Wednesday, 30 November 2016

औरंगाबाद, अमरावती, नाशिक जिल्हे ‘जियो मनरेगा’ अंतर्गत पुरस्कृत











नवी दिल्ली, 30 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) च्या अंतर्गत झालेले कामे जियो मनरेगा तंत्रज्ञानाच्या सहायाने कुठेही आणि केव्हाही पाहता येतील. या तंत्रज्ञानाच्या सहायाने राज्यातील औरंगाबाद, अमरावती, नाशिक या तीन जिल्ह्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्यासाठी आज या जिल्‌हयांना पुरस्कृत करण्यात आले.
        येथील विज्ञान भवनात केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने जियो मनरेगा लोकार्पण सोहळयाच आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायत राज, पेयजल आणि स्वच्छता मंत्री नरेंद्र सिंग तोमर, अंतराळ विभाग (स्वतंत्र प्रभार) राज्य मंत्री जितेंद्र सिंग, ग्रामीण विकास राज्य मंत्री रामक्रीपाल यादव, आदी मान्यवर व्यासपीठवर उपस्थित होते.
        महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेव्दारे  विविध बांधकाम केले जाते. यामध्ये शेततळे, चेक डँम, रस्ते, पांनधन,  विहिरी, असे अनेक कामे केली जातात.  जी कामे प्रत्यक्षात झालेली आहेत, त्या कामांचे भुवन या  ऍपव्दारे छायाचित्रण करून टॅगींग केले जाईल. यामुळे कामात मनरेगाच्या कामात अधिक पारदर्शकता येईल. एकदा टॅगींग झालेले छायाचित्र पुन्हा टॅगींग करता येणार नाही. हे यामध्ये विशेष आहे.
मनरेगा अंतर्गत झालेल्या कामांमधून, आज एकूण  6 लाख 35 हजार बांधकाम झालेल्या संपत्तीचे टॅगींग झाले. आज त्याचे लोकपर्ण  केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री श्री तोमर यांच्या हस्ते करण्यात आले.
औरगांबाद विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, अमरावती जिल्‌हयाचे जिल्हा एमआयएस समन्वयक श्री अनंत घुगे आणि नाशिक जिल्‌हयाचे एमआयएस समन्वयक सनी धात्रज यांना आज जियो मनरेगाअंतर्गत उत्कृष्ट काम केल्या बद्दल केंद्रीय ग्रामीण विकास राज्य मंत्री रामक्रीपाल यादव यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.







Tuesday, 29 November 2016

वर्धा येथील शालेय विद्यार्थ्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट



                

नवी दिल्ली, २९ : वर्धा येथील शालेय विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी संसद भवनात भेट घेतली. पंतप्रधानांनी  या  विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा धडा शिकवला.  
            वर्धा रोटरी क्लबच्यावतीने वर्धा येथील २५ शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी सपने सच हुए कार्यक्रमाअंतर्गत दिल्ली दौ-याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौ-यात सोमवारी विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.  
 या भेटीत पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी माहिती दिली आणि स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत उत्तम काम करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही शाळा व आपल्या परिसरात ते राबवित असलेल्या स्वच्छता कार्यक्रमाची माहिती दिली. रोटरी क्लबच्या अध्यक्ष सुनीता इथापे आणि सचिव हितेंद्र गावने यावेळी उपस्थित होते.  
            तत्पूर्वी, या विद्यार्थ्यांनी लोकसभा अध्यक्ष सुमीत्रा महाजन यांची भेट घेतली  व त्यांच्याशी संवाद साधला. संसद परिसर आणि सभागृहाला भेट देऊन या विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली.
                                                           …….*……..

  


 


Monday, 28 November 2016

राज्यातील दोन रेल्वे मार्गाच्या निधीच्या तरतुदीस मंजुरी : महादेव जानकर








                                                                        
नवी दिल्ली, २८ : राज्यातील फलटण ते पंढरपूर आणि आष्टी-जामखेड-ढवळस या रेल्वे मार्गांच्या निधीच्या तरतुदीस केंद्र शासनाच्या आगामी अर्थसंकल्पात समावेश करण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध आणि मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी  सोमवारी दिली.  
            श्री. जानकर यांनी आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांची रेल्वे भवन येथे भेट घेतली. यावेळी रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि पंढरपूर-लोणंद रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ वाघमोडे, महेश डोंगरे उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीतफलटण ते पंढरपूरआणिआष्टी-जामखेड-ढवळस रेल्वे मार्गासाठी निधीच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली. तसेच, सोलापूर जिल्हयातील कुर्डूवाडी येथील आर.पी.एफ ट्रेनिंग सेंटरचे स्थलांतर होणार नसल्याची ग्वाही रेल्वे मंत्र्यांनी दिली.  
            श्री. जानकर यांनी सांगितले, लोणंद ते पंढरपूर  रेल्वे मार्गाचे २००८ मध्ये फेर सर्वेक्षण होऊन लोणंद ते पंढरपूर रेल्वे मार्गासाठी आर्थिक तरतूदीस मंजुरी मिळाली होती. उर्वरित फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गाच्या कामासाठी ४०० कोटी खर्च अपेक्षित आहे. आजच्या बैठकीत रेल्वे मंत्र्यांनी फलटण ते पंढरपूर मार्गासाठी २०१७-१८च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी मान्य केली .  
             मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आणि शेतक-यांना महत्वाचा ठरणारा आष्टी-जामखेड-ढवळस(कुर्डूवाडी) या नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी ५० कोटींच्या निधीसाठी आगामी अर्थसंकल्पात मंजुरी दिल्याचे श्री. जानकर यांनी सांगितले. या उभय प्रकल्पांसाठी केंद्र शासनाच्यावतीने ५० टक्केंचा निधी उपलब्ध होणार असून उर्वरित ५० टक्के निधी राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे.  
 सोलापूर जिल्हयातील माढा तालुक्यातील कुर्डूवाडी  येथील आर.पी.एफ. ट्रेनिंग सेंटरचे स्थलांतरण रोखण्याच्या मागणीस रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली. तसेच, या कार्यशाळेच्या सुविधा वाढविण्यासाठी रेल्वे मंत्रालय आवश्यक मदत देणार असल्याचे आश्वासन श्री. प्रभु यांनी दिल्याचे श्री. जानकर यांनी सांगितले. 

                                                           …….*…….. 

Saturday, 26 November 2016

‘मराठी पाऊल पडते पुढे’ कार्यक्रमाचे बहारदार सादरीकरण आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात ‘महाराष्ट्र दिन’ साजरा







नवी दिल्ली, 26 :  ‘मराठी पाऊल पडते पुढे’ कार्यक्रमातील पोवाडा, लावणी, जोगवा, गण-गौळण, वाघ्या-मुरळी, दिंडी, अभंग, वासुदेव आदी लोक कलांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृध्द सांस्कृतिक वारशाच्या बहारदार सादरीकरणाने शनिवारी प्रगती मैदान येथे महाराष्ट्र दिन’ साजरा झाला. या कार्यक्रमाने देश-विदेशातील प्रेक्षकांची मन जिंकली.
भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2016 ला 14 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली.  मेळाव्यात दररोज सायंकाळी लालचौक खुला रंगमंच येथे व्यापार मेळाव्यात सहभागी राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होत असते. व्यापार मेळाव्याच्या तेराव्या दिवशी आज  ‘महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
 या कार्यक्रमाचे उदघाटन सचिव तथा  निवासी आयुक्त आभा शुक्ला यांच्या हस्ते झाले. राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक एस.एस. सुरवसे , वित्त नियंत्रक राजेंद्र मडके, महाव्यवस्थापक विजय कपाटे, औरंगाबाद व नाशिक विभागाच्या व्यवस्थापक अलका मांजरेकर, निवासी व्यवस्थापक अमरज्योतकौर अरोरा  यावेळी उपस्थित होत्या.            
            यावेळी मुंबई येथील ‘उदय साटम ग्रुप' च्या ३४ कलाकारांनी महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणारा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा  बहारदार कार्यक्रम सादर केला. नमना’ ने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाहीराने डफावर थाप मारत छत्रपती  शिवाजी महाराजांच्या शुरगाथा कथन करण्यास सुरुवात केली, तोच उपस्थितांनी टाळयावाजवत पोवाडयाला उत्सफुर्त दाद दिली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचे दर्शन घडविणा-या वासुदेव, दिंडी या लोककलांच्या सादरीकरणाने येथे उपस्थित देश-विदेशातील रसिक प्रेक्षकांच्या टाळया मिळवल्या. मराठी मानसाचा उर स्वाभीमानाने भरून आणणारा शिव राज्याभिषेक’, महाराष्ट्राच्या कडा-कपारीत राहणा-या ठाकर जमातीचे दर्शन घडाविणारे नृत्य, संताच्या अध्यात्मिक विचार उलगडणारे भारूड, श्रीकृष्णाच्या लींलावर आधारीत गण-गौडण आदींनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. विविध लोककला व लोकनृत्यांचा आविस्कार असणा-या या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिबींबच उभे राहिले आणि यास उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद लाभला.                            
                                                           …….*…….. 

Friday, 25 November 2016

राजधानीत ‘संविधान दिन’ साजरा




नवी दिल्ली, 25 :  महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे आज संविधान दिन साजरा करण्यात आला. 
            कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्य घटनेच्या सामुहिकपणे वाचन करण्यात आले. यावेळी निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला, राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र,अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त भारती झाडे,       संजय आघाव आणि अजीतसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते 

                   महाराष्ट्र परिचय केंद्रात संविधान दिन साजरा

महाराष्ट्र परिचय केंद्रात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी परिचय केंद्राच्या अधिकारी कर्मचा-यांनी  राज्य घटनेच्या उददेशिकेचे सामुहिकपणे वाचन केले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्यासह कर्मचारी यावेळी उपस्थित होते .   
                                                                       00000












Thursday, 24 November 2016

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात ‘महाराष्ट्र दिन’



नवी दिल्ली, दि. 24 : प्रगती मैदान येथे आयोजित ३६ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्या (आयआयटीएफ) मध्ये महाराष्ट्राचा वैविद्यपूर्ण सांस्कृतिक वारसा दर्शविणारा ‘महाराष्ट्र दिन’ शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर २०१६ ला सायंकाळी ५.३० वाजता  साजरा होणार आहे .    
            आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यास भेट देणा-या देश- विदेशातील ग्राहक व जनतेला विविध वस्तुंच्या खरेदीसह येथील लाल चौक थिएटर मध्ये भारतातील विविध राज्यांचा सांस्कृतिक वारसा दर्शविणा-या कार्यक्रमांचा आंनद घेता येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या लघुउद्योग विकासमहामंडळाच्यावतीने  २६ नोव्हेंबर ला लाल चौक थिएटर येथे महाराष्ट्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कलारंजन सांस्कृतिक ग्रुपचे ३४ कलाकार या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणार आहेत. 
            युनीक आयडेंटीटी  अथॉरिटी ऑफ इंडियाचे मुख्य  कार्यकारी अधिकारी डॉ. अजयभुषण पांडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे. महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजी दौंड, सचिव तथा  निवासी आयुक्त आभा शुक्ला यावेळी उपस्थित राहणार आहेत.                
                                                       0000000

Tuesday, 22 November 2016

बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राचे संचालक भुजबळ यांच्या हस्ते अनावरण




  
नवी दिल्ली21 : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राचे अनावरण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) देवेंद्र भुजबळ यांच्या हस्ते महाराष्ट्र परिचय केंद्रात करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष जेष्ठ संपादक रविंद्र बेंडकिहाळ, उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे उपस्थित होते. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधितर्फे हे तैलचित्र परिचय केंद्रास आज भेट देण्यात आले.
महाराष्ट्र परिचय केंद्र हे महाराष्ट्र शासन, दिल्लीतील मराठी पत्रकार, महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी व दिल्लीत भेट देणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांचे संपर्क केंद्र आहे. अशा या केंद्रात मराठी पत्रसृष्टीचे जनक दर्पणकार यांचे तैलचित्र देऊन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने अतिशय स्तुत्य उपक्रम केला आहे. येथे येणाऱ्या सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधींना हे तैलचित्र सतत प्रेरणा देईल, असे प्रतिपादन संचालक देवेंद्र भुजबळ यांनी केले.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या कामकाजाची व दर्पणकारांच्या कार्यासाठी संस्था करीत असलेल्या उपक्रमांची माहिती देऊन रविंद्र बेडकिहाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर यांनी आभार मानले. परिचय केंद्राच्या कामकाजाबद्दल श्री.बेंडकिहाळ व शेवडीकर यांनी समाधान व्यक्त केले.



Monday, 21 November 2016

आयआयएमसी मराठीतून अभ्यासक्रम सुरू करणार- के.जी. सुरेश

 











नवी दिल्ली, 21 : भारतीय जनसंज्ञापन संस्था (IIMC) येत्या शैक्षणिक वर्षापासून अमरावती येथील संकुलात मराठीतून जनसंज्ञापनाचा अभ्यासक्रम सुरू करणार असल्याची माहिती संस्थेचे महासंचालक के.जी.सुरेश यांनी दिली.
            राज्य अधिस्वीकृती समितीची सातवी बैठक दिल्लीत सुरू असून समितीच्या सदस्यांनी आज आयआयएमसीला भेट दिली यावेळी के.जी. सुरेश यांनी ही माहिती दिली. यावेळी राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदूनाथ जोशी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक  देवेंद्र भुजबळ, आयआयएमसीचे अतिरिक्त महासंचालक  मयंककुमार अग्रवाल, प्रा.विजय परमार, सहयोगी प्राध्यापक डॉ.सुरभी दहिया उपस्थित होत्या.
            के.जी.सुरेश म्हणाले, आयआयएमसी चे देशात एकूण 6 संकुल असून महाराष्ट्रात  अमरावती येथे संकुल उघडण्यात आलेली आहे. संस्थेच्या इतिहासात प्रथमच मराठी भाषेतून जनसंज्ञापनाचा अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून या अभ्यासक्रम सुरु होणार आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा मोठ्याप्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि माहिती  विभागाच्या अधिका-यांनी या संदर्भात जनजागृतिसाठी सहयोग करावा असे आवाहन केले.
बडनेरा येथे 16 एकर जागा
आयआयएमसी अमरावतीसाठी महाराष्ट्र शासनाने बडनेरा येथे 16 एकर जागा उपलब्ध करून दिली असून त्याबद्दल के.जी.सुरेश यांनी शासनाचे आभार मानले.
सध्या संत गाडगेबाबा महाराज अमरावती विद्यापीठ येथे आयआयएमसीची शाखा सुरू आहे.
मुंबई येथे नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स उभारणार

प्रसार माध्यमातील होत असलेले विविध आधुनिक बदल व प्रशिक्षणाची मागणी पहाता येत्या काळात मुंबई आयआयएमसीद्वारा नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स संस्था उभारण्यात येणार असल्याची माहिती श्री.सुरेश यांनी दिली. नवमाध्यमांचे प्रशिक्षण देण्यासाठी आयआयएमसीद्वारे ही संस्था उभारण्यात येणार असून महाराष्ट्र शासनाकडे नवी मुंबई येथे 25 एकर जागेची मागणी करण्यात आलेली आहे. 

Sunday, 20 November 2016

राज्य अधिस्वीकृती समितीच्या सदस्यांची महाराष्ट्र दालनास भेट









नवी दिल्ली, 20 : महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीच्या सदस्यांनी आज भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयातील ‘डिजीटल महाराष्ट्र दालना’स भेट दिली.
राज्य अधिस्वीकृती समितीची बैठक नवी दिल्ली येथे सुरु असून समितीच्या सदस्यांनी येथील प्रगती मैदान येथे सुरु असलेल्या ३६ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात महाराष्ट्र दालनास भेट दिली. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक विजय कपाटे, निवासी व्यवस्थापक अमरज्योत अरोरा, नाशिक-औरंगाबाद विभागाच्या व्यवस्थापक अलका मांजरेकर यांनी राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदूनाथ जोशी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) देवेंद्र भुजबळ, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्यासह समितीच्या सदस्यांचे स्वागत केले.
महाराष्ट्र दालनामध्ये ग्रामपंचायतींना इंटरनेटच्या माध्यमातून जोडणारी ई-चावडी, भूमापनासाठी वापरण्यात येणारी ई-मोजणी, राज्याची वनसंपदा व उद्योग क्षेत्रासह दळणवळण क्षेत्रातील प्रगती दर्शविणारी आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात झालेली परदेशी गुंतवणूक व या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला रोजगार हे डिजीटल स्वरुपात ठळकपणे दर्शविण्यात आले आहे. शासकीय कामकाज पारदर्शी व जलद गतीने होण्यासाठी राज्य सरकार राबवित असलेली “आपले सरकार” ही संकल्पना तसेच, राज्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पाची माहिती डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करुन मांडण्यात आली आहे. या मांडणीमुळे महाराष्ट्र दालनास भेट देणा-या देश विदेशातील ग्राहक व जनतेला डिजीटल महाराष्ट्राची ओळख होणार असल्याच्या भावना राज्य अधिस्वीकृती समितीच्या सदस्यांनी व्यक्त केल्या .
यावेळी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या नाशिक विभागाचे सहायक व्यवस्थापक प्रदीप सावळे, मुंबई मुख्यालयातील सहायक व्यवस्थापक गजानन जळगावकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्याच्या विविध भागातील हस्तकला आणि लघु उद्योजकांचे ७० स्टॉल्स येथे विक्री व प्रदर्शनासाठी लावण्यात आली आहेत. या दालनात राज्यातील १६० हस्तकलाकार व लघुउद्योजक सहभागी झाले आहेत. दिनांक 14 ते 27 नोव्हेंबर 2016 या कालावधीत सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत सर्वसामान्य जनतेसाठी मेळावा खुला आहे.

राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीत खासदार परिचय पुस्तिकेचे प्रकाशन


















नवी दिल्ली, 20 : महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने प्रकाशित खासदार परिचय पुस्तिकेचे प्रकाशन राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार यदूनाथ जोशी यांच्या हस्त झाले.

महाराष्ट्र सदन येथे आज पासून सुरू झालेल्या राज्य अधिस्वीकृती समितीच्या 7 व्या बैठकीच्या उदघाटन कार्यक्रमात हा प्रकाशन सोहळा झाला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) देवेंद्र भुजबळ, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे आणि महाराष्ट्र सदनाचे सहाय्यक निवासी आयुक्त अजितसिंह नेगी यावेळी उपस्थित होते.
परिचय केंद्राच्यावतीने प्रकाशित खासदार परिचय पुस्तिकेत महाराष्ट्रातील लोकसभा, राज्यसभा सदस्यांसह राष्ट्रपतींद्वारा मनोनित महाराष्ट्रातील संसद सदस्यांची माहिती सचित्र देण्यात आली आहे. या पुस्तिकेत केंद्र व राज्य शासनाची महत्वाची संकेतस्थळ, महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे महत्वाचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.
परिचय केंद्राला बाळशास्त्री जांभेकरांचे तैलचित्र भेट
या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण निधीच्यावतीने महाराष्ट्र परिचय केंद्रास मराठी पत्रकारीतेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचे तैलचित्र भेट स्वरूपात देण्यात आले. पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकीहाळ, उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर यांनी हे तैलचित्र परिचय केंद्राचे उपसंचालक  दयानंद कांबळे यांना भेट दिले. यावेळी राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार यदूनाथ जोशी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) देवेंद्र भुजबळ उपस्थित होते.
                                                                       00000

Saturday, 19 November 2016

Maharashtra's MP Booklet released at the hands of Shri Yadunath Joshi at...

राष्ट्रीय सेवा योजनेत महाराष्ट्राचा गौरव
















नवी दिल्ली, 19 : महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे  एक कार्यक्रम समन्वयक ,एक कार्यक्रम अधिकारी यांच्यासह दोन स्वयंसेवकांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने गौरव करण्यात आला.
            राष्ट्रपती भवनाच्या दरबारहॉल मधे आज केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार २०१५-१६ या वर्षाच्या पुरस्काराचे वितरण आज करण्यात आले. एनएसएसच्या माध्यमातून उत्तम कार्य करणा-या देशभरातील विविध  विद्यापीठांच्या ४ कार्यक्रम समन्वयकांना, १० महाविद्यालयांच्या कार्यक्रम अधिका-यांना आणि ३० महाविद्यालयांच्या समन्वयकांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री  विजय गोयल यांच्यासह  मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या  राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. भाऊराव दायदर यांना उल्लेखनीय कार्यासाठी  या पुरस्काराने गौरविण्यात आले.  नांदेड येथील शारदा भवन शिक्षा समाज यशवंत महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शिवाजीराव बोकाडे यांना यावेळी सन्मानीत करण्यात आले. कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयाची एनएसएस स्वयंसेविका शानेदिवान सोनिया राजेखान आणि सोलापूर येथील डी.बी.एफ. दयानंद कला व विज्ञान महाविद्यालयाचा एनएसएस स्वयंसेवक शेखआफताब अनवर यांना उल्लेखनीय योगदानासाठी  पुरस्काराने गौरविण्यात आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. भाऊराव दायदर यांनी एनएसएस स्वयंसेवकांचा व्यक्तीमत्व विकास घडविण्यात आणि सामुदायिक सेवेत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. श्री. करपे यांनी  ६९२ वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करून ४३ हजार८४० वृक्षांची लागवड केली. त्यांनी ४३ हजार ८४० युनीट रक्तदान  करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेला एचआयव्ही एडस जागृकता कार्यक्रम आदीं महत्वपूर्ण योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. १ लाख रूपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नांदेड येथील शारदा भवन शिक्षा समाज यशवंत महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शिवाजीराव बोकाडे यांनी यांनी  ६ वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करून १५४० वृक्षांची लागवड केली. त्यांच्या मार्गदर्शनात ३०० युनीट रक्त संकलीत करण्यात आले. महत्वपूर्ण योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  रोख राशी , पदक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयाची एनएसएस स्वयंसेविका शानेदिवान सोनिया राजेखान आणि सोलापूर येथील डी.बी.एफ. दयानंद कला व विज्ञान महाविद्यालयाचा एनएसएस स्वयंसेवक शेखआफताब अनवर यांना प्रामाणिक व  सक्रीय सहभागासाठी उत्कृष्ट एनएसएस स्वयंसेविका व स्वयंसेवकाच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात  प्रत्येकी ५० हजार रूपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
                                                                       00000




जागतिक विक्रम नोंदविणा-या भारूलता कांबळे यांचा परिचय केंद्रात सत्कार




                                                                      
नवी दिल्ली, 19 : इंग्लड ते भारत हा ३२ हजार किलो ‍मिटरचा प्रवास ३२ देशांमधून कारद्वारे एकटीनेच पूर्ण करत जागतिक विक्रम नोंदविणा-या भारूलता कांबळे यांचा आज महाराष्ट्र परिचय केंद्रात सत्कार करण्यात आला. भारूलता यांनी या कार  प्रवासात बेटी बचाब बेटी पढावचा संदेश दिला आहे.
         नुकत्याच दिल्लीत पोहचून जागतिक विक्रम नोंदविणा-या भारूलता कांबळे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमंत्रित करून त्यांचे स्वागत व कौतुक केले.  कारने प्रवास करून जगात सर्वात जास्त अंतर पूर्ण करत विश्वविक्रम नोंदविणा-या भारूलता कांबळे या पहिल्या महिला ठरल्या आहेत. श्रीमती कांबळे यांच्या या विक्रमानिमित्त महाराष्ट्र परिचय केंद्रात  गौरव समारंभ आयोजित करण्यात आला.  
            या कार्यक्रमात महिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(माहिती)(वृत्त-जनसंपर्क) देवेंद्र भुजबळ यांच्या हस्ते भारूलता कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे ,भारूलता कांबळे यांचे पती डॉ. सुबोध कांबळे  यावेळी उपस्थित होते .    
  इच्छाशक्तीच्या जोरावरच यश मिळवू शकले
            विपरीत हवामान, निमर्नुष्य रस्ते, विविध देशातील कायदे नियम आदि अडचणींवर केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर मात करून जागतिक विक्रम बनवू शकले अशा भावना भारूलता कांबळे यांनी  यावेळी बोलताना  व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या. १३ सप्टेंबर २०१६ ला इंग्लडमधून भारताकडे येण्यासाठी आर्टिक सर्कल मार्गे प्रस्थान केले. या प्रवासात २८ सप्टेंबर २०१६ ला आपण एकटीनेच हे आर्टिक सर्कलचे २ हजार ७९२ किलो मिटरचे खडतर अंतर पूर्ण करून सोलो आर्टीक सर्कल पूर्ण करणारी जगातील पहिली महिला बणण्याचा बहूमान मिळविला. यासह केवळ ५७ दिवसांच्या कालावधीत एकटीने कार चालवून ३२ देशातून ३२ हजार किलो मिटरचे अंतर पूर्ण करत ट्रान्स कोन्टीनेंटल आणि आर्टिक सर्कलची यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली.  त्यांचा हा कार प्रवास जागतिक विक्रम ठरला आहे. १७ नोव्हेंबर २०१६ रोजी दिल्लीत त्यांची ही कार यात्रा संपली. दस्तूरखुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले स्वागत केले आणि हा आयुष्यातील बहुमोल प्रसंग ठरल्याचे श्रीमती कांबळे म्हणाल्या.
                                              बेटी बचाव बेटी पढावचा दिला संदेश
भारूलता कांबळे या व्यवसायाने वकील असून त्या ब्रिटीश शासनातील निवृत्त शासकीय कर्मचारी आहेत. कारने विश्वविक्रम करण्यासाठी निघालेल्या कांबळे यांनी देशो-देशांमध्ये प्रवास करतांना बेटी बचाव, बेटी पढावचा संदेश पोहचविण्याचे मोलाचे काम केले. यासंदर्भातील विविध म्हणी  व संदेश त्यांच्या बीएमडब्ल्यु एक्स-३ या कारवर चित्रीत करण्यात आले आहे. 
                                                     महाराष्ट्राची सून असल्याचा अभिमान 
                गुजरात येथील नवसारी जिल्हयात जन्मलेल्या भारूलता यांचा विवाह महाराष्ट्रातील रायगड जिल्हयातील महाड येथील डॉ. सुबोध कांबळे यांच्याशी झाला. महाराष्ट्राची सून म्हणून मला सार्थ अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. सुबोध कांबळे यांनी आपल्याला दिलेले सततचे प्रोत्साहन आणि पाठिंब्यामुळे आपण हा किर्तीमान स्थापन करू शकलो असे त्या म्हणाल्या.
                                                  भारतीय  म्हणून देशो-देशी मिळाला बहूमान
मूळच्या भारतीय असलेल्या आणि सध्या इंग्लड येथे स्थायीक भारूलता कांबळे यांना विश्वविक्रम नोंदवितांना कराव्या लागलेल्या देश भ्रमंतीमध्ये भारतीय असल्याने देशो-देशात बहूमान मिळाल्याचे त्यांनी सांगितले. रशिया मध्ये बरेच ठिकाणी भारताप्रमाणे जेवनाचे ढाबे बघायला मिळाले. भारतीय चित्रपट व  संस्कृतीचे येथील लोकांना विशेष आकर्षणअसून या देशातील २८ शहरांमधून केलेल्या कार प्रवासात मला भारतीय म्हणून खूप चांगली वागणूक मिळाल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय कझाकिस्तान, म्यानमार या देशांमध्ये आपले उत्तम स्वागत आणि आवभगत झाल्याचे अनुभवही त्यांनी  कथन केले .  
             या कार्यक्रमास माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक(माहिती) गणेश मुळे, उपसंचालक (वृत्त) ज्ञानोबा इगवे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, भारूलता कांबळे यांचे कुटुंबिय उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंपादक रितेश भुयार यांनी केले.

                                                                       ०००००