Thursday, 31 March 2016

नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी ३ हजार ७५० कोटींचा करार

                  
नवी दिल्ली, दि. ३१: नागपूर मेट्रो प्रकल्पाला जर्मन बँकेकडून ३ हजार ७५० कोटी रूपयांचे कर्ज मिळणार आहे, यासंदर्भात १ एप्रिल २०१६ रोजी केंद्रीय आर्थिक व्यवहार विभाग व जर्मनीच्या केएफडब्ल्यु बँक यांच्यात करार होत आहे.
             येथील नॉर्थब्लॉकस्थित केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाच्या कार्यालयात दुपारी १२.३० वाजता  केंद्र शासनाचा आर्थिक व्यवहार विभाग, केएफडब्ल्यु बँक समूह आणि नागपूर मेट्रोरेल कॉर्पोरेशन लिमीटेड(एनएमआरसीएल)च्या वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत हा करार होणार आहे. करारानुसार नागपूर मेट्रोच्या कामांसाठी केएफडब्ल्यु बँक २० वर्ष मुदतीसाठी ३,७५० कोटी रूपये(५०० मिलीयन युरो) कर्ज स्वरूपात देणार आहे. कर्ज रूपाने उपलब्ध होणा-या रकमेतून नागपूर मेट्रोचे डबे, मेट्रो मार्ग, विद्युत पुरवठा, ट्रक्शन, बांधकाम आदी कामे करण्यात येणार आहे.

केंद्र सरकार आणि केएफडब्ल्यु बँके दरम्यान होणा-या करारानंतर नागपूर मेट्राचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याआधी नागपूर मेट्रोरेल कॉर्पोरेशन लिमीटेड आणि  केएफडब्ल्यु बँके दरम्यान नागपूर येथे प्रकल्प करार होणार आहे. महाराष्ट्र शासन,केंद्रीय नगर विकास मंत्रालय आणि केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या महत्वपूर्ण सहकार्याने केएफडब्ल्यु बँक समुहाकडून हे कर्ज उपलब्ध झाले आहे.  

 गेल्या वर्षी  जून महिन्यात केएफडब्ल्यु बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांनी नागपूरला भेट देऊन नागपूर मेट्रो प्रकल्पाचा सखोल अभ्यास केला होता. यानंतर सप्टेंबर २०१५ मधे केंद्र सरकार आणि केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने ओडीए प्लस लोनअंतर्गत नागपूर मेट्रोसाठी केएफडब्ल्यु बँक समुहाकडून ५०० मिलीयन युरोचे कर्ज स्वीकारण्यास मंजुरी दिली, अशी मंजुरी मिळविणारी नागपूर मेट्रो ही देशातील पहीली मेट्रो ठरली आहे.
                                                                  00000000







Wednesday, 30 March 2016

देवनार डम्पींग ग्राऊंडचा प्रश्न लवकरच सोडवणार ; प्रकाश जावडेकर



नवी दिल्ली, दि. ३० : एकात्मिक कचरा व्यवस्थापनाच्या प्रभावी अमंलबजावणीतून देवनार डम्पींग ग्राउंडचा प्रश्न सोडविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वने व पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. 
मुंबईतील देवनार डम्पींग ग्राऊंडला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयात श्री. जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित उच्चस्तरीय अधिका-यांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. बैठकीत महाराष्ट्र राज्य पर्यावरण विभागाच्या सचिव मालिनी शंकर, बृह्नमुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अजय मेहता,अतिरीक्त आयुक्त संजय मुखर्जी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव पी.अनबलगन आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
मुंबईसह देशातील कच-याच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार संवेदनशील असून या दिशेने महत्वाच्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे श्री. जावडेकर यांनी सांगितले. देवनार डम्पींग ग्राऊंडच्या ठिकाणी १ कोटी २० लाख टन कच-याचे २० ते ३५ मिटर उंचीचे ढिग निर्माण झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. आजच्या बैठकीत या समस्येवर एकात्मिक कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून उपाय काढण्याचे सूचविण्यात आले. या संदर्भात टाटा कन्सलटन्सी या कंपनीला सल्ला देण्याचे व निवीदा तयार करण्याचे काम सोपविण्यात आल्याचे श्री. जावडेकर यांनी सांगितले.
                                        मुलुंड डम्पींग साईट बंद करण्याबाबत १५ दिवसात निवीदा
मुंबई शहरातील मुलुंड डम्पींग साईट बंद करण्याचा निर्णय प्रगतीपथावर आहे. येत्या १५ दिवसात या संबंधात निवीदा काढण्यात येतील व पुढील कार्यवाही लवकरच सुरु करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
                                 कांझुर बायो मिथेनायजेशन प्रकल्पात सीआरझेड साठी परवानगी देणार
कांझुर येथील बायो मिथेनायजेशन प्रकल्पाने चांगली प्रगती केली आहे. कचरा व्यवस्थापनासाठी हा प्रकल्प महत्वाची भूमिका निभवत असून कच-यावर बायो मिथेनायजेशनची प्रकिया करण्यात येणा-या या प्रकल्पात सीआरझेडसाठी परवानगीची मागणी होत आहे. याबाबत आमच्या मंत्रालयाकडे प्रस्ताव आल्यास आमच्याकडून विनाविलंब परवानगी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बांधकामाच्या ठिकाणी निर्माण होणारी धूळ आणि कचरा व्यवस्थापनाबाबत पर्यावरण मंत्रालयाने नुकतेच नियम प्रकाशीत केले आहे. देशातील मोठया महानगरपालिकांनी आपल्या हद्दीतील बांधकामाच्या ठिकाणचा कचरा गोळा करून त्यावर नीटपणे प्रक्रिया केल्यास त्यातून पेवर ब्लॉक, पाईप आदी वस्तूंची निर्मिती केली जाऊ शकते. या दिशेने काम करण्याचे निर्देश मुंबई महानगर पालिकेला देण्यात आले असून त्यासंदर्भात तात्पूरते, मध्यकालीन व दिर्घकालीन उपाय योजना करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले आहेत. दर ३ महिन्यांनी या कामाचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
                                                                   00000000

Tuesday, 29 March 2016

चाकोरी बाहेरचे लेखन होण्याची गरज : बाबा भांड



                             
नवी दिल्ली, दि. २९ : लेखकांनी चोकोरीबध्द लेखन सोडून वेगवेगळया विषयांच्या मुळाशी जात लेखन करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, लेखक तथा प्रकाशक बाबा भांड यांनी केले.

        श्री. भांड यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी आयोजित अनौपचारिक गप्पांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या अवती-भोवती असे असंख्य विषय आहेत जे साहित्यापासून मैलो दूर आहेत. त्यांचा अभ्यास करून साहित्याच्या विविध प्रकारांमधून ते वाचकांपर्यंत पोहचले पाहीजे त्यासाठी लेखकाने आपल्या आवडीचा विषय निवडून यासंदर्भात काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. श्री. भांड यांनी बडोदा संस्थानचे प्रमुख सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या कार्यासंबंधित महत्वाच्या फाईल्स लंडन येथून आणल्या असून त्यावर ते लेखन करीत आहेत. सयाजीराव महाराजांनी आपल्या संस्थानामधे कित्येक वर्षांपूर्वीच सुरु केलेले सक्तीचे प्राथमिक शिक्षण, त्यांनी सुरु केलेली ग्रंथाली चळवळ, धार्मिक, शेती व सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान आदींची माहिती सामान्य वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी ते लेखन करीत आहेत.

            या अनौपचारीक गप्पांमधे औरंगाबाद जिल्हयातील पैठन तालुक्यातील वडजी गावापासून बाबा भांड यांचा लेखक म्हणून झालेला प्रवास. लागेबांधेया पहिल्यावहील्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी त्यांचे गुरु प्रसिध्द साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांनी दिलेले प्रोत्साहन व  मार्गदर्शन ते त्यांनी लिहीलेल्या ८५ पुस्तकांबद्दल या गप्पांमधून उपस्थितांना माहिती  मिळाली. त्यांनी यावेळी साहित्याच्या विविध प्रकारांवर व लिखानावर प्रकाश टाकला.

            परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी श्री. भांड यांचे पुष्पगुच्छ व परिचय केंद्राचे प्रकाशने भेट देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसंपादक रितेश भुयार यांनी केले. परिचय केंद्राचे अधिकारी -कर्मचारी , ग्रंथालयाच्या अभ्यासिकेचा लाभ घेणारे विद्यार्थी, वाचक व अभ्यासक यावेळी उपस्थित होते.   
                                                                00000000

Monday, 28 March 2016

63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा : ‘रिंगण’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट





नवी दिल्ली, 28 : 63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा सोमवारी झाली असून सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान सर्वात महागडा चित्रपट बाहुबली द-बिगिनिंग या तेलगू चित्रपटला मिळाला. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट रिंगण तर सर्वोत्कृष्ट गायक महेश काळे यांची कट्यार काळजात घूसली या चित्रपटाच्या गायनासाठी निवड करण्यात आली.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अरूण जेटली यांना आज 63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समितीच्या तीन सदस्यीय परीक्षकांच्या गटाने पुरस्कार विजेत्यांची यादी प्रदान केली. यानंतर राष्ट्रीय माध्यम केंद्र येथे परीक्षक मंडळाचे अध्यक्ष रमेश सिप्पी यांनी पुरस्कारांची घोषणा केली.

63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठी चित्रपटांनी मारली बाजी

63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठी चित्रपटाने बाजी मारली आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट रिंगण ठरला तर सर्वोत्कृष्ट गायक महेश काळे यांची कट्यार काळजात घूसली या चित्रपटाच्या गायनासाठी निवड झाली आहे. उत्कृष्ट शैक्षणिक लघूपटासाठी मिथुनचंद्र चौधरी यांच्या पायवाट या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. अमोल देशमुख यांच्या औषध या लघूपटाला सर्वोत्कृष्ट लघूपटासाठी निवडण्यात आले आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटया चित्रपटाची अभिनेत्री रिंकू राजगुरू यांची चित्रपटातील विशेष उल्लेखनीय कामगिरीसाठी निवड करण्यात आली आहे.



बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांची पिकू चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड झाली आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कंगना रणावतला तनू वेड्स मनू रिटर्न्स या चित्रपटातील अभियासाठी निवड करण्यात आली आहे. सलग दुस-यांदा कंगना रणावतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळणार आहे. मागच्या वर्षी क्वीन्स या चित्रपटाकरिता कंगणा रणावतला पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

बाजीराव मस्तानी या चित्रपटाचे दिग्दर्शक संजयलीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून निवडण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून दम लगा के हैशा याची निवड करण्यात आली. बजरंगी भाईजान या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट म्हणून निवड करण्यात आली. बाजीराव मस्तानी या चित्रपटाच्या नृत्यासाठी नृत्यदिग्दर्शक रिमो डिसुझा यांची निवड करण्यात आली. संवाद लेखनाकरिता पिकू साठी जुही चतुर्वेदी तर तन्नू वेड्स मन्नू रिर्टन्स साठी हिमांशू शर्मा या दोघांची निवड करण्यात आली. गीतकार वरूण ग्रोव्हर यांना दम लगा के हैशा या चित्रपटातील मोह मोह के धागे या गाण्याकरिता निवड करण्यात आली आहे. सुजीत सावंत यांची बाजीराव मस्तानी’  चित्रपटातील प्रोडक्शन डिसाइनसाठी निवड करण्यात आली आहे. बेस्ट ज्यूरीसाठी कल्की यांची निवड करण्यात आली. बाहुबली द-बिगिनिंग या चित्रपटाची विशेष पुरस्काराकरीताही निवड करण्यात आली आहे. चित्रपट प्रेमी राज्य म्हणून गुजरात राज्याची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील ९ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान























नवी दिल्ली, दि. २८ : राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते आज पद्मपुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्रातील ९ मान्यवरांचा यात समावेश आहे.  
  
राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शानदार कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनिय योगदान देणा-या देशातील ५६ मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून एका मान्यवरांस मरणोत्तर पद्मविभूषण, २ मान्यवरांना पद्मभूषण तर ६ मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी उपराष्ट्रती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी ,केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
             पद्म पुरस्कारांचे  वितरण दोन  टप्प्यात करण्यात येते. आज पहिल्या टप्प्यात ५६ मान्यवरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. देशाच्या उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिवंगत प्रसिध्द उद्योजक धिरूभाई अंबानी यांना पद्म पुरस्कारातील सर्वोच्च मानला जाणारा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. धिरुभाई अंबानी यांच्या पत्नी कोकीलाबेन अंबानी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. आज एकूण ५ पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले.
            या समारंभात एकूण ८ पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले पैकी महाराष्ट्रातील २ मान्यवरांचा यात समावेश आहे. कला व चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी प्रसिध्द अभिनेते अनुपम खैर यांना तर वास्तूशास्त्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हाफिज कॉन्ट्रक्टर यांना सन्मानीत करण्यात आले.

या समारंभात एकूण ४३ पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले पैकी महाराष्ट्रातील ६ मान्यवरांचा यात समावेश आहे. कला व चित्रपट क्षेत्रातील उत्तम योगदानासाठी प्रसिध्द दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि प्रसिध्द अभिनेते अजय देवगण यांना सन्मानीत करण्यात आले. जाहीरात व संवाद क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी  पियुष पांडे यांना, व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी  दिलीप संघवी  यांना, शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रगत शेतकरी सुभाष पाळेकर आणि विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रा.(डॉ.) गणपती दादासाहेब यादव यांना सन्मानीत करण्यात आले.

या कार्यक्रमात कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी महाराष्ट्रातील धुळे जिल्हयात जन्मलेले प्रसिध्द शिल्पकार राम सुतार यांना पद्मभूषण पुरस्काराने तर गोव्यातील प्रसिध्द शास्त्रीय गायक पंडीत तुळशीदास बोरकर यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

गणतंत्र दिनाच्या पूर्व संध्येला यावर्षी देशातील पद्म पुरस्कार प्राप्त ११२ मान्यवरांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण १६ मान्यवरांचा समावेश आहे, पैकी एक मरणोत्तर पद्मविभूषण, ५ मान्यवरांना पद्मभूषण तर १० मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले.
                                                                  00000000

Wednesday, 23 March 2016

राजधानीत शहीदांना अभिवादन








नवी दिल्ली दि. 23 :  शहीद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांना आज शहीद दिनानिमित्त  राजधानीत अभिवादन करण्यात आले.

कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात अपर निवासी आयुक्त समीर सहाय यांनी शहीदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, सहायक निवासी आयुक्त राजीव मलिक, सहायक निवासी आयुक्त संजय आघाव, सहायक निवासी आयुक्त अजित सिंग नेगी, यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
स्वातंत्र्य लढयात आपल्या प्राणांची आहुती देणा-या शहीद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांना महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपसंचालक श्री कांबळे, माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे तसेच लघु लिपीक कमलेश पाटील यांनी आजच्या दिनाचे औचित्य तसेच स्वातंत्र्य लढयात शहीदांनी निभावलेली महत्वपुर्ण भुमिका याचा पुनरोच्चार केला. यावेळी कार्यालयात आलेले अभ्यगंतासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Thursday, 17 March 2016

खासदार संजयकाका पाटील यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट









                           
नवी दिल्ली दि. १७ : सांगली जिल्हयाचे खासदार संजयकाका पाटील  यांनी गुरूवारी  महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी परिचय केंद्राच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून देण्यात येणा-या माहितीचे कौतुक केले.

            परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. पाटील यांचे स्वागत केले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामाची माहिती घेताना श्री. पाटील यांनी कार्यालयाच्या ट्वीटर हँडल, फेसबुक, ब्लॉग, गुगलप्लस, युटयुब अकाउंटच्या माध्यमातून देण्यात येणा-या बातम्या व महत्वाच्या माहितीच्या उपक्रमाबाबत जाणून घेतले. आधुनिक माध्यमांच्या युगात कार्यालयाने चालविलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत श्री. पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी दिली. दैनिक सामनाचे दिल्ली प्रतिनिधी निलेश कुलकर्णी आणि रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया() चे  उपाध्यक्ष महेंद्र शिर्के यावेळी उपस्थित होते. श्री. पाटील यांना महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना श्री. पाटील  यांनी भेट देऊन माहिती  घेतली .                                           

            000000 

Wednesday, 16 March 2016

महाराष्ट्रातील सातारा आणि नंदूरबार जिल्‌ह्यांना ‘कायाकल्प’ पुरस्कार

         

नवी दिल्ली, 16 : रूग्णालयातील स्वच्छतेसाठी  कायाकल्प अंतर्गत देण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये राज्यातील सातारा जिल्हा रूग्णालयाला प्रथम आणि नंदूरबार जिल्हा रूग्णालयाला व्दितीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने येथील नवी दिल्ली महानगर पालिका सभागृहात या पुरस्कार वितरण सोहळाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंचावर केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव बी.पी. शर्मा, अतिरीक्त सचिव आरोग्य विभाग डॉ. अरूण कुमार पांडा, आरोग्य सेवेचे महासंचालक डॉ. जगदीश प्रसाद,  सह सचिव (पॉलीसी) मनोज झलाणी उपस्थित होते.
केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर देश पातळीवरील रूग्णालय तसेच राज्यपातळीवरील रूग्णालयातील स्वच्छतेबाबत कायाकल्प ही योजना 15 मे 2015 ला घोषीत केली. यातंर्गत रूग्णालयातील स्वच्छतेबाबत विविध मापदंड ठेवण्यात आले. जसे रूग्ण तपासणी, रूग्णांच्या मुलाखती, रूग्णालयाची आतील तसचे परीसर स्वच्छता, वैद्यकिय जैविक कच-याची विल्हेवाट, रूग्णालयातील कर्मचा-यांच्या मुलाखती, कर्मचा-यांचे मुल्याकंन असे विविध स्तरावर तपासणी करण्यात आली. या करिता रूग्णालयातील प्रमुखांना प्रशिक्षणही देण्यात आले होते. ज्या रूग्णालयांनी सर्व मापदंडांना पूर्ण केले त्यांना आज पुरस्कृत करण्यात आले.
राज्यातील सातारा जिल्हा रूग्णालयाला प्रथम पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप 50 लाख रूपये रोख, कायाकल्पचे मानचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. उपविजेतेचा पुरस्कार नंदूरबार जिल्हा रूग्णालयाला मिळाला. हा पुरस्कार जिल्हा चिकित्सक डॉ. श्रीकांत भोये यांनी स्वीकारला. या पुरस्काराचे स्वरूप 20 लाख रूपये रोख, कायाकल्पचे मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे आहे. आरोग्य विभागाचे सचिव बी.पी. शर्मा यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.


सातारा जिल्ह्याचे तत्कालीन शल्य चिकित्सक डॉ. जगदाळे यांनी  पुरस्कार प्राप्ती नंतर मनोगत व्यक्त करत सांगितले, आम्ही केलेल्या कार्याला योग्य न्याय मिळाला. या पुरस्कारामुळे सातारा जिल्हा रूग्णालयाने  राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख निर्माण केली.

नंदूरबार सारख्या दूर्गम भागातील जिल्हा रूग्णालयाला मिळालेल्या या पुरस्कारामुळे आनंद झाला आहे. तसेच दूर्गम भागातील रूग्णालयही स्वच्छतेची सर्व मापदंड पाळतात हा संदेश राष्ट्रीय पातळीवर पोहचल्याचे’, आपल्या मनोगतात डॉ. श्रीकांत भोये म्हणाले.

Tuesday, 15 March 2016

खासदार संजय जाधव यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट



नवी दिल्ली दि. १५ : मराठवाडयासह राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना मी हार-पुष्पगुच्छ कसे स्वीकारणार ?.’ हा भावूक स्वर ऐकूण मंगळवारी महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी-कर्मचारी आणि उपस्थित पत्रकार यांना त्यांच्या संवेदनशील स्वभावाची प्रचिती आली. प्रसंग होता परभणी जिल्हयाचे खासदार संजय जाधव यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला दिलेल्या भेटीचा.

            महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया अंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राला लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, साहित्यिक, विद्यार्थी आदींचा सतत राबता असतो. कार्यालयाच्या शिरस्त्या प्रमाणे येथे येणा-या पाहुण्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्याची परंपरा आहे. आज कार्यालयास खा. संजय जाधव यांनी भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी  श्री. जाधव यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ देऊ केले तेव्हा, श्री. जाधव यांनी त्यास नकार दिला. ते म्हणाले, मराठवाडयासह राज्यात दुष्काळाची परिस्थिती  असल्याने मी स्वागताचा बडेजाव स्वीकारने बंद केले आहे, हे ऐकूण उपस्थितांना श्री. जाधव यांच्या संवेदनशील स्वभावाचा परिचय आला. श्री. जाधव यांनी परभणी जिल्हयातील दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या ३०० हून अधिक मुला-मुलींची लग्ने लावून ते थांबले नाहीत तर त्यांचे संसार उभे करण्याचे काम त्यांनी केले आहे.

यावेळी श्री. कांबळे यांनी  महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. जाधव यांना दिली. यावेळी श्री.जाधव  यांना महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने भेट स्वरूपात देण्यात आली. दैनिक सामनाचे दिल्ली प्रतिनिधी निलेश कुलकर्णी, दैनिक पुढारीचे दिनेश कांजी, राहुल पारचा, अनिल जोशी यावेळी उपस्थित होते. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना श्री. जाधव  यांनी भेट देऊन चौकशी केली.  

                                                                      000000 

Monday, 14 March 2016

शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट




नवी दिल्ली, 14 : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या व जनसंवादशास्त्र विभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सोमवारी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. त्यांनी यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची माहिती जाणून घेतली.       
     
दिल्ली अभ्यास दौर्‍यावर असणार्‍या या २५ विद्यार्थी व विद्यार्थीनींनी पत्रकारिता विभागाचे समन्वयक अनिल देशमुख यांच्यासह आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

        यावेळी औपचारिक वार्तालापही झाला. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची वैविध्यपूर्ण माहिती उपसंचालक दयानंद कांबळे यांनी दिली. महाराष्ट्र सदनात कार्यरत खासदार कक्षाद्वारे साधण्यात येणारा समन्वय व महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय, दिल्लीस्थित मराठी व अन्य प्रादेशिक, राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आणि परिचय केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शासनाचा जनसंपर्क साभांळताना घ्यावी लागणारी खबरदारी आदींची उदाहरणांसहीत माहितीही श्री.कांबळे यांनी दिली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसंपादक रितेश भुयार यांनी केले तर विद्यार्थीनी अमृता जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.  
                                                    0000000

Saturday, 12 March 2016

जागतिक सांस्कृतिक महोत्सवात मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित


नवी दिल्ली, 12 : ‘आर्ट ऑफ लिव्हींग या संस्थेला ३५ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आयोजित जागतिक सांस्कृतिक  महोत्सवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. 

रशियातील व्यापार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रण



नवी दिल्ली, 12 : रशियाच्या स्वर्द लोस्क प्रांताचे गव्हर्नर येवेगेनी कुयाशेव यांनी शनिवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘इनोप्रोम 2016’ आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे निमंत्रण  दिले.

गव्हर्नर येवेगेनी कुयाशेव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र सदन येथे मुख्यमंत्री  फडणवीस यांची  भेट  घेतली .  दिनांक 11 ते 14 जुलै 2016  दरम्यान रशियातील एकातेरेनबर्ग येथे आयोजित करण्यात येणा-या ‘इनोप्रोम 2016’ आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे निमंत्रण यावेळी  गव्हर्नर येवेगेनी कुयाशेव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. भारत या व्यापार मेळाव्याचा सहयोगी देश आहे. यावेळी झालेल्या बैठकीत  उभय नेत्यांनी  महाराष्ट्र आणि स्वर्द लोस्क प्रांता दरम्यान विविध क्षेत्रात सहकार्य  करण्याबाबत  चर्चा  केली .  

            मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी गव्हर्नर येवेगेनी कुयाशेव यांना वारली  पेंटींग आणि नाशिक येथे पारपडलेल्या कुंभ मेळयाचे कॉफी टेबल बुक भेट स्वरूपात दिले .   

00000

Friday, 11 March 2016

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती राजधानीत साजरी


नवी दिल्ली, 12 मार्च महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात  साजरी करण्यात आली.
कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, सहायक निवासी आयुक्त संजय आघाव, सहायक निवासी आयुक्त अजित सिंग नेगी तसेच सदनात निवासी असलेले   गणमान्य व्यक्तींसह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

परिचय केंद्रात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

महाराष्ट्र परिचय केंद्रात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी. याप्रसंगी माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित कर्मचा-यांनेही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहीली.

राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील तीन भाषा तज्ज्ञांचा सन्मान


नवी दिल्ली, 11 : राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील तीन भाषा तज्ज्ञांचा सन्मान आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.
केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रातील पं.श्रीकृष्णशास्त्री काशीनाथशास्त्री जोशी (कोडणीकर), डॉ. प्रसाद प्रकाश जोशी आणि डॉ. धम्मदीप पंढरी वानखेडे यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
साता-याचे पं. श्रीकृष्णशास्त्री जोशी (कोडणीकर) यांना संस्कृत भाषा लोकप्रिय करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी गौरविण्यात आले. श्री जोशी यांनी न्यायशास्त्र, काव्य, वेदांत्तसार आणि  ऋग्वेदाचे अध्यन केले. कर्नाटकाच्या संकेश्वरपीठातून न्यायरत्न, पुराणशास्त्र-कोविद तथा ब्राह्णणबहुभाषिक संघ, मैसुरामधील अवधूतदत्तपीठातून शास्त्रनिधि, कराडमधून ब्रह्यश्री पदवी प्राप्त केली. 45 वर्षापासून साता-यातील शंकराचार्य वेदशास्त्र शाळेमध्ये ते अध्यापन कार्य करीत आहेत. तसेच वेगवेगळया ठिकाणी कार्यक्रम घेऊन ते पुराण प्रवचन, देवी भागवत पारायण, रामायण कथा आणि भावगत कथेचे वाचन करतात. संस्कृत भाषेला जोपासण्याचे तसेच वाढविण्याचे काम श्री जोशी करीत आहेत.
डॉ. प्रसाद जोशी यांनी पुण्यातील भारतीय  विद्या भवनव्दारे आयोजित संस्कृत भाषा कोविद ही परीक्षा उत्तीर्ण केली. यासह श्री जोशी यांनी वैदिक व्याकरणामधेही विद्यावारिधि ही पदवी प्राप्त केली. पुण्यातील वेद शास्त्रोत्तेजक  सभेतून संस्कृत चूड़ामणि आणि पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयातून भाषाशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. फर्ग्यूसन कॉलेजमध्ये श्री जोशी यांनी 7 वर्ष संस्कृतचे विभाग प्रमुख म्हणून कार्य केले असून यादम्यान श्री जोशी यांनी संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध चर्चा सत्र, परिषदेत, कार्यशाळेत भाग घेतला. आतापर्यंत श्री जोशी यांचे 17 शोध प्रबंध 10 आलेख प्रकाशित झाले आहेत. श्री जोशी यांनी वेदिक एओरिस्ट एण्ड पाणिनि या नावाने ग्रंथ लिहीला आहे. याशिवाय एन आडटलाइन ऑफ प्राकृत लिटरेचर ग्रंथाचे अनुवादही केले. मागील 16 वर्षापासून डेक्कन कॉलेज विद्यापीठाव्दारे संचालित संस्कृत शब्दकोश समितीशी ते जुळलेले आहेत. सध्या ते डेक्कन कॉलेज विद्यापीठामध्ये संस्कृत व कोश शास्त्र विभागात सहायक सम्पादक म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. धम्मदीप पंढरी वानखेडे हे पाली भाषेतील तज्ञ आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पालीभाषेत एम.ए. आणि राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पीएच-डी केली आहे. श्री वानखेडे यांनी बौध्द तर्कशास्त्राची रूपरेषा मराठीत तर विश्व क्षिजित पर बौध्दधर्म हिंदीत पुस्तक लिहीली आहे. यासह परमत्थदीपनी, अनुदीपनी, आणि निरत्तिदीपनी या बौध्द धर्माशी संबधीत महत्वपुर्ण ग्रंथाचे संपादन केले आहे. पाली व बौध्द अध्ययन संस्था गुलबर्गा विद्यापीठ, कलबुर्गि कर्णाटक येथे अतिथी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

Wednesday, 9 March 2016

‘भारत समुद्र परिषदेच्या’ माध्यम मोहिमेचा गडकरींच्या हस्ते आरंभ

           

नवी दिल्ली, ०९:  मुंबई येथे दिनांक १४ ते १६ एप्रिल २०१६ दरम्यान केंद्रीय जहाजबांधणी मंत्रालयाच्यावतीने आयोजित करण्यात येणा-या भारत समुद्र परिषद २०१६ च्या माध्यम मोहिमेचे उदघाटन बुधवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

         येथील राष्ट्रीय माध्यम केंद्राच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात श्री. गडकरी यांनी ही घोषणा केली. जहाजबांधणी मंत्रालयाचे सचिव राजीव कुमार आणि राष्ट्रीय माध्यम केंद्राचे महासंचालक ए.पी.फ्रँक नरोहा यावेळी उपस्थित होते.       

            यावेळी गडकरी म्हणाले, भारतीय समुद्र क्षेत्रात गुंतवणुकीला मोठया प्रमाणात संधी आहे. भारत समुद्र परिषद २०१६ च्या माध्यमातून  जगभरातील गुंतवणूकदारांना आमंत्रित करून देशाच्या समुद्र क्षेत्राचा विकास करण्याचा प्रयत्न आहे. आज या परिषदेच्या माध्यम मोहिमेचा अधिकृत आरंभ झाल्याचे सांगत गडकरी म्हणाले, महिनाभर चालणा-या माध्यम मोहिमेच्या माध्यमातून देश आणि विदेशात प्रिंट, इलेक्ट्रॉनीक आणि आऊट डोअर पब्लिसीटीच्यामाध्यमातून जनतेपर्यंत माहिती पोहचविण्यात येणार आहे. भारतीय समुद्र क्षेत्रात असलेल्या गुंतवणूक क्षमतेकडे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. समुद्र क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे देशात मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून देशाच्या अर्थव्यवस्थेला गती येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

            भारत समुद्र परिषद २०१६ ची माहिती देण्यासाठी www.maritimeinvest.in या अधिकृत संकेतस्थळाचे गेल्या महिन्यात मुंबईत आयोजित मेक इन इंडियासप्ताहात उदघाटन करण्यात आले.  भारतीय समुद्र क्षेत्राच्या क्षमतांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कोलकत्ता, चैन्नई, हैद्राबाद आणि अहमदाबाद येथे रोड शो चे आयोजन करण्यात आले आहे अशी माहितीही गडकरी यांनी दिली. समुद्र क्षेत्रात अग्रेसर असणा-या देशांच्या दुतावासांमधे अधिका-यांसोबत बैठका करून या परिषदेत त्यांचे प्रतिनिधीत्व वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दक्षिण कोरिया, नॉर्वे, सिंगापूर, संयुक्त अरब अमीरात, इंग्लड, युरोपीयन युनीयन, फ्रांस हे समुद्र क्षेत्रात आघाडीवर असलेले देश या परिषदेत सहभागी होणार आहेत.

            मुंबईच्या गोरेगाव भागातील बॉम्बे कव्हेंशन अँड ऐक्सिबीशन सेंटर मधे दिनांक १४ ते १६ एप्रिल २०१६ दरम्यान  भारत समुद्र परिषद २०१६ चे आयोजन करण्यात येणार आहे. रिपब्लिक ऑफ कोरिया या परिषदेचा सहभागी देश असणार आहे. या परिषदेत सहभागी देश व कंपन्यांना भारतीय समुद्र क्षेत्रात व्यवसाय व गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होणार आहे. दिनांक १४ आणि १५ एप्रिल रोजी या परिषदेत विविध करार होणार आहेत. जहाजबांधणी, जहाज दुरूस्ती,जहाज पुनर्बांधणी, बंदरांचे आधुनिकीकरण आणि बंदर विकास, बंदर आधारित औद्योगिक विकास आदींबाबत प्रदर्शन व चर्चासत्रांचे  आयोजन या परिषदेत करण्यात येणार आहे.  

                                       
                                       ००००००००