Tuesday, 6 December 2016
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र कमी करण्याचा निर्णय
नवी दिल्ली, दि. ०६ : मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या
सिमाक्षेत्रापासून १०० मीटर ते ४ कि.मी. पर्यंतचे क्षेत्र हे पर्यावरण संवेदनशील
क्षेत्र गणले जाईल अशी माहिती केंद्रीय पर्यावरण व वने मंत्री अनिल दवे यांनी
दिली. या निर्णयामुळे या परिसरातील मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प व इतर विकास
प्रकल्पांना चालना मिळणार आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील एकूण
५९.४६ चौ.कि.मी एवढे क्षेत्र हे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून अधिसूचीत
करण्यात आले होते. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ १०३.६८ चौ. कि.मी. इतके
आहे. यापैकी ४४.४४ चौ. कि.मी क्षेत्र
मुंबई जिल्हयात तर उर्वरीत ५९.२४ चौ. कि.मी. हे क्षेत्र ठाणे जिल्हयांतर्गत येत
आहे. या राष्ट्रीय उद्यानाच्या सिमेपासूनचे एकूण ५९.४६ चौ. कि.मी. हे क्षेत्र पर्यावरण
संवेदनशील क्षेत्र आहे पैकी १९.२५ चौ.कि.मी. हे वनक्षेत्र आहे तर ४०.२१ चौ. कि.मी.
वन विरहीत क्षेत्र आहे.यामुळे या क्षेत्रात कोणतेही विकास प्रकल्प राबविणे शक्य
नव्हते. या संदर्भात लोकप्रतिनिधी, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन, मुंबई महानगर
पालिका, विविध संस्था आदींनी पर्यावरण मंत्रालयाकडे निवेदन सादर करून पर्यावरण
संवेदनशील क्षेत्राबाबत फेरविचार करण्यात यावा अशी विनंती केली होती. सर्वोच्च
न्यायालयानेही पर्यावरण मंत्रालयाने या संदर्भात सर्वसमावेशक विचार करून अंतिम
अधिसूचना काढण्याचे निर्देश दिले होते.
मंत्रालयाला विविध क्षेत्रातून प्राप्त सूचना,
या राष्ट्रीय उद्यान परिसरातील जैव विविधतेचे संरक्षण, वन्यजीव आणि मानवी वस्ती
यातील संघर्ष टाळणे आदी बाबींचा सखोल विचार करून दिनांक ५ डिसेंबर २०१६ ला अंतिम
अधिसूचना काढण्यात आल्याचे श्री. दवे यांनी सांगितले.उद्यानाच्या सीमाक्षेत्रापासून
१०० मीटर ते ४ कि.मी. पर्यंतचे क्षेत्र त्या-त्या भौगोलिक परिस्थितीनुसार पर्यावरण
संवेदनशील क्षेत्र म्हणून निर्धारीत करण्यात आले आहे.
मुंबई मेट्रो रेल्वे शेड उभारणीचा मार्ग मोकळा
या अधिसूचनेमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
परिसरातील १.६५ चौ.कि.मी क्षेत्रावर मुंबई मेट्रो रेल्वेला शेड उभारता येणार आहे. यामुळे
या भागात आता मेट्रो रेल्वेच्या कामांना गती येणार आहे.
वन्यजीव
संरक्षणासाठी कुंपन उभारणार
या राष्ट्रीय उद्यान परिसरात मोठया प्रमाणात असलेले
बिबटे आणि अन्य वन्य जीव तसेच
जैवविवधेतेचे संरक्षण करण्यासाठी
उंच भिंतीसह कुंपन उभारण्यात येणार आहे. यामुळे मानवी वस्ती शेजारील या
वन्य प्राण्यांना संरक्षण मिळणार असून वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्षही
थांबणार आहे.
००००००
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यातील खासदारांचे अभिवादन
नवी दिल्ली, दि. ०६ :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण
दिनानिमित्त राज्यातील खासदारांनी महाराष्ट्र सदन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पुर्णाकृती पुतळयास अभिवादन केले.
कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज सकाळी लातुरचे
खासदार डॉ. सुनील गायकवाड, राज्यसभेचे
खासदार सर्वश्री अमर साबळे, डॉ. विकास महात्मे आणि छत्रपती संभाजीराजे यांनी डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी
उपस्थित दिल्लीत विविध क्षेत्रात कार्यरत मराठी बांधवांनीही डॉ. आंबेडकरांना अभिवादन
केले.
००००००
Monday, 5 December 2016
राज्यातील ७ व्यक्तींना ‘राष्ट्रपती स्काऊट एंड गाईड पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली, दि. ५ : भारत स्काऊट गाईड चळवळीच्या माध्यमातून उल्लेखनीय समाज कार्य करणा-या महाराष्ट्रातील ७ व्यक्तींना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते ‘राष्ट्रपती स्काऊट ॲण्ड गाईड पुरस्काराने’ सन्मानीत करण्यात आले.
राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉल मध्ये
आयोजित कार्यक्रमात विविध श्रेणींमध्ये आज वर्ष २०१५ चे ‘राष्ट्रपती स्काऊट ॲण्ड गाईड पुरस्कार’ प्रदान
करण्यात आले. महाराष्ट्रातील ७ व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. प्रशस्तीपत्र
असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट
गाईडच्या विविध पदांवर उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल शोभना जाधव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. साडेतीन दशक
त्यांनी अविरत सेवा दिली. त्यांनी महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि
आंतरराष्ट्रीय पातळीवर स्काऊड गाईच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात
उल्लेखनीय कार्य केले. त्या सध्या भारत स्काऊट गाईडच्या राष्ट्रीय नियम समितीच्या
सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
महाराष्ट्र राज्य स्काऊट ॲण्ड गाईचे विधी सल्लागार ॲड अशुतोष कुंभकोनी यांना
पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यातील विविध विधी महाविद्यालय, विविध बार
असोशिएशन आणि जनसामान्यांना कायद्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात ॲड कुंभकोनी
यांनी मोलाचे योगदान दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बहुतेक वेळा गरजू
व्यक्तींसाठी वकील म्हणून त्यांची नेमणूक केली आहे.
जळगाव जिल्हा स्काऊड ॲण्ड गाईडचे सहायक आयुक्त अनंत
काळे यांनी जिल्हयात स्काऊट गाईड चळवळीच्या विस्तारात दिलेल्या महत्वाच्या योगदानासाठी त्यांना या
मानाच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. राज्य भारत स्काऊट गाईडमध्ये तीन दशक
सेवा देणारे श्री. काळे यांनी चळवळीसाठी निधी संकलनात मोलाचे योगदान दिले. युवा व ज्येष्ठांसाठी
जिल्हा स्तरीय संमेलन आयोजित करण्यात त्यांचा सक्रीय सहभाग राहीला आहे.
वाशिम जिल्हा स्काऊट गाईडच्या आयुक्त रजनी धानोरक
यांनी विविध आयोजनांच्या माध्यमातून स्काऊट गाईड चळवळीचा विस्तार केला. श्रीमती
धानोरकर यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानीत
करण्यात आले.अडीच दशकांच्या कार्यकाळात त्यांनी विविध प्रशिक्षण शिबीर आयोजित करून
स्काऊट गाईडच्या गुणात्मक वाढीसाठी मोलाचे योगदान दिले.
पुणे जिल्हा स्काऊट गाईडच्या सह सचिव
सरला भोसले यांना या पुरस्काराने सन्मानीत
करण्यात आले. गेल्या तीन दशकापासून चळवळीत सक्रीय असणा-या सरला भोसले या
व्यवसायाने शिक्षीका असून त्यांनी पुणे परिसरातील आर्थिकदृष्टया मागास समाजाच्या
विकासासाठी मोलाचे योगदान दिले.
महाराष्ट्र स्काऊट गाईडचे माजी
प्रशिक्षक अप्पासाहेब शिंदे यांना उल्लेखनीय सेवेसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात
आला. राज्यातील विविध जिल्हयांमधे स्काऊट गाईडचा विस्तार करण्यासाठी त्यांनी
मोलाचे योगदान दिले.
राज्य स्काऊट गाईडच्या प्रशिक्षक
कुसुम लोंढे यांनी मुलींना प्रशिक्षीत करण्यासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी
त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आधुनिकतेची कास धरून स्काऊट
गाईडचा विस्तार करण्यात त्यांनी महत्वाची भूमीका निभवली आहे.
००००००
Saturday, 3 December 2016
राज्यातील दिव्यांग खेळाडूंसाठी अकादमी उभारण्याचा मनोदय : राजकुमार बडोले
नवी दिल्ली, 03 : दिव्यांगासाठी राज्यात
क्रीडा अकादमी सुरू करण्याचा मनोदय आहे. अशी माहिती सामजिक न्याय मंत्री श्री
राजकुमार बडोले यांनी पत्रकार परिषदेत
दिली.
केंदीय सामजिक न्याय व
सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने आज ‘अंतरराष्ट्रीय अपंग दिना’ च्या निमित्त विविध श्रेणीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्रातील उत्कृष्ट काम करणा-या दिव्यांग व्यक्तींना विविध श्रेणीच्या
पुरस्कारने आज सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास
महामंडळाला उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात
आले. हा पुरस्कार राज्याचे सामजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी स्वीकारला.
या कार्यक्रमानंतर महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी
ही माहिती श्री बडोले यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पीक
स्पर्धेत भाग घेऊन देशासाठी पदक कमविणा-या खेळांडूना महाराष्ट्र राज्य अपंग वित्त
व विकास महामंडळातर्फे 5 लाख रूपये रोख
पारितोषिक देण्याचा निर्णय राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. दिव्यांग
खेळाडूंना गुणवत्तापुर्ण प्रशिक्षण मिळावे, यासाठी अकादमी सुरू करण्याचा मनोदय
आहे. यामुळे राज्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीयस्तरावर होणा-या विविध क्रीडा स्पर्धेत
भाग घेऊन भविष्यात पदके मिळवू शकतील.
राज्यात 3 टक्के आरक्षण
हे दिव्यांगसाठी आहे. राज्य शासनाने दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष रोजगार मोहिमे
सुरू केली आहे. यातंर्गत नियोजनबद्धरीत्या
दिव्यांगाचा असलेला अनुशेष भरून काढण्यात येईल. अपंग वित्त व विकास
महामंडळाचे भाग भांडवल 50 कोटी आहे. हे भाग भांडवल 300 कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट महामंडळाचे आहे. हे
उद्दिष्ट भविष्यात पुर्ण करण्याचा निर्धार राज्य शासनाचा असल्याचे श्री बडोले यांनी
सांगितले.
महाराष्ट्राला दिव्यांगजन राष्ट्रीय पुरस्कार प्रदान : राज्यातील ७ व्यक्ती आणि ५ संस्थांचा सन्मान


नवी
दिल्ली, दि. ३ : अपंगांच्या
क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास
महामंडळास राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ट राज्य
प्राधिकृत वाहिनीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष
सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याशिवाय राज्यातील ७
व्यक्ती आणि ४ संस्थांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय अपंग दिनी विज्ञान भवनात दिव्यांगजन राष्ट्रीय पुरस्कार
वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणा-या
देशातील ७८ व्यक्ती व संस्थांना १४ श्रेणींमध्ये राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या
हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत, राज्यमंत्री द्वय
रामदास आठवले,कृष्णपाल गुर्जर आणि दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव एन.एस.भांग यावेळी
उपस्थित होते.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री
राजकुमार बडोले यांनी महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाला देशातील सर्वोत्कृष्ट
राज्य प्राधिकृत वाहिनीचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला. महामंडळाच्यावतीने राज्यातील
बेरोजगार दिव्यांगांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध
करून देणे आणि त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम प्रभावीपणे केले आहे.
अल्प दृष्टी
प्रकारात लातूर जिल्हयातील अहमदपूर येथील गजानन बेलाले यांना पुरस्काराने सन्मानीत
करण्यात आले. श्री. बेलाले हे सध्या मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग
संचालनालयात उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. श्री. बेलाले यांनी विविध
कंपन्यांमध्ये रोजगार कार्यशळांच्या माध्यमातून २ हजारांहून अधिक दिव्यांगांना
मार्गदर्शन केले आहे.
नागपूर येथील डॉ. महंमद इर्फानूर
रहीम यांना चलन वलन विषय दिव्यांगांच्या श्रेणीत उल्लेखनीय योगदानासाठी सन्मानीत
करण्यात आले. कमरे खालील सर्व अवयवाने अधू असणारे डॉ. महंमद इर्फानूर रहीम हे
नागपूर येथील डागा स्मृती हॉस्पीटल मध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नागपूर
परिसरातील विविध आरोग्य शिबीरांच्या आयोजनात त्यांनी सक्रीय सहभाग दिला.
नागपूर येथील राधा बोर्डे (इखनकर) यांना देशातील सर्वोत्तम दिव्यांग
व्यक्तींच्या(गैर व्यवसायिक) श्रेणीमध्ये सन्मानीत करण्यात आले. वयाच्या
तिसऱ्या वर्षीच श्रीमती बोर्डे यांना अंधत्व आले. अंधत्वावर मात करून त्यांनी अंध
व्यक्तींसाठी दोन कौशल्य विकास संस्था उभारल्या. अंध व सर्वसामान्यांसाठी वाचनालय
उभारले.
बहु दिव्यांग
श्रेणीमध्ये पुणे येथील निशाद शहा यांना सन्मानीत करण्यात आले. बौध्दीक व श्रवण
बहु दिव्यंगत्व ही कमजोरी न मानता श्री. शहा यांनी स्वयंरोजगाराची कास धरली. श्री.
शाह हे पुणे येथील जानिव संघटनेच्या माध्यमातून फेरीवाल्यांच्या अधिकारांसाठी
कार्य करीत आहेत.
पुणे येथील
अश्विनी मेलवाने यांना कर्ण बधिरांच्या श्रेणीत सन्मानीत करण्यात आले.अपंगत्वावर
मात करून श्रीमती मेलवाने यांनी फॅशन स्टाइलीस्ट, प्रतिमा सल्लागार, उद्योजक आणि
सामाजिक कार्यकर्त्या म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली.
मुंबई येथील योगिता तांबे यांना दिव्यांगत्वासह सर्वोत
सर्जनशिल जेष्ट व्यक्तींच्या श्रेणीमध्ये सन्मानीत करण्यात आले. श्रीमती तांबे यांनी अंधत्वावर मात करून कलाकार व संगीत
शिक्षीका म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांनी
आपली कला सादर केली आहे.
मुळच्या नागपूरच्या
आणि सध्या दिल्लीत स्थायिक देवांशी जोशी यांना सर्वोत्तम दिव्यांग कर्मचारी म्हणून
सन्मानीत करण्यात आले. मतीमंदत्वावर मात करून
कु. देवांशी ने स्वयंरोजगाराची कास
धरली आणि तरूणांसमोर आदर्श निर्माण केला.
दिव्यांगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या
राज्यातील चार संस्थांचाही यावेळी सन्मान करण्यात आले. सेरेब्रल पाल्सी आजाराने
ग्रस्त व्यक्तींसाठी कार्यकरणा-या लातूर येथील जनकल्याण समितीच्यावतीने चालविण्यात
येणा-या ‘संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्राला’ यावेळी
सन्मानीत करण्यात आले. केंद्राच्या मुख्याध्यापिका दिपा सुरेश पाटील यांनी
पुरस्कार स्वीकारला. २००६ मध्ये स्थापन झालेल्या या केंद्राच्या माध्यमातून
सेलेब्रल पाल्सी आजाराने ग्रस्त विद्यार्थ्यांवर स्वीच थेरपी, फिजीओथेरपी,
ॲक्यूपेशनल थेरपी, वाटर थेरपीच्या माध्यमातून उपचार करण्यात येतो तसेच या
विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण देऊन स्वावलंबाने धडे शिकवीले जातात.
दिव्यांगाच्या मेहनतीने फुललेल्या सातारा जिल्हयातील
महाबळेश्वर तालुक्यातील ‘सनराईस कॅन्डल्स’
या संस्थेला सन्मानीत करण्यात आले. संस्थेच्या उपाध्यक्ष निता भावेश भाटीया यांनी
हा पुरस्कार स्वीकारला. संस्थेचे महाराष्ट्राबाहेर १३ राज्यांमध्ये शाखा असून २
हजार २८० दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यात १ हजार ६९३ पुरूष आणि ५८७ महिलांचा समावेश आहे.
मुंबईतील विधीमंडळ भागात स्थित स्टेट बँक ऑफ इंडिया
शाखेचा यावेळी सन्मान करण्यात आला . संस्थेच्या
मुख्य कार्यकारी अधिकारी अरूंधती
भट्टाचार्य यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्टेट बँक मुंबई ने २ हजार ८८२ दिव्यांग
व्यक्तींना बँकेत रोजगार दिला.
मुंबई येथील
कुर्ला(पश्चिम) भागातील ‘एजीस लिमीटेड’ ला सर्वोत्तम गैर सरकारी संस्थेच्या
पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. संस्थेचे चिफ पिपल ऑफीसर एस.एम.गुप्ता यांनी
पुरस्कार स्वीकारला. ‘एजीस लिमीटेड’ ही
बाहय सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारतासह ९ देशांमध्ये ४३ ठिकाणी आपली सेवा
देते. संस्थेने ७११ दिव्यांग कर्मचा-यांना रोजगार दिला आहे जो संस्थेच्या एकूण
कर्मचा-यांच्या १०.७५ टक्के एवढा आहे.
००००००
Friday, 2 December 2016
धर्मांतरीत बौध्दांसाठी नवीन जात प्रमाणपत्र देण्याचा विचार : राजकुमार बडोले
नवी दिल्ली, 02 : अनुसूचित जातीतून
धर्मांतरीत बौध्दांसाठी नवीन जात प्रमाणपत्र देण्याचा विचार आहे, अशी माहिती सामजिक न्याय मंत्री श्री बडोले यांनी दिली.
आज शास्त्री भवन येथे
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री
राजकुमार बडोले यांची बैठक झाली. या बैठकीत 1956 मध्ये अनुसूचित जातीतून
धर्मांतरीत झालेल्या बौध्दांना अदयाप भारत सरकारच्या आरक्षणाच्या सवलती मिळत नाही.
त्या मिळाव्या त्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जात होता. या संदर्भात
जूनमध्ये महत्वपुर्ण निर्णय झालेला होता. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे सुधारीत
जात प्रमाणपत्र ऐवजी आता महाराष्ट्र शासन अशा अनुसूचित जातीतील लोकांसाठी नवीन जात
प्रमाणपत्र देण्यासंदर्भांत बैठकीत चर्चा झाली.
यावेळी श्री बडोले यांनी
राज्यातील विद्यार्थी आणि केंद्रातील स्पर्धा परिक्षांमध्ये बसणा-या उमेदवांराना
येणा-या अडचणींविषयी माहिती दिली. त्यावर उपाय म्हणून अनुसूचित जातीतून धर्मांतरीत
बौध्दांना नवीन जात प्रमाणपत्र देण्याचा विचार करीत असल्याचे श्री बडोले यांनी
बैठकीत सांगितले. या प्रमाणपत्रात 1956
नंतर अनुसूचित जातीतून धर्मांतराचा स्पष्ट उल्लेख असेल. हे प्रमाणपत्र राज्यासह
केंद्र शासनाच्या कुठल्याही सेवेसाठी पात्र ठरणार. जर केंद्र शासनाच्यास्तरावर
काही अडचणी भविष्यात या प्रमाणपत्रा संदर्भात उदभवल्यास त्याला सोडविण्याचा पुर्ण
प्रयत्न केंद्रातर्फे करण्यात येण्याचे आश्वासन श्री गहलोत यांनी दिले.
यासह
वर्ष 2016-17 ची थकीत शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मिळावी याविषयांवरही चर्चा झाली.
थकीत शिष्यवृत्तीची थकीत रकम केंद्राकडून शक्य तितक्या लवकर देण्यात येईल, असे
आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री श्री थावरचंद गहलोत यांनी दिले.
‘रमाई आवास योजने’अंतर्गत राज्यात १ लाख ६० हजार घरे बांधणार : राजकुमार बडोले
नवी दिल्ली, दि. 02 : ‘रमाई आवास योजने’अंतर्गत २०१९ पर्यंत राज्यात १ लाख ६० हजार घरे बांधण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात दिली.
श्री. बडोले यांनी आज परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी झालेल्या अनौपचारीक चर्चेत त्यांनी ही माहिती दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री. बडोले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी श्री. बडोले यांच्या पत्नी शारदा बडोले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री. बडोले यांचा मुलगा अनिकेत बडोले, उपसंपादक रितेश भुयार, दैनिक सामनाचे दिल्ली प्रतिनिधी निलेश कुलकर्णी, मंथन संस्थेचे आनंद रेखी यावेळी उपस्थित होते.
श्री. बडोले
म्हणाले, समाजाच्या मागास घटकातील जनतेला
पक्के घर बांधून देण्यासाठी राज्य शासन कटीबध्द आहे. त्यादिशेने राज्यात ‘रमाई आवास योजने’अंतर्गत प्रभावी अंमलबजावणी सुरु
आहे. येत्या तीन वर्षात या योजनेअंतर्गत १ लाख ६० हजार घरे बांधण्यात येणार
असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रमाई आवास योजना आणि शबरी
योजना या राज्य शासनाच्या योजना एकत्रितकरून सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणानुसार वर्ष
२०२२ पर्यंत सर्वांना पक्के घरे बांधून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी
सांगितले.
मागास समाजाच्या विकासाठी कार्यरत महात्मा फुले मागासवर्ग
विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य अपंग
वित्त व विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ,संत
रोहीदास चर्मोद्योग आणि चर्मकार महामंडळांच्या सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण निर्णय
घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जातपडताळणीचा विषय महत्वाचा असून या संदर्भात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी
ऑनलाईन जातपडताळणी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यात जातपडताळणी संदर्भात कायदा आणण्यात आला
असून त्यात महत्वपूर्ण तरतुदींची गरज असून यासंदर्भात काम सुरु असल्याचे त्यांनी
सांगितले. श्री.बडोले यांनी यावेळी सामाजिक न्याय मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात
येत असल्या विविध योजना व कार्यक्रमांविषयी माहिती दिली.
यावेळी परिचय केंद्राचे उपसंचालक श्री.कांबळे यांनी महाराष्ट्र परिचय
केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात
येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची
माहिती श्री. बडोले यांना दिली. श्री. बडोले यांना यावेळी महाराष्ट्र परिचय
केंद्राची प्रकाशने भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच
कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन श्री. बडोले यांनी माहिती जाणून घेतली. श्री.
बडोले यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामा बद्दल समाधान व्यक्त केले.
0000000
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले स्वीकारणार ‘दिव्यांगजन राष्ट्रीय पुरस्कार’
नवी दिल्ली, दि. २ : महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळास ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले हे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते स्वीकारणार आहेत.
केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय अपंग दिनाचे औचित्य साधून शनिवारी ३ डिसेंबर ला विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार वितरण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत होणा-या या सोहळयात महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय अपंग वित्त व विकास महामंडळाच्या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाला देशातील सर्वोत्कृष्ट प्राधिकृत वाहिनी म्हणून राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार जाहीर झाला. महामंडळाच्यावतीने राज्यातील बेरोजगार अपंग बांधवांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले व त्यांना प्रशिक्षण दिले आहे. कर्जाची प्रक्रिया ऑनलाईन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय श्री.बडोले यांनी घेतला. परिणामस्वरूप महामंडळाच्या कर्ज वसुलीत मोठया प्रमाणात वाढ झाली असून मागील २ वर्षात ३ हजारांहून अधिक दिव्यांग व्यक्तींना कर्ज पुरवठा करण्यात आला. कर्ज शिफारशींमधील अनियमीतता टाळण्यासाठी राज्यभर ‘लाभार्थी मुल्यमापन चाचणी’ लागू करण्यात आली. श्री. बडोले यांनी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर महामंडळाच्या कार्य प्रणालीत अमुलाग्र बदल झाले. राज्यातील दिव्यांग व्यक्तींकरीता राज्य स्तरीय दिव्यांग साहित्य कला व उद्योजकता संमेलनाचे आयोजन करण्यात आले. दिव्यांग उद्योजकांची यशोगाथा प्रकाशीत करण्यासाठी महामंडळाच्यावतीने ‘यशोगाथा’ नावाचे प्रकाशनही सुरु केले आहे. महामंडळाने दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेल्या विविध योजना आणि दिव्यांगांसाठी केलेल्या महत्वपूर्ण कार्यासाठी हा राष्ट्रीय सन्मान होत आहे.
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळासह राज्यातील संस्था व व्यक्तींचा राष्ट्रीय सन्मान
नवी दिल्ली, दि.२ : दिव्यांगांच्या
क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास
महामंडळासह राज्यातील ७ व्यक्ती व ४ संस्थांचा राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या
हस्ते शनिवारी, ३
डिसेंबर ला राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
केंद्रीय
सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय अपंग दिनाचे औचित्य
साधून विज्ञान भवनात राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी कार्यकरणा-या देशातील संस्था व व्यक्तींना १४
श्रेणींमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार
आहे. केंद्रीय मंत्र्यासह राज्याच्यावतीने
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले या कार्यक्रमास उपस्थित
राहणार आहेत .
दिव्यांगांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय
कार्यासाठी देशातील सर्वोत्कृष्ट राज्य प्राधिकृत वाहिनीचा राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाला प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय अल्प
दृष्टी प्रकारात लातूर जिल्हयातील अहमदपूर येथील गजानन बेलाले यांना पुरस्काराने
सन्मानीत करण्यात येणार आहे. नागपूर येथील डॉ. महंमद इर्फानूर रहीम यांना चलन वलन
विषय दिव्यांगांच्या श्रेणीत तर नागपूरच्याच राधा बोरडे इखनकर यांना सर्वोत्तम गैर
व्यवसायिक श्रेणीमध्ये सन्मानीत करण्यात येणार आहे. बहु दिव्यांग श्रेणीमध्ये पुणे
येथील निशाद शहा तर पुण्याच्याच अश्विनी मेलावाने यांना कर्ण बधिरांच्या श्रेणीत
सन्मानीत करण्यात येणार आहे. मुंबई येथील योगिता थांबे यांना दिव्यांगत्वासह
सर्वोत सर्जनशिल जेष्ट व्यक्तींच्या श्रेणीमध्ये सन्मानीत करण्यात येणार आहे.
मुळच्या नागपूरच्या आणि सध्या दिल्लीत स्थायीक देवांशी जोशी यांना सर्वोत्तम
दिव्यांग कर्मचारी म्हणून सन्मानीत करण्यात येणार आहे.
दिव्यांगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या
राज्यातील चार संस्थांचाही यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. सेरेब्रल पाल्सी
आजाराने ग्रस्त व्यक्तींसाठी कार्यकरणा-या लातूर येथील जनकल्याण समितीला यावेळी
सन्मानीत करण्यात येणार आहे. दिव्यांगाच्या मेहनतीने फुललेल्या सातारा जिल्हयातील
महाबळेश्वर तालुक्यातील ‘सनराईस कॅन्डल्स’
या संस्थेला सन्मानीत करण्यात येणार आहे. मुंबई येथील कुर्ला(पश्चिम) भागातील ‘एजीस लिमीटेड’ ला सर्वोत्तम गैर सरकारी
संस्थेच्या पुरस्काराने तर मुंबईतीलच विधीमंडळ भागातील स्टेट बँक ऑफ इंडियाचाही
सन्मान करण्यात येणार आहे.
००००००
Subscribe to:
Posts (Atom)





