नवी दिल्ली, दि. ३० : जागतिक अपंग दिनानिमित्त देण्यात येणारे राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार- २०१७ जाहीर झाले आहेत. महाराष्ट्राला ५ पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिनांक ३ डिसेंबर या जागतिक अपंग दिनी विज्ञानभवनात होणार आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्यावतीने हे पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतात. दिव्यांगजणांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, उत्कृष्ट दिव्यांगजन कर्मचारी, दिव्यांगजणांसाठी कार्य करणाऱ्या संशोधन संस्था अशा एकूण १४ श्रेणीमध्ये हे पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्रातील दोन व्यक्ती आणि ३ संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
मुंबई येथील प्रणय पुरुषोत्तम बुरडे व पुणे येथील गौरी गाडगीळ यांना मानसिक दुर्बलता व मानसिक स्थूलता या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामासाठी हापुरस्कार जाहीर झाला आहे. अपंगत्वावर मात करत प्रणय बुरडे यांनी स्वबळावर रोजगार मिळवला असून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. डाऊन सिंड्रोम आजारानेग्रस्त व्यक्तींना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रणय बुरडे कार्यरत आहे. डाऊन सिंड्रोम या आजारावर मात करून दिव्यांगांच्या ऑल्म्पिकमध्ये भारतासाठी देान वेळा रजत पदक पटकाविणारी पुण्याची गौरी गाडगीळ ने दिव्यांगांसाठी आदर्श निर्माण केला आहे. गौरीच्या यशाची दखल मराठी चित्रपटसृष्टीनेही घेतली असून ‘यलो’ हा मराठी चित्रपट तिच्या यशोगाथेवर प्रदर्शीत झाला आहे.
दिव्यांगासाठी कार्यरत सर्वोत्तम संस्थामध्ये देशभरातून दोन संस्थाची निवड झाली. यात पहिला क्रमांक नवी मुंबई महानगर पालिकेच्या वाशी येथील ‘ई टी सी’ या दिव्यांगांना शिक्षण, प्रशिक्षण व सेवा देणा-या संस्थेला जाहीर झाला. पालिका आयुक्त डॉ. रामस्वामी एन, महापौर अनंत सुतार आणि संस्थेच्या अध्यक्षा डॉ. वर्षा भगत पुरस्कार स्वीकारणार आहेत.
दिव्यांगासाठी पुस्तक प्रकाशित करणा-या देशातील उत्कृष्ट ब्रेल प्रेस चा एकमेव पुरस्कार मुंबई ( वरळी ) येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया(नॅब) या संस्थेला जाहीर झाला आहे. ही संस्था १९५२ पासून कार्यरत असून संस्थेचे सचिव डॉ. विमल कुमार डेंगळा आणि कार्यकारी संचालक पल्लवी कदम पुरस्कार स्वीकारणार आहेत.
दिव्यांगजणांसाठी सुलभ संकेतस्थळ निर्माण करण्यासाठी दिला जाणारा ‘उत्कृष्ट संकेतस्थळ पुरस्कार’ जळगाव च्या ‘द जळगाव पीपल को ऑपरेटिव्हबँकेस’ जाहीर झाला आहे . हि बँक १९३३ पासून कार्यरत असून बँकेने दिव्यांगांना हाताळण्यास सुलभ असे संकेतस्थळ तयार केले आहे. या कार्याची दखल घेत बँकेची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.
या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आणि केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत, राज्यमंत्री द्वय कृष्णपाल गुर्जर आणि रामदास आठवले यांच्या उपस्थितीत दिनांक ३ डिसेंबर २०१७ ला सकाळी ११ वाजता येथील विज्ञान भवनात होणार आहे.
अधिकृत माहिती , वृत्त व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करा. http://twiteer.com/micnewdelhi