली बाहेर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीदिनाचे औचित्य साधत १४ एप्रिल २०१६ रोजी मध्यप्रदेशातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महू या जन्मस्थानापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘ग्राम उदय से भारत उदय’ या अभियानाची देशभर सुरुवात झाली. देशातील सर्वच ग्रामपंचायतींमधे राबविण्यात आलेल्या या अभियानाचा समारोपही या कार्यक्रमात झाला .
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीचे एकूण १६८ लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
*********
सूचना : सोबत फोटो जोडले आहेत