Wednesday, 14 April 2021

 

  डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक पुनर्रचनेतून समाजपरिवर्तनाला दिशा दिली-

                                                                        श्री अर्जुन डांगळे

नवी दिल्ली, १४ : समाजव्यवस्थेने घालून दिलेली जातीची उतरंड, विषमता व भेदाभेद मोडून काढण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक पुनर्रचनेची संकल्पना मांडून वंचित समाजाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करत समाज परिवर्तनाला दिशा दिली ,असे मत ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे यांनी आज मांडले.   

                    महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत “डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा ”  या विषयावर 27 वे पुष्प गुंफताना श्री. डांगळे बोलत होते .

              सामाजिक व्यवस्थेने सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेपासून वंचित ठेवलेल्या व डोक्यावर हक्काचे छप्पर नसलेल्या ,राहायला हक्काची जमीन नसलेल्या घटाकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमानाची व हक्काची जाणीव करून दिली. या वंचित उपेक्षित घटकाला मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी व स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी सामाजिक पुनर्रचनेची  संकल्पना मांडली व ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक लढे उभारल्याचे श्री डांगळे यांनी सांगितले.

                         डॉ आंबेडकरांच्या सामाजिक पुनर्रचनेच्या  लढयांमध्ये १९२७ चा रायगड जिल्ह्यातील महाड येथील ‘चवदार तळयाचा सत्याग्रह’, १९३० मध्ये नाशिक येथील ‘काळाराम मंदिर’ प्रवेश असे एकानेक लढे आहेत.  वंचितांना स्वावलंबी जीवन मिळवून देण्यासाठी १९२४ मध्ये ‘बहिष्कृत हितकारणी सभे’ची स्थापन करून त्यांनी ‘ शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ असा मंत्र दिला. जुन्या चालीरीती, रुढींचा त्याग करून स्वावलंबी शिक्षण घेवून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा  संदेश त्यांनी दिला. अशा समाज घटकांसाठी शिक्षणाची दारे उघडी खुली व्हावी म्हणून पिपल्स एज्युकेश सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीच्या माध्यमातून मुंबईत सिध्दार्थ महाविद्यालय तर औरंगाबाद येथे मिलींद महाविद्‌यालयाची स्थापना केली.  

डॉ. आंबेडकरांचा दृष्टीकोण व्यापक होता दलितोध्दारासोबतच कामगार मंत्री असताना त्यांनी कामगारांचा आठ तासाचा दिवस ठरवून देण्याचे तसेच  महिलांना बाळंतपणाची रजा मिळवून देण्याचे प्रयत्न केले. सर्वांना कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी  त्यांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना केली. शेतीकऱ्यांना पुरक व्यवसाय उपलब्ध करून देण्याचा विचार तसेच जल व्यवस्थापनाबाबतही त्यांनी महत्वाचे विचार मांडले, अशी माहिती श्री. डांगळे यांनी दिली.     

समाजशास्त्रज्ञ, शिक्षण शास्त्रज्ञ, समाजसुधारक, विद्वान पंडित, राजकारणी असे विविध पैलु डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तीमत्वाला होते. समाजातील शेवटच्या घटकाला स्वावलंबीपणे जगता यावे म्हणून त्यांनी समता बंधुता स्वातंत्र यावर आधारीत जीवनमुल्य पध्दती अंमलात आणण्यासाठी त्यांनी अथक संघर्ष केला.  या सर्व विषयांवर डॉ आंबेडकरांनी  लिखाण केले. ‘एनिहिलेशन ऑफ कास्ट’ या ग्रंथातून त्यांनी भारतातील धर्मव्यवस्थेचे विश्लेषण केले. ‘प्राब्लेम ऑफ रुपी’,  ‘बुध्द अँड  हिज धम्म’, ‘रानडे, गांधी  आणि जीना’ असे ग्रंथ लिहून त्यांनी भारतीय लोकशाही व सुधारणावादाची पंरपरा सांगितली. ‘कास्ट इन इंडिया’ या निबंधात त्यांनी देशातील जाती व्यवस्थेची मिमांसा केली असे श्री डांगळे यांनी सांगितले.

            सर्वांसाठी शिक्षण या महात्मा फुले यांच्या विचाराला त्यांनी गती दिली. छत्रपती शाहु महाराजांनी १९२० च्या मानगाव परिषदेत डॉ आंबेडकरांना पाठिंबा दिला होता. पुढे  त्यांनी फुले-शाहुंच्या विचारांची  पंरपरा मजबूत केली. जनतेच्या प्रबोधनासाठी राजकीय पक्ष , संघटना उभारल्या , वृत्तपत्रे सुरु केली ब्रिटीशांनी १९३८ मध्ये आणलेल्या कामगार विरोधी काळया कायद्या विरुध्द ते रस्त्यावर उतरले. ‘स्वतंत्र मजूर पक्ष’, ‘शेडयुलकास्ट फेडरेशन’ आणि ‘रिपब्लिकन पक्षा’ची स्थापना करून त्यांनी मोठे कार्य उभे केले. ‘मुकनायक’ ‘जनता’ ‘बहिष्कृत भारत’आदी वृत्तपत्रांतून त्यांनी जनतेचे  प्रबोधन केले व जुन्या चालीरीत सोडून देत आधुनिक मुल्यांचा स्वीकार करण्याची शिकवण दिली, असे श्री डांगळे म्हणाले.

       तत्कालीन व्द‍िभाषिक मुंबई राज्य जावून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावे यासाठी लढा उभारण्याबाबत विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबासाहेबांची भेट घेतली होती. या भेटीत संयुक्त महाराष्ट्राच्या लढयाला डॉ आंबेडकरांनी पाठिंबा दर्शविण्याची भूमिका स्पष्ट केली होती. तसेच या लढयासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहनही केले होते, असे श्री डांगळे यांनी सांगितले.

                                       भारतीय राज्यघटना ; राष्ट्रभक्तीचे प्रतिक

            बाबासाहेबांनी भारत देशाला दिलेली राज्यघटना हे राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्तीचे प्रतिक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र, समता-बंधुता’ या मुल्यांचा अंतर्भाव करून समाजातील शेवटच्या घटकाला आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळावा यासाठी  त्यांनी राज्यघटनेत अनेक तरतुदी करून ठेवल्या. बाबासाहेबांचे राष्ट्रनिर्मितीचे स्वप्न आणि त्यांना अपेक्षित असलेला भारत राज्यघटनेतून दिसून येतोख्‍ असे श्री डांगळे म्हणाले.

   एकजातीय पध्दतीवर आधारीत राजकीयपक्ष डॉ आंबेडकरांना नको होता म्हणून लोकशाही टिकविण्यासाठी त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून ‘रिपब्लीकन पक्ष’ स्थापन केला. या पक्षाच्या माध्यमातून लोकशाही टिकविण्यासाठी सामाजिक न्यायाची लढाई लढली.  त्यांनी आधुनिक मुल्यांशी सुसंगत असा ‘बौध्द धम्म’ स्वीकारला होता . आधुनिक विचाराचे अधिष्ठान असणारा ,विज्ञान निष्ठा मानणारा व स्त्रियांना समानता देणारा एक समाधिष्टीत धम्म त्यांनी पुढे आणला. डॉ आंबेडकरांनी  अनिष्ट वृढींवर प्रहार केले व देशावर प्रेम केले शेवटच्या मानसाला न्याय मिळावा यासाठी ते सदैव प्रयत्नरत राहील. लोकशाहीचे सामाजिकीकरण करून सर्वसमान्यांना त्यांचे अधिकार मिळवून दिले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार आचरणात आणणे व ते पुढच्या पिढी पर्यंत पोहचविणे हीच बाबासाहेबांना आदरांजली ठरेल असे आवाहनही श्री डांगळे यांनी केले.


राजधानीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

 





 





नवी दिल्ली दि. 14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. 

 

कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यासह कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास अभिवादन केले. यावेळी  सहायक निवासी आयुक्त  डॉ. राजेश आडपावार, सहायक लेखा अधिकारी निलेश केदारे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस व पुतळयास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

              महाराष्ट्र परिचय केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  यांच्यासह कार्यालयात उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून नागरीकांना भारतीयत्वाची मिळालेली ओळख आणि देशात झालेला सकारात्मक बदल यावर श्रीमती निमसरकर यांनी याप्रसंगी  प्रकाश टाकला.

Monday, 12 April 2021

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समाज परिवर्तनाची दिशा” विषयावर आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे यांचे व्याख्यान



 

नवी दिल्ली, दि. 12 : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे हे 14 एप्रिल 2021 रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समाज परिवर्तनाची दिशा’ या विषयावर 27 वे पुष्प गुंफणार आहेत.

 

            महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली 60 वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने 19 मार्च 2021 पासून ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु झाली आहे. 14  एप्रिल रोजी या व्याख्यानमालेच्या सत्तावीसाव्या दिवशी अर्जुन डांगळे हे सकाळी 11 वाजता विचार मांडणार आहेत.

अर्जुन डांगळे यांच्या विषयी

ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, साहित्यिक मराठी साहित्यावर प्रभुत्व असलेले आणि गेली पाच दशके महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींमध्ये अर्जुन डांगळे यांनी सहभाग घेतला आहे. कवी, इतिहासाचा विद्वान वाचक आणि समाज सुधारणेच्या चळवळीचा संवेनदशील माणूस म्हणून श्री डांगळे यांची ओळख आहे. त्यांनी केवळ आंबेडकरी साहित्य चळवळीलाच हातभार लावला नाही तर पिढयानपिढया लिहण्यासाठी इच्छुक असणा-यांनाही मार्गदर्शन केले. राज्यघटनेत अपेक्षित असलेल्या सामाजिक समतेसाठी ते संघर्षरत आहेत. मराठी साहित्य, समाज सुधारणेच्या चळवळीमधील त्यांचे योगदान महत्वपुर्ण आहे.

‘छावणी हलते आहे…’ या कवितासंग्रहासह ‘ही बांधावरची मानस’ हा लघुकथांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. ‘दलित विद्रोह’, ‘आंबेडकरी चळवळीचे अंतरंग’, ‘निळे अधोरेखित’  हे लेख संग्रह आहेत. ‘मैदानातील माणसे’, ‘कार्यकारणभाव :समाज आणि साहित्य..... साहित्यिक टिका’, ‘दलित पँथरचा इतिहास’ हे आणखी काही पुस्तके श्री डांगळे यांनी लिहीलेली आहेत.  

काही पुस्तकांचे संपादनही श्री डांगळे यांनी केले आहे. यामध्ये ‘दलित साहित्य : एक अभ्यास’, ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  : निवेदक वाड्मय’, ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड – काळ आणि कर्तुत्व’, ‘विषयुक्त भाकर : दलित साहित्याचे काव्यशास्त्र’,  ‘प्रबुध्द भारत नियतकालिक’ ही पुस्तके  आहेत.

 

समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण

        मंगळवार, 14 एप्रिल 2021 रोजी  सकाळी 11 वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share  तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhiयुटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे. 

महाराष्ट्राला लाभल्या समृध्‍द व वैविद्यपूर्ण रानवाटा : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली

  

नवी दिल्ली, १२ : महाराष्ट्राच्या जंगलातील हिरवाई, पक्षी, प्राणी यांचा वैविद्यपूर्ण अधिवास आणि या जंगलातील अनाकलनीय व चमत्कृतिक घटनांचा अनुभव मला घेता आला. येथील रानवाटा समृध्द असल्याची, माहिती अरण्यऋषी, पक्षीतज्ज्ञ, वृक्ष अभ्यासक व साहित्यिक मारूती चितमपल्ली यांनी आज दिली.  

             “महाराष्ट्राच्या रानवाटा” या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे रौप्य पुष्प (25 वे) गुंफताना श्री. चितमपल्ली  बोलत होते.

        वनाधिकारी पदवी शिक्षण पूर्ण करून वनअभ्यासक हुड यांच्या प्रेरणेतून निष्ठेने सुरु झालेला वन विभागातील प्रवास व या सेवेमध्ये महाराष्ट्रातील चमत्कृतिक रानवाटांतून सापडलेले ज्ञानभांडार असा पटच मारुती  चितमपल्ली यांनी  उलगडला.

            १९५८-६० मध्ये तामीळनाडूतील कोईंबतुर शहरात वनाधिकारी पदवी शिक्षण घेताना, महाविद्यालयाच्या प्रथेनुसार अनाईमलाई पर्वतावर स्थित वनअभ्यासक हुड यांच्या समाधीचे दर्शन व त्याचा किस्सा श्री चितमपल्ली यांनी सांगितला. हुड यांनी अनाईमलाई पर्वतावरील हजारो एकरावर फुलवलेली हिरवाई व त्यांची वनांप्रती असलेली निष्ठा बघून थक्क झालो.  येथून वनांचा विकास आणि तेथील प्राण्यांचे संवर्धन त्यांचा वैविद्यपूर्ण अभ्यास हे जीवन ध्येय ठरल्याचे श्री चितमपल्ली यांनी सांगितले. 

             महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथील जबाबदारी पार पाडताना वन्यजीवन व्यवस्थापन, वने, वन्यप्राणी आणि पक्षी जगताविषयी केलेल्या संशोधन कार्यातील निरीक्षणांवर त्यांनी ओघवता प्रकाश टाकला. या सर्व परिपकातून राज्याच्या जंगलातील वैविद्यपूर्ण व चमत्कृतिक वैशिष्टये विविध पुस्तकांच्या रुपात मांडता आली येथील वनांतील  पक्षी निरीक्षणाचा अनुभवही समृध्द करणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

  

                                                  रानकुत्र्यांना अभय

       महाराष्ट्रातील रानवाटांचा अभ्यास करताना व प्रत्यक्ष कार्य करताना ठसठसीत आठवाव्या अशा अनुभवांमध्ये रानकुत्र्यांचे प्राण वाचविण्याचा अनुभव श्रेष्ठ असल्याचे सांगून श्री चितमपल्ली यांनी स्वानुभव कथन केला. पूर्व विदर्भातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान आणि नागझिरा अभयारण्यात कार्यरत असताना रानकुत्र्यांबाबत सटीक अभ्यास करून शासनास सादर केलेल्या अहवालामुळे येथील रानकुत्र्यांचे प्राण वाचले. या भागात वाघाची संख्या कमी होण्यास रानकुत्रेच जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढून रानकुत्र्यांना माराण्याचे फर्मान देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पक्षितज्ज्ञ सलीम अली यांच्यासोबत झालेल्या भेटीत त्यांनी रानकुत्र्यांचा साक्षेपी अभ्यास करून शासनाचा फर्मान थांबवा अशा सूचना दिल्याचा संदर्भही श्री चितमपल्ली यांनी यावेळी दिला. यासाठी २४ तास रानात पहारा देवून रानकुत्र्यांच्या खानपध्दतीचा अभ्यास केला निरीक्षण नोंदवली यासंदर्भात शासनास सविस्तर अहवाल सादर केला. अखेर वाघांची संख्या कमी होण्यास रानकुत्रे जबाबदार नसल्याचे मान्य झाले व त्यांचे प्राण वाचले हा आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण ठरल्याचे त्यांनी सांगितले.    

            संस्कृत साहित्यात वन्यप्राण्यांची मोठी माहिती उपलब्ध असल्याने वयाच्या ४०व्या वर्षी संस्कृत भाषा शिकण्याचा व विद्यापीठात दुसरा क्रमांक पटकाविण्याचा अनुभवही श्री चितमपल्ली यांनी सांगितला. ‘पालकाप्यम’ हा पाल ऋषीने लिहीलेल्या संस्कृत ग्रंथाचा अभ्यास व पुढे प्रत्यक्ष देशाच्या दक्षीण भागातील जंगलामध्ये जावून हत्ती या महाकाय प्राण्याच्या वैशिष्टयपूर्ण क्रियाकलापाबाबतच्या अनुभवांवरही श्री चितमपल्ली यांनी यावेळी प्रकाश टाकला.


 


महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या विचारधारा काल आज आणि उद्या’या विषयावर

डॉ.निलम गोऱ्हे यांचे व्याख्यान

नवी दिल्ली, दि. 12 : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे या 13 एप्रिल 2021 रोजी ‘महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या विचारधारा काल आज आणि उद्या’ या विषयावर 26 वे पुष्प गुंफणार आहेत.

 

            महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली 60 वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने 19 मार्च 2021 पासून ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु झाली आहे. 13  एप्रिल रोजी या व्याख्यानमालेच्या सव्वीसाव्या दिवशी उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे या सकाळी 11 वाजता विचार मांडणार आहेत.

डॉ. निलम गोऱ्हे  यांच्या विषयी

वर्तमानात महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती आणि महिलांविषयक हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या डॉ. निलम गोऱ्हे या महाराष्ट्रातील तळागळातील जनतेला सुपरिचित असे नाव आहे. डॉ. गोऱ्हे यांनी 1987 पासून सार्वजनिक क्षेत्रात काम सुरू केले. सामाजिक, राजकीय क्षेत्राात काम तसेच याच विषयांवर विविध दैनिकात, मासिकात लिखाण केले. पंचायत राज, महिला विकास, स्त्रीयांवर होणारे अत्याचार, याविषयांवर जनजागृती करणारे जवळपास 500 पेक्षा अधिक व्याख्याने त्यांनी आजवर दिलेली आहेत.

            डॉ. निलम गोऱ्हे या स्त्री आधार केंद्र व क्रांतीकारी माहिला संघटना या संस्थांच्या त्या संस्थाप‍िका आहेत. 1993-95 मध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या त्या सदस्या राहील्या आहेत. 1992 ते 98 या कालावधीत  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महिला व्यासपीठाच्या निमंत्रक म्हणून त्यांनी काम केले.

 

राज्यातील हजारो कुटुंबीयांना व महिलांना कायदेशीर मदत, सल्ला मार्गदर्शन, समुपदेशन सेवा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. घरगुती हिंसाचार, बलात्कार, छळ अशा विषयांमध्ये महिलांच्या मदत गटाची स्थापना त्यांच्या पुढाकराने झालेली आहे. स्त्री आधार केंद्रामार्फत न्यायालयात न्याय मिळवून देण्यासाठी सहाय्य आणि सक्रिय सहकार्य डॉ. गोऱ्हे या करतात.

डॉ. गोऱ्हे यांना लिहीण्याचा आणि वाचण्याचा व्यासंग आहे. त्यांची अनेक पुस्तके आहेत. या पुस्तकांमधुनही त्यांनी जनजागृतीचे कार्य केलेले आहे.  

           

समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण

        मंगळवार, 13 एप्रिल 2021 रोजी  सकाळी 11 वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे 

मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic,

 हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍

इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईलhttps://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share  तसेच

 https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhiयुटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे. 

Sunday, 11 April 2021

महात्मा फुले हे क्रांतिकारक कार्यातून जनमानसाच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारे महामानव –डॉ. श्रीमंत कोकाटे



 नवी दिल्ली, ११ : महात्मा जोतिराव फुले  यांनी धर्मव्यवस्था व राजसत्तेला आव्हान दिले. सांस्कृतिक क्षेत्रातील गुलामगिरी नष्ट करणारे व देशातील शुद्रातीशुद्रांना शिक्षण देण्याचे क्रांतिकारक कार्य करणारे महात्मा फुले हे जनमानसाच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारे महामानव ठरतात, असे मत प्रसिध्द वक्ते व इतिहास संशोधक डॉ श्रीमंत कोकाटे यांनी आज मांडले.

 “महात्मा फुले : एक क्रांतिकारक महामानव” या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे 24 वे पुष्प गुंफताना डॉ. कोकाटे बोलत होते.

            महात्मा फुले हे मध्ययुगीन काळाला व आधुनिक काळाला बांधून ठेवणारे क्रांतिकारक व्यक्तीमत्व आहे. आधुनिक महाराष्ट्राला महात्मा फुलें यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा परिचय झाला. राज्यात व देशात सार्वजनिक व मोफत शिक्षणाचा पाया फुले यांनी घातला. पिढयान-पिढया पिचलेल्या वर्गाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी व्यवस्थे विरूध्द लढा दिला. जनमाणसाची, शुद्रातीशुद्रांची, कष्टक-यांची मराठी भाषा साहित्यामध्ये आणण्याचे महत्वाचे कार्य फुले यांनी केले. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, साहित्य‍िक‍ि, सांस्कृतिक क्षेत्रात महात्मा फुले यांनी अमुलाग्र क्रांती घडवून आणत जनसामान्यांना जगण्याचे बळ दिले व त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला, असे डॉ. कोकाटे म्हणाले.

            महात्मा फुले शिक्षण घेत असतांनाच त्यांनी अनुभवले की, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, क्रांती नाही व परिवर्तनही नाही म्हणूनच सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली. स्त्रियांना शिक्षण दिल्याने धर्म बुडतो असा समज असणा-या तत्कालीन समाजव्यवस्थेने महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवल्याचे चित्र पाहून त्यांनी या विरूध्द बंड पुकारत १८४८ मध्ये पहिली मुलींची शाळा सुरु केली. पुढे १८५२ मध्ये मुलांची शाळा सुरु केली. या शाळांमध्ये सर्व जाती धर्माच्या स्त्री -पुरुषांना प्रवेश दिला. स्त्री-पुरुष समानता हे महात्मा फुले यांच्या कार्याचे वैशिष्टे आहे. १८८२ साली त्यांनी ‘हंटर कमिशन’ पुढे साक्ष देत समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी स्त्रियांना शिक्षण देण्याचे महत्व पटवून दिले होते.

शिक्षणाच्या अभावामुळे या देशातल्या शुद्रातीशुद्रांची काय अवस्था झाली याचे विवेचन महात्मा फुले यांनी ‘शेतक-यांचा असुड’ या आपल्या  ग्रंथाच्या उपोद्घाटामध्ये करताना म्हटले आहे, “विद्येविना मती गेली, मती विना निती गेली, नितीविना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शुद्र खचले ,इतके सगळे अनर्थ एका अविज्ञेने केले”

       महात्मा फुले हे बांधकाम व्यावसायिक होते. पुणे-सातारा रस्त्यावरील कात्रजच्या बोगदयाचे बांधकाम, खडकवासला धरणाचे बरेचसे बांधकाम व पुण्यातील अनेक पुल त्यांच्या कंपनीने बांधले. बांधकाम व्यवसायातून आलेला पैसा त्यांनी जनकल्याणासाठी वापरला. येणा-या उत्पन्नातून त्यांनी शाळा काढल्या गोरगरिबांना शिकवले. महात्मा फुलेंना संकुचित राष्ट्रवाद मान्य नव्हता ‘ एकमयी समाज’ हा त्यांचा राष्ट्रवाद होता असे डॉ कोकाटे यांनी सांगितले.

        स्त्रीभृणहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून महात्मा फुले यांनी अबला, निराधार स्त्रियांना आधार दिला. या महिलांमधील एक काशीबाई नातू यांचा मुलगा यशवंत यास दत्तक घेवून आपल्या विचाराचा व संपत्तीचा वारसदार केले म्हणून महात्मा फुले हे क्रांतिकारक ठरतात असे डॉ. कोकाटे म्हणाले.

   अकाली वैधव्य आलेल्या महिलांना तत्कालिन समाजरितीनुसार केशवपणाला सामोरे जावे लागत असे केशवपणाची ही अमानुष प्रथा महात्मा फुले यांनी  बंद पाडली, त्यासाठी नाभीकाची संघटना उभारली.

          महात्मा फुलेंचे साहित्य जनसामान्यांना आत्मविश्वास मिळवून देणारे

महात्मा फुलें यांचे साहित्य हे क्रांतिकारक आहे. त्यांच्या साहित्याने दबलेल्या-पिचलेल्या वर्गाला प्रेरणा दिली  त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. ‘गुलामगिरी’, ‘शेतक-यांचा असूड’, ‘ब्राह्मणांचे कसब’, ‘सार्वजनिक सत्यधर्म’ ‘शिवरायांचा पोवाळा’ ‘तृतियरत्न नाटक’ या महात्मा फुलेंच्या साहित्याने अमुलाग्र क्रांती घडवून आणल्याचे डॉ कोकाटे म्हणाले.

                        महात्मा फुलेंनी शिवजन्मोत्सवाचा पाया घातला

आधुनिक महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख करून देण्याचे जास्तीत-जास्त श्रेय  महात्मा फुलेंना जाते.  १८६९  मध्ये महात्मा फुले रायगडावर गेले शिवरायांच्या समाधीचा त्यांनी शोध लावला व तिथे चार दिवस मुक्काम केला. रायगडाहून परत येऊन पुण्यामध्ये त्यांनी १८६९ मध्ये शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करून देशात  शिवजन्मोत्सवाचा पाया घातला असे डॉ कोकाटे यांनी सांगितले.

३० सप्टेंबर १८७३ ला ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना करून फुले यांनी विवेकी पिढी निर्माण करण्याचे कार्य केले. त्यांच्या प्रेरणेने कामगारांचे संघटन उभे राहिले नारायण मेघाजी लोखंडे हे महात्मा फुलेंचे अनुयायी देशातील कामागार संघटनेचे पहिले अध्यक्ष होत, असे डॉ कोकाटे म्हणाले.

पुणे, सातारा, जुन्नर आदी भागात पडलेल्या दुष्काळाच्या काळात महात्मा फुले यांनी स्वत:च्या वाडयातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. दुष्काळी भागातील जनतेला अन्न-धान्य पोहचविले.

     महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव म्हणून  त्यांचे अनुयायी, सहकारी व सर्व क्षेत्रातील लोकांनी १८८८ मध्ये मुंबई येथील सार्वजनिक कार्यक्रमात त्यांना उत्सफुर्तपणे ‘महात्मा’ ही पदवी दिली.  

महात्मा फुले यांनी शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय आदी क्षेत्रात केलेल्या कार्यातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात मोठे कार्य उभे राहिल्याचे  डॉ .कोकाटे यांनी सांगितले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा: http://twitter.com/micnewdelhi