Friday, 30 November 2018

डॉ. अजय भुषण पांडे यांनी स्वीकारला केंद्रीय महसूल सचिवपदाचा पदभार


     
      
नवी दिल्ली, ३० : भारतीय प्रशासकीय सेवेच्या महाराष्ट्र कॅडरचे वरिष्ठ अधिकारी तथा ‘युनीक आयडेंटीफीकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय भुषण पांडे यांनी आज केंद्रीय अर्थमंत्रालयाचे महसूल सचिव म्हणून पदभार स्वीकारला  

            अर्थमंत्रालयाचे महसूल सचिव डॉ. हसमुख आडिया आज सेवानिवृत्त झाले, रिक्त झालेल्या या  पदावर डॉ. अजयभुषण पांडे यांची निवड झाली असून डॉ आडिया यांनी डॉ. पांडे यांना आपल्यापदाची सुत्रे सुपूर्द केली. डॉ. पांडे हे नव्या नियुक्तीसह ‘युनीक आयडेंटीफीकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहतील तसेच वस्तू व सेवाकर नेटवर्क (GSTN)  या सरकारी उपक्रमाचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळणार आहेत.
                            आधारकार्डची सांख्यिकी माहिती बळकट करण्यात मोलाचे योगदान  
महाराष्ट्र शासन व केंद्र शासनामध्ये गेल्या ३४ वर्षांपासून कार्यरत डॉ. पांडे यांनी सामान्य मानसाची ओळख म्हणून प्रसिध्द असणा-या आधार कार्डची सांख्यिकी माहिती बळकट करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. गेल्या आठ वर्षांपासून‘युनीक आयडेंटीफीकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ मध्ये कार्यरत डॉ. पांडे यांनी कायदा तयार करून  आधार कार्डसाठी लागणारा सांख्यिकी पाया मजबूत केला. सर्वोच्च् न्यायालयात दाखल ३७ याचिकांना सामारे जात त्यांनी ५ न्यायधिशांच्या पीठासमोर सलग दोन दिवस केलेल्या सादरीकरणातून  आधार कार्ड करिता वापरण्यात आलेले तंत्रज्ञान, या कार्डचे महत्व  व उपयुक्तता पटवून दिली होती.     
                                                    महाराष्ट्रात वीज वितरणातील नुकसानास आळा                     
        डॉ. पांडे यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून वीज वितरणाची व्यवस्था बळकट करत राज्यातील वीजेची तूट भरून काढण्यात महत्वपूर्ण भूमिका निभवली. त्यांनी राज्यातील वीज प्रसार व गळतीचे प्रमाण कमी करून राज्याच्या नुकसानास आळा घातला. यासोबतच राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव म्हणून त्यांनी  राज्याच्या महत्वाकांक्षी ‘ई-गव्हर्नन्स’ प्रकल्पात उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी राज्य शासनाच्या विक्रीकर विभागात महत्वाच्या पदावर कार्य केले आहे.
                                               कानपूर आयआयटीमधून अभियांत्रिकी पदवी      
        डॉ. पांडे यांनी आयआयटी कानपूर मधून इलेक्ट्रीकल अभियांत्रिकीत पदवी मिळविली. १९९८ मध्ये त्यांनी मिनेसोटा विद्यापीठात प्रवेश घेतला व येथे संगणक विज्ञान विषयात एमएस आणि पीएचडी पदवी मिळविली.
           
    महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.४०८/  दिनांक ३०.११.२०१८ 

Wednesday, 28 November 2018

महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी विक्रमी १ लाख १६ हजार घरे मंजूर




          
      
नवी दिल्ली, २८ : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत आज देशातील शहरी गरिबांसाठी एकूण २ लाख ५ हजार ४४२ घरे मंजूर करण्यात आली यापैकी महाराष्ट्रासाठी विक्रमी १ लाख १६ हजार ४२ घरे मंजूर झाली आहेत.

केंद्रीय गृह निर्माण व नगर विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या ४० व्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील विविध शहरांतील गरिबांसाठी १ लाख१६ हजार ४२ घरे मंजूर करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी )अंतर्गत केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीने आतापर्यंत देशभरात विविध राज्यांकरिता  ६५ लाख ०४ हजार ३७ घरांना मंजुरी  दिली आहे यात महाराष्ट्रातील ७ लाख ४८ हजार ४९९ घरे केंद्राकडून मंजूर झाली आहेत.            
                                           
                            राज्यातील ६५ प्रकल्पांसाठी १ हजार ७४० कोटी ६३ लाखांचा निधी        
        याबैठकीत राज्यातील एकूण ६५ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांकडून वैयक्तिकरित्या करण्यात येणा-या बांधकामासाठी (बीएलसी) ८ हजार ४०० तर उर्वरीत १ लाख ७ हजार ६४२ घरे हे राज्यातील भागीदारी तत्वानुसार (एएचपी) करण्यात येणा-या बांधकामांसाठी मंजूर झाली आहेत. या घरांच्या बांधकामासाठी केंद्राकडून एकूण १ हजार ७४० कोटी ६३ लाख रूपये मंजूर झाले आहेत.   

                                          राज्याला आतापर्यंत ७ लाख ४८ हजार घरे मंजूर
    प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) अंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्राला ७ लाख ४८ हजार ४९९ घरे केंद्राकडून मंजूर झाली आहेत.             
           
दरम्यान, केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या ४० व्या बैठकीत महाराष्ट्रासह कर्नाटक, बिहार, तामीळनाडू, जम्मू आणि काश्मीर या ५ राज्यांसाठी ३९२ प्रकल्पांतर्गत एकूण  २ लाख ५ हजार ४४२ घरे मंजूर करण्यात आली आहेत. या घरांसाठी एकूण ७ हजार ३९१ कोटींचा खर्च येणार असून केंद्राकडून ३ हजार ८२ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.                               
           
   महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.४०७/  दिनांक २८.११.२०१८ 


Monday, 26 November 2018

राजधानीत ‘संविधान दिन’ साजरा



 

नवी दिल्ली, २६ :  महाराष्ट्र सदन , महाराष्ट्र परिचय केंद्र आणि केंद्रीय अल्पसंख्याक आयोग येथे आज संविधान दिन साजरा करण्यात आला.
 कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्य घटनेच्या उद्देशिकेचे’ सामुहिकपणे वाचन करण्यात आले. यावेळी निवासी आयुक्त(अ.का.)समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, इशु संधू, विजय कायरकर, राजीव मलिक, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.    
                           महाराष्ट्र परिचय केंद्रात संविधान दिन साजरा
महाराष्ट्र परिचय केंद्रात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचा-यांनी राज्य घटनेच्या उद्देशिकेचे’ सामुहिकपणे वाचन केले. यावेळी उपसंचालक दयानंद कांबळे यांच्यासह  महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी, कर्मचारी व अभ्यागत  उपस्थित होते.
                     केंद्रीय अल्पसंख्याक आयोगात ‘संविधान दिन’ साजरा
केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या कार्यालयात आज ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी आयोगाचे अध्यक्ष सैयद गयरुल हसन रिजवी, सदस्य सुलेखाताई कुंभारे, प्रसिध्द अभिनेत्री सलमा आगा  यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचारी यांनी ‘राज्य घटनेच्या उद्देशिकेचे’ सामुहिकपणे वाचन केले. यावेळी आयोगाचे अध्यक्ष, सदस्य व उपस्थित अधिकारी -कर्मचारी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                               http://twitter.com/micnewdelhi                              
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.४०६/  दिनांक 26.11.2018 




Thursday, 22 November 2018

महाराष्ट्राला आर्थिक क्षेत्रात सर्वोकृष्ट कामगिरीसाठी ‘स्टेट ऑफ स्टेट्स’ पुरस्कार



राज्याचे अर्थमंत्री श्री मुनगंटीवार यांनी स्वीकारला पुरस्कार

 नवी दिल्ली दि. 22 : महाराष्ट्राने आर्थिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी इंडिया टुडेसमुहाच्यावतीने स्टेट ऑफ स्टेट्स पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार उपराष्ट्रपती एम. वैकया नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राज्याचे अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा पुरस्कार ‍स्विकारला.

            येथील ताजमहल या हॉटेल मध्ये इंडिया टुडे या प्रकाशन संस्थेच्यावतीने 15व्या स्टेट ऑफ स्टेट्स परिषद चे आयोजन करण्यात आले. यावेळी उपराष्ट्रपती , इंडिया टुडे समुहाचे समुह संपादक संचालक (प्रकाशन विभाग) राज चेंगप्पा, इंडिया टुडे समुहाच्या उपाध्यक्ष कल्ली पुरी यावेळी उपस्थित होत्या. याप्रसंगी राज्यांमध्ये होत असलेल्या विविध  क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट  विकासकामांसाठी विविध पुरस्काराने राज्यांना गौरिवण्यात आले. आर्थिक क्षेत्रातील सर्वोकृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

राज्याच्या अर्थव्यवस्थेचे वाटचाल योग्य दिशेन : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये श्री मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्राला आर्थिक क्षेत्रात सर्वोकृष्ट कामगिरीसाठी  मिळालेला पुरस्कार मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामुळे आणि जनतेच्या सहकार्याने राज्याची आर्थिक स्थिती उत्तम करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे तो योग्य दिशेन असून  या संकल्पावर आज इंडिया टुडेने महाराष्ट्राचा केलेला गौरव यातुन शिक्का र्मोतब झाल्याचे दिसून येते.

महाराष्ट्रातील व्यापारी बांधव, उद्योग क्षेत्रातील सर्व बंधु-भगिनींना तसेच विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी केलेले परिश्रम, योग्य नियोजनाचे फलित असल्याचेही श्री मुनगंटीवार म्हणाले. महाराष्ट्र शासन लक्ष्यपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे याचे फलश्रुती आज प्राप्त झालेल्या पुरस्कारातून मिळाले असल्याचा पुनोरोच्चार श्री मुनगंटीवार यांनी यावेळी केला.




इंडिया टुडेने असे केले मुल्यमापन

इंडिया टुडे समुहातर्फे स्टेट ऑफ दी स्टेटस् कॉन्‍क्लेव्ह हा  उपक्रम दरवर्षी राबविला जातो. नागरिकांना कामाच्या तसेच इतर ठिकाणी संधी देणा-या राज्यांचा शोध घेण्यासाठी या उपक्रमा दरम्यान सर्वेक्षण करण्यात आले. गेल्या 5 वर्षातील मुल्यमापनाच्या आधारे विविध क्षेत्रातील राज्यांच्या कामगिरीनुसार राज्यांची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. यात व्यापारासाठी पोषक वातावरण व जीवनमानाची गुणवत्ता या  दोन महत्वाच्या घटकांच्या आधारे मुल्यमापन करण्यात आले. प्रामुख्यान आर्थिक क्षेत्र, कृषी क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, आरोग्य, पायाभूत सुविधा, सर्वांगिण विकास, कायदा व सुव्यवस्था, उद्यमशिलता, सुशासन, पर्यावरण, स्वच्छता या क्षेत्रात विविध राज्यांनी केलेल्या कामगिरीचे मुल्यमापन यामध्ये करण्यात आलेले आहे.

            यात महाराष्ट्राची  देशातील मोठया राज्यांमध्ये आर्थिक क्षेत्रात सर्वोकृष्ट कामगिरी करणारे राज्य म्हणून निवड झाली आहे. 2016 मध्ये सुध्दा आर्थिक क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी महाराष्ट्राला इंडिया टुडे समुहातर्फे सन्मानित करण्यात आले होते

राजधानीत महाराष्ट्रातील १० कलाकारांचे ‘मेलँग-२’ चित्रप्रदर्शन








            
नवी दिल्ली, २२ : महाराष्ट्राच्या विविध भागातील १० चित्रकार व शिल्पकारांनी एकत्र येत देशाच्या राजधानीत   ‘मेलँग-२’ हे अनोखे चित्रप्रदर्शन आयोजित केले आहे.
            चित्रकला व शिल्पकला क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्रातील कलाकारांनी एकत्र येत राज्याची राजधानी मुंबई येथे जहांगीर ऑर्ट गॅलरी येथे ‘मेलँग-’ हे अनोखे चित्रप्रदर्शन आयोजित केले, या प्रदर्शनास मिळालेल्या यशानंतर थेट देशाच्या राजधानीतच या कलाकारांनी दिल्लीत येणा-या देश- विदेशातील कला रसिकांसाठी ‘मेलँग-२’ हे चित्रप्रदर्शन आयोजित केले आहे.
            येथील इंडिया हॅबीटॅट सेंटरच्या ‘ओपन पाम कोर्ट गॅलरी’ येथे दिनांक २२ ते २६ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन आज ललीत कला अकादमीचे सचिव राजन फुलारी यांच्या हस्ते आणि प्रसिध्द शिल्पकार टीटू पटनायक यांच्या उपस्थित  झाले.
                                                  ६४ चित्र व १६ शिल्पांचा समावेश
        या प्रदर्शनीत ८ चित्रकारांची प्रत्येकी ८ असे एकूण अशी  ६४ चित्र आणि २ शिल्पकारांची प्रत्येकी ८ अशी एकूण १६ शिल्प मांडण्यात आली आहेत. ठाणे येथील चित्रकार अजित चौधरी, मुळचे नागपुरचे आणि सध्या चंदीगड येथे कला महाविद्यालयात कार्यरत आनंद शेंडे, नागपूर येथील शासकीय कला महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक किशोर इंगळे, मुळचे नागपुरचे आणि दिल्लीत एम्स या संस्थेत कार्यरत आर्टीस्ट रामचंद्र पोकळे, मुळचे सोलापूर जिल्हयातील कुर्डुवाडी येथील आणि सध्या  नागपूर येथील शासकीय कला महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक संजय जठार, जे.जे. स्कुल ऑफ आर्ट मुंबई येथे कार्यरत  प्राध्यापक सिता गोंडाने आणि चित्रकार स्वाती साबळे या चित्रकारांची फिगरेटीव्ह आणि ॲबस्ट्रॅक प्रकारातील ॲक्रॅलीक, ऑईल आणि इंक पेंटींग येथे प्रदर्शनी व विक्रीसाठी मांडण्यात आली आहेत.
            मुळचे सांगलीचे व सध्या मुंबईतील विरार येथे वास्तव्यास असणारे शिल्पकार प्रदिप कांबळे आणि पालघर जिल्हयातील वसई येथील शिल्पकार सचिन चौधरी या शिल्पकारांचे निसर्गातील व मानवी आकाराच्या विविध छटा उलगडून दाखविणारे  शिल्पही या ठिकाणी  मांडण्यात आली आहेत.
              दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनाशुल्क खुले आहे.
                                 महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                              http://twitter.com/micnewdelhi                        
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.४०५/  दिनांक 22.11.2018 





भंडारा येथील मशरुम बिस्कीटला दिल्लीकरांची पसंती ‘आदि महोत्सवात’ महाराष्ट्रातील आदिवासी कलाकारांना उत्तम प्रतिसा













नवी दिल्ली, २२ : भंडारा येथील आदिवासी स्वयं कला संस्थेच्या महिलांनी तयार केलेल्यामशरूम बिस्कीटांनादिल्लीकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, ‘आदि महोत्सवाच्यासहाव्या दिवशीच हे बिस्कीट संपली आहेत. यासोबतच राज्यातील आदिवासी कलाकारांनी तयार केलेल्या विविध हस्तकलेच्या वस्तू या महोत्सवास भेट देणा-या देश-विदेशींचे आकर्षण ठरत आहे
            केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालय आणि भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महामंडळ यांच्यावतीने येथील दिल्ली हाट येथे दिनांक १६ ते ३० नोव्हेंबर २०१८ दरम्यान आदि महोत्सवया देशभरातील आदिवासी कलाकारांच्या वस्तू, खाद्य पदार्थांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जिओल ओराम यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. या महोत्सवात देशभरातील २३ राज्यांतील ६०० कलाकार, २० राज्यांतील  ८० शेफ आणि नृत्य कलाकारांचे १४ संघ सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातील २ खाद्यपदार्थांचे व ६  हस्तकलेचे असे एकूण ८ स्टॉल्स याठिकाणी असून एकूण २१ कलाकार सहभागी झाले आहेत.
                           ‘दिल्ली हाटच्या ऍम्पी थिएटर परिसरात भंडारा जिल्हयातील सालेकसा तालुक्यातील जांभडी येथील सुनिता ऊइके यांच्या  आदिवासी स्वयं कला संस्था खाद्यपदार्थांचा स्टॉल येथे भेट देणा-यांचे विशेष आकर्षण ठरत आहे. या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरील मशरुम बिस्कीट दिल्लीकरांच्या खास पसंतीस उतरले. मशरुमच्या वैशिष्टय गुणांची खास पारख असणा-या दिल्लीकरांना या बिस्कीटांनी भुरड पाडली आणि म्हणता म्हणता ६ दिवसात या स्टॉल वरील २०० मशरूम  बिस्कीटची पाकीटे संपली. आदिवासींनी पिकविलेल्या मशरूमचा उपयोग करून स्वत:चे उत्पादन युनीट असणा-या आदिवासी स्वयं कला संस्थेने या अनोख्या मशरूम बिस्कीटची निर्मिती केली त्यास पहिल्याच प्रयत्नात राजधानीत मिळलेल्या प्रतिसादाने सुनिता ऊईके समाधानी आहेत. या स्टॉलवरील आस्की हे तांदळापासून निर्मित धिरडे, बेसन व सुजीचे लाडू आणि साबुदाना वडा हे जिन्नस दिल्लीतील  खवय्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
  ऍम्पी थिएटर परिसरातच पुणे येथील महाराष्ट्र राज्य आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने आदिवासी महिला बचत गटाने खाद्यपदार्थांचा स्टॉल लावला आहे. येथे राज्याच्या व्यंजनाची खास ओळख करून देणा-या पुरणपोळीसह  मासवडी, आलुवडी आणि डांगर भाकरी हे वैशिष्टयपूर्ण खाद्यपदार्थ असून ते दिल्लीकरांच्या पसंतीस पडले आहेत.



                            मेळघाटातील शुध्द मध, वारली पेंटींग आणि बांबू आर्टही ठरले आकर्षण  
            अमरावती जिल्हयातील मेळघाटात राहणाऱ्या कोरकु आदिवासी जमातींनी संकलीत केलेल्या शुध्द मधाच्या स्टॉलकडेही येथे भेट देणा-या देश विदेशातील ग्राहकांचे पाय स्थिरावत आहेत. मेळघाटातील धारणी तालुक्यातील सुसरदा येथे खादी ग्रामोद्योगाच्या स्फुर्ती प्रकल्पाच्यामाध्यमातून  या  गावातील व गावाशेजारील ३७  गावच्या  एकूण ४५० आदिवासींनी मध संकलन केले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींना रोजगार उपलब्ध झाला आहे. मुंबई स्थित भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या माध्यमातून या प्रकल्पातील आदिवासींना मधमाशा न मारता शास्त्रोक्त पध्दतीने मध संकलनाचे प्रशिक्षण देण्यात आले व प्रक्रिया युनीटही सुरु करण्यात आले आहे. या स्टॉल वर २५० ग्रॅम पासून १ किलोच्या पॅक मध्ये मध उपलब्ध आहे.
            पालघर जिल्हयातील डहाणू तालुक्यातील कोसेसरी येथील अंकुश करमोडा यांच्या वारली पेंटींगचा स्टॉल विदेशी ग्राहकांचे खास आकर्षण ठरला आहे. या स्टॉलवर आदिवासींचे पांरपरिक तारपा नृत्य, मासेमारी, आदिवासींचे धार्मिक सण उत्सव, आदिवासींची शेती, मुंग्यांचे वारूळ या आशयाची  वारली पेंटींग बघायला मिळतात.
            नाशिक जिल्हयातील सुरगना  येथील  विष्णू भवर आणि उजेश मोहनकर या आदिवासी कलाकारांचा बांबू आर्ट स्टॉल आहे. बांबूच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले टी कोस्टर, पेन होल्डर, पेन स्टँड, बांबूपासून निर्मित कप आदि वस्तू या स्टॉलवर आहेत

             नागपूर येथील विदर्भ आदिवासी केंद्राचा कापडाचा स्टॉल याठिकाणी असून येथे  सिल्कच्या साडया ,दुपट्टे, शर्ट ,जॅकेट आदि वस्तू आहेत. भंडारा येथील अरमीरा महिला उद्योग आणि भंडारा जिल्हयातीलच मोहाडी येथील आदिवासी कलाकारांनी तयार केलेल्या कापडांचा स्टॉलही याठिकाणी येणा-या देश विदेशातील ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे.


महाराष्ट्राला इंडिया टुडेचा स्टेट ऑफ स्टेट पुरस्कार प्रदान

Tuesday, 20 November 2018

‘महाराष्ट्र दिन’ कार्यक्रमामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतिची देश व जगाला ओळख : केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु






                                                             
               आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दिन साजरा 

नवी दिल्ली, २० : महाराष्ट्राची लोककला ही समृध्द असून यामाध्यमातून राज्याच्या वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडते. आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात ‘महाराष्ट्र दिना’च्या आयोजनामुळे या समृध्द संस्कृतीची ओळखच देश व जगाला झाली, असे गौरवोद्गगार केंद्रीय  वाणिज्य व उद्योग, नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभु यांनी काढले.
येथील प्रगती मैदानावर ३८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात आज आयोजित महाराष्ट्र दिनाचे उदघाटन श्री. प्रभु यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त (अ.का.) समीर सहाय, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक विजय कपाटे आणि श्रीमती उमा प्रभु यावेळी  उपस्थित  होत्या.
          श्री. प्रभु म्हणाले,  लावणी, दिंडी नृत्य, कोळी नृत्य आदी महाराष्ट्रातील लोककलांमुळे महाराष्ट्राच्या समृध्द सांस्कृतिक वारस्याचे सादरीकरण होते. महाराष्ट्र दिनाच्या आयोजनामुळे ही परंपरा देशासमोर मांडण्यात आली याचा आनंद आहे. या कार्यक्रमाद्वारे राज्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडले आहे. आज भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयातील महाराष्ट्र दिनाच्या माध्यमातून ही लोककला देश-विेदशात पोहचत असल्याचा अभिमान वाटत आहे असेही ते म्हणाले.  
                              महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे सादरीकरण
महाराष्ट्र दिना निमित्त आयोजित ‘संगीत महाराष्ट्र’ कार्यक्रमातील गण-गौळण, शेतकरी नृत्य, खानदेशी नृत्य, दिंडी, अभंग, वासुदेव आदी लोककलांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृध्द सांस्कृतिक वारशाच्या दमदार सादरीकरणाने प्रगती मैदानात उपस्थित देश-विदेशातील प्रेक्षकांची मने जिंकली.
 भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात दररोज सायंकाळी हंसध्वनी सभागृह येथे व्यापार मेळयात सहभागी देश व राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होते. या उपक्रमांतर्गत व्यापार मेळयाच्या सातव्या दिवशी आज महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
            मुंबई येथील 'पृथ्वी आर्ट’ गृपच्या कलाकारांनी ‘ संगीत महाराष्ट्र् ’ या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. गणेश वंदनेने  या कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहाटेचे  दर्शन घडविणारे वासुदेव नृत्य तसेच पंढरपूरच्या वारीचे दर्शन घडविणारे दिंडी नृत्य सादर करण्यात आले. थेट प्रेक्षकांमधून निघालेली वारक-यांची दिंडी पाहून उपस्थितांनी उभे राहत दिंडीला मानवंदना दिली. शेतकरी नृत्य, खानदेशी नृत्य या लोककलांच्या सादरीकरणाने येथे उपस्थित देश-विदेशातील रसिक प्रेक्षकांच्या टाळया मिळवल्या. महाराष्ट्राच्या कडा-कपारीत राहणा-या ठाकर जमातीचे दर्शन घडाविणारे नृत्य, संताचे अध्यात्मिक विचार उलगडणारे भारूड आदींनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. विविध लोककला व लोकनृत्यांचा आविष्कार असणा-या या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिबींबच उभे राहिले आणि यास उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद लाभला.                
                                महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                              http://twitter.com/micnewdelhi                        
 000000  
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.४०२/  दिनांक 20.11.2018